आसिफ बागवान asif.bagwan@expressindia.com

सध्याच्या लोकशाही चौकटीत इस्लामला बसवणे कठीण आहे ते का, याचा वेध घेऊ पाहणारे हे पुस्तक मुस्लीम राष्ट्रांतील राजकारण, सत्ताकारण आणि धर्माधिष्ठीत व्यवस्थेबद्दल ऐतिहासिक आणि वर्तमान संदर्भ पुरवणारे आहे..

धर्म आणि लोकशाही या दोघांत श्रेष्ठ कोण, हा प्रश्न आज नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उपस्थित होतो. पृथ्वीतलावर आजघडीला जवळपास चार हजारांहून अधिक धर्म, पंथ अस्तित्वात असून त्यांचे अनुयायी जगभरातील विविध देशांत विखुरले गेले आहेत. त्या देशांपैकी जवळपास १६७ देश लोकशाही मार्गाने चालणारे आहेत. त्यातील अनेक देशांत भिन्न धर्माची जनता एकत्रितपणे लोकशाहीच्या छत्राखाली नांदते आहे. अनेक देशांत या ना त्या टप्प्यावर धर्म आणि लोकशाही यांतील श्रेष्ठत्वाचा वाद उपस्थित होतोच. या वादांचे अधिक बारकाईने निरीक्षण केल्यास इस्लाम या धर्माशी निगडित लोकशाहीविषयी संघर्षांचे मुद्दे अधिक असल्याचे दिसून येतात. याचा अर्थ अन्य धर्माचे लोकशाहीशी अगदी गुण्यागोविंदाने सुरू आहे, असा नाही. मात्र, मध्य-पूर्व, दक्षिण आशिया किंवा युरोप येथील राष्ट्रांत ‘लोकशाही विरुद्ध इस्लाम’ हा संघर्ष अधिक प्रखरतेने उभा राहिलेला दिसतो. तसे पाहायला गेले तर इंडोनेशिया, मलेशिया, टय़ुनिशिया, तुर्कस्तान या देशांत करोडोच्या संख्येने राहणाऱ्या मुस्लीम लोकसंख्येने लोकशाही प्रक्रियेशी जुळवून घेतलेले आहेच. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या वास्तव्यास आहे. असे असतानाही ‘इस्लाम आणि लोकशाही एकत्र नांदणे कठीणच’ असा दृष्टिकोन दाखल्यांनिशी दिला जातो. इस्लाम या धर्माचा पायाच हुकूमशाही व्यवस्थेशी निगडित असल्याचेही सांगितले जाते. हे गृहीतक ठसवण्यासाठी अनेक कारणे दिली जातात. मात्र, त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न अपवादानेच दिसतो. हीच पाश्र्वभूमी विचारात घेऊन शादी हमीद यांनी ‘इस्लामिक एक्सेप्शनॅलिझम : हाऊ द स्ट्रगल ओव्हर इस्लाम इज रीशेपिंग द वर्ल्ड ’ या पुस्तकाची मांडणी केली आहे.

अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, परराष्ट्र धोरण अशा विविध क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील ब्रूकिंग्ज इन्स्टिटय़ूट या संस्थेत  ‘इस्लामी जगताशी अमेरिकेचे संबंध’ या प्रकल्पात वरिष्ठ अभ्यासक म्हणून शादी हमीद हे कार्यरत आहेत. इस्लाम धर्माविषयीच्या अभ्यासासोबतच मुस्लीम राष्ट्रांतील घडामोडींचे जाणकार अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे हमीद यांचे हे पुस्तक म्हणजे, मुस्लीम राष्ट्रांतील राजकारण, सत्ताकारण आणि धर्माधिष्ठित व्यवस्था या तिन्हींच्या संदर्भाचा मोठा खजिना आहे. इस्लामविषयी जगभरात- विशेषत: पाश्चात्त्य राष्ट्रांत असलेला संशयास्पद दृष्टिकोन लक्षात घेऊन, त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न हमीद यांनी या पुस्तकात केला आहे.

हमीद यांच्या पुस्तकाचे नावच ‘इस्लामिक एक्सेप्शनॅलिझम’ असे आहे. ‘एक्सेप्शनल’ अर्थात अपवादात्मक. जगातील इतर धर्माच्या तुलनेत इस्लाम हा अतिशय वेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण धर्म आहे, असा दावा ते पुस्तकातून करतात. मात्र, हे ‘वेगळेपण’ इस्लामच्या धर्मरीती वा नीतिमूल्यांशी संबंधित नसून सध्याच्या लोकशाही चौकटीत इस्लामला बसवणे कसे कठीण आहे, यावर पुस्तक अधिक भाष्य करते. किंबहुना इस्लाम हा धर्मनिरपेक्षतेच्या पातळीवर इतर धर्माच्या तुलनेत अधिक असहिष्णू आहे, हा पाश्चात्त्य किंवा उजव्या विचारसरणीच्या मंडळींमध्ये रूढ असलेला विचारच हमीद यांनी अधोरेखित केला आहे.

इस्लामची ही ‘अपवादात्मक’ रचना मांडताना हमीद यांनी १९२४ मध्ये खिलाफत राजवट संपुष्टात आल्यानंतरच्या काळापासून सुरुवात केली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर इस्लामी कायदा आणि रीती यांच्या आधारे जगभरातील मुस्लीम समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी खलिफांची नेमणूक करण्यात आली होती. सुरुवातीच्या चार खलिफांच्या राजवटीनंतर खिलाफत या संकल्पनेलाच धक्का बसला आणि विविध मुस्लीम राष्ट्रांत बादशाहांच्या रूपात वेगवेगळे खलिफा एकाच वेळी वर्चस्व गाजवू लागले. त्यातही तुर्कस्तानच्या उस्मानी साम्राज्याचा दबदबा अधिक होता. या साम्राज्याच्या नियंत्रणाखाली जगभरातील मुस्लीम समाजाची सूत्रे हलत होती. मात्र, १९२४ मध्ये हे साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर अधिकृत इस्लामी राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठीचा संघर्ष वाढू लागला. गेल्या दशकभरात अरब राष्ट्रांत झालेले उठाव आणि त्यानंतर ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराण अ‍ॅण्ड सीरिया’ अर्थात आयसिसचा उदय या घडामोडी या संघर्षांचेच उदाहरण आहे, असे हमीद सांगतात.  त्यासाठी त्यांनी इजिप्तसह अन्य काही राष्ट्रांतील राजकीय उठाव आणि हिंसाचाराचे अनेक दाखले दिले आहेत.

या पुस्तकाचा बहुतांश भाग ‘मुस्लीम ब्रदरहूड’मधील स्थित्यंतरांशी संबंधित घडामोडींवर खर्च झाला आहे. आजवरच्या सर्व इस्लामी चळवळींच्या मुळाशी असलेल्या ‘मुस्लीम ब्रदरहूड’ची सुरुवात १९२८ मध्ये झाली. त्या वेळी मुस्लीम समाजाला अधिकृत राजकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे हा हेतू होताच; पण हसन अल बाना या इजिप्तमधील शिक्षकाने सुरू केलेल्या या चळवळीचा उद्देश इस्लाममधील मूळ संरचनेला धक्का न पोहोचवता हा धर्म आधुनिक काळाशी सुसंगत करणे हा होता. मुस्लीम ब्रदरहूडबद्दल आज जो काही प्रचलित दृष्टिकोन  आहे, त्यापेक्षा खूप वेगळा आणि आधुनिक विचार असलेली ही चळवळ होती, असा दावा हमीद करतात. या चळवळीला इस्लामी विचारांवर आधारित व्यवस्था उभी करायची होती. मात्र, ते करताना संसदीय राजकारण आणि अन्य धर्मीयांना सामावून घेत जाण्याचा मार्ग त्यांनी आखला होता. यासाठी कित्येक दशके लागली तरी, संथ वाटचालीतूनच अशी व्यवस्था उभी करण्याचा विश्वास त्या ब्रदरहूडला होता, असे हमीद सांगतात. परंतु २०१४ मधील अरब देशांतील उठाव आणि आयसिसच्या उदयानंतर मुस्लीम ब्रदरहूडची संकल्पनाच बदलून गेली. जुन्या विचारांच्या ब्रदरहूडऐवजी ‘फेसबुक पिढी’ असलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी ब्रदरहूड आपल्या ताब्यात घेतले. या पिढीला ‘झटपट फैसला’ करायचा होता. त्यातूनच हिंसा हा एकमेव मार्ग आहे, असा विचार घेऊन आयसिससारखे ब्रदरहूड फोफावले, असे निरीक्षण हमीद नोंदवतात.

इस्लामचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी हमीद यांनी त्याची तुलना एकेश्वरवादी ख्रिश्चन धर्माशी केली आहे. या दोन्ही धर्मामध्ये साम्यस्थळे अनेक असली तरी, त्यांच्यात स्थापनेपासूनच भिन्नता असल्याचे ते सांगतात. ख्रिश्चन धर्माच्या केंद्रस्थानी असलेले येशू ख्रिस्त हे तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेच्या दृष्टीने ‘बंडखोर’ होते, तर सुरुवातीला प्रस्थापितांशी लढल्यानंतर प्रेषित मोहम्मद यांनी ‘इस्लामी राजवट’ स्थापन केली होती. त्यामुळे येशूच्या उपदेशांमध्ये शासनाविषयी किंवा राज्यकारभाराच्या नियमाविषयी अगदी तुरळक तपशील आढळतो. याउलट कुराणमध्ये धर्मशासनाबद्दल विस्ताराने उपदेश करण्यात आला आहे. हा ‘उपदेश म्हणजेच कायदा’ अशी चौकट इस्लाममध्ये सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे. याउलट ख्रिश्चन धर्माने कालपरत्वे घडलेल्या घडामोडींनुसार विविध बदलांना, तत्त्वांना अंगिकारल्यामुळे लोकशाही व्यवस्थेशी हा धर्म स्वत:ला सुसंगत करू शकला, अशी मांडणी हमीद यांनी केली आहे. एकीकडे ख्रिश्चन धर्म समावेशक बनत असताना इस्लाममधील ‘कुराणाधारित कायद्याची रचना अजिबात मोडता कामा नये’ असा दृष्टिकोन कायम राहिला, असेही ते सांगतात.

‘गेल्या अनेक वर्षांपासून पाश्चात्त्यांनी इस्लामी राज्यकर्त्यांना लोकशाही प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र, त्यासाठी त्यांना धर्मातील मूळ तत्त्वांना मुरड घालून नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून सत्ता करावी लागणार होती. सुरुवातीला इस्लामी नेते यासाठी तयार नव्हते. मात्र त्यांनी लवकरच निवडणुकाधारित लोकशाहीला आत्मसात केले. आज इस्लाम आणि लोकशाहीमधील दरी कमी होत चालली आहे. शांततापूर्ण सहभाग आणि लोकशाहीवादी दृष्टिकोन यांच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उकल करता येईल, अशा नव्या पर्वाची ही नांदी आहे,’ असा विश्वास हमीद यांनी पुस्तकात जरूर व्यक्त केला आहे. मात्र, हे सगळे लवकर होईल याबाबत ते साशंक आहेत.

भविष्यात जग अधिकाधिक धर्मनिरपेक्ष होईल; लोकशाही आणि उदारमतवाद हे एकत्र नांदतील; सर्व धर्माच्या संरचनेत हळूहळू उत्क्रांती होत जाईल आणि त्यातून सर्वसमावेशकता अधिक वाढीस लागेल, असा एक आशावाद नेहमीच मांडण्यात येतो. मात्र, ‘याला इस्लाम हा अपवाद ठरेल,’ असा काहीसा निराशावादी दावा हमीद करतात. याउलट इस्लामची घट्ट चौकट मान्य करून घेतल्यास त्याबद्दलची कटुता कमी होईल, असे ते मानतात.

हमीद यांनी अनेक वर्षे मुस्लीम ब्रदरहूड, आयसिस यांच्यासह विविध क्षेत्रांतील, देशांतील मुस्लीम तज्ज्ञांशी चर्चा करून ‘इस्लामिक एक्सेप्शनॅलिझम’ची मांडणी केली आहे. मात्र, यातील काही मुद्दय़ांवर मतमतांतरे असू शकतात. विशेषत: इस्लाम आणि लोकशाही यांचे एकत्र नांदणे कठीण असल्याचे त्यांचे निरीक्षण (की गृहीतक?) प्रामुख्याने मध्य-पूर्व राष्ट्रांतील विद्यमान परिस्थितीला धरून असल्याचे वाटते. दुसरे म्हणजे, ‘इस्लाम विरुद्ध लोकशाही’ या संघर्षांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करताना त्यावर अगदी काटेकोर नाही; पण ढोबळ उपाय तरी त्यांनी सुचवायला हवा होता असे वाटते. एखाद्याला त्याच्या आजाराचे मूळ आणि त्याची लक्षणे सांगून झाल्यानंतर उपाय न सुचवल्यावर रुग्णाला जशी हुरहुर लागते, तशी हुरहुर हे पुस्तक वाचल्यानंतर वाटल्याशिवाय राहत नाही.

‘इस्लामिक एक्सेप्शनॅलिझम : हाऊ द स्ट्रगल ओव्हर इस्लाम इज रीशेपिंग द वर्ल्ड’

लेखक : शादी हमीद

प्रकाशक : सेंट मार्टिन्स प्रेस, न्यू यॉर्क

पृष्ठे: ३०६, किंमत : ४९९ रुपये