28 February 2021

News Flash

इतिहासाचा इतिहास

इतिहास हा तथ्यपूर्ण असावा ही मागणी असेतोवर पुराव्यानिशी इतिहास लिहिण्याचे आवाहन ते करतात.

निखिल बेल्लारीकर

इतिहास म्हणजे ‘समाजाची सामूहिक आठवण’ असा अर्थ घेतल्यास उभे राहणारे चित्र तितके साधेसोपे नाही. भारतीय उपखंडापुरते हे अफाट गुंतागुंतीचे चित्र रेखाटत गेल्या आठशे वर्षांतील इतिहासलेखनाचा पट मांडणाऱ्या पुस्तकाविषयी..

अतिप्राचीन काळापासून इतिहास हा सर्व प्रकारच्या मानवी समाजांसाठी कमी-अधिक प्रमाणात आणि विविध रूपांत जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. वर्तमानापुरते पाहायचे, तर समाजमाध्यमांवर लोक पोटतिडिकीने व्यक्त होतात, आणि त्यांच्या अभिव्यक्तीच्या माऱ्यापुढे विचारवंतांची दखल घेतली जात नाही. याबद्दल कैकजणांचे मत बव्हंशी निराशाजनक असते. परंतु इतिहास म्हणजे ‘समाजाची सामूहिक आठवण’ असा अर्थ घेऊन या आठवणींची ‘निर्मिती’, जतन, प्रसार, बदल इत्यादी गोष्टींचा मागोवा घेतल्यास उभे राहणारे चित्र इतके साधेसोपे नाही. भारतीय उपखंडापुरते हे अफाट गुंतागुंतीचे चित्र रेखाटण्याचा एक ताकदवान प्रयत्न डॉ. सुमित गुहा या अग्रगण्य इतिहासकारांनी ‘हिस्टरी अ‍ॅण्ड कलेक्टिव्ह मेमरी इन साऊथ एशिया, १२००-२०००’ या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. अवघ्या पावणेदोनशे पानांतून डॉ. गुहा भारतीय उपखंडातल्या बऱ्याच मोठय़ा प्रदेशांमधील गेल्या आठशे वर्षांतील इतिहासलेखनाचा एक जगड्व्याळ पट मोठय़ा कौशल्याने उभा करतात. ऐतिहासिक आठवणींत तवारिखांसोबतच भाट-चारणादींच्या मौखिक परंपरा, देवळे-दग्रे इत्यादींच्या हकीकतींचाही तितकाच मोठा वाटा आहे, हे ते सप्रमाण दाखवतात.

पहिल्या प्रकरणात इतिहास, भूतकाळ आणि आठवणी यांच्या सामाजिक संदर्भचौकटींचे जागतिक परिप्रेक्ष्यात उत्तम तौलनिक विवेचन आहे. भूतकाळ नेहमीच यथातथ्य आठवण्यास मानवी स्मृती असमर्थ असल्याने त्याचे लिखित अथवा मौखिक रूपात जतन करणे आवश्यक असते. यातूनच आठवणी आणि पुढे त्यांपासून इतिहास तयार होतो. त्यामुळे इतिहासलेखनाची कृती मुळातच सहेतुक असते हे दिसते. ‘क्लॉयस्टर’ अर्थात सुरक्षित जागा आणि त्याबाहेरचे या दोन प्रकारांत इतिहासलेखनाचे ढोबळ वर्गीकरण करून जगभर या दोन्ही प्रकारांतील अनेक ऐतिहासिक परंपरा एकाच प्रदेशात नांदत होत्या, हे गुहा उत्तमरीत्या दर्शवतात. प्राचीन इजिप्त, ग्रीस, मेसोपोटामिया, इराण, चीन, भारत आदी संस्कृतींच्या या त्रोटक आढाव्यातून गुहा भिन्न संस्कृतींमधील भिन्न समाजचौकट आणि त्याद्वारे तयार होणाऱ्या भिन्न इतिहासलेखनाकडे लक्ष वेधतात. मुळात इतिहासाची गरज नक्की कशासाठी? जशी मागणी, जसा उद्देश तसा पुरवठा हे समीकरण या प्रकरणातून नीट लक्षात येते. उच्च आणि नीच अशा दोन्ही स्तरांमधून अनेक परंपरा यासाठी उदयाला येतात. सरतेशेवटी गुहा- पश्चिम युरोपातही शास्त्रीय दृष्टिकोनाच्या उदयाआधी इतिहासाचा उपयोग उच्चवर्गीय हितसंबंधांच्या रक्षणासाठीच होत असे, हे दाखवून देतात.

दुसऱ्या प्रकरणात भारतीय उपखंडातील पर्शियन भाषक दरबारी इतिहासलेखन आणि त्याच्या छायेत वाढलेल्या अनेक ऐतिहासिक परंपरांचे विवेचन आले आहे. विशेषत: दिल्ली सल्तनतीच्या स्थापनेनंतर एकरेषीय कालसंकल्पना असलेल्या अनेक तवारिखा भारतात लिहिल्या जाऊ लागल्या. परंतु इतिहासलेखनात फक्त यांचेच वर्चस्व कधीच नव्हते. मुळात तत्कालीन इतिहासलेखनाचा उद्देश कैकदा विशिष्ट राजवंशाच्या चरित्रकथनाद्वारे उच्चवर्गात प्रतिष्ठा प्राप्त करणे, किंवा विशिष्ट देवस्थानात भक्तांची गर्दी वाढून आर्थिक फायदा व्हावा असा असे. पुढे उत्तर भारतभर मुघल साम्राज्य पसरले, त्याच सुमारास अनेक राजपूत घराण्यांचाही त्यात भरणा होता. सोळाव्या-सतराव्या शतकांमधील उत्तर भारतातील राजकीय स्थिरतेमुळे अनेक राजपूत घराण्यांच्या वंशावळी आणि इतिहासांत अनेक साम्यस्थळे येऊ लागली. अशा चरित्रांचा उल्लेख कैकदा त्या घराण्याचे स्थान उच्च असल्याचे दाखवणे हा असे. त्यांत परस्परविरोधी राजकीय माहितीचे भरताड असूनही स्थानिक-प्रादेशिक भूगोल आणि इतिहासाचे तपशील मात्र नेमके असत. इंग्रज अधिकाऱ्यांनी अशा अनेक चरित्रांचा अभ्यास करून त्यांमधून इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला, ज्यांत त्यांना बरेच यशही मिळाले. उत्तर आणि पश्चिम भारतासोबतच गुहा ओदिशा आणि बंगाल या पूर्व भारतातील प्रांतांचेही विवेचन करतात. ओदिशात जगन्नाथाचे मंदिर अल्पकाळ वगळता ‘जिवंत’ राहिल्याने त्यासंबंधीच्या परंपरा, इतिहाससाधने इत्यादी शिल्लक राहून तेथील ऐतिहासिक परंपराही टिकली. बंगालमध्ये मात्र पूर्णच उलटे चित्र असल्याचे प्रतिपादन गुहा करतात. बख्तियार खिलजीच्या काळापासून मुघल काळापर्यंत बंगालमध्ये अनेक कारणांनी इतकी सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे झाली, की तेथील इतिहासलेखन परंपरेला स्थिरावण्यास योग्य तो अवधीच मिळाला नाही. त्यातच इंग्रजांचा प्रवेश झाल्यानंतर इतके आणि इतक्या वेगाने बदल झाले, की जुनी व्यवस्था पूर्णच मोडून पडली. त्यामुळे ब्रिटिशपूर्वकालीन बंगाली इतिहासलेखन हे प्रामुख्याने विवाहसंबंधविषयक वंशावळी आणि संतचरित्रांपुरतेच मर्यादित राहिले. उत्तर भारतातील अनेक प्रांतांचा असा धावता आढावा घेऊन गुहा प्राचीन भारतातील इतिहासलेखनाची गुंतागुंत उलगडून दाखवतात.

तिसऱ्या प्रकरणात गुहा त्यांच्या आवडत्या महाराष्ट्राकडे वळतात. गुहा हे आजमितीस मराठेशाहीच्या काही मोजक्या अग्रगण्य बिगरमराठी अभ्यासकांपैकी एक आहेत. मराठेशाही इतिहासाची सामाजिक शास्त्रांमधील वेगळी उपयोगिता ते कायम अधोरेखित करत असतात. हे प्रकरणही त्याला अपवाद नाहीच. बखरींच्या सामाजिक संदर्भचौकटीच्या त्रोटक चच्रेने प्रकरण सुरू होते. इनामे इत्यादींवर दावा सांगण्याकरिता अनेक बखरी, कैफियती इत्यादी कशा रचल्या गेल्या, खोटी सनदापत्रे कशी तयार केली, याची अनेक उदाहरणे ते व्यवस्थितपणे उलगडून सांगतात. या प्रकरणातील एक मुख्य मुद्दा म्हणजे- कागदोपत्री पुराव्याच्या आधारे तर्क करून, त्याआधारे स्वत:च्या इनामे आदींबद्दलचे दावे कायदेशीररीत्या संमत करून घेण्याला महाराष्ट्रात किमान काही शतकांचा इतिहास आहे. तेव्हा अस्सल व नकली कागद कसे ओळखावे, बखरींमधील सत्य कसे ओळखावे, इत्यादी गोष्टींचा महाराष्ट्राला ब्रिटिश येण्याच्याही बराच आधीपासून परिचय होता. या गोष्टींना सामाजिक व आर्थिक मूल्य असल्याने ते कौशल्य व ती वृत्ती पिढय़ान्पिढय़ा जोपासली गेली. कागदपत्रांना ऐतिहासिक पुरावा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हा फक्त उच्च जातींपुरताच मर्यादित नव्हता, हे दाखवण्याकरिता रामोशी समाजाचे नेते उमाजी नाईक यांच्याकडील ताम्रपटाचे अचूक उदाहरण गुहा देतात.

याखेरीज समाजशास्त्रामधील व इतिहासातील एका मोठय़ा प्रश्नाचे अंशत: उत्तर ते मराठेशाहीच्या माध्यमातून देतात! प्रख्यात संशोधक गायत्री चक्रवर्ती स्पिव्हाक यांनी ‘कॅन दी सबाल्टर्न स्पीक?’ असा प्रश्न विचारून त्याचे स्वत:च नकारार्थी उत्तरही दिले होते. मराठेकालीन महजर इत्यादींमधून आलेला महार समाजाच्या जबानीचा हवाला देऊन गुहा सांगतात की, किमान महाराष्ट्रापुरते तरी, ‘सबाल्टर्न’ अर्थात दलित हे नुसतेच बोलत असे नाही, तर त्यांची जबानी ही राज्याकरिताही एक महत्त्वाची गोष्ट होती. सरतेशेवटी एका महत्त्वाच्या उदाहरणाद्वारे गुहा दाखवून देतात की, इतिहास हा जाणीवपूर्वक रचला जातो. मराठेशाहीच्या अनेक बखरींमध्ये ‘बीदर बादशहा’ किंवा मुघल बादशहाचा उल्लेख कमीअधिक तपशिलाने येतो, परंतु जावळीच्या मोरेंची बखर वगळता विजयनगरचा उल्लेख मात्र त्रोटकपणेच होतो. याचे कारण अज्ञान नसून, मराठय़ांच्या प्रांतीय अभिमानात असावे, असा तर्क गुहा मांडतात. दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्याशी आपले कूळ या ना त्या प्रकारे नेऊन भिडवण्याला प्रतिष्ठा होती; मात्र महाराष्ट्रात तसे न होता बखरी एकजात शिवछत्रपतींच्या वंशापाशीच पोहोचतात.

वसाहतपूर्वकालीन भारतानंतर चौथ्या आणि शेवटच्या प्रकरणात ब्रिटिश काळातील भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत आणि पाकिस्तानातील इतिहासलेखनाची विस्तृत चर्चा येते. या प्रकरणात चर्चिलेल्या घडामोडी आधुनिक काळाच्या परिप्रेक्ष्यात पाहता खूपच महत्त्वाच्या आहेत. ब्रिटिशप्रणीत इतिहासलेखनपद्धतीच नव्हे, तर एकूण व्यवस्थाच अगोदरच्या व्यवस्थेपेक्षा पूर्ण वेगळी होती. याआधारे कैक ब्रिटिश लेखकांनी भारतावर अनाठायी टीका केली. एकरेषीय कालसंकल्पना आणि तीतून उदयास आलेले ‘पुराव्यानिशी’ लेखन, ख्रिस्ती धर्मप्रसार आणि उपयुक्ततावादाच्या आधारे ब्रिटिश साम्राज्याचे नैतिक समर्थन आणि भारतीय, त्यातही हिंदू संस्कृतीच्या नैतिक अध:पतनावर बोट ठेवणे आदी प्रकार करणाऱ्यांत चार्ल्स ग्रँट आणि जेम्स स्टुअर्ट मिल हे अग्रेसर होते. विशेषत: भारताबद्दल सप्रमाण माहिती नसतानाही भारतीयांच्या उणिवा दाखवण्याचा दावा करण्यात मिल अग्रेसर होता. नंतरच्या कैक ब्रिटिश इतिहासकारांनी मिलवर टीका करूनही त्यांचा सूर मूलत: सारखाच होता- भारताला ऐतिहासिक दृष्टी नसून त्याकरिता फक्त युरोपीय पद्धतच अंगीकारली पाहिजे, इत्यादी इत्यादी. ब्रिटिशांच्या या दृष्टिकोनावरील भारतीयांच्या प्रतिक्रिया गुहांनी तपशीलवारपणे तपासल्या आहेत.

यावर भारतीय स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. याची सुरुवात झाली बंगालमध्ये. ब्रिटिश इतिहासकारांचा भर इस्लामी काळापासून पुढील इतिहासाकडे असतो, हे दाखवताना बंकिमचंद्रांनी बंगालच्या प्राचीन इतिहासाकडे लक्ष वेधले आणि बंगालचा इतिहास लिहिण्यात बंगाली लोकांनीच पुढाकार घ्यावा असे सुचवले. याचे परिणामही विविध होते- काहींनी युरोपीय पद्धतीची पुस्तके लिहायला सुरुवात केली, तर जदुनाथ सरकारांनी इशारा दिला की पुरेशी साधने जमवल्याशिवाय आताच हा प्रयत्न करण्याची घाई करू नये. हळूहळू अनेक साधने उजेडात येत गेली, आणि राष्ट्रीय इतिहासलेखनाच्या प्रवाहात बंगाली इतिहासकारांनी उडी घेतली. पुढे पुढे त्यावर मार्क्‍सवाद्यांचा वरचष्मा राहिला.

याही प्रकरणात गुहा मराठेशाहीच्या इतिहास लेखनातील वेगळेपण दर्शवतात. पेशवाईचा अस्त होऊनही कैक मराठी संस्थाने १९४७ पर्यंत टिकून होती. शिवाय उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, आदी उदाहरणे पाहता महाराष्ट्रीयांची सशस्त्र उठाव करण्याची प्रवृत्ती आणि क्षमता या दोन्हींची मुंबईतील ब्रिटिश प्रशासनाने चांगलीच दखल व धास्ती घेतली होती. या उठावांची प्रेरणा बहुतेकदा मराठेशाहीपर्यंत पोहोचत असल्याने मराठेशाहीची स्तुती करणाऱ्या कोणत्याही लिखाणाकडे ब्रिटिश संशयानेच पाहत. इतिहासविषयक जी दृष्टी ब्रिटिश रुजवू पाहत होते, तिला महाराष्ट्रातून सर्वात कडवा व परिणामकारक विरोध झाला. त्याचा थोडक्यात आढावा या प्रकरणात घेतला आहे. युरोपीय इतिहासलेखनपद्धती वापरून, लाखो समकालीन कागदपत्रे जमा करून त्यांद्वारे मराठय़ांचा नेमका इतिहास मांडणे आणि परिणामत: युरोपीय पद्धती वापरून युरोपीयांनाच विरोध करणे हे त्यामुळे साध्य झाले. विजयनगरच्या इतिहासाची गरज हिंदू राष्ट्रवादाला असली तरीही मूळ साधनांतच फार काही न मिळाल्याने इतिहासकारांची झालेली निराशाही गुहा वर्णितात.

इंग्रजी तंत्रज्ञानामुळे दिपलेल्या काहींनी ‘हे सर्व भारतात आधीपासूनच होते’ असा प्रचार केला, आणि त्या अनुषंगाने कैकजणांनी प्राचीन भारताच्या महान संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा घाट घातला. परिणामत: लिहिलेली पुस्तके उत्तर भारतात कैक वर्षे प्रचलित होती. भारतीय इतिहासलेखनातले हे नाना प्रवाह शेवटी नेहरूप्रणीत ‘लिबरल’ इतिहासलेखनासमोर तुलनेने काहीसे बाजूला पडले. स्वातंत्र्योत्तर काळातील विद्यापीठांमधून इंग्रजीत जे इतिहासाचे अध्यापन व अध्ययन होई, ते साक्षरतेच्या अभावामुळे समाजापर्यंत पोहोचतच नसे. परिणामी त्या व्यवस्थेतील इतिहासकारांची चर्चा ही फक्त अन्य तत्सम इतिहासकारांशीच होत असे. यालाच गुहा ‘आयव्हरी टॉवर’ असे संबोधतात. हळूहळू १९८० नंतर हिंदू राष्ट्रवादी ‘पॉप्युलर’ इतिहासाने या अकादमिक इतिहासकारांच्या वर्चस्वाला बऱ्याच प्रमाणात दिलेल्या आव्हानाचीही ते चर्चा करतात.

या पुस्तकाचा उपसंहार आवर्जून वाचण्यासारखा आहे. अकादमिक इतिहासकारांनी आपले स्थान आणि समाजमन बदलण्याची आपली क्षमता यांबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यात गुहा करतात. त्यांनी घेतलेला इतिहासलेखनाचा आढावा पाहता हे खरे तर स्वयंस्पष्ट आहे. तरीही ही कबुली व हे आत्मभान विचारवंतांमध्ये अभावानेच आढळते. हेच या पुस्तकाचे बहुधा सर्वात मोठे वैशिष्टय़ आणि यशही असावे. इतिहास हा तथ्यपूर्ण असावा ही मागणी असेतोवर पुराव्यानिशी इतिहास लिहिण्याचे आवाहन ते करतात. हाच या पुस्तकाचा शेवटचा संदेश आहे- सध्याच्या काळात सर्वानीच त्याचे यथाशक्ती पालन करणे ही खरी गरज आहे.

‘हिस्टरी अ‍ॅण्ड कलेक्टिव्ह मेमरी इन साऊथ एशिया, १२००-२०००’

लेखक : सुमित गुहा

प्रकाशक : युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन प्रेस

पृष्ठे: २६४, किंमत : ९१५ रुपये

nikhil.bellaryar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 5:18 am

Web Title: book review history and collective memory in south asia 1200 2000 zws 70
Next Stories
1 अन्यायाविरुद्ध खणखणीत आवाज..
2 दैववाद की उत्क्रांतीवाद?
3 पुस्तक नेमके कुठे नेते?
Just Now!
X