वंशभेदाला विरोध करणाऱ्या विचारांचे लेखक म्हणून इब्राम एक्स. केंडी यांची ख्याती २०१६ पासून- म्हणजे ऐन ट्रम्पकाळात – अधिक होऊ लागली. अमेरिकेच्या ‘नॅशनल बुक अ‍ॅवॉर्ड्स’वर राजकीय वर्चस्व खरोखरच नसतं, हे त्या वर्षीच्या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट ललितेतर पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं सिद्ध झालं. त्या पहिल्या पुस्तकाचं नाव होतं ‘स्टॅम्प्ड फ्रॉम द बिगिनिंग’. वंशभेद हा अमेरिकेला जणू या देशाच्या जन्मापासूनच झालेला आजार आहे, असं निदान केंडी यांनी त्या पुस्तकात केलं होतं. नव्या, दुसऱ्या पुस्तकात त्यांनी निराळी मांडणी केली आहे. ‘हाउ टु बी अ‍ॅन अ‍ॅन्टी-रेसिस्ट’हे ते पुस्तक अद्याप भारतात उपलब्ध नाही, त्यामुळे एरवी सवलतीत पुस्तकं विकणाऱ्या भारतीय संकेतस्थळांवरही बाराशे ते दीड हजार रुपये अशी त्याची किंमत सध्या आहे.. पण पुस्तकाचा वाचकवर्ग केवळ अमेरिकेपुरता नसल्याचा साक्षात्कार प्रकाशकांना (वनवर्ल्ड- रँडम हाउस) लवकरच होईल, अशी चिन्हं आहेत.

हे पुस्तक अमेरिकेतल्या वंशवादाची चिकित्सा करून ‘वंशवादविरोध’- सक्रिय विरोध- हा उपाय सुचवणारं आहे. तोच उपाय जातीजातींमधल्या भेदांवरही सुचवता येतो, हे उघड आहे. भारतात अनेकांनी तो सुचवलाही आहे. ‘आंतरजातीय विवाह हा जातिभेद मिटवण्याचा एक मार्ग’ यासारख्या विश्वासांमधून तो सक्रिय विरोध व्यक्तही होत असतो. पण विरोधाची कारणं आणि विरोध करण्यासारखी परिस्थिती यांची शहानिशा सतत करत राहणं, हे विरोधाची धार वाढवण्यासाठी उपयोगी पडतं. ती धार वाढवायची, तर विश्लेषणाच्या पद्धतीत नावीन्य हवं. असं नावीन्य ‘हाउ टु बी अ‍ॅन अ‍ॅन्टी-रेसिस्ट’ या पुस्तकात सापडू शकेल.

‘मीही वंशवाद मान्य असणाराच होतो..’ अशी कबुली स्वत: कृष्णवर्णीय असलेले केंडी पुस्तकाच्या सुरुवातीलाच देतात. त्यांचं ‘वंशवाद मान्य असणं’ म्हणजे काय? – याची उदाहरणं पुस्तकात आहेत. त्यातलंच एक :  ‘मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर स्मृती वक्तृत्व स्पर्धे’मध्ये पहिला क्रमांक पटकावताना केंडी यांनी केलेलं भाषण- कृष्णवर्णीय तरुणांना शिक्षणाचं महत्त्व कळत नाही, जोडीदार शोधणं आणि खंडीभर मुलं होऊ देणं एवढंच हे तरुण पूर्ण उत्साहानं करताना दिसतात.. जणू चांगलं जगण्याचा उत्साहच त्यांना नसतो, वगैरे भरपूर परखड म्हणावंसं आत्मपरीक्षण होतं त्या भाषणात. पण केंडी विचारतात, एका समाजघटकाला ‘हे सुधारणार नाहीत’ असं लेबल लावण्याचाच प्रकार नाही का हा? त्या समाजघटकाचा भोवताल बदलतो आहे, त्या समाजघटकातले काहीजण रूढार्थानं ‘प्रगती’ करत आहेत, पण अख्खा भोवताल तसाच राहातो, यात धोरणात्मक अपयश काहीच नाही? धोरणं ‘पुरेशी’ असतील, तर मग ‘हे कधी सुधारणार नाहीत..’ अशी धारणा खपवून कशी काय घेतली जाते? अशी धारणा कुणीतरी सातत्यानं बाळगत राहातंय, या अपयशात धोरणांच्या अपुरेपणाचा काहीच हात नाही?

ही धोरणं बदलण्यासाठी संघर्षच करावा लागतो, हे केंडी यांना स्वानुभवानं माहीत आहे. रस्त्यावरच्या संघटित निदर्शनांची सवयही त्यांना आहेच. पण त्याहीपेक्षा ठिकठिकाणी भाषणं देऊन मनं बदलणं, हा त्यांचा सध्याचा वैयक्तिक कृती-कार्यक्रम आहे. ‘तुम्ही केवळ वंशवादी नसणं पुरेसं नाही.. तुम्ही ‘वंशवादविरोधी’ आहात का?’ हा टोकदार प्रश्न ते अशा भाषणांतून प्रत्येक श्रोत्याला करतात. हाच प्रश्न त्यांनी पुस्तकातून जगाला केला आहे.

प्रश्न कायम आहेत, कारण ‘सध्याची धोरणे पुरेशी नाहीत’ हे दाखवून देण्यासाठी नेहमीच सांख्यिकीचा आधार घेतला जातो. भारतातल्या दलित, वंचित कार्यकर्त्यां-विद्वानांनीही तो वेळोवेळी घेतला आहे. तसा आधार केंडी घेतातच पण हल्लीच्या अमेरिकी सत्ताधाऱ्यांबद्दलही ते बोलतात, हे भारतातल्या अनेकांना जमलेलं नाही. ओबामा यांच्या कारकीर्दीत बरेच अमेरिकी बुद्धिजीवी हे  ‘आपण आता ‘वंशभेदोत्तर’ काळात आहोत’ असं म्हणायचे, याचा सटीक ऊहापोह केंडी करतात. ते म्हणतात : या अशा लोकांना, आता ‘तुमचा’ राष्ट्राध्यक्ष आलाय, असंच म्हणायचं असावं. ही लोकभावना होतीच, कारण ‘वंशवादविरोध’ ही मनोभूमिका बहुतेकांनी स्वीकारलेलीच नाही. नेमक्या याच ‘आम्ही वंशवादी नाही’ म्हणणाऱ्या आणि प्रत्यक्षात वंशवादविरोधी नसणाऱ्या लोकांनी ट्रम्प यांच्यासारख्या गौरवर्ण-वर्चस्ववादी राजकारण्यांना कोपरानं खणू दिलं. ट्रम्प गौरवर्णीयांना सतत भीती घालत राहिले की हे कृष्णवर्णीय- आशियाई असे सारे परवंशीय लोक आता तुमच्यावर शिरजोर होणार.

वंशभेद मानणारे किंवा वंशवादी विचार करणारे लोक काही केवळ गौरवर्णीय- कॉकेशन वंशाचेच असतात, असंही नाही. केंडी यांना कदाचित माहीत नसेल, पण अनेक अमेरिकास्थित मराठीभाषकही कृष्णवर्णीयांचा  ‘काळू’ असा वर्णवाचक उल्लेख करतात. केंडी यांनी पुस्तकातून मांडलेली ‘वंशवादविरोध’ ही संकल्पना समाजापासून सध्या दूरची आहे. पण ही संकल्पना म्हणजे मनोभूमिका बदलणारं उत्तर आहे. विरोधाचा विवेक कायम ठेवणारी ही संकल्पना केंडी यांनी कुठेकुठे जोडून पाहिली, हे समजण्यासाठी पुस्तक उपयोगी पडेल.