आज महिलांमध्ये खंबीरपणा आहेच, पण त्याची जाणीव स्वतला व्हायला हवी. या खंबीरपणाची आजची चित्रं काय आहेत, हे दाखवणारं हे पुस्तक, तेही चित्रांतूनच खंबीरपणाच्या गोष्टी सांगणारं- या संदर्भात महत्त्वाचं आहे. हे पुस्तक खूप कमी वेळात वाचून संपतं.. पण खूप काळ लक्षात राहातं.

पुढल्या आठवडय़ात पुन्हा १६ डिसेंबर येईल. देशाच्या राजधानीत एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची आठवण अनेकांना होईल. काही जण संघटितपणे या दिवशी महिलांवरल्या अत्याचारांबद्दल पुन्हा आवाज उठवतील. ‘या तीन वर्षांत काय बदल झाला?’ असा प्रश्न यापैकी काही जण तावातावानं विचारतील, त्याला कदाचित तितक्याच तावातावानं -आणि राजकीय रंग देऊनसुद्धा- उत्तरं दिली जातील. पण ‘तीन वर्षांत काय बदल झाला?’ हा खरंच प्रश्न आहे का? बदल असा तीन वर्षांत घडून येतो का? हा बदल लोकांच्या -पुरुषांच्या आणि स्त्रियांच्याही- मनोवृत्तीत व्हायला हवा की नाही? हा काळच असा आहे की, इथं स्त्रीलाही स्वत:विषयीच्या कल्पना बदलून खंबीर व्हावं लागेल. आज महिलांमध्ये खंबीरपणा आहेच, पण त्याची जाणीव स्वत:ला व्हायला हवी. या खंबीरपणाची आजची चित्रं काय आहेत, हे दाखवणारं एक पुस्तक, तेही चित्रांतूनच खंबीरपणाच्या गोष्टी सांगणारं- या संदर्भात महत्त्वाचं आहे.
ज्योती सिंगवरल्या १६ डिसेंबरच्या अत्याचारानंतर जे विचारमंथन झालं, त्याचं एक फलित म्हणजे हे पुस्तक, याही अर्थानं ते महत्त्वाचं आहे. स्त्रियांचे गट नव्यानं बनू लागले, त्यात काही जणी चित्रकारही होत्या, तर काही लेखिका. त्यातून चित्रमय पुस्तकाची कल्पना निघाली. त्यासाठी काही जणी निवडून त्यांचं शिबीर घ्यायचं, असंही ठरलं आणि यासाठी ‘मॅक्समुल्लर भवन’ची मदत झाली. युरोपात सामाजिक बदल घडवण्यासाठी चित्रमय पुस्तकं करण्याचा अनुभव असलेल्या लॅरिसा बर्तोनासो आणि लुडमिला बरिश्त यादेखील भारतात येऊन, शिबिरात सामील झाल्या. या प्रक्रियेतून तयार झालेलं हे पुस्तक, ‘जुबान’ या स्त्रीवादी प्रकाशन संस्थेने साकार केलं. या पुस्तकात सहज कुणालाही वाचता येणाऱ्या आणि पाहून समजणाऱ्या अशा १४ गोष्टी आहेत.
मुलगी सावळी नसावी, अशा चिंतेत असलेल्या एका आईच्या गर्भाची पहिली गोष्ट.. हा गर्भ मुलीचाच असल्याचं आईला माहीत आहे, फक्त मुलगी गोरी असावी एवढीच तिची अपेक्षा आहे. गर्भातली मुलगी वाचकांशी संवाद साधते आहे की, मला आईच्या कल्पना पसंत नाहीत.. असेन मी काळीसावळी, काय फरक पडतो? ती जगात येते आणि रडण्याआधी हसते, एवढीच गोष्ट चित्रांमुळे रंगतदार झाली आहे. मूल सावळं नसावं म्हणून ‘हे कर’- ‘ते करू नको’ असं बाळंतिणीला सांगणारे नातेवाईकही गोष्टीत आहेतच. पुढली गोष्टसुद्धा अशीच छोटीशी.. दिल्लीची मुलगी मुंबईत नोकरीसाठी येते, लोकलगाडीच्या ‘लेडीज डब्या’त, सहप्रवासी/ विक्रेते यांच्याकडे कधी आढय़तेनं तर कधी आश्चर्यानं पाहू लागते.. स्त्रिया एकमेकींशी कशा भांडतात हे पाहातेच, पण स्त्रीवादाला अपेक्षित असलेला ‘भगिनीभाव’ म्हणजे काय, हे तिला स्वानुभवानं कळतं.. तो स्वानुभवही साधासा.. तिच्या कपडय़ात एक कीटक शिरतो तेव्हा डब्यातली एक मावशी बरोब्बर आयडियानं तिची सुटका करते, एवढाच. यात कसला आलाय खंबीरपणा, असा प्रश्न मात्र ही साधी गोष्ट संपल्यावर पडत नाही. कारण, लेडीज डब्यातल्या स्त्रीशक्तीची चित्रं वाचकाला साक्षात् दिसलेली असतात. खंबीरपणा म्हणजे कोरडेपणा नव्हे.. हा धडा इथं मिळतो.
लग्नच करणार नाही म्हणणारी एक मुलगी आणि अर्थशास्त्रात एम.ए. होऊनही गृहिणी असलेली तिची आई यांच्यातल्या संघर्षांची रेशू सिंग यांची कथा दोन्ही बाजू दाखवते. आईला मुद्दाम ‘जुनाट’ किंवा ‘प्रतिगामी’ वगैरे दाखवण्याचा कावा इथं अजिबात नाही. मुलगीसुद्धा ‘केवळ पुरोगामी म्हणून भंपकच’ अशी नाही. दोघीही एकमेकींना समजून घेताहेत. पण पटत नाही एकमेकींना. शेवटी मुलगी म्हणते.. ‘‘आई तू स्वत:चं व्यक्तिमत्त्व बाजूला ठेवून घरात विरघळलीस खरी, पण कडवटपणाही आलाय गं तुझ्यात..’’ – इथं आई ‘‘अजून लहान आहेस तू’’ म्हणून विषय टाळते.. मुलगीही गप्प होते.. पण खरंच आपली आई सुखी नाही ही जाणीव मुलीला पोखरू लागते. लग्न जुळवण्यासाठी फोटो काढायचाय या ‘दृश्या’पासून सुरू झालेली ही गोष्ट, ‘माझ्या फोटोंना चौकट असेल, माझ्या व्यक्तिमत्त्वाला नाही..’ अशा वाक्यानं संपते.
चित्रमय गोष्टी सांगण्याचे (ग्राफिक स्टोरीटेलिंग) अनेकविध प्रकार या पुस्तकात आहेत. सौम्या मेनन यांची ‘आयडियल गर्ल’ ही चित्रमालिका गोष्टीसारखं कथानक असलेली नाही. पण कौटुंबिक विषमतेची चार-पाच उदाहरणं सांगताना, ‘आदर्श मुलगा’ आणि ‘आदर्श मुलगी’ अशी तुलना लेखिकेनं मांडली आहे. पण त्यात कटुताच आहे असं नाही. मुली अनेक ताणांचा सामना करूनही पुढं जात असतात, याची ही चित्रं अगदी खुसखुशीत आहेत, म्हणून सर्वाना पटणारी आहेत. त्या पुढल्या गोष्टींपैकी नीलिमा आर्यन यांनी, त्यांच्या आईनं (प्रसन्ना आर्यन ऊर्फ ‘प्रयाण’ यांनी) लिहिलेली एक गोष्ट चित्रबद्ध केली आहे.. ती मूळ कथा तशी सांकेतिक म्हणावी अशी.. ‘झडप घालायला टपलेल्या ससाण्या’ला एक तेरा-चौदा वर्षांची मुलगी कशी युक्तीनं जेरबंद करते, असं कथानक असलेली! या कथेतल्या ‘टपणं’, ‘झडप’ यांचा संबंध पुरुषी वासनेशी आहे, हा सांकेतिक भाग नीलिमा यांनी चित्रांमधून उलगडून दाखवला आहे.
नोकरी एका लहान गावातल्या साध्या ब्युटी पार्लरमधली. पण तिथं इतरजणींचं दु:ख वाटून घेता घेता स्वत:चा ताण एक स्त्री विसरते आहे. नवऱ्याची नोकरी प्रवासाची, घरी मूल नाही. तिला एकटं वाटतं आहे. नवऱ्यालाही आठवण येते तिची, पण तो मित्रांबरोबरच्या पाटर्य़ात ही आठवण दडवून टाकू शकतो.. ती मात्र एकटेपणाचा सामना करते आहे.. दीप्ती शेठ यांची ही गोष्ट, मोठय़ा चित्रमय कादंबरीचा भाग असावा असं वाटतं. ही गोष्ट पूर्ण होत नाही, अधांतरीच संपते. पण अर्थात, नायिका एकटेपणाचा सामना करते तो कसा, हे वाचकाला पूर्णत: कळलेलं असतं.
मासिकातल्या किंवा वर्तमानपत्रातल्या वृत्तान्तासारखी वरवर पाहता वाटेल, अशीही एक गोष्ट आहे. मणिपूरमधून ‘अफ्स्पा’ हा लष्कराला अमर्याद अधिकार देणारा कायदा हटवावा यासाठी उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला हिच्याशी झालेल्या भेटीचा हा वृत्तान्त. साहजिकच, शर्मिलाच्या तोंडी बरीच वाक्यं आहेत. ती जे सांगते, त्याचा आशय पोहोचवण्याचं काम चित्रांनी केलं आहे. पण याच गोष्टीत पुढे- ‘शर्मिलाला आपण कशाशी लढतो आहोत हे माहीत आहे. काय नको, हे स्पष्ट आहे तिच्यापुढे.. माझा संघर्ष मात्र अधिक गुंतागुंतीचा आहे..’ अशा स्थितीपर्यंत लेखिका पोहोचते. इथं वृत्तान्त संपतो आणि गोष्ट सुरू होते. ही गोष्ट होती ईटा मेहरोत्रा यांची, तर या अदृश्य मर्यादा कसल्या, ते अगदी स्पष्ट करून सांगणारी गोष्ट चित्रांतून साकारली आहे ती कावेरी गोपालकृष्णन यांनी. कावेरी १८ जणींना विचारतात, ‘तुम्ही स्वत:भोवती एक अदृश्य तट उभारत असालच.. कोणता तो तट?’ या १८ जणी विविध वयांच्या आहेत. त्यांची उत्तरं निरनिराळी आहेत, पण स्पष्ट आहेत. आणि त्याहीपेक्षा, ‘समजा असले तटबीट उभारण्याची गरज नाही. कुणीच पाहणारं नाही तुमच्याकडे.. स्त्री म्हणून तुमच्यावर येणारी सगळी बंधनं गळून पडलीत.. तर तुम्ही काय कराल?’ यावरीलही उत्तरं निरनिराळी.. एक मध्यमवयीन महिला म्हणते, ‘मी खाजवेन कराकरा.. माझ्याच अंगावर, कुठेही’.
या मर्यादा फक्त स्त्रियांवर असतात असं नाही. त्या नैतिकतेचा भाग असतात. ही नैतिकता लोककथांपासून धार्मिक कल्पनांपर्यंत रुजलेली असते.. पण हे चित्र बदलता येईल, असा विश्वास बंगालच्या ‘पट्टचित्र परंपरे’तून जे सामाजिक सुधारणावादी विचारसुद्धा गेल्या काही वर्षांत रुजू लागले, त्याच्या अनुभवातून विद्युन सभानी यांनी सांगितलं आहे.
हे पुस्तक खूप कमी वेळात वाचून संपतं.. पण खूप काळ लक्षात राहातं. तुम्ही जर महिला असाल, तर तुमच्या आतला खंबीरपणा आणि तुमच्या भोवतीच्या मर्यादा या दोन्हीचा शोध तुम्हाला घ्यायला लावतं.

ड्रॉइंग द लाइन : इंडियन विमेन फाइट बॅक.
संपादन : प्रिया कुरियन व अन्य.
प्रकाशक : जुबान बुक्स
पृष्ठे : १६४ (आर्टपेपर), किंमत : ६९५