बिहारमधील राजकारणात मुख्यमंत्रीपद टिकवलेले नितीशकुमार हेही कधीकाळी धुळाक्षरे गिरवीत होते. प्रत्येकाचा पहिला काळ हा कसोटीचा असतो तसाच तो नितीश यांच्याबाबतही होता. त्या काळात नितीशकुमार यांनी ‘तो’ निर्णय जर खरोखर घेतला असता, तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आताची निवडणूक त्यांना एकहाती जिंकणे सोपे गेले असते!
नितीशकुमार त्या वेळी १९७७ व १९८० या दोनही निवडणुकांत काँग्रेसचे भोला सिंह यांच्याकडून हरनौट मतदारसंघातून पराभूत झाले होते त्यामुळे वैतागून त्यांनी राजकारणसंन्यासाचा निर्णय जवळपास घेतलाच होता, ‘भइया ऐसे कैसे होगा, लगता हैं कोई बिझीनेस करना होगा..’ असे, त्या वेळी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या मुन्ना सरकार यांना नितीशकुमार म्हणाले. अभियांत्रिकी शाखेत पदवीधर असल्याने त्यांना छोटा उद्योग सुरू करणे कठीण नव्हते, पण सेंकड ओपिनियन म्हणून त्यांनी जवळच्या सहकाऱ्यांना विचारले, तेव्हा त्यांनी नितीशना सबुरीचा सल्ला दिला.. तो नितीश यांनी ऐकला नसता तर?
संतोष सिंह यांच्या ‘रूल्ड ऑर मिसरूल्ड’ या पुस्तकात नितीशकुमारांच्या राजकीय जीवनातील आठवणी दिल्या आहेत. पहिल्या दोन्ही निवडणुकात पराभव झाल्याने त्यांचे कुटुंबीय अधीर झाले होते. अपयश माणसाला खचवून टाकते तसेच त्यांच्याही बाबतीत झाले.. हा भाग पुस्तकात आहे. पण मोदी-शहा जोडीला हरवण्याचे काम जणू त्यांच्या हातून व्हायचे होते, याची कल्पना लेखकाला नसावी! नितीश यांच्या पत्नी मंजू सरकारी शाळेत शिक्षिका. त्यांनीही ‘राजकारण सोडा’ हेच पतीला सांगितले होते. पण मित्रांच्या सल्ल्यानंतर मंजू यांना नितीश म्हणाले, ‘ ही एक निवडणूक लढवू दे. त्यात पराभूत झालो तर राजकारण सोडून देईन. पण काही वेळा अशी एक संधी माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते तसेच नितीशकुमारांचे झाले. भोला सिंह यांना त्यांनी १९८५ च्या निवडणुकीत आसमान दाखवले. नितीश यांच्या मित्रांनी त्यांना निवडणुकीसाठी पैसे दिले. त्यांच्या पत्नी मंजू यांनी बचतीतून जमा केलेले २० हजार रुपये त्यांना दिले होते, असे नितीशकुमार यांचे मित्र नरेंद्र (मोदी नव्हेत) सांगतात. अर्थात या पुस्तकात केवळ नितीशकुमार यांचीच कथा नाही तर लालूप्रसाद व सुशीलकुमार मोदी या १९७४ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून घडलेल्या नेत्यांच्या आयुष्यातील चढउतारही आहेत. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे उत्सुक अधिक होते हताश कमी. लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत हताश अधिक होते उत्सुक कमी. यातून दोन वर्षांत पडलेला फरक लक्षात येतो. बिहारात नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यामुळे येथे त्यांच्या आश्वासनांचा उपयोग नाही या अर्थाने वेगळाच प्रचार सुरू केला. देर आए दुरुस्त आये अशी थोडी नितीशकुमारांची स्थिती होती असे या पुस्तकातील विवेचनात म्हटले आहे.
एकंदर २१ प्रकरणांतून बिहारमधील नेत्यांची कारकीर्द लेखकाने राजकीय परिप्रेक्ष्यातून रेखाटली आहे. बिहार हे गैरप्रशासनाचे खरे तर उदाहरण, तरीही पुरेशी संवेदनशीलता बाळगून लेखकाने नितीशकुमार यांची २०१३ नंतर एनडीएशी काडीमोड घेतल्यानंतरच्या काळातील राजकीय जुळणीबरोबरची आशा, सुधारणा व बांधणी यांची कहाणी मांडली आहे. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी वीस वर्षांनी केलेली हातमिळवणी इथपर्यंतचा इतिहास त्यात आहे. यात भाजपचे काहीच नाही असेही नाही. भाजपचा बिहारमधील उदय व जनता परिवाराचे मीलन याचाही तपशील त्यात आहे. हे पुस्तक म्हणजे नेहमीच्या वार्ताकनाचेच लेखकाने सादर केलेले काहीसे विस्तृत रूप आहे, तरी आपल्यासारख्या दूरच्या राज्यातील लोकांना बिहारी राजकारणाची ओळख त्यातून घडते एवढे मात्र खरे.
* रूल्ड ऑर मिसरूल्ड । लेखक : संतोष सिंह । प्रकाशक : ब्लूम्सबरी । पृष्ठे : ३४०, किंमत : ४९९ रु.