News Flash

बुकबातमी : नंतरचे सावरकर…

मराठीत धनंजय किर किंवा द. न. गोखले यांच्यासारख्या मुरलेल्या चरित्रकारांनी वि. दा. सावरकरांवर लिहिलेले चरित्रग्रंथ असोत वा शेषराव मोरे यांच्यासारख्या अभ्यासकाने घेतलेला सावरकरविचारांचा धांडोळा असो;

मराठीत धनंजय किर किंवा द. न. गोखले यांच्यासारख्या मुरलेल्या चरित्रकारांनी वि. दा. सावरकरांवर लिहिलेले चरित्रग्रंथ असोत वा शेषराव मोरे यांच्यासारख्या अभ्यासकाने घेतलेला सावरकरविचारांचा धांडोळा असो; किंवा खुद्द सावरकरांचेच सारे साहित्य मराठीत उपलब्ध असल्याने महाराष्ट्रीय वाचकांना सावरकरांविषयी, त्यांच्या कार्याविषयी जाणून घेण्यासाठी इंग्रजीत ज्यास ‘फस्र्ट हॅण्ड सोर्स’ म्हणतात, तसे विपुल साहित्य आहे. मात्र, काळाचा एवढा टप्पा उलटून गेल्यानंतर, नव्या संदर्भसाधनांचा शोध घेत, बदललेल्या राजकीय-सामाजिक परिप्रेक्ष्यात सावरकरांचा पुनर्शोध घेण्याचे प्रयत्न मराठीत तरी अलीकडच्या काळात झाल्याचे दिसत नाहीत. जे तसा दावा करतात, त्यात आवच जास्त आणि शोध कमी, अशी स्थिती. या पार्श्वभूमीवर, विक्रम सम्पत या तरुण अभ्यासकाने इंग्रजीत लिहिलेले ‘सावरकर : एकोज् फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. सावरकरांच्या जन्मापासून, म्हणजे १८८३ सालापासून १९२४ पर्यंतच्या, म्हणजे त्यांची तुरुंगातून सशर्त मुक्तता होईपर्यंतच्या काळाचा या पुस्तकात सम्पत यांनी मागोवा घेतला आहे. सहाशेहून अधिक पृष्ठांचे हे पुस्तक अनेक परिचित-अपरिचित संदर्भांचा दाखला देत ‘आधीचे सावरकर’ वाचकापुढे उभे करणारे आहे. त्यानंतर या पुस्तकाचा पुढील भाग येणार असल्याची चर्चा होत होतीच; त्याची अधिकृत घोषणा सरत्या आठवड्यात झाली. सम्पत यांच्या सावरकर चरित्रग्रंथाचा दुसरा भाग ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस’ या प्रकाशनसंस्थेकडूनच येत्या जुलैमध्ये प्रकाशित होत असून त्याचे शीर्षक ‘सावरकर : ए कन्टेस्टेड लीगसी’ असे आहे. १९२४ नंतरचा सावरकरांचा जीवनकाळ चितारणारा हा ग्रंथखंडही तब्बल सहाशे पृष्ठांचा आहे. देश-विदेशांतील सावरकरांशी संबंधित दस्तावेजांचा, संदर्भाचा आधार घेत सावरकरांच्या जीवनातील उत्तरार्धाचा वेध सम्पत यांनी यात घेतला आहे. याशिवाय पुढील वर्षी सम्पत यांची अन्य तीन पुस्तके प्रसिद्ध होणार असल्याचीही बातमी आहे. त्यातील पहिले पुस्तक टिपू सुलतानविषयी, दुसरे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी, तर तिसरे भारतीय इतिहासातील काही कळीच्या प्रश्नांविषयी भाष्य करणारे असेल. ती पुढील वर्षी येतीलच; पण येत्या २६ जुलैला सम्पत यांच्या सावरकरचरित्राचा दुसरा खंड बाजारात दाखल होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 12:02 am

Web Title: book news character books written on vd savarkar akp 94
Next Stories
1 अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…
2 परिचय : पॅलेस्टाइन संघर्षावर ‘भांडवली’ उत्तर?
3 बुकबातमी : आहे ‘बंडखोर’ तरी…
Just Now!
X