14 December 2017

News Flash

बुकरायण : नव्या नव्हाळीची रहस्यकथा!

प्रगत देशांमधील समस्येचा एक धागा ‘हिस्ट्री ऑफ वूल्व्ह्ज’ या कादंबरीमध्ये सजगपणे वापरण्यात आलेला

पंकज भोसले | Updated: October 7, 2017 4:05 AM

एमिली फ्रिडलण्ड

‘चाइल्ड पोर्नोग्राफी’, लहान मुलांवरील अत्याचार या गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेल्या प्रगत देशांमधील समस्येचा एक धागा ‘हिस्ट्री ऑफ वूल्व्ह्ज’ या कादंबरीमध्ये सजगपणे वापरण्यात आलेला आहे. या कादंबरीतील रहस्य खिळवून ठेवणारे आहेच.. पण तितकीच सुंदर आहेत ती लेखिकेने केलेली निसर्गवर्णने.. लांडग्यांचे रूपक इथे, खलप्रवृत्तीच्या मुख्य पुरुषपात्राशी चपखल जोडले आहे. एवढे असूनही नव्या नव्हाळीची- टीनएज फिक्शन ठरणारी- ही कादंबरी ‘बुकर पारितोषिका’च्या लघुयादीत यंदा न येती तरच नवल.. 

आंतरराष्ट्रीय ‘बुकर प्राइझ’च्या यंदाच्या अंतिम लघुयादीतील सहा कादंबऱ्या वाचून त्यांच्याबद्दल बरंच काही सांगणाऱ्या नैमित्तिक सदराचा हा चौथा भाग!

इसवी सन दोन हजारोत्तर काळात म्हणजेच गेल्या सतरा वर्षांच्या पुरस्कार इतिहासामध्ये निव्वळ एकाच तरुण-तुर्की (टीनएजर) निवेदक असलेल्या कादंबरीला बुकर प्राप्त झाले आहे. स्पर्धेत इतिहास, शंभर वर्षांतील समाज ढवळून काढणारी बाब किंवा भाव-भावनांच्या कल्लोळ, अतिदु:खांची गाथा असलेल्या कादंबऱ्यांना पुरस्कार मिळण्याची शक्यता अधिक असते. मात्र, २००३ साली डीबीसी पिएर यांच्या ‘व्हर्नन गॉड लिटिल’ या आत्यंतिक तिरकस कादंबरीला स्पर्धेत स्थान मिळण्याला कारणीभूत होत्या त्या अमेरिकेसोबत ब्रिटनमधील शाळेतही लहान मुलांनी घडविलेल्या हिंसाचाराच्या घटना. यातील शाळकरी नायकाने कोणताही गुन्हा केलेला नसताना त्याला गोळीबाराच्या घटनेमध्ये गोवले जाते. का आणि कसे, याचे रहस्य राखत इथला नायक गंभीर-गमती करीत कादंबरीभर पोलिसांपासून पळ काढून या गुन्ह्य़ाच्या मागावर राहतो आणि रहस्यरंजन करीत वाचकांना पानापानांत जखडून ठेवतो. या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाल्यानंतर यंग-अ‍ॅडल्ट साहित्य प्रकाराला बरे दिवस आले आणि मार्क हॅडनच्या ‘द क्युरिअस केस इन्सिडण्ट ऑफ  द डॉग इन द नाइट टाइम’ कादंबरीपासून ते जॉन ग्रीनच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ किंवा सध्या टीव्ही मालिकेमुळे जे अशरच्या ‘थर्टीन रीझन्स व्हाय’ या पुस्तकांनी खपाचे विक्रम केले. या सर्वाची आठवण होण्याचे कारण म्हणजे यंदाच्या बुकरमध्ये असलेली एमिली फ्रिडलण्ड हिची कादंबरी ‘हिस्ट्री ऑफ वूल्व्ह्ज’ ही वर सांगितलेल्या तरुण-तुर्की निवेदकांच्या पंथातील कादंबरी आहे. पण निव्वळ शाळकरी वयातील बंडखोर पात्रापेक्षा अधिक समंजसपणा ठायी ठायी भरलेल्या चौदा वर्षीय नायिकेचे हे निवेदन या साहित्यप्रकारातील विरळा नमुना आहे.

यंदाच्या बुकर निवड समितीने कादंबरी निवडताना वाचनीयतेखेरीज पुस्तकाबाबत कोणतीही भपकेदार जाहिरातबाजी ग्राह्य़ न धरण्याचा निश्चय केल्यामुळे ही अमेरिकेतल्या खेडेगावात घडणारी संयत रहस्योत्कट कादंबरी लघुयादीपर्यंत मिरवत आहे. या कादंबरीतील मेडलिन ऊर्फ लिंडा किंवा इतर अनेक चांगल्या अर्थाने नसलेल्या टोपणनावांनीच ओळखली जाणारी निवेदिका सर्वच बाबतीत सामान्य आहे. तिच्याकडे तिच्या वर्गातील आकर्षणबिंदू असलेल्या लिलीसारखे घोटीव शरीर नाही किंवा घरातील वातावरण बरे नाही. तिला सातत्याने आपले आई-वडील यांचे आपण खरेच अपत्य आहोत का, ही शंका असते. हिप्पी संस्कृती अंगीकारून झालेल्या भ्रमनिरासानंतर ख्रिस्ती धर्मातील अतिरेकी देवभोळेपणा स्वीकारलेली आई आणि वडिलांच्या सान्निध्यात तिची वाढ ही प्रचंड एकटेपणात झाली आहे.

या लिंडाच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे, ग्रिअरसन नावाच्या इतिहासाच्या शिक्षकाचे कॅलिफोर्नियातून मिनोसोटामधील खेडय़ामध्ये शिकवायला येणे! त्याआधीचे अ‍ॅडलर नावाचे निव्वळ रशियाच्या इतिहासाची आणि झारची माहिती देणारे शिक्षक शाळेच्या प्रहरातच मृत्युमुखी पडल्याचा प्रसंग अत्यंत वृत्तकोरडेपणातून लेखिकेने जिवंत केला आहे. तर कॅलिफोर्नियामधील शहरी भपक्यातून या खेडेगावसदृश शाळेमध्ये दाखल होणाऱ्या ग्रिअरसन यांचे वर्गातल्या लिलीकडे आकर्षित होतानाची जळण-घडण अनुभवत लिंडा या शिक्षकाला आपल्या जवळ ओढण्यासाठी क्ऌप्त्या शोधते. इतिहासाच्या तासासाठी ‘लांडग्यांचा इतिहास’ यावर प्रकल्प रचण्याच्या निमित्ताने लोलिता कादंबरीतील नायिकेसारखे ग्रिअरसन या शिक्षकाकडे पाहायला लागते. पुढे या शिक्षकाने कॅलिफोर्नियामध्ये केलेल्या कृष्णकृत्यांचे तपशील लिंडाला समजतात आणि लिलीशी त्याने केलेल्या वर्तनाचीही जगामध्ये चर्चा रंगू लागते. लिंडा यादरम्यान आपल्या कुटुंबासोबत नदीकिनारी असलेल्या घरामध्ये एकांतवासाचा टोकदार सहवास अनुभवताना आणखी एका कुटुंबाशी परिचित होते. पात्रा आणि तिचा छोटा मुलगा पॉल. या कुटुंबामध्ये पॉलला सांभाळण्यासाठी दाखल झाल्यानंतर लिंडाचे आयुष्यभान आणखी वाढत जाते. तिच्या भवतालाकडे ती आणखी वेगळ्या पद्धतीने पाहू लागते.

लिली आणि शिक्षक ग्रिअरसनमध्ये, लिंडा आणि ग्रिअरसनमध्ये वाढत आणि ताणत जाणारे संबंध यांच्याबरोबरच त्या छोटय़ा गावामध्ये घडत जाणारे बदल या कादंबरीचा गाभा आहे. ग्रिअरसनच्या कुख्यात भूत आणि वर्तमानाचा लिंडाच्या ‘लांडग्यांच्या इतिहासा’च्या शीर्षकाशी लावलेला प्रतीकात्मक संबंध आणि पुढे त्यानुसार घडणारे रहस्यमयी कथानक यांनी ही कादंबरी वाचनीयतेचे सगळे निकष पाळते. कादंबरीमध्ये गुन्हे आणि रहस्य आहे, पण ती सर्वाधिक तेथील निसर्गाविषयी बोलते. त्या निसर्गानुसार वर्षभरात माणसांच्या दिनक्रमांत होणाऱ्या बदलांबद्दल बोलते. बर्फाळ आणि उन्हाळ ऋतूंचे वेगवेगळे रंग शब्दबद्ध झाले आहेत. त्यातील बदल चित्रबद्ध झाला आहे. आपल्या लहानपणातील निसर्ग आज उरला नाही, याबद्दलची लिंडाची खंत वारंवार व्यक्त होते. बर्फ पडल्यानंतर गावातल्या लोकांचे जगणे, हॉकी खेळणाऱ्या तरुणांचा वेळ घालविण्याचा कार्यक्रम हे सारे  विस्ताराने येथे चितारण्यात आलेला आहे. त्यामुळे ‘हिस्ट्री ऑफ वूल्व्हज’ निव्वळ गुन्हे-रहस्यकथा राहत नाही. पौगंडावस्थेतील एकारलेपणातून निवेदनात आलेली तटस्थ आणि रांगडी भाषा वाचकाला पकडून ठेवते. ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’, लहान मुलांवरील अत्याचार या गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेल्या प्रगत देशांमधील समस्येचा एक धागा कादंबरीमध्ये सजगपणे वापरण्यात आलेला आहे.

‘व्हर्नन गॉड लिटिल’सारखी यंग-अ‍ॅडल्ट किंवा तरुण तुर्की कादंबरी असूनही ‘हिस्ट्री ऑफ वूल्व्हज’ त्यातील रहस्य आणि सुंदर निसर्गवर्णन या दोन परस्परविरोधी घटकांमुळे वेगळी बनली आहे. यंदा तीन अमेरिकी लेखक बुकरच्या स्पर्धेमध्ये आहेत. त्यातील जॉर्ज सॉण्डर्स आणि पॉल ऑस्टर या दिग्गजांच्या नावापुढे एमिली फ्रिडलण्ड बुकरच्या दीर्घयादीमध्ये येईस्तोवरदेखील अमेरिकी साहित्यवर्तुळात परिचित नव्हती. यापूर्वी थोडय़ा लघुकथा लिहिलेल्या फ्रिडलण्ड हिच्या पुस्तकाला बुकर मिळाल्यास तरुण-तुर्की कादंबऱ्यांना आता आहेत त्याहून अधिक चांगले दिवस येतील, हे नक्की.

‘हिस्ट्री ऑफ वूल्व्ह्ज’

लेखिका : एमिली फ्रिडलण्ड

प्रकाशक : पेंग्विन/ डब्ल्यू.एन. बुक्स

पृष्ठे : २७९, किंमत : ६९९ रुपये

पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

First Published on October 7, 2017 4:05 am

Web Title: book review history of wolves by emily fridlund
टॅग History Of Wolves