दिलीप चावरे  patrakar@hotmail.com

हंगेरियन-ब्रिटिश कादंबरीकार आर्थर कोस्लर यांची ‘डॉर्कनेस अ‍ॅट नून’ ही १९४० साली प्रसिद्ध झालेली कादंबरी. विरोधक संपवून टाकण्याच्या सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन याच्या मोहिमेकडेच तिचा रोख आहे, असा सार्वत्रिक समज आतापर्यंत होता. पण तब्बल ८० वर्षांनंतर ही कादंबरी मूळ जर्मन हस्तलिखिताच्या आधारे त्याच स्वरूपात प्रसिद्ध झाल्यावर, नाझी क्रूरकर्मा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या ज्यू आणि साम्यवादविरोधी अमानुष अत्याचारांचीही तिला डूब असल्याचे स्पष्ट झाले आहे..

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?

वाङ्मय जगतातील एक अभूतपूर्व घटना सध्या चर्चेत आहे. जगप्रसिद्ध लेखक आर्थर कोस्लर यांची ‘डार्कनेस अ‍ॅट नून’ ही त्यांच्या दाहक अनुभवांवर आधारित कादंबरी सुमारे ८० वर्षांनंतर तिच्या मूळ स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे. जगभरातील बहुतेक सर्व प्रमुख भाषांमध्ये रूपांतरित झालेली ही कादंबरी एवढी वर्षे तिच्या अस्सल स्वरूपात समोर आलेली नव्हती, हे वास्तव धक्कादायक आहे. मात्र, तिची कथावस्तू एवढी कसदार आहे की, या सदोष स्वरूपातही तिला प्रचंड लोकप्रियता लाभली. ‘डार्कनेस..’चे एक वैशिष्टय़ म्हणजे सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन याची आपले खरे आणि काल्पनिक विरोधक संपवून टाकण्याची मोहीम ही या कादंबरीची पार्श्वभूमी असल्याचा सार्वत्रिक समज आतापर्यंत होता. आता ही कादंबरी मूळ जर्मन हस्तलिखिताच्या आधारे त्याच स्वरूपात प्रसिद्ध झाल्यावर नाझी क्रूरकर्मा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या ज्यू आणि साम्यवादविरोधी अमानुष अत्याचारांचीही तिला डूब असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेव्हा हिटलरची कापरे भरवणारी कृष्णकृत्ये नुकतीच जगासमोर येऊ लागली होती. त्यातच ‘डार्कनेस..’च्या सदोष इंग्रजी भाषांतरामुळे ती केवळ स्टॅलिनविरोधी असल्याचा समज होणे स्वाभाविक होते. परिणामी तिची ही एकच बाजू जगासमोर आली. साम्यवाद म्हणजे ब्रह्मवाक्य आणि रशिया म्हणजे देवभूमी अशी श्रद्धा तोपर्यंत बाळगणारे अनेक कॉम्रेड मात्र ‘डार्कनेस..’मुळे जागे झाले. पुढे निकिता क्रुश्चेव यांनी स्टॅलिनचे पाप जगासमोर मांडले आणि ‘डार्कनेस..’ला पुन्हा मागणी वाढली. आश्चर्याची बाब म्हणजे, कोस्लर यांनी या सदोषतेच्या संदर्भात कधीच चकार शब्दही उच्चारला नव्हता! ‘डार्कनेस..’ची कथावस्तू सर्वपरिचित असल्याने तिची पुनरावृत्ती करण्याचे येथे प्रयोजन नाही. पण ती मूळ स्वरूपात कशी सापडली, तो घटनाक्रमही अचंबित करणारा आहे.

कोस्लर हे ज्यू आणि त्यातच साम्यवादी असल्यामुळे हिटलरच्या राजवटीत ते जिवंत राहणे शक्य नव्हते. ते पॅरिसमध्ये असताना जर्मन फौजा तिथे पोहोचल्या. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. वर्षभराने ते सुटले. त्याच सुमारास ‘मॉस्को ट्रायल’ म्हणून इतिहासात कुप्रसिद्ध असलेला खटला संपून स्टॅलिनचे जवळचे दोन साथीदार ‘प्रतिक्रांती’चे हस्तक म्हणून ठार करण्यात आले होते. त्यांना अनन्वित यातना देऊन त्यांच्याकडून ‘कबुली’ घेण्यात आली होती की ते भांडवलदारांचे हस्तक होते. याच भीषण अनुभवावर ‘डार्कनेस..’ बेतण्यात आली होती. आपणास कधीही अटक होईल अथवा मारून टाकण्यात येईल या भयामुळे कोस्लर यांनी ‘डार्कनेस..’ जर्मन या मातृभाषेत लिहिली. ही कादंबरी ते लिहीत असतानाच त्यांची इंग्रज प्रेयसी दॅफने हार्डी हिने घाईतच तिचे इंग्रजीत भाषांतर केले. त्या वेळी ती केवळ २१ वर्षांची होती आणि तिच्याकडे काहीही वाङ्मयीन अनुभव नव्हता. एखादा शब्दकोश किंवा संदर्भसाधने त्या वातावरणात उपलब्ध होणे शक्य नव्हते. म्हणून तिने जमेल तसे भाषांतर करून इंग्रजी हस्तलिखित लंडनला पाठवले. कोस्लर यांनी आपले मूळ जर्मन हस्तलिखित तटस्थपणे स्वित्झर्लंडला एका प्रकाशकाकडे पाठवले. युद्धाच्या त्या धामधुमीच्या काळात ते जर्मन हस्तलिखित कुठे तरी नाहीसे झाले. दरम्यान दॅफने इंग्रज नागरिक असल्याने कशीबशी लंडनला पोहोचली. ही घटना १९४० सालची. कोस्लर यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पॅरिसमधून पलायन केले. काही काळानंतर मोरोक्को आणि पोर्तुगाल असा द्राविडी प्राणायाम करून तेही लंडनमध्ये दाखल झाले. तोपर्यंत ही रूपांतर झालेली कादंबरी लंडनमध्ये विलक्षण लोकप्रिय झाली होती. त्यानंतर इंग्रजी भाषांतराची जर्मन आणि इतर भाषांमधील रूपांतरे जगभर खपू लागली.

‘डार्कनेस अ‍ॅट नून’ आजवर ३३ भाषांमध्ये प्रकाशित झाली आहे. ती लोकांच्या हाती पडू नये यासाठी साम्यवादी नेत्यांनी विविध प्रकारे प्रयत्न केले. ही कादंबरी ढिगाने विकत घेऊन जाळून टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पुस्तकविक्रेत्यांना धमक्या देण्यात आल्या. फ्रान्सच्या राज्यघटनेबाबत सार्वमत घेण्यात आले, तेव्हा ही घटना आपल्याला पाहिजे तशी असावी म्हणून साम्यवादी नेत्यांनी अथक परिश्रम केले. परंतु ‘डार्कनेस..’चा प्रभाव इतका होता, की अखेर या सार्वमतात साम्यवादी पराभूत झाले. ‘माझ्या जीवनातील एक अत्यंत समाधानाचा प्रसंग’ असे या वैचारिक लढाईचे वर्णन कोस्लर यांनी नंतर केले.

अशा प्रकारे दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ‘डार्कनेस..’ ही एक अद्वितीय साहित्यिक कृती म्हणून प्रस्थापित झाली होती. जॉर्ज ऑर्वेलसारख्या लेखकाने ‘डार्कनेस..’ची अमाप प्रशंसा केली आणि ती खपाचे उच्चांक गाठत राहिली. कोस्लर मात्र या संदर्भात मौन पाळून राहिले. ते का, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

साहित्य शाखेचा एक विद्यार्थी मॅथिआस वेसेल याला या मूळ जर्मन कादंबरीची हस्तलिखित प्रत २०१५ साली स्वित्झर्लंडमध्ये संशोधन करताना सापडली. कोस्लर यांनीच पाठवलेली ही प्रत असल्याची खात्री पटण्याचे कारण म्हणजे तिच्या प्रत्येक पानावर फ्रेंच सेन्सॉरचे शिक्के आहेत. झुरीच इथल्या ‘युरोपा’ या प्रकाशनगृहाचे संस्थापक एमिल ऑप्रेश्त यांच्या खासगी दप्तरात वेसेल याच्या हाती हा खजिना लागला. त्याबरहुकूम फिलिप बोहल यांनी केलेले इंग्रजी भाषांतर आता ‘व्हिंटेज’ या नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. मूळ हस्तलिखिताचा सम्यक अभ्यास करून बोहल यांनी ‘डार्कनेस..’ ही कादंबरी नव्याने सिद्ध केली आहे. दॅफने हार्डीची वाङ्मयीन जाण किती मर्यादित होती, याचा पुरावाच या नवकादंबरीच्या नावातून समोर आला आहे. मूळ जर्मन कादंबरीचे भाषांतरित शीर्षक असायला हवे होते- ‘द व्हिश्यस सर्कल’.. म्हणजेच दुष्टचक्र! मात्र लंडनमधील प्रकाशकाच्या हट्टानंतर तिने ‘डार्कनेस अ‍ॅट नून’ असे ते केले. या शीर्षकबदलासाठी कोस्लर यांच्याशी संपर्क साधणे तिला शक्यच नव्हते; कारण त्यांचा ठिकाणा माहीत नव्हता. त्याचप्रमाणे मूळ कादंबरीतील भावना तिला त्याच उत्कटतेने भाषांतरात उतरवणे शक्य झाले नाही, असे दोन्ही भाषांचे जाणकार असणारे सांगतात. कोस्लर यांनी फक्त स्टॅलिन याच्यावरच निशाणा साधल्याचा समज आणि ‘डार्कनेस..’ म्हणजे स्टालिनच्या राजवटीचा व साम्यवादी विचारसरणीचा परखड पंचनामा असा ग्रह प्रस्थापित झाला, त्यास काही अंशी हे भाषांतर जबाबदार आहे. परंतु ‘डार्कनेस..’च्या लोकप्रियतेवर याचा काहीच परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादी विचारसरणीचा प्रसार जसा अधिक जोरकस स्वरूपात होऊ लागला, तशी ‘डार्कनेस..’ची मागणी वाढत गेली.

‘डार्कनेस..’चे इंग्रजी भाषांतर गाजत असल्याने, मूळ जर्मन हस्तलिखिताची प्रत हाती नसल्यामुळे आणि ते इंग्लंडला पोहोचेपर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेले असल्याने कोस्लर यांनी या भाषांतरात कोणतीच दुरुस्ती अथवा कोणताच फेरफार केला नसावा, असे गृहीत धरावे लागते. या संदर्भात कोस्लर यांनी खुलासा केलेला असल्यास तो माझ्या पाहण्यात आलेला नाही. कोस्लर यांचे चरित्रलेखक मायकेल स्कॅमेल म्हणतात की, ‘‘दॅफने हिने केलेले भाषांतर बरे असले, तरी तिने अनेक भाग गाळले आहेत. काही ठिकाणी मूळ अर्थछटा सौम्य केली आहे. बोहल यांच्या भाषांतरात अधिक नेमकेपणा आला असून अस्सल लिखाण कसे होते, हे अधिक चांगल्या प्रकारे प्रतीत होते.’’

कोस्लर यांचा जन्म १९०५ साली बुडापेस्ट येथे झाला. त्यांचे संगोपन व्हिएन्ना इथे झाले. ते नाझीविरोधी असल्याने त्यांना साम्यवादी विचारांची भुरळ पडली. मात्र, मॉस्को खटल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. ‘डार्कनेस..’चे लिखाण त्यांनी १९३८ ते १९४० या अवधीत केले. कोस्लर १९८३ साली निधन पावले. त्यांची सर्वच पुस्तके कमीअधिक प्रमाणात वाचकांनी डोक्यावर घेतली. कोस्लर उत्तरआयुष्यात टीकेचे धनी बनले, कारण त्यांनी काल्पनिक वैज्ञानिक विषय लिहायला घेतले. वैयक्तिक आयुष्यात त्यांच्यासोबत राहणाऱ्या काही स्त्रिया त्यांच्या अत्याचारांची शिकार बनल्या. या साऱ्याच कथा आता इतिहासजमा झाल्या आहेत. मात्र ‘डार्कनेस..’ जागतिक साहित्य क्षेत्रातील एक मलाचा दगड म्हणून मान्यता पावली आहे.

 

ज्यूंना जर्मनीत परके ठरवणारा आणि आर्यन वंशश्रेष्ठत्वाचे खूळ लोकप्रियतेसाठी पुरेपूर वापरणारा हिटलर हा समलैंगिकांचाही द्वेष करीत असे. या पार्श्वभूमीवर, हिटलर हाही समलैंगिकच होता काय, असा संशय व्यक्त करणारी चित्रमालिकाच मॅकडर्मॉट आणि मॅकगॉ या अमेरिकी दाम्पत्याने (दोघेही पुरुष) २००१ मध्ये रंगविली आणि जे तुम्ही समजता ते तसे नसते तर?’ हा प्रश्न जगाला विचारला. त्या चित्रमालिकेतील हे एक चित्र, त्यातील हिटलर हा एखाद्या स्टालिन-कालीन स्मारकशिल्पासमोर ऐटीत उभा असलेला दिसतो.