डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी २०१७ च्या जानेवारीत आले आणि त्या देशात त्यांच्या मतांविरुद्ध आणि मुख्यत: आचरणाविरुद्ध टीकेची झोड उठणं हे नेहमीचंच झालं. त्या टीकेला वर्षभरानंतर भक्कम आधार मिळाला तो अमेरिकी पत्रकार मायकेल वुल्फ यांच्या पुस्तकाचा. या वुल्फ यांना व्हाइट हाऊसमध्ये संचाराची मोकळीक होती. त्याचा उपयोग या पुस्तकासाठी त्यांना झाला. व्हाइट हाऊसमधल्या प्रत्येक स्तरातल्या कर्मचाऱ्यांशी वुल्फ यांनी बातचीत केली आणि या कर्मचाऱ्यांनी जे सांगितलं ते वुल्फ यांनी थेट लिहून काढलं. तेच ‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी : इनसाइड द ट्रम्प व्हाइट हाऊस’ हे पुस्तक! २०१८ च्या जानेवारीत प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक वादळी ठरलं. ट्रम्प यांच्या लहरी कार्यपद्धतीचे दाखले, त्यामुळे व्हाइट हाऊसअंतर्गत पडलेले दोन गट, ट्रम्प यांचे तेव्हाचे सल्लागार स्टीव्ह बेनॉन यांनी सांगितलेले अनुभव असा बराचसा मसाला त्यात होता. त्यावरून ट्रम्प यांनी वुल्फ, बेनॉन आणि पुस्तकाची प्रकाशन संस्था यांना नोटीसही बजावली; पण पुस्तकाचा खप प्रचंड झाला. (आणि पुढे याच धर्तीवर ट्रम्प यांच्याविषयी आणखी काही पुस्तकेही बाजारात आली. बॉब वुडवर्ड यांचे ‘फीअर : ट्रम्प इन द व्हाइट हाऊस’ हे त्यापैकी एक. त्याचीही बरीच चर्चा झाली होती. असो.)

तर.. वुल्फ यांच्या पुस्तकानं उडवलेला धुरळा आताशा खाली बसतो ना बसतो तोच, त्यांच्या नवीन पुस्तकाची घोषणा झाली आहे. येत्या ४ जूनला प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकाचं शीर्षक आहे- ‘सीज : ट्रम्प अंडर फायर’! हे पुस्तक म्हणजे ‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी’चा पुढचा भाग (सीक्वेल) आहे. २०१८ च्या फेब्रुवारीपासून यंदाच्या मार्चमध्ये ‘म्युलर अहवाल’ सादर होईपर्यंतच्या घडामोडींची पाश्र्वभूमी या पुस्तकाला आहे. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियन हस्तक्षेप झाला, असं हा अहवाल सिद्ध करतो. मात्र, ट्रम्प यांचे हात त्यात गुंतले आहेत का, याबद्दल अहवालाचे कर्ते रॉबर्ट म्युलर यांना खरोखरच काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत, की त्यांनी फक्त संकेतच पाळले, या मुद्दय़ावर वुल्फ यांचं नवं पुस्तक प्रकाश टाकणार आहे. स्वत: म्युलर यांनी चारच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत, ‘राष्ट्राध्यक्षांवर कोणतेही थेट आरोप ठेवण्याचा संकेत अमेरिकेत नाही’ असं म्हणत, ट्रम्प यांच्यावर दोषारोप सूचित केला होता.  त्यामुळे आता म्युलर अहवालाच्या मुद्दय़ावर वुल्फ यांचं ‘दीडशे आतल्या गोटातल्या माहितगारांना भेटून’ सिद्ध झालेलं हे पुस्तक ट्रम्प यांना खरंच घेरणार का, हे पाहावं लागेल!