03 June 2020

News Flash

बुकबातमी : कोठडीतलं ‘फुलपाखरू’!

कोठडीतला काळ आणि पळण्याची साहसं यांचा गोफ विणणारी ही गोष्ट.

(संग्रहित छायाचित्र)

सन १९०२ पासून ‘टीएलएस’ अर्थात ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ सुरू आहे आणि आजही छान चालतं आहे. या ‘टीएलएस’चे २०१६ पासूनचे मुख्य संपादक स्टिग अबेल यांना ‘स्टोरीज् ऑफ अवर टाइम्स’ नावाच्या पॉडकास्ट-कार्यक्रमात विचारण्यात आलं, ‘करोनाकाळात वाचलं पाहिजे असं एखादंच पुस्तक सुचवायचंय तुम्हाला.. तर कुठलं सुचवाल?’

‘पॅपिलॉन’ हे स्टिग अबेल यांचं उत्तर! महाराष्ट्रात साधारण १९८० च्या दशकात आंरी शॅरियर या फ्रेंच लेखकाचं ‘पॅपिलॉन’ तुफान गाजत होतं. एका फ्रेंच कैद्याची ही ‘७५ टक्के खरी’ आत्मकथा. त्यानं सात वेळा कोठडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. अखेर तो यशस्वीसुद्धा झाला! कोठडीतला काळ आणि पळण्याची साहसं यांचा गोफ विणणारी ही गोष्ट. पण या पुस्तकाची शिफारस साक्षात ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’सारख्या साक्षेपी नियतकालिकाच्या प्रमुखानं करावी? बरं पुस्तक १९७० सालचं. अबेल यांचा जन्मच १९८० चा.. तरीही?

‘हो. म्हटलं तर हे पुस्तक पलायनवादी साहित्याचं उदाहरण ठरेल; पण या काळात ते वाचणं महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्याची आस म्हणजे काय, हे या पुस्तकातून आज कळेल’- हे स्टिग अबेल यांचं उत्तर मात्र साक्षेपी म्हणावं असंच होतं.. ‘करोनाकाळात फार जड वाचू नका- आरामात वाचा,’ हेही या स्टिग अबेल यांनी सांगितलं. त्याआधी आणि त्यानंतरही, बऱ्याच लेखकांनी अनेक पुस्तकांची नावं करोनाकाळात वाचण्यासाठी घेतली. उदाहरणार्थ, कामिला शम्सी यांनी इटालो काल्व्हानोचं ‘इन्व्हिजिबल सिटीज्’ सुचवलं. काझुओ इशिगुरो यांनी १९३१ सालातल्या आर. सी. शेरिफचं ‘अ फोर्टनाइट इन सप्टेंबर’ची शिफारस केली.. पण त्या कुणालाच ‘पॅपिलॉन’ इतकी लोकप्रियता नाही.

‘बुकमार्क’च्या अनेक वाचकांना हे पुस्तक समोर नसलं तरी,  परिस्थिती आपल्याच कर्मानं आली असली तरी ती बदलू पाहणारा त्यातला  नायक लक्षात असेल. ‘पॅपिलॉन’या फ्रेंच शब्दाचा अर्थ फुलपाखरू. स्वातंत्र्याची आस असलेलं, पण कोठडीत डांबलेलं फुलपाखरू हे प्रतीक. आपण सारेजण आज ‘पॅपिलॉन’सारखेच आहोत, याची आठवण १४ एप्रिल रोजी स्टिग अबेल यांनी करून दिली होती. नंतरच्या महिन्याभरात इतकं चपखल पुस्तक कुणीही सुचवलेलं नाही, ही मात्र ‘ताजी’ बातमी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:40 am

Web Title: book review papillon by henri charriere zws 70
Next Stories
1 महत्त्वाकांक्षेच्या मार्गातील मर्यादा..
2 पिढीजात नावीन्यकथा..
3 शब्दमीरेचा एकतारी प्रवास..
Just Now!
X