राहुल सरवटे

महाराष्ट्रविषयक इंग्रजी अभ्यासग्रंथांचा मागोवा घेणाऱ्या मासिक सदरातील हा दहावा लेख – अकादमिक वर्तुळात शिवसेना पक्षाबद्दल झालेल्या अभ्यासाचे स्वरूप नोंदवत शिवसेनेतील स्त्री-कार्यकर्त्यांच्या राजकीय सहभागाचा नेमका अर्थ उलगडणाऱ्या पुस्तकाची ओळख करून देणारा!

शिवसेना या पक्षाबद्दल शिष्टजन अकादमिक वर्तुळात काही फार आपुलकीची, ममत्वाची भावना असण्याची शक्यता नाही. किंबहुना, शिवसेनेला महाराष्ट्रीय प्रतिगामीपणाचं एक ‘ग्लोबल प्रतीक’ म्हणून पाश्चिमात्य अकादमीत साधारणपणे पाहिलं जातं. एकीकडे शिष्टजन अकादमीचा इंग्रजी उच्चभ्रूपणा, तर दुसरीकडे शिवसेनेचं एकंदरच वैचारिकताविरोधी व ठोकशाहीप्रधान धोरण लक्षात घेता, याबाबत फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

परंतु अलीकडच्या काळात या हिंदू धार्मिकता आणि भाषा/प्रांतवाद यांच्या आधारे राजकारण करणाऱ्या उजव्या पक्षाची कार्यपद्धती समजून घेण्याचा काही अकादमिक प्रयत्न झालेला दिसतो. अगदी मेरी कॅटझेनस्टाइन यांचं १९७९ सालचं ‘एथ्निसिटी अ‍ॅण्ड इक्व्ॉलिटी : द शिवसेना पार्टी अ‍ॅण्ड प्रेफरेन्शिअल पॉलिसीज् इन बॉम्बे’ (प्रकाशक : कॉर्नेल युनिव्हर्सिटी प्रेस) आणि दीपंकर गुप्तांचं १९८२ साली आलेलं ‘नेटिव्हिझम इन अ मेट्रोपोलिस : द शिवसेना इन बॉम्बे’ (प्रकाशक : मनोहर) अशी जुनी पुस्तकं सोडली, तरी गेल्या दोन दशकांतली काही पुस्तकं पाहायला हवीत. उदाहरणार्थ, सिकाता बॅनर्जी यांचं ‘वॉरिअर्स इन पॉलिटिक्स : हिंदू नॅशनालिझम, व्हॉयलन्स अ‍ॅण्ड द शिवसेना इन इंडिया’ (वेस्टव्ह्य़ू प्रेस, २०००), थॉमस हॅन्सेन यांचं ‘वेजेस् ऑफ व्हॉयलन्स : नेमिंग अ‍ॅण्ड आयडेन्टिटी इन पोस्टकलोनिअल बॉम्बे’ (प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस, २००१), जुलिया एकर्ट यांचं ‘द करिस्मा ऑफ डायरेक्ट अ‍ॅक्शन : पॉवर, पॉलिटिक्स अ‍ॅण्ड द शिवसेना’ (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००३). मुख्यत: वसाहतोत्तर काळातल्या राजकीय हिंसेचं स्वरूप समजून घेण्याचा या पुस्तकांचा साधारण प्रयत्न आहे.

शिवाय शिवसेनेतल्या स्त्री-कार्यकर्त्यांचं नेटवर्क, त्यांचा राजकीय संघटना बांधणीतला आणि प्रसंगी हिंसेतला सहभाग, त्यांचं राजकीय नेतृत्व अशा अनेक गोष्टींचा विशेष अभ्यासही हल्ली होऊ  लागला आहे. अत्रेयी सेन यांचं ‘शिवसेना वुमेन : व्हॉयलन्स अ‍ॅण्ड कम्युनॅलिझम इन अ बॉम्बे स्लम’ (प्रकाशक : इंडियाना युनिव्हर्सिटी प्रेस) नावाचं शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या कार्यकर्त्यांवरचं पुस्तक २००७ साली आलं होतं आणि आजच्या लेखात ज्याचा आपण परिचय करून घेणार आहोत, ते तारिणी बेदी यांचं ‘द डॅशिंग लेडीज् ऑफ शिवसेना’ हे पुस्तक २०१६ साली प्रसिद्ध झालं.

मात्र, या उजव्या आणि हिंसेला अभिमुख असणाऱ्या राजकारणाशी संबंधित स्त्रियांबद्दल काहीशी गुंतागुंतीची भावना एकंदर डावीकडे झुकणाऱ्या अकादमिक वर्तुळात आढळते. एकीकडे, स्त्रियांचं राजकारणात येणं आणि राजकारणाच्या पुरुषप्रधान चौकटींना आव्हान देणं हे या अभ्यासकांना उत्साहवर्धक वाटतं; तर दुसरीकडे, या राजकारणाच्या धर्मवादी आणि परंपरावादी स्वरूपाला स्त्रियांनी पाठिंबा देणं त्यांना हताश करतं. अत्रेयी सेन यांच्या पुस्तकाचं परीक्षण करताना ह्य़ुस्टन विद्यापीठाच्या दीपा रेड्डी म्हणतात : ‘धर्मवादी राजकारणातल्या स्त्रियांच्या सहभागाची कारणमीमांसा करणं आम्हाला अकादमिकदृष्टय़ा नेहमीच महत्त्वाचं वाटत असे. परंतु हे वाटणं निव्वळ तात्त्विक पातळीवरच राहायचं. प्रत्यक्ष त्या स्त्रियांचा या राजकारणातला वावर एथ्नोग्राफिक पद्धतीनं अभ्यासला जायचा नाही, कारण सहसा ‘डावी’कडे झुकणाऱ्या सेक्युलर अभ्यासकांसाठी हा एक अतिशय अस्वस्थ करणारा (अनकम्फर्टेबल) अवकाश आहे.’ दिल्ली विद्यापीठातल्या उमा चक्रवर्तीचं परीक्षण तर विशेष बोलकं आहे. त्या लिहितात : ‘अत्रेयी सेन यांनी आम्हा स्त्रीवादी चळवळीतल्या मंडळींसाठी एक अतिशय अवघड असलेला विषय हाताळलाय. त्यांनी स्वत: न्यायाधीशाची भूमिका न घेता आपल्या कथनातून शिवसेनेतल्या, प्रसंगी हिंसेला उत्तेजन देणाऱ्या स्त्री-कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वत:च्या आवाजात बोलतं केलंय; ज्यातून आपल्याला त्या स्त्रियांचा नैतिक अवकाश समजून घेता येतो. अर्थात आपलं अगदी आतडं ढवळून निघतं त्यात.’

रेड्डी किंवा चक्रवर्तीच्या मांडणीत राजकीय अवकाशाची ‘पुरोगामी’ आणि ‘प्रतिगामी’ अशी कर्मठ विभागणी होऊन एक ढोबळ सरसकटीकरण केलं जातं. त्यामुळे शोषणाच्या संरचनांचं आकलन बाजूला पडतं आणि सुष्ट व दुष्ट अशा प्रवृत्तीविषयक झगडय़ाच्या पौराणिक गाथांनाच चालना मिळते. अर्थात, चक्रवर्ती किंवा रेड्डी यांच्यापुढचा हा जो नैतिक पेच आहे तो खराच आणि अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, त्याला निव्वळ नैतिक अवकाश वा भिन्न राजकीय भूमिकांपुरता मर्यादित असं न पाहता- जात, लिंगभाव, निम्न आर्थिक स्तरातल्या आणि बकाल शहरातल्या वंचितांच्या जगण्यात सतत वावरत असणारी हिंसकता अशा अनेक बाजूंच्या संदर्भात पाहायला हवं. सुदैवानं या बाबींचा बहुविध विचार अत्रेयी सेन आणि विशेषत: तारिणी बेदी यांनी केलेला आढळतो. ही दोन्ही पुस्तकं सामाजिक मानववंशशास्त्रात प्रचलित असणारी ‘एथ्नोग्राफिक’ (वर्णनात्मक) पद्धती वापरून शिवसेनेतल्या स्त्री-कार्यकर्त्यांचा राजकीय, सामाजिक आणि नैतिक अवकाश समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अत्रेयी सेन यांच्या आधीच्या अभ्यासाचं ऋण मान्य करून तारिणी बेदी त्यांच्या थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मुंबई-पुणे-नाशिक या महाराष्ट्रातल्या शहरी त्रिकोणात केलेल्या २००३ ते २०१३ अशा दशकभराच्या दीर्घ पायपीट आणि अभ्यासाच्या आधारावर त्यांचं विवेचन आधारलेलं आहे.

शिवसेनेतल्या सामान्य स्त्री-कार्यकर्त्यां पक्षांतर्गत आपलं स्थान कसं निर्माण करतात; आपलं राजकीय संचित निर्माण करण्याचे त्यांचे मार्ग कुठले असतात; त्या स्थानिक समूह आणि राजकीय व्यवस्था यांच्यातल्या मध्यस्थाची भूमिका कशी वठवतात.. अशा स्वरूपाचे प्रश्न बेदींच्या दृष्टीनं कळीचे आहेत. व्यापक अर्थानं, या पुस्तकातून बेदी महाराष्ट्रातल्या शहरी राजकारणाचा पोत बारकाईनं तपासू पाहतात. स्थानिक राजकीय प्रक्रियांना एका बृहद् जाळ्याचा (नेटवर्क) भाग म्हणून पाहताना, त्या जाळ्यासाठी ‘इलेक्ट्रिक ग्रीड’ ही उपमा त्या वापरतात. सामान्य स्त्री-कार्यकर्त्यांच्या राजकारणातल्या सहभागातून एक व्यापक राजकीय ऊर्जानिर्मितीचं मंडल (सर्किट) कार्यान्वित होताना त्यांना दिसतं. त्यांच्या एथ्नोग्राफिक पद्धतीतून दृश्यात्मक असं राजकारणाचं चलत्चित्रच त्यांच्या लिखाणातून उभं राहतं.

या स्त्रियांचं धडाकेबाज (डॅशिंग) असणं आणि त्यांच्या राजकीय सहभागातून एक स्त्रीप्रधान आश्रयव्यवस्था (मेट्रनेज) आकाराला येणं ही प्रक्रिया बेदींच्या विवेचनाच्या केंद्रस्थानी आहे. इथे बेदी ‘धडाकेबाज’ हे निव्वळ विशेषण म्हणून वापरत नाहीत. तर या संज्ञेला त्या बराच व्यापक अर्थ प्रदान करतात. म्हणजे नेमकं काय? तर, बेदींच्या दृष्टीनं शहरातल्या निम्न आर्थिक स्तरातल्या राजकारणाचं स्वरूप मुख्यत: विनिमयाची व्यवस्था असं आहे. शिवाय या राजकारणाची बांधणीच अशी असते, ज्यात आक्रमकता, भीती आणि हिंसा यांची कळीची भूमिका असते. त्यात जेव्हा सामान्य स्त्रिया कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून सहभागी होतात तेव्हा त्यांची भूमिका निव्वळ आश्रय मागण्याची नसते, तर आक्रमकता, भीती आणि हिंसा याच माध्यमांचा वापर करून त्या सत्तेच्या जाळ्याला कार्यान्वित करू पाहतात. त्यासाठी त्यांना जे कर्तृत्व दाखवणं आवश्यक असतं ते ‘धडाकेबाज’च असावं लागतं. शिवसेनेतल्या स्त्रिया ज्या गोष्टींना ‘धडाकेबाज’ म्हणतात, त्यातून एका स्त्रीप्रधान आश्रयव्यवस्थेची निर्मिती होते. स्त्रीनं पुरुषाकडे आश्रय मागण्याच्या पारंपरिक व्यवस्थेला इथं डोक्यावर उभं केलं जातं. बेदी ज्याला ‘पॉलिटिकल मेट्रनेज’ म्हणतात, ती अशा प्रकारे लिंगभावी रचनेच्या मोडतोडीतून निर्माण झालेली राजकीय विनिमयाची व्यवस्था आहे.

स्त्री-पुरुषांच्या व्यापक समुदायाला शिवसेनेतल्या स्त्री-कार्यकर्त्यां मदत करतात, अडलेली नडलेली कामं होण्यासाठीचे विविध राजकीय ‘रिसोर्सेस’ पुरवतात. त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय प्रभुत्व आणि प्रभाव यांची एक साखळी तयार होते. अशा अनेक स्त्री-कार्यकर्त्यांना लोक ‘मालकीण’ म्हणतात, असं सांगून बेदी आपल्याला स्त्रियांच्या राजकीय सहभागाबद्दलच्या धारणांचा पुनर्विचार करायला भाग पाडतात. अर्थात, या प्रभुत्व आणि प्रभावाच्या साखळ्यांचं स्वरूप सगळीकडे एकसारखचं असत नाही किंवा स्त्रियांच्या राजकारणातल्या सहभागाच्या आकलनाचा हा काही एकच साचा नाही. शिवाय, या स्त्रियांच्या सहभागातून कार्यान्वित होणारी ही ‘ग्रीड्स’ मुळातच पुरुषसत्ताक व्यवस्थेअंतर्गतच कार्यरत असतात. त्यामुळे बेदींच्या दृष्टीनं, निम्न आर्थिक स्तरांत वावरणाऱ्या शिवसेनेच्या सामान्य स्त्री-कार्यकर्त्यांची आपल्या भावनात्मक, भौतिक आणि प्रतीकात्मक अशा बहुविध ऊर्जाचं राजकीय प्रक्रियेत रूपांतर करण्याची क्षमता म्हणजेच ही ‘राजकीय मेट्रनेज’ व्यवस्था आहे.

‘धडाकेबाज’ स्त्रियांच्या या अभ्यासातून स्त्रियांच्या राजकीय सहभागाविषयीची दोन गृहीतकं बेदी खोडून काढतात. एक म्हणजे, पुरुषी राजकीय नेतृत्व आणि पुरुषी राजकीय डावपेच एवढंच राजकारणाचं स्वरूप नसून, राजकीयदृष्टय़ा सजग स्त्रिया सातत्यानं ते डावपेच वाकवून आपल्याला अनुकूल करून घेत आल्या आहेत. दुसरं म्हणजे, राजकीयदृष्टय़ा ताकदवान पुरुषाच्या आधारेच स्त्रिया राजकारण करतात वा करू शकतात हे गृहीतकदेखील बेदींच्या अभ्यासातून खोडलं जातं.

तीनेकशे पानांच्या या पुस्तकात एकूण नऊ प्रकरणं आहेत. एथ्नोग्राफिक पद्धतीनं लिहिलेल्या पुस्तकात अनेक मुद्दे एकमेकांत गुंतलेले असल्यामुळे प्रकरणनिहाय अलगता फार स्पष्ट असत नाही. त्यामुळे ढोबळपणे केलेली प्रकरणांची विभागणी फक्त पाहू या. पहिल्या प्रकरणात त्यांच्या अभ्यासातल्या – राजकीय सर्किट, आपल्या ‘धडाकेबाज’ शैलीनं राजकीय व्यवस्थेत स्त्रियांनी कार्यान्वित केलेली ऊर्जा आणि त्याचा एकंदर राजकीय विनिमयाच्या स्वरूपावर झालेला परिणाम या सूत्रांची यथास्थित मांडणी येते. दुसऱ्या प्रकरणात शिवसेनेची बेधडक कार्यपद्धती आणि मुख्यत: भावनात्मक पातळीवर चालणाऱ्या राजकारणाशी सामान्य स्त्री-कार्यकर्त्यांचं असलेलं नातं उलगडण्याचा त्या प्रयत्न करतात. यात शिवसैनिकांच्या लोकांशी, एकमेकांशी आणि तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्याचा त्या वेध घेतात. विशेषत: हिंदू भक्ती परंपरेतल्या ‘देवाचं दर्शन’ या रूपकाचा इथं त्यांनी फार चपखल वापर केलेला आहे!

‘धडाकेबाज’ या संज्ञेची घनता तिसऱ्या प्रकरणात अधिक उलगडते. हे फारच लक्षवेधी प्रकरण आहे. ‘धडाकेबाज’ असणं म्हणजे काय, हे इथं रस्त्यावरच्या राडय़ापासून महापालिकेतल्या राजकारणापर्यंतच्या भौगोलिक परिघाचा वेध घेऊन आणि समकालीन ते स्थानिक इतिहासाची मौखिक साधनं वापरून बेदी विशद करतात. चौथ्या प्रकरणात त्या महाराष्ट्राच्या आणि व्यापक अर्थानं वसाहतोत्तर समाजातल्या शहरी भागातल्या राजकारणाचा पोत धुंडाळण्याचा प्रयत्न करतात. राजकारणाचं बृहद्जाल हे स्वरूप ‘इलेक्ट्रिक ग्रीड’च्या रूपकातून इथे अधिक उलगडतं. स्त्री-कार्यकर्त्यांचं पक्षातल्या इतर सहकाऱ्यांसोबतचं आणि समूहासोबतचं ‘नेटवर्क’ एका राजकीय ऊर्जेची निर्मिती कशी करतं, हे त्या दाखवतात.

या ऊर्जेचा प्रखर आविष्कार जिथे दिसतो, अशा मोर्चा आणि आंदोलनांचा विचार त्या पाचव्या प्रकरणात करतात. राजकारणातल्या स्त्रियांचं व्यापक समाजाला दृगोचर (व्हिजिबल) होणं हे मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमांतून कसं घडतं, याचं अतिशय प्रत्ययकारी चित्रण बेदी इथं करतात. सहावं प्रकरण हे ‘हळदीकुंकू’ या खास स्त्रियांच्या मानल्या गेलेल्या घरगुती समारंभाच्या माध्यमातून राजकीय स्त्री-कार्यकर्त्यां घट्ट भगिनीभावाची      नाती कशी निर्माण करतात, याचा विचार करतं.      इथं दृगोचर होण्याच्या उलट वैयक्तिक आणि भावनिक प्रक्रियांचा पाठपुरावा त्या करतात. पाचव्या आणि सहाव्या प्रकरणांतून समाजात दृश्यमान असणाऱ्या आणि अदृश्य अशा दोन्ही राजकीय प्रक्रियांतून स्त्री-कार्यकर्त्यां आपल्या राजकीय संबंधांना पुनर्निर्मित कशा करत असतात, हे बेदी दाखवून देतात.

सातव्या प्रकरणात मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या राजकीय प्रकल्पात या स्त्री-कार्यकर्त्यां स्वत:ला राजकीय मध्यस्थ म्हणवून घेत कशा शिरकाव करतात आणि आपलं राजकारण – म्हणजे सातत्यानं विनिमय करू शकण्याची क्षमता – कसं पुढे रेटतात, ते दिसतं. आठव्या आणि नवव्या प्रकरणांत शिवसेनेच्या स्त्री-कार्यकर्त्यां आपल्या घरांमध्ये तडजोड (अ‍ॅडजस्टमेंट) कशी करतात, याचं विवेचन येतं. एकंदर स्त्रियांचा राजकारणातला सहभाग जसं राजकारणाचं स्वरूप बदलून टाकतो तसं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही निराळं वळण देतो, हे बेदी अतिशय उत्तमपणे दाखवून देतात.

एक अतिशय उत्तम एथ्नोग्राफी वाचल्याचा आनंद तर ही ‘धडाकेबाज’ स्त्रियांची गोष्ट देईलच; परंतु आपल्या आसपास घडणाऱ्या गुंतागुंतीच्या, काही दृश्य पण बऱ्याचशा अदृश्य राजकीय प्रक्रियांविषयी आपल्याला सजगसुद्धा करेल.

‘द डॅशिंग लेडीज् ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मेट्रनेज इन अर्बनायझिंग इंडिया’

लेखिका : तारिणी बेदी

प्रकाशक : अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली

पृष्ठे : ३१६, किंमत : ६९९ रुपये

rahul.sarwate@gmail.com