ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे हे आत्मकथन भारताची नवी, आधुनिक ओळख कशी घडत गेली, याचेही दर्शन घडवते..

जयराज साळगावकर

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात डॉ. अनिल काकोडकर यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही उच्च सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी’ या आत्मकथनाच्या सुरुवातीलाच काकोडकर – ‘आपला आदर्श हा द्रोणाचार्याचा शिष्य एकलव्य होय,’ असे नमूद करतात. आयुष्यात मूलभूत शैक्षणिक संधी नाकारल्या जाऊनही एकलव्याने चिकाटीने, परिश्रमाने अर्जुनाहून उजवा असा धनुर्धर स्वत:त घडवला. इतका निष्णात की, गुरू द्रोणाचार्याना अर्जुनावरील प्रेमापोटी एकलव्याची भीती वाटून गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाची मागणी करावी लागली. एकलव्याप्रमाणे चिकाटी आणि अथक परिश्रम आपल्या अंगी बाणवून काकोडकरांनी आपले नशीब घडवले- तेही देशासाठी, असा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात काकोडकर यांच्या आई कमला काकोडकर (पूर्वाश्रमीच्या कमला गंगाधर खडीकर) वध्र्याला महिलाश्रमात शिकत होत्या. काकोडकरांचे मामा वाय. एम. पारनेरकर हे शेतीशास्त्रातील पदवीधर होते. ते महात्मा गांधींच्या निकटवर्तीयांतील होते. त्यांनी काकोडकरांच्या मातोश्रींना महिला आश्रमात दाखल केले. काकोडकरांचे वडील पुरुषोत्तम काकोडकर हे काशी विश्वविद्यालयाचे पदवीधर. त्यांनी गांधीजींच्या सेवाग्रामात काम करायला सुरुवात केली. पुढे पारनेरकर मामांनी काकोडकरांच्या आई-वडिलांचे लग्न ठरविले. लग्नानंतर जोडीने दोघेही सर्वोदय चळवळीचे काम करू लागले. १९४३ च्या नोव्हेंबर महिन्यात बडवाणी, मध्य प्रदेश येथे डॉ. अनिल काकोडकरांचा जन्म झाला. काकोडकरांचे कुटुंब गोव्याचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवामुक्ती आंदोलनासाठी काकोडकरांच्या वडिलांनी डॉ. राममनोहर लोहिया यांच्याबरोबर गोवामुक्ती संघटनेत भाग घेतला. पोर्तुगीजांनी १९४६ साली त्यांना अटक केली आणि नऊ वर्षांसाठी पोर्तुगालला तुरुंगात धाडले. अडीच वर्षांचे मूल पदरात असताना नवऱ्याला नऊ वर्षांचा तुरुंगवास होणे हा त्यांच्या मातोश्रींना फार मोठा धक्का होता. महिला आश्रमातल्या शिक्षणाचा नोकरी मिळवण्यासाठी काही उपयोग नव्हता. म्हणून त्यांनी खासगीरीत्या कर्वे शिक्षण संस्थेतून पदवी घेतली. परंतु ब्रिटिश सरकारमान्य शिक्षण हे आश्रमाला मान्य होणारे नव्हते. शेवटी प्रकरण महात्मा गांधींपर्यंत गेले. महात्माजींनी त्यांचा निर्णय म्हणून कमलाबाईंच्या तोंडात पेढा भरवला. प्रश्न संपला. पुढे कमलाबाईंनी मॅडम मारिया माँटेसरी यांच्याकडे बालशिक्षणाचे शिक्षण घेतले आणि आपल्या माहेरच्या गावाजवळ खरगोण (मध्य प्रदेश) येथे माँटेसरी शाळा चालू केली. या काळात अनिल काकोडकर त्यांच्या आजी-आजोबांकडे राहिले. या खडतर काळात कमलाबाईंच्या मागे कुटुंबातील आणि आश्रमातले काही सज्जन लोक उभे राहिले. अशी कर्तृत्ववान आई हे काकोडकरांचे प्रेरणास्थान ठरणे हे ओघानेच आले. कमलाबाईंनी स्थापन केलेली माँटेसरी शाळा पुढे ‘बाल शिक्षण निकेतन’ या नावाने मोठी शिक्षण संस्था झाली आहे. काकोडकरही याच शाळेत शिकले. इथेच त्यांनी आईला गुरू मानले.

शालेय शिक्षणानंतर मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयामध्ये प्राचार्य भिडे यांनी त्यांना दाखल करून घेतले. मध्य प्रदेशमधून त्यांचा निकाल अजून यायचा होता; पण काकोडकरांनी आपल्याला पहिला वर्ग मिळेल, अशी ग्वाही भिडे यांना दिली आणि निकालाच्या आधीच ते रुपारेलमध्ये इंटर सायन्सच्या वर्गात दाखल झाले. बऱ्याच वर्षांनी रुपारेल महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवात, पी. सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अध्यक्ष म्हणून आले होते. काकोडकरांनी हा किस्सा आपल्या भाषणात ऐकवल्यानंतर, त्यावर अलेक्झांडर यांनी विनोदाने असे म्हटले की, ‘‘पूर्वीचे मुख्याध्यापक सहृदय असत, सवलती देत. ते कौतुकास्पदही आहे; पण मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने अशा प्रकारची सवलत मी मान्य करू शकणार नाही!’’

काकोडकरांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना लहान वयात अर्थार्जन करावे लागले. मुंबईतीलच व्हीजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी मिळेपर्यंत त्यांची आर्थिक-सामाजिक आणि भावनिक दमछाक झाली. त्यांना पहिल्या नोकरीसाठी प्रीमियर ऑटोमोबाइल्स कंपनीच्या टूल डिझाइन खात्यात संधी होती; पण तेथे पहिल्याच दिवशी त्यांना शेठ लालचंद हिराचंद यांचे दर्शन झाले. शेठ दालनामध्ये आल्यावर सर्व लोकांनी उठून उभे राहायचे, असा नियम होता. तो काकोडकरांना जाचक वाटला आणि त्यांनी त्या नोकरीचा नाद सोडला. आर्थिक स्थिती खडतर असताना ज्वलंत अभिमान शाबूत ठेवण्याच्या त्यांच्या मनोबलाचा कुणालाही हेवा वाटावा; पण झाले ते चांगलेच झाले; कारण लवकरच त्यांना भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी)च्या ट्रेिनग स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. त्यातून पुढे ते अणुऊर्जा विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्त होणार होते. व्हीजेटीआयच्या पदवीधराने सरकारी नोकरी स्वीकारणे हे त्या काळी चांगले समजले जात नसे; पण इथेच एके दिवशी त्यांच्या आयुष्यातला ‘टर्निग-टिपिंग पॉइंट’ आला. एका स्नेहभोजनाच्या ठिकाणी डॉ. होमी भाभांशी त्यांची गाठ पडली. पहिल्या भेटीतच भाभांनी भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे स्वप्न त्यांना उलगडून दाखवले. त्या दिवशी काकोडकरांना प्रकाश दिसला.

यापुढचा काळ हा त्यांच्या आयुष्यातील आणि देशाच्या आण्विक विकासातील महत्त्वाचा काळ ठरणार होता. बीएआरसीमध्ये ‘ध्रुव’ या अणुभट्टीची निर्मिती होत होती. संचालक डॉ. राजा रामण्णा, अणू-भौतिकी विभागाचे जे. एन. सोनी, डॉ. चिदम्बरम, डॉ. अय्यंगार, इलेक्ट्रॉनिक्स व कंट्रोल ग्रुपचे पी. आर. दस्तीदार व शेषाद्री अशा संशोधकांबरोबर आणि ‘टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी’ (टीबीआरएल) व ‘डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ) यांच्या सहकार्यातून भारताचा आण्विक कार्यक्रम फळास येणार होता. काकोडकरांनी जेव्हा कार्यक्रमास सुरुवात केली, तेव्हा पोखरण येथील तळ भारतीय लष्कर तयार करत होते. काम काहीसे रेंगाळल्यासारखे होत होते. त्या काळात काकोडकरांना ‘हो जायेगा मॅन’ ही पदवी त्यांचेच वरिष्ठ डॉ. राजा रामण्णा यांनी दिली. कोणालाही जे जमत नसे ते काकोडकरांना जमत असे, असा डॉ. रामण्णा यांना अनुभव होता. १९७४ चा पोखरणचा अनुभव काकोडकरांना, भारत सरकारला आणि जगाला खूप काही शिकवून गेला. तेव्हा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. सेठना होते. पोखरणनंतर अमेरिकेने तारापूर येथे उभारलेल्या अणुभट्टय़ांना इंधन पुरवण्याचे थांबवले. वास्तविक ती त्यांची जबाबदारी होती. सेठनांनी ही समस्या खूप खंबीरपणे हाताळली, हे पी. सी. अलेक्झांडर- जे त्या वेळी पंतप्रधानांचे प्रमुख सचिव होते- यांनी सांगितल्याचे काकोडकरांनी नमूद केले आहे. हा सगळा इतिहास या पुस्तकात विस्ताराने लिहिला गेला आहे. पोखरणच नव्हे तर रावतभाटा आणि कल्पक्कम येथील अणुभट्टय़ासुद्धा या कठीण काळात भारतीय तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांनी बांधून काढल्या. भारताच्या अमेरिकेतील राजदूत अरुंधती घोष यांच्याही महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख पुस्तकात आहे. तसेच तेव्हाचे डीआरडीओचे प्रमुख डॉ. अब्दुल कलाम यांचाही पूर्ण विश्वास डॉ. काकोडकरांवर होता. पोखरण प्रकल्पावर डॉ. काकोडकरांनी जीव ओतून काम केल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा प्राधिकरणाच्या संचालक मंडळावर काकोडकर कार्यरत होते. या कामासाठी ते वारंवार व्हिएन्ना येथे जात. तेथील भारताचे राजदूत किरण दोशी यांचीही मोठी मदत भारत सरकारच्या आण्विक कार्यक्रमाला झाल्याचे दिसते.

ऑक्टोबर २००० मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतभेटीवर आले असता त्यांनी बीएआरसीला भेट दिली. त्यांनी ‘ध्रुव’बरोबर छायाचित्र घेण्याची इच्छा व्यक्त केली. तसे आधी काही ठरले नव्हते; पण पुतिन यांनी छायाचित्र घेतले आणि ते जगभरच्या प्रसारमाध्यमांना प्रसारित केले. रशिया-भारत संबंधात हे छायाचित्र पुढे फार महत्त्वाचे ठरणार होते. पुढे २००५ साली काकोडकर जेव्हा शिष्टमंडळ घेऊन चीनला जात होते, तेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अमेरिकेला जात होते. काकोडकर चीनमध्ये असतानाच त्यांना तातडीचा निरोप आला की, डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांना अमेरिकेला आपल्यासोबत ताबडतोब येण्यास सांगितले आहे. कारण अणुशक्तीविषयी महत्त्वाची बोलणी अमेरिका-भारत या दोन देशांदरम्यान होणार आहे. पंतप्रधान कार्यालयातील सुजाता मेहता आणि व्यंकटेश वर्मा यांनी ही बोलणी यशस्वी करण्यात महत्त्वाचे योगदान दिले, असे काकोडकर म्हणतात. तसेच परराष्ट्रमंत्री नटवरसिंग, पृथ्वीराज चव्हाण, परराष्ट्र सचिव श्याम सरन आदींचा खमका चमू भारतातर्फे बोलणी करायला हजर होता. एकंदरीत अमेरिकेने आपला नूर पालटला होता. जगाची वाढती ऊर्जेची गरज लक्षात घेता अणुऊर्जा हा योग्य पर्याय आहे, अन्यथा तेल किंवा कोळसा यांनी बनवलेली ऊर्जा पर्यावरणाला घातक ठरेल, असे अमेरिकेला वाटत होते. (शेल कंपनीचे वायू आणि तेल उत्खननाचे यशस्वी प्रयोग यानंतर उजेडात आले, हे लक्षात घ्यावयास हवे.) यानंतर मार्च, २००६ मध्ये- म्हणजे अवघ्या नऊ महिन्यांत बुश पुन्हा भारतात आले. याच दरम्यान भारत-अमेरिका व्यापार समूह रॉन सॉमर्स यांच्या नेतृत्वाखाली भारत व अमेरिकेतील उच्चपदस्थांशी आण्विक ऊर्जेवर बोलणी करू लागला होता. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, पोखरणनंतर अमेरिकेने हे ताडले होते की भारत हा चीनसमोर उभी राहणारी एक महासत्ता होतो आहे; तेव्हा भारताशी सहकार्य वाढवणे, हे भू-राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे आहे.

‘अ‍ॅकॅडेमिक्स, रिसर्च, टेक्नोलॉजी : द ‘आर्ट’ इन द नॉलेज इरा’ या धोरणाने काकोडकरांनी आण्विक ऊर्जेचा वापर आणि आण्विक शस्त्राचा वापर भारताच्या अर्थकारणाशी जोडून घेतला. महात्मा गांधी आणि होमी भाभा यांचे स्वप्न ग्रामीण भारताच्या विकासाशिवाय पूर्ण होणार नाही, याची जाण काकोडकरांना होती. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ग्रामीण भागात बीएआरसीची छोटी-छोटी संशोधन केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. ‘प्लॅन्ट ब्रीडिंग अ‍ॅण्ड बायोपेस्टिसाइड्स’ या विषयाबाबत महाराष्ट्रातील आणि देशातील बहुतांश कृषी विद्यापीठांत जाऊन त्यांनी पाहणी केली. कांदे, आंबे आणि इतर अन्नपदार्थ टिकवण्यासाठी अणुऊर्जेचा वापर करून दाखवला. त्यामुळे भारतीय शेतकऱ्याला आपला माल जगाच्या बाजारपेठेत काही प्रमाणात विकता आला. प्रा. राम ताकवले आणि विवेक सावंत यांनी विकसित केलेल्या ‘ई-एज्युकेशन इन डिजिटल सोसायटी’ या पदव्युत्तर शिक्षणक्रमात त्यांना खूप रस होता. महात्मा गांधींनी स्वावलंबनासाठी ‘मासेस्’कडून उत्पादन करून ग्रामविकासाची योजना अमलात आणली; परंतु ही कल्पना यांत्रिकीकरणातील ‘मास प्रॉडक्शन’समोर तग धरू शकली नाही. या यांत्रिकीकरणातच आमूलाग्र बदल घडवून परत ‘मासेस्’कडे उत्पादन नेण्याचे स्वप्न काकोडकरांनी जपले.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात काकोडकरांच्या सुविद्य पत्नी सुयशा यांनी एक छोटेसे हृद्य प्रकरण लिहिले आहे. त्यात त्यांनी वडिलांची खरगोण (मध्य प्रदेश) येथे बदली झाल्यावर त्या कमलाताई काकोडकर (काकोडकरांच्या मातोश्री) यांच्या बाल शिक्षा निकेतन माँटेसरी शाळेत कशा गेल्या, तसेच तेथील गोड शिरा, तेथेच झालेली अनिल काकोडकरांची भेट आदी गोष्टी आजही आठवतात, हे प्रांजळपणे नमूद केले आहे. काकोडकरांना साथ देताना बीएआरसीच्या संकुलात राहूनही प्रत्यक्ष बीएआरसीमध्ये पहिल्यांदा जायला किती मोठा अवधी लागला, सुट्टीवर किती कमी वेळा जाता आले, १९८३ साली पहिल्यांदा विमानात बसण्याचा अनुभव, २००४ मध्ये त्यांची केरळची सहल काकोडकरांना भारतात त्सुनामी आल्यामुळे कशी अर्ध्यावर सोडावी लागली, हे वाचताना गलबलून येते. काकोडकरांचे सर्व लेखनकाम घरीच होत असे. कार्यालयामध्ये चर्चा, भेटी, बैठका. लेखनकाम अनेकदा रात्री ११ ते पहाटे चार वाजेपर्यंत चाले. पुन्हा सकाळी सातला उठून साडेआठला कार्यालयामध्ये हजर होत. शिक्षिकेची नोकरी सांभाळून अशा थोर माणसाबरोबर संसार करायचा, यात सुयशा काकोडकर यांचेही कर्तृत्व काकोडकरांएवढे मोठे होते हे जाणवते. पुस्तकाचा शेवट सुरेश गंगोत्रा या सहलेखकाने केला आहे; त्यात शेवटी पुन्हा एकदा काकोडकरांचे एकलव्य प्रेम त्यांनी उलगडून दाखवले आहे.

भारताच्या प्राचीन विज्ञान परंपरेचा हा जणू अर्वाचीन इतिहासच आहे, असे काहीसे पुस्तक वाचल्यावर जाणवते. हिमालयाएवढी अनेक प्रचंड माणसे एकाच वेळी एकाच कामात गुंतली तरच असे काही देशात घडू शकते आणि ‘साप, नाग, विंचू, हत्ती यांचा देश’ अशी भारताची प्रतिमा पुसली जाऊन आधुनिक वैज्ञानिक विचारांचा एक विकसनशील देश अशी भारताची प्रतिमा या काळात कशी निर्माण झाली, ते या पुस्तकातून कळते. हीच या पुस्तकाची उजवी बाजू ठरते!

‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी’

लेखक : डॉ. अनिल काकोडकर, सुरेश गंगोत्रा

प्रकाशक : रुपा पब्लिकेशन्स इंडिया

पृष्ठे: १९४, किंमत : ५०० रुपये

jayraj3june@gmail.com