09 April 2020

News Flash

सहचरीशी पत्रसंवाद..

अंतुले यांनी ही पत्रं ऑक्टोबर १९५७ ते ऑक्टोबर १९६१ या काळात लिहिली होती.

प्रेमपत्रं ही खासगी बाब, पण बरीच वर्ष लोटल्यानंतर आणि पत्रांचे लेखक कालवश झाल्यानंतर अशा पत्रसंवादातून प्रेमासोबतच अनेक गोष्टी पुढल्या पिढय़ांना दिसू लागतात. दूर असलेल्या जोडीदाराची आठवण हा या पत्रांचा गाभा असला तरी, पत्रलेखकाची बाकी हालहवाल काय होती, मानसिक स्थिती कशी होती, आव्हानं होती की उत्कर्षच होता आणि बदलत्या भोवतालाचंही प्रतिबिंब या प्रेमपत्रांमध्ये कसं पडलं, हे दिसू लागतं. त्याहीपेक्षा, प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून पत्रलेखकाची सांस्कृतिक पातळी कळते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी त्यांच्या वाग्दत्त वधूला- नर्गिस अंतुले यांना- तरुणपणी पाठवलेली पत्रं ही अशी, सांस्कृतिक समृद्धी दाखवणारी आहेत.

अंतुले यांनी ही पत्रं ऑक्टोबर १९५७ ते ऑक्टोबर १९६१ या काळात लिहिली होती. काँग्रेसचे विधानसभा उमेदवार म्हणून ‘मुंबई प्रांता’ची निवडणूक अंतुले यांनी लढवली होती. ते हरले, पण पुढे १९६१ मध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. या राजकीय प्रवासाची सावली अगदी दुरूनच या पत्रसंग्रहावर आहे. याच काळात एका शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून ब्रिटनला जाण्याची संधी अंतुले यांना मिळाली होती. लंडनच्या ‘लिंकन्स इन’मधूनच त्यापूर्वी (१९५५) बॅरिस्टर झालेल्या अंतुले यांना, लंडन अजिबात नवे नव्हते. त्यामुळे त्या वेळच्या पत्रांमध्ये प्रवासवर्णनपर किंवा अप्रुपाचा भाग अजिबात नाही. त्या वेळच्या काही प्रसंगांचे तपशील मात्र आहेत. ‘मी ज्या नाटकाचा प्रयोग इथे पाहिला, त्यास ब्रिटनचे पंतप्रधान चारचौघांसारखेच आले होते आणि योगायोगाने माझ्याच रांगेत बसले होते’ हे सांगून न थांबता ‘लोकांमध्ये मिसळल्याने, चारचौघांत आपल्याबद्दल काय बोलले जाते हेही त्यांना कळते, असे मला नंतर सांगण्यात आले’ हेही अंतुले नमूद करतात. सहकाऱ्यांच्या लकबींचा वा त्यांच्याशी झालेल्या हास्यविनोदांचा उल्लेख या पत्रांतही येतो, तेव्हा अंतुले हे नर्गिस यांना स्वत:बरोबर, स्वत:च्या (राजकीय) जगाची मानवी बाजू दाखवीत असतात.

महाराष्ट्रातही जोडप्यांचे पत्रसंग्रह निघाले आहेत. ‘कुसुमानिल’ हा स्थिरावलेल्या साहित्यिक जोडप्याचा पत्रसंवाद होता, तर मधू आणि प्रमिला दंडवते यांची ‘आणीबाणीतील पत्रे’देखील पोक्त होती. ही पत्रं मात्र एकटय़ा अंतुले यांचीच आहेत आणि ती तरुणपणीची, लग्नापूर्वीची आहेत. ही मूळ ऊर्दू पत्रं अंतुले यांच्या कन्या नीलम अंतुले यांनीच संपादित केली असून, पुस्तक देवनागरी लिपीत आहे. जावेद अख्म्तर यांची प्रशंसा (ब्लर्ब) आणि विख्यात ऊर्दू साहित्यिक गोपीचंद नारंग यांची अंतुलेंची व्यक्तिवैशिष्टय़े सांगणारी छोटेखानी प्रस्तावना या पुस्तकाला आहे. काही दुर्मीळ छायाचित्रंही पुस्तकात आहेत.

‘बनाम नर्गिस- बक़लम ए. आर. अंतुले’

संकलन : नीलम अंतुले

प्रकाशक : उर्दू चॅनेल

पृष्ठे: २००, किंमत : ३०० रु. (पुठ्ठाबांधणी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 2:37 am

Web Title: book review banaam nargis baqalam ar antulay zws 70
Next Stories
1 एका कोंडीची कुंठित समीक्षा
2 अर्थविचारांचे भारतीय सूत्र
3 बुकबातमी : ब्राऊनीयन बालचित्रवाणी..
Just Now!
X