24 February 2019

News Flash

कल्पिताचा चक्रव्यूह

ही कादंबरी वाचताना वाचक स्वस्थ बसू शकत नाही. त्याला सतत निवड करत राहावी लागते.

‘लोकेला’ लेखक : कालरेस लाबे  प्रकाशक : ओपन लेटर बुक्स

निखिलेश चित्रे

‘मेटाफिक्शन’ प्रकारातल्या खेळकर कादंबरीविषयी..

कार्लोस लाबे (Carlos Labbe) या चिलियन लेखकाच्या ‘लोकेला’ (Loquela) या कादंबरीच्या पहिल्याच वाक्यात मुख्य पात्राचं नावही ‘कार्लोस’च आहे, हे वाचकाला कळतं आणि आपसूकच त्याच्या मनात पुढे काय वाचायला मिळणार, याविषयी काही धारणा आकार घेतात. स्वत:च्या आयुष्यातल्या घटनांचा वापर कादंबरीच्या कच्च्या मालासारखा करणाऱ्यांपैकी हा लेखक असावा, अशी शंका डोकं वर काढते. मुद्दामच स्वत:चं नाव त्यानं मुख्य पात्राला दिलं असावं आणि त्यालाही लेखक केलं असावं. म्हणजे वाचणारा प्रत्येक वेळी हे खरं की कल्पित अशा संभ्रमात राहील, असे विचारही मनात येऊन जातात. अशी कादंबरी वाचकाशी सतत वास्तव आणि कल्पिताच्या सरहद्दीचा खेळ करत राहते. तिचा निवेदक बहुतांशी प्रथमपुरुषी असतो. तो भटकणारा, संवेदनशील, कलावंत वगैरेही असण्याची शक्यता असते. जागतिक साहित्यात अनेक श्रेष्ठ लेखकांनी अशा प्रकारे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यातल्या काही वाचनीय आणि दर्जेदारही आहेत. डब्ल्यू. बी. सेबाल्ड हा जर्मन वा सेर्गिओ पितोल हा मेक्सिकन लेखक यांनी तर कायम याच पद्धतीने लेखन केलं.

‘लोकेला’ ही कादंबरीही त्याच प्रकारची असणार असा आपला ग्रह होतो आणि तिथूनच ही कादंबरी आपले सगळे पूर्वग्रह पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करायला सुरुवात करते. कारण कार्लोस लाबे याला वास्तवाचं कल्पित कृतीत रूपांतर करण्यात रस नाही. त्याला कल्पिताच्या विविध आयामांचा धांडोळा घ्यायचा आहे. मुख्य पात्राला स्वत:चं नाव देणं, हा केवळ या शोधाचा पहिला टप्पा आहे, हे आपल्या क्रमश: लक्षात येत जातं. आख्यानपद्धतीच्या वेगवेगळ्या गुंतागुंती निर्माण करून त्यांच्याशी खेळणं हा या लेखकाचा छंद आहे. त्याच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या ‘नाविदाद अ‍ॅण्ड मातान्झा’ या पहिल्या कादंबरीतूनही त्याची चुणूक दिसली होती. ‘लोकेला’चं स्वरूपही एखाद्या खेळासारखं आहे. अनेक स्तर आणि मिती असलेल्या या कादंबरीच्या संरचनेविषयी थोडक्यात काही सांगणं तसं कठीणच. कारण त्यामुळे व्यामिश्रता नष्ट होण्याची शक्यता आहे. तरीही त्यातली गुंतागुंत लक्षात घेणं आवश्यक आहे.

कादंबरीचा नायक कार्लोस नामक लेखक आहे. हा लेखक आपण वाचत असलेली ‘लोकेला’ ही कादंबरी लिहितो आहे. त्या कादंबरीतल्या पात्रांना त्याच्या पात्रं असण्याची जाणीव आहे. ती त्यांच्या संभाषणांमधून व्यक्त होते. या पात्रांमध्ये पुन्हा कार्लोस नावाच्या लेखकाचं पात्र आहे. ‘या कादंबरीचं स्वरूप नेमकं कसं आहे, हे समजण्यासाठी मला जरा कादंबरीबाहेर येऊन तिच्याकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे,’ असं तो एके ठिकाणी म्हणतो. ही गुंतागुंत कमी म्हणून की काय, कादंबरीतली काही पात्रं वास्तवात वावरायला लागतात. कार्लोस लिहीत असलेली कादंबरी ही एक रहस्यकथा आहे. या रहस्यकथेतली उत्कंठा वाढवण्यासाठी खून, मारामाऱ्या, पाठलाग- अशी सगळी हुकुमी तंत्रं लेखक वापरतो. कादंबरीच्या संरचनेतला खेळकरपणा या रहस्यकथेमुळे अधोरेखित व्हायला मदत होते. रहस्याचा उलगडा करण्यासाठी वाचक स्वत:ला कार्लोसच्या, म्हणजेच लेखक-पात्राच्या भूमिकेत ठेवून पाहतो. त्यातून हा खेळ अधिक रंगतदार होत जातो. वाचक- लेखक- निवेदक या तिन्ही पातळ्या एकमेकींना छेदत राहतात. त्यातून आरशापुढे आरसा धरल्यावर निर्माण होणाऱ्या असंख्य प्रतिबिंबांच्या एकात एक चौकटी दिसायला लागतात. कादंबरीतली पात्रं वास्तववादी कादंबरीतल्या पात्रांसारखी विशिष्ट स्थळ आणि काळाला बांधलेली नाहीत. ती जणू अनेक समांतर विश्वांमध्ये ये-जा करत आहेत. असं असलं, तरी ती निर्जीव आणि सपाट नाहीत. त्यांचं चित्रण लेखकानं बारकाईनं व मन लावून केलेलं दिसतं. त्यांचे विशिष्ट स्वभाव, लकबी आणि तऱ्हेवाईकपणा जिवंतपणे चित्रित झाला आहे. अर्थात, तो स्वत:ही त्यांच्यापैकीच असल्याने त्याला या पात्रांविषयी जास्त ममत्व वाटत असावं.

‘लोकेला’ वाचताना ‘मिझ आँ अबिम’ (Mise en abyme) या फ्रेंच संज्ञेची आठवण होते. स्वत:चीच प्रतिकृती पोटात घेतलेली कलाकृती आणि त्यातून सूचित होणारी अनंतता व्यक्त करण्यासाठी ही संज्ञा वापरली जाते. तिचा शब्दश: अर्थ ‘असीम पोकळीत ठेवणं’ असा होतो. ‘मिझ आँ अबिम’चा जाणीवपूर्वक केलेला पहिला वापर प्रतिभावंत स्पॅनिश चित्रकार दिएगो वेलास्केस याच्या सतराव्या शतकातल्या ‘लास मेनिनास’ या विख्यात चित्रात आढळतो. त्यात छोटी राजकन्या आणि तिच्याभोवती असलेलं सेविकांचं कोंडाळं दिसतं. मागे असलेल्या मोठय़ा आरशात वेलास्केस स्वत: हे चित्र रंगवताना दिसतो. आरशातल्या आरशाप्रमाणे प्रतिमांचा गुणाकार सूचित करणारं हे चित्र वास्तव व कल्पित याच्या बहुपेडी नात्यावर केलेलं भाष्यच आहे.

दृश्यकलांसाठी वापरली जाणारी ‘मिझ आँ अबिम’ ही संज्ञा फ्रेंच लेखक आन्द्रे जीद यानं पहिल्यांदा साहित्याच्या संदर्भात वापरली. त्यातूनच पुढे ‘मेटाफिक्शन’ ही संकल्पना उगवली. मेटाफिक्शन म्हणजे ‘कल्पित साहित्य ज्याच्या केंद्रस्थानी आहे असं कल्पित साहित्य’! हे साहित्य स्वत:च्या साहित्य असण्याबद्दल सजग असतं. त्यात रचण्याची प्रक्रिया वाचकासमक्षच घडत असते. एवढंच नव्हे, तर वाचकानं या प्रक्रियेत सहभागी होणं अपेक्षित असतं. मेटाफिक्शनचे घटक ‘महाभारत’ किंवा ‘ओडिसी’सारख्या महाकाव्यांमध्येही आढळतात. मात्र साहित्यात, विशेषत: कादंबरीत त्या घटकांचा जाणीवपूर्वक वापर साठच्या दशकापासून सुरू झाल्याचं दिसतं. जुलियो कोर्तासार या अर्जेन्टाइन लेखकाच्या ‘हॉपस्कॉच’ या कादंबरीत वर उल्लेख केलेली स्वसंवेद्यता आणि खेळकरपणा यांचा साधन म्हणून प्रभावी वापर केलेला दिसतो.

‘लोकेला’ची संरचना अशीच स्वसंवेद्य आहे. ही कादंबरी वाचकासमोर स्वत:ला रचत जाते आणि असं करताना स्वत:ला उसवत जाते. तिची घडण वाचकसापेक्ष असल्यामुळे प्रत्येक वाचक त्यात स्वत:ची भर घालतो. कादंबरीत एक पात्र वाचकाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हणतं : ‘मी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की एखाद्या असीम पोकळीत, हे तूच ठरव. मी व्यक्ती आहे, पात्र आहे, प्रतिमा आहे की केवळ संकल्पना, हे तुझ्यावरच अवलंबून आहे. तू वाचायचा थांबलास की मी मरणार हे नक्की.’

लिहिली जात असलेली कादंबरी आणि लेखकाचं वास्तव ही दोन विश्वं कादंबरीत आलटूनपालटून येतात. सम क्रमांकाची प्रकरणं लिहिल्या जाणाऱ्या कादंबरीची, तर विषम क्रमांकाची लेखकाच्या आयुष्याची, अशी विभागणी लेखकानं केलेली आहे. मात्र तिची अर्थपूर्णताही फसवी आहे. कारण ही दोन्ही विश्वं एकमेकांत गुंतलेली आहेत. निखळ नाहीत.

ही कादंबरी वाचताना वाचक स्वस्थ बसू शकत नाही. त्याला सतत निवड करत राहावी लागते. तो सक्रिय बनतो. ज्याप्रमाणे व्हिडीओ गेम खेळताना खेळणारा विविध पर्यायांतून निवड करत पुढच्या पातळीवर जातो, तसंच या कादंबरीत वाचकाला प्रकरणांची निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र हे स्वातंत्र्य फसवं आहे. कारण त्याचे नियम एखाद्या खेळाप्रमाणे पूर्वनियोजित आहेत. वाचकाला त्या नियमांचं पालन करावं लागतं. तसं केलं तरच खेळाचा आनंद घेता येतो. आपल्या रोजच्या जगण्यातल्या वैतागांवर उपाय म्हणून कादंबरीत अशी गुप्त व्यवस्था राबवणं आपल्याला अर्थपूर्ण वाटतं, असं कालरेस लाबेनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

या कादंबरीची निर्मितीकथाही रोचक आहे. कार्लोस लाबे महाविद्यालयात असताना त्याला रहस्यकथा लिहायची खूप इच्छा होती. त्याने एक रहस्यकथा लिहायला घेतली खरी, परंतु ती मनासारखी लिहून होत नव्हती. रहस्यकथेच्या फॉर्मचं पालन करताना आपल्याला हवं ते सांगता येत नाहीये, असं त्याला वाटलं. म्हणून त्यानं लेखकाच्या पात्राचा आवाज निर्माण करून कादंबरीत घातला. हे लेखक-पात्र त्याच्यासारखंच रहस्यकथा लिहायची इच्छा असूनही लिहिता येत नाही म्हणून वैतागलेलं होतं. या पात्राच्या तोंडून त्यानं रहस्याचा उलगडा पहिल्या पानावरच सांगून टाकला. या ओझ्यातून मोकळा झाल्यावर तो त्याला हवं ते लिहू शकला आणि ‘लोकेला’ आकारली! नंतर कादंबरीतल्या लेखक-पात्राच्या आवाजात खून झालेल्या बाईच्या पात्राचा आवाजही मिसळला. हा आवाज द्वितीय पुरुषी होता. तो थेट कादंबरीबाहेर येऊन लेखकाला (आणि वाचकालाही) उद्देशून बोलायला लागला. अशा प्रकारे हळूहळू कादंबरीची संहिता तयार होत गेली.

या कादंबरीच्या केंद्रस्थानी डिटेक्टिव्ह कादंबरी असणं विशेष महत्त्वाचं आहे. या साहित्य प्रकारानं कायम वाचनप्रक्रियेला सर्वोच्च स्थानी ठेवलं. वाचण्यातली आणि रचण्यातली गंमत हरवू दिली नाही. कल्पित साहित्यातला खेळकरपणा अधोरेखित केला. म्हणूनच अनेक मोठय़ा लेखकांना डिटेक्टिव्ह कथा-कादंबऱ्यांनी भुरळ घातली. डिटेक्टिव्ह साहित्यातल्या मायावीपणाला संगणकयुगात नवा आधुनिकोत्तर आवाज लाभला. ‘लोकेला’ डिटेक्टिव्ह कथालेखक आणि वाचकासमोरच रहस्याचं जाळं विणत जाते. हे जाळं दोघांना मिळून सोडवत न्यायचं असतं. ते सोडवताना गंमत तर येतेच, पण जगण्यातले काही दुर्लक्षित कोपरे दिसायला लागतात.

ज्या कादंबरीत भाषा हे केवळ साधन नसून साध्य आहे, ती अनुवादित रूपात वाचणं फारसं चांगलं नाही. कारण आपण नेमकं काय गमावतोय हे वाचकाला कधीच कळत नाही. तो अनुवादकाचं बोट धरून पुढे जात राहतो. त्यामुळे वाचताना किमान ठेचा लागू नयेत, अशी त्याची अपेक्षा असते. स्पॅनिशमधून ही कादंबरी अनुवादित करणाऱ्या विल व्हॅण्डरहायडेन (Will Vanderhyden) यांनी ही अपेक्षा व्यवस्थित पूर्ण केलेली आहे. अतिशय गुंतागुंतीची रचना असलेली ही कादंबरी लिहिताना लेखकाची कल्पनाशक्ती पणाला लागली असली पाहिजे. वास्तववादाच्या सावटाखाली असणाऱ्या मराठी कादंबरीत काही अपवाद वगळता कल्पनाशक्तीचा असा वापर होताना दिसत नाही. झाला तरी तो कृत्रिम व मुद्दाम केलेला असतो. सामाजिक वास्तववादाच्या काटेरी तारांचं कुंपण असलेल्या मराठी कादंबरीच्या प्रांगणात अजून कल्पनाशीलतेला मुक्त प्रवेश नाही. तो मिळाला तर उद्याची मराठी कादंबरी जास्त चैतन्यमय असेल.

‘लोकेला’

लेखक : कालरेस लाबे

 प्रकाशक : ओपन लेटर बुक्स

 पृष्ठे : २००, किंमत : १२६६ रुपये

satantangobela@gmail.com

 

First Published on May 12, 2018 2:25 am

Web Title: book loquela by author carlos labbe