नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सल्लागार आणि निकटवर्तीय डॉमिनिक कमिंग्स यांनी तिथल्या करोना- निर्बंधांमध्ये केलेल्या आगळिकीस पंतप्रधान जॉन्सन यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिथे बरेच वादळ उठले. कमिंग्स आणि जॉन्सन यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न तिथल्या वृत्तपत्रांनी केला, तसेच जाणत्या मंडळींनीही आपली भूमिका निर्भीडपणे मांडली. ‘हॅरी पॉटर’ ग्रंथमालिकेच्या लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या जे. के. रोलिंगसुद्धा यात मागे राहिल्या नाहीत. त्यांनी या प्रकरणावर खरमरीत प्रतिक्रिया देत कमिंग्स यांना खडे बोल सुनावले. पण रोलिंग यांच्या स्पष्टवक्तेपणाचे हे काही पहिले उदाहरण नाही. २०१६ साली ‘ब्रेग्झिट’च्या – म्हणजे युरोपीय महासंघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली होती. इतकेच नव्हे तर ब्रिटनने युरोपीय महासंघातच राहावे असा आग्रह धरणारी मोहीमही त्यांनी सुरू केली होती. त्याही आधी, ब्रिटनच्या काही कलाकारांनी इस्राएलवर सांस्कृतिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. तेव्हा रोलिंग यांनी काही सहकाऱ्यांसह या मागणीस विरोध करणारे पत्र ‘गार्डियन’मध्ये लिहिल्याचेही अनेकांना आठवत असेल. सरकारी धोरणांवरही त्या वेळोवेळी व्यक्त होत असतात आणि मजूर पक्षाबद्दल वाटणारा जिव्हाळाही त्यांनी कधी दडवून ठेवलेला नाही.

रोलिंग यांच्या राजकीय भूमिकेचे मासले देण्यास कारण ठरली आहे ती याच आठवडय़ात आलेली एक बातमी. ती आहे रोलिंग यांच्या नव्या पुस्तकाच्या घोषणेविषयीची. तर.. रोलिंग यांचे हे नवे पुस्तक आहे ते ‘चिल्ड्रन्स बुक्स’ याच प्रकारातले. पण खरी ‘बुकबातमी’ आहे ती त्याच्या प्रकाशनाविषयीची! हे पुस्तक छापील रूपात येईल ते यंदाच्या नोव्हेंबरमध्ये. पण मंगळवारपासूनच ते ‘ऑनलाइन’ स्वरूपात क्रमश: प्रसिद्ध होऊ लागले असून https://www.theickabog.com/ या संकेतस्थळावर ते क्रमश: भाग पुढील सात आठवडे मोफत वाचता येणार आहेत! हे पुस्तक हॅरी पॉटर मालिकेप्रमाणे ‘जादुई’ नसून, हे पुस्तक म्हणजे सत्तेचा गैरवापर आणि सत्य यांची कहाणी सांगणार असल्याचे खुद्द रोलिंग यांनीच स्पष्ट केले आहे. लहान मुलांसाठी पुस्तक लिहिण्यापासून काही काळ स्वत:ला दूर ठेवणाऱ्या रोलिंग यांनी हे नवे पुस्तक लहानग्यांना ‘मोठय़ां’च्या गोष्टी सांगण्यासाठी लिहिले, असेच म्हणावे लागेल. त्यात रोलिंग यांच्या राजकीय भूमिकांचे प्रतिबिंब किती पडले आहे, हे शोधण्याचे काम प्रौढ वाचकांचे! पण रोलिंग यांनी या पुस्तकाच्या लहानग्या वाचकांना आणखी एक काम दिले आहे ते चित्रे काढण्याचे. क्रमश: प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकातील भागांवर चित्र काढून पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले असून यातील निवडक चित्रे नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकाच्या छापील आवृत्तीत समाविष्ट केली जाणार आहेत!