25 February 2021

News Flash

दैववाद की उत्क्रांतीवाद?

धर्मातील चालीरीतींपुढे प्रश्न विचारायची जागा नसते आणि जिथे प्रश्न उभा राहतो तिथेच विज्ञान सुरू होते.

रामाशिष जोशी

धर्मातील चालीरीतींपुढे प्रश्न विचारायची जागा नसते आणि जिथे प्रश्न उभा राहतो तिथेच विज्ञान सुरू होते. विज्ञानामुळेच वेगळा विचार करण्याचे धैर्य मिळू शकते, हे वयाच्या पंधराव्या वर्षीच निरीश्वरवादी झालेल्या रिचर्ड डॉकिन्स यांना पटले होते. तेच डॉकिन्स आता वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही त्या मतावर ठाम आहेत ते का, हे सांगणाऱ्या त्यांच्या नव्या पुस्तकाबद्दल..

पंधराव्या वर्षी निरीश्वरवादी झालेल्या मुलाला पंचाहत्तरीनंतरही देवावरील विश्वासापेक्षा विज्ञानाचाच मार्ग हा खरा मार्ग आहे हे तितक्याच उत्साहात सांगायचे आहे. ती व्यक्ती म्हणजे ‘रॉयल सोसायटी’चे सदस्य रिचर्ड डॉकिन्स! सत्तरच्या दशकात ‘द सेल्फिश जीन’ या पुस्तकामळे रिचर्ड डॉकिन्स प्रकाशझोतात आले. चालू सहस्रकाच्या प्रारंभी आलेले त्यांचे ‘द गॉड डिल्युजन’ हे पुस्तक वादग्रस्त ठरले. २०१८ साली त्यांनी- ‘आऊटग्रोइंग गॉड’ आणि ‘अथेइजम फॉर चिल्ड्रन’ या दोन पुस्तकांवर काम सुरू असल्याचे ट्विटरवर जाहीर केले होते. त्यापैकी काहीच महिन्यांपूर्वी (सप्टेंबर, २०१९) आले- ‘आऊटग्रोइंग गॉड : ए बिगिनर्स गाइड’! हा अवघड आणि नाजूक विषय वैज्ञानिक माहितीच्या आधारे सोप्या भाषेत मांडल्याने हे पुस्तक वयात येणाऱ्या मुलांपासून ते वयोवृद्ध वाचकांनाही वाचण्यासारखे आहे.

पुस्तकात विषयाची मांडणी दोन भागांत केली आहे. पहिल्या भागात, ‘ईश्वर’ ही संकल्पना आदिमानवाला का सुचली असेल आणि त्यातून पुढे आजचे धर्म, प्रत्येक धर्माचे मूळ पुस्तक, पौराणिक कथा आणि त्यांतील विसंगती दाखवत- आजच्या प्रगत समाजाला त्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रगत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील २०१६ सालच्या निवडणुकीतून डेमोक्रॅटिक पक्षाच्या बर्नी सॅण्डर्स यांची केवळ नास्तिक असल्याने पीछेहाट कशी झाली किंवा करवली गेली, हे वाचल्यावर आपसूकच आपल्याकडील धर्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या राजकारणाचे संदर्भ मनात येतात. मध्यपूर्व आशियातून उदयास आलेल्या धर्माचे संदर्भ जरी पुस्तकात जास्त आलेले असले, तरी त्या गोष्टींचा ताळमेळ भारतीय धर्मातील चालीरीतींबरोबर सहज लावता येतो. दैवीमानलेल्या गोष्टींचा निष्कर्ष मानववंशशास्त्राचा आधार घेत काढण्यावर भर दिला आहे. उदाहरणार्थ, देवाचा आवडीचा प्राणी म्हणताना उत्क्रांतीशास्त्रानुसार तो प्राणी त्या काळी कसा होता; पौराणिक म्हणून सांगितलेल्या गोष्टी, चालीरीती खरोखरी जुन्या आहेत, की त्यात स्थळ-काळानुसार लोकांनीच भर घातली आहे आणि अशी भर घालत माणसाचाच देव बनवला गेला, हे लक्षात घ्यायला हवे.

अशा कथांकडे फक्त एक साहित्य म्हणून बघायला हवे, असे डॉकिन्स म्हणतात. तुरुंगात नास्तिक कमी आणि आस्तिकच जास्त असल्याची आकडेवारी देत- देवावर विश्वास ठेवणारी माणसे भली म्हणावीत का, असा प्रश्न ते वाचकांसमोर ठेवतात. आपल्याला सतत कुठला तरी देव वरून बघत असेल म्हणून आपण चांगले वागावे, की चांगले वागणे हा आपला मूळ स्वभावच हवा, यावर विचार करायला पुस्तकातील पहिला भाग प्रवृत्त करतो.

दुसऱ्या भागात, नैसर्गिक अद्भुत गोष्टी सोप्या वैज्ञानिक भाषेत मांडत, यामागे कोणी कर्ता-करविताही नाही आणि त्यामागे काही ठोस असा उद्देशही नाही, हे मांडले आहे. निसर्गातील एखादी अद्भुत गोष्ट समजून घेण्यासाठी अभ्यासाचा अवघड मार्ग अवलंबण्यापेक्षा; त्वरित उत्तर हवा असणारा, वरवरचे पाहणारा दैवी शक्तीचे अस्तित्व मानून सोपा मार्ग पत्करतो. एखादी गोष्ट घडण्याची शक्यता जितकी कमी, तितका जास्त काळ ती गोष्ट घडून यायला लागतो. जसे हवेत उडवलेल्या शंभरच्या शंभर नाण्यांवर छापाच दिसण्याची शक्यता जितकी कमी आहे, त्याहून कैक पटींनी कमी शक्यता ही सगळी सृष्टी सुरू होऊन सद्य:स्थितीत येण्याची आहे. अशी कमी शक्यता असूनही दृश्य सजीव सृष्टीमागे केवळ आणि केवळ उत्क्रांतीवाद आहे, हे डॉकिन्स पटवून देतात.

धर्मातील चालीरीतींपुढे प्रश्न विचारायची जागा नसते आणि जिथे प्रश्न उभा राहतो तिथेच विज्ञान सुरू होते. धर्मातील चालीरीती सामान्यांच्याच नाही, तर मोठय़ा मोठय़ा वैज्ञानिकांच्याही मनात घट्ट रुजलेल्या असतात. याचे उदाहरण देताना डॉकिन्स म्हणतात की, आर्किमिडीज, गॅलिलिओ, न्यूटन यांनी कितीतरी अवघड गोष्टी क्लिष्ट गणित मांडून सोडवल्या, पण ज्याला गणिताची काहीही आवश्यकता नव्हती असा उत्क्रांतीवाद त्यांना का सुचला नसेल? की त्यांच्यावरील धर्माच्या पगडय़ामुळे सजीव सृष्टीच्या निर्मितीचे काम त्यांनी देवावर सोडले असेल?

प्रथेबाहेर, चौकटीबाहेर जाऊन विचार न केल्याने कधी कधी अगदी सोपे उत्तर समोर असूनही दिसत नाही. विज्ञानामुळेच असा वेगळा विचार करण्याचे धैर्य आपण दाखवू शकतो. हे पुस्तक वाचल्यावर असे धैर्य आपल्या ठायी येऊन आपणही निरीश्वरवादी होऊ, तरच या पुस्तकाची कहाणी सफळ संपूर्ण!

‘आऊटग्रोइंग गॉड : ए बिगिनर्स गाइड’

लेखक : रिचर्ड डॉकिन्स

प्रकाशक : रॅण्डम हाऊस

पृष्ठे: २९४, किंमत : १,६४१ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 5:13 am

Web Title: book review outgrowing god by richard dawkins zws 70
Next Stories
1 पुस्तक नेमके कुठे नेते?
2 कथा‘सार’
3 ‘सीईओ’ काय वाचतात?
Just Now!
X