ट्रम्प यांच्या विजयाचा अन्वयार्थ लावायचा, तर समकालीन अमेरिकी समाजातील अस्वस्थतेचे अवलोकन करणे आवश्यक ठरते. तेच या पुस्तकांनी केले आहे..

९ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेत जे घडले ते अनेकांसाठी धक्कादायक होते. ते अशासाठी की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयच अनेकांनी जमेस धरला नव्हता. या अनेकांत अमेरिकेतील तसेच अमेरिकेच्या बाहेरीलही पत्रकार, प्राध्यापक, राजकीय विश्लेषक यांचा समावेश होता. या सर्वाचे अंदाज चुकवत ट्रम्प विजयी ठरले. आता प्रश्न असा की, या सर्वाचे अंदाज चुकीचे का ठरले आणि ट्रम्प यांचा विजय झाला तरी कसा?  जगभरात गेली अनेक वर्षे असलेल्या अमेरिकेच्या प्रतिमेच्या भंजनात याचे उत्तर मिळते. अमेरिका, म्हणजेच तिथला समाज हा उदारमतवाद व लोकशाही मूल्यांविषयी तळमळ असणारा आहे, अशी भावना या प्रतिमेने रूढ झाली होती. त्यामुळेच अतिआक्रस्ताळ्या आणि विधिनिषेधशून्य राजकीय भूमिका असणाऱ्या ट्रम्प यांच्या मागे अमेरिकी समाज जाणार नाही, असाच अनेकांचा अंदाज होता. परंतु तो खुद्द अमेरिकी समाजानेच चुकीचा ठरवला आहे. अमेरिकेने उदारमतवादापासून फारकत घेण्यावर ट्रम्प यांच्या विजयाने शिक्कामोर्तब झाले असले, तरी याची सुरुवात काही वर्षांपूर्वीच झाली होती. त्यामुळे अमेरिकी समाजाचे हे मन्वंतर झाले तरी कसे, हे समजून घेणे आता क्रमप्राप्त झाले आहे. हे समजून सांगणारी, किंबहुना ते प्रत्यक्ष घडत असतानाच त्याचे विश्लेषण करणारी काही पुस्तके याच काळात आली होती. ‘लिसन, लिबरल – ऑर, व्हॉट एव्हर हॅपन्ड टू द पार्टी ऑफ द पीपल’ हे थॉमस फ्रँक यांचे पुस्तक त्यातीलच एक. अमेरिकेतील उदारमतवादी प्रवाहाला- प्रामुख्याने डेमोक्रॅटिक पक्षाला- त्याच्यासमोरील आव्हानांची जाणीव करून देणारे हे पुस्तक यंदाच्या मार्चमध्येच आले होते. अभिजनवादी राजकारण करत गोऱ्या कामगार वर्गाच्या इच्छा-आकांक्षांकडे या पक्षाचे दुर्लक्ष कसे झाले, हे फँ्रक यांनी या पुस्तकात दाखवून दिले होते. हे पुस्तक तसे उशिरा आले असले तरी डेमोक्रॅटिक पक्षाच्या धुरीणांनी त्यातून काही एक बोध घ्यायला हवा होता. तो तसा न घेतल्यानेच ट्रम्पच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

जगभरात सर्वत्रच विशेषत: युरोपमध्ये उजवीकडे झुकलेल्या आत्मकेंद्री व लोकानुरंजनवादी राजकारणाचा प्रवाह अलीकडच्या काही वर्षांत जोर धरत असताना अमेरिका त्यापासून अलिप्त राहू शकत नव्हतीच. अमेरिका आणि युरोपमध्ये सुरू झालेल्या या नव्या प्रवाहाचे विश्लेषण करणारे ‘द पॉप्युलिस्ट एक्स्प्लोजन – हाऊ द ग्रेट रिसेशन ट्रान्स्फॉर्मड् अमेरिकन अ‍ॅण्ड युरोपियन पॉलिटिक्स’ हे जॉन ज्युडिस यांचे पुस्तक यंदाच्या ऑक्टोबरमध्ये आले. न्यू यॉर्कस्थित कोलंबिया विद्यापीठाने पत्रकारिता आणि विद्यापीठीय संशोधन यांचा समन्वय साधणारा ‘कोलंबिया ग्लोबल रिपोर्ट्स’ हा प्रकल्प सुरू केला आहे. त्या प्रकल्पातले हे पुस्तक. यात लेखकाने अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंना लोकनुरंजनवादाने उसळी घेण्यामागची पाश्र्वभूमी सांगितली आहे. डाव्यांच्या आर्थिक तर उजव्यांच्या सांस्कृतिक लोकानुरंजनवादाला एकाच तागडीत तोलणाऱ्या ज्युडिस यांना ट्रम्प यांच्या लोकानुरंजनवादात राष्ट्रवाद दिसतो. मुख्य म्हणजे, त्यांना हा राष्ट्रवाद फॅसिस्ट वळणाचा वाटत नाही. यातील विवेचन हे ‘९ नोव्हेंबरच्या आधीचे व नंतरचे’ अशा कालबिंदूच्या निश्चितीपर्यंत नेणारे ठरेल, अशी चर्चा आता तेथील विद्यापीठीय वर्तुळात रंगू लागली आहे. ते तसे खरेच होईल का, हे येणारा काळच सांगेल. परंतु यंदाची निवडणूक ही आणखी एका बाबीमुळे लक्षात राहणारी ठरेल. ती म्हणजे, ट्रम्प यांची भाषणशैली. आक्रस्ताळी आणि बेताल वक्तव्ये (आणि त्यात पुन्हा प्रस्थापित व्यवस्थेला विरोध असल्याचा आभास) ही त्याची वैशिष्टय़े. तरीही ती बहुतांश जणांना भावल्याचेच निकालाने स्पष्ट झाले. ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेले ‘स्ट्रेंजर्स इन देअर ओन लॅण्ड – अँगर अ‍ॅण्ड मॉअर्निग ऑन द अमेरिकन राइट’ हे अर्ली रसेल हुकशिल्डलिखित पुस्तकही तसे होण्यामागची कारणे शोधू पाहते. समाजशास्त्रज्ञ असणाऱ्या हुकशिल्ड यांनी येथे अमेरिकेच्या भावनिकतेचे समाजशास्त्र उलगडून दाखवले आहे. परंपरेने रिपब्लिकनांना मतदान करणारी लाल राज्ये आणि डेमोक्रॅटिक  पक्षाला मतदान करणारी निळी राज्ये अशी अमेरिकी राजकारणाची रंगीय विभागणी. निळ्या राज्यांच्या तुलनेत लाल राज्यांची आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील स्थिती फारशी बरी नसतानाही ही राज्ये रिपब्लिकनांच्या भावनिक आवाहनाला का प्रतिसाद देतात, याचे हुकशिल्ड यांनी केलेले विवेचन मुळातून वाचावे असे आहे.