जयराज साळगावकर

गेल्या दीड दशकातला भारतीय उद्योग जगताचा इतिहास मांडत हे पुस्तक राजकारणी, नोकरशहा आणि उद्योजक यांच्या हितसंबंधांतून भारतातल्या भांडवलशाहीचे रूपडे कसे बदलले आणि उद्योगधंद्यांच्या राक्षसी वाढीमागचे आणि वाढीचा हा फुगा फुटण्यामागचे इंगित सांगते..

जेम्स क्रॅबट्री हे लंडनच्या ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्राचे मुंबई बिझनेस ब्यूरो चीफ म्हणून २०११-२०१६ या पाच वर्षांच्या काळात कार्यरत होते. सध्या ते सिंगापूरमध्ये आहेत. (सिंगापूर हे ‘भारतातील’ सर्वोत्कृष्ट शहर आहे, असे ते मिश्कीलपणे म्हणतात!) ली कॉउन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी येथे अध्यापन करतात. वंशाने ब्रिटिश असलेले जेम्स क्रॅबट्री अमेरिकेतही बराच काळ वास्तव्यास होते. हार्वर्डच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. पत्रकारितेत येण्यापूर्वी क्रॅबट्री हे ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर तसेच गॉर्डन ब्राऊन यांना धोरणविषयक सल्ले देणाऱ्या गटातही कार्यरत होते. गतवर्षीच्या मध्यास ‘द बिल्यनिअर राज’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

पुस्तकाच्या उपोद्घातात कॅ्रबट्री यांनी मुकेश अंबानींच्या मुलाने त्यांच्या ‘अँटिलिया’ या घराजवळ केलेल्या/ झालेल्या अपघाताचे एखाद्या रहस्यकथेत असावे तसे आंखो देखी वर्णन केले आहे. अंबानींच्या मुलाच्या अ‍ॅस्टन मार्टिन या महागडय़ा गाडीने २०१३ मध्ये ७ डिसेंबरच्या मध्यरात्री रुपारेल नावाच्या तरुणीच्या ऑडी एसयूव्हीला धडक दिली आणि त्यानंतर हे सगळे प्रकरण कसे गुंडाळण्यात आले, याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे. या अपघातात कोणी दगावले नाही वा जखमीही झाले नाही. कॅ्रबट्री भारतीय अतिश्रीमंत उद्योगपतींच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बेताल वागण्याचे रूपक म्हणून हे अपघात प्रकरण वापरतात, असे दिसते.

पुस्तकाचे शीर्षक ‘द बिल्यनिअर राज’ असे आहे; त्यातील ‘राज’ हा शब्द ‘ब्रिटिश राज’ या संदर्भात वापरला आहे. परंतु पुस्तकाचे शीर्षक वाचून असे वाटणे साहजिक आहे, की काही मोजके भारतीय उद्योगपती अगदी कमी काळात अब्जाधीश कसे झाले, याचा हा एक लेखाजोखा असेल. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. भारताच्या सद्य:स्थितीचे (गेले दीड दशक) मोजमाप करताना ते १९ व्या शतकातील अमेरिकेतील धनाढय़ उद्योगपतींच्या अशाच अचानक झालेल्या प्रगतीशी (windfall) तुलना करतात; या उद्योगपतींना ‘लुटारू धेंडं’ (robber barons) असे म्हटले जाते. जसे की, जॉन रॉकफेलर, जे. पी. मॉर्गन वगैरे. कदाचित उपहासाने कॅ्रबट्री असे म्हणतात, की या लोकांच्या दानशूरतेमुळे अमेरिकेच्या प्रगतीची पहाट झाली. बुद्धिवाद, लोकशाही, साहित्य-कला, स्वतंत्र प्रसारमाध्यमे, उदारमतवाद आणि आधुनिक भांडवलशाही व्यवस्था उदयाला आली. मार्क ट्वेनने मात्र या तत्कालीन अमेरिकेतील परिस्थितीचे वर्णन ‘बाहेरून सोन्याचा वर्ख लावल्यामुळे चमकणारी, पण आतून सडून गेलेली व्यवस्था’ असा केला आहे. या साधम्र्याविषयी मात्र भारताच्या संदर्भात कॅ्रबट्री ठोस असे काहीही म्हणत नाहीत, फक्त सुचवतात. तेही मिश्कीलपणे.. समजणाऱ्याने समजून घ्यायचे! उत्पन्नातील वाढती विषमता हा विषयसुद्धा ते अमर्त्य सेन व थॉमस पिकेटी यांच्या हवाल्यावर सोडून देतात.

भारताच्या अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे बरेचसे श्रेय कॅ्रबट्री नेहरूंना देतात. पण नेहरूंच्या आर्थिक धोरणाबद्दल मात्र ते काही बोलत नाहीत. स्वतंत्र पक्ष (सी. राजगोपालाचारी, एन. जी. रंगा आदींनी स्थापन केलेला) आणि १९९० मधील चंद्राबाबू नायडू यांचे आंध्र प्रदेशमधील सुधारणावादी धोरण या दोनच गोष्टी त्यांच्या दृष्टीने भारताच्या आधुनिक आर्थिक धोरणाला पोषक ठरल्या आहेत. हे पुस्तक २०१८ मध्ये प्रसिद्ध झाले असले, तरी कॅ्रबट्री यांचे अनुभव २०११ ते २०१५ या काळातील आहेत. २०१५ नंतर आजपर्यंत भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि ते अर्थातच या पुस्तकात आपल्याला दिसत नाहीत. कदाचित त्यांनी या पुस्तकाचा पुढचा भाग लिहिला तर त्यावर प्रकाश पडू शकेल.

भारतात (डॉलरच्या हिशेबात) मिल्यनिअर व्यक्ती १९९० च्या आसपास फक्त दोनच होत्या, त्या आता १२० व्यक्ती झाल्या आहेत. अशा प्रकारची श्रीमंतीमध्ये झालेली वाढ बर्लिनची भिंत पडल्यानंतर (१९८९) रशियामध्ये दिसून आली होती. त्याला Russia’s Oligarchs असे म्हणतात. ‘Oligarchs’ला ‘Bollygarchs’ असा नवीन शब्द कॅ्रबट्री यांनी भारतासाठी सुचविला आहे.

सॅम्युअल हटिंग्टन या राजकीय विश्लेषकाच्या मते, भ्रष्टाचार हा केवळ एक दुष्परिणाम नसून आधुनिकीकरणासाठी लागणारे ते वंगण आहे. हे भारताच्या बाबतीत खरे वाटू लागते. याविषयीचे तंतोतंत भविष्यकथन ‘The Threat of Oligarchy’ या २००८ साली दिलेल्या भाषणात रघुराम राजन यांनी केलेले होते. याचा उल्लेख जेम्स कॅ्रबट्री वारंवार करतात. याशिवाय केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा व डावीकडे झुकणारे प्रा. आशुतोष वॉरश्ने यांचेही या विषयातील, त्यांच्या स्वत:च्या मताशी सहमत वाटणारे असे दाखले देतात. भारत आता स्वत:ची ‘सोन्याचा मुलामा दिलेली अवस्था’ (Gilded Age) अनुभवत आहे, असे मत ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीत (२०११-१२) मांडले गेले होते.

प्रस्तुत पुस्तक हे तीन भागांत विभागले गेले आहे. पहिला भाग बडय़ा उद्योगपती/समूहांविषयी, दुसरा राजकीय व्यवस्थेविषयी आणि तिसरा भारताच्या नव्या ‘गिल्डेड’ अवस्थेविषयी मांडणी करतो. शिवाय हे पुस्तक तीन भिन्न अंगांनी लिहिले गेले आहे : (१) भारताचा २००० सालानंतरचा औद्योगिक इतिहास. (२) १९९१ च्या सुधारणांमुळे मुक्त बाजारपेठांना आलेले यशापयश, नोकरशाही, उद्योजक आणि राजकारणी यांच्या संगनमतातून निर्माण झालेली दीर्घकालीन (विकृत) भांडवलशाही. या परिस्थितीचे ‘इंडियाज् ओल्ड सिस्टम ऑफ रिटेल करप्शन’ असे धाडसी वर्णन त्यांनी केले आहे. (३) पहिल्या दोन मुद्दय़ांमुळे भारतीय उद्योगधंद्यांची राक्षसी वाढ- म्हणजे फुग्यासारखी होणारी वाढ आणि नंतर त्या वाढीचा ताण सहन न झाल्यामुळे तो फुगा फुटण्याची भीती, याचा ऊहापोह कॅ्रबट्री यांनी केला आहे.

हे तीन मुद्दे सिद्ध करण्यासाठी ते विजय मल्या, मुकेश अंबानी, लक्ष्मी मित्तल, गौतम अदानी, नीरव मोदी, नोटाबंदी, नरेंद्र मोदींचे धोरण, विनोद राय,

२-जी घोटाळा, कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, दलालांचा (Power Brokers) सुळसुळाट, बेल्लारीचे रेड्डी आणि त्यांच्या खाणी, पर्रिकर आणि गोव्याच्या खाणी, समाजवादी पक्ष आणि मुलायमसिंग/ अखिलेश यादव, गंगा सफाई, रामदेव बाबा आणि त्यांची आयुर्वेदिक औषधे, जयललिता आणि त्यांना पाच वेळा मिळालेली सत्तेची संधी, याच काळात जयललितांनी सरकारी शाळेतील मुलांना वाटलेले ७० लाख लॅपटॉप व इतर चीजवस्तू आणि त्यातून निर्माण झालेला भ्रष्टाचार.. आदी उदाहरणे देतात. अम्मांचे हेच मॉडेल वाय. एस. आर. रेड्डी यांनी आंध्र प्रदेशमध्ये वापरले आणि पुढे उघडपणे देशात त्याचा सर्रास वापर सुरू झाला. भारतात कर्नाटक क्रमांक एक, आंध्र प्रदेश क्रमांक दोन व तमिळनाडू क्रमांक तीन अशी तीन मुख्य भ्रष्टाचार केंद्रे असल्याचे कॅ्रबट्री म्हणतात. भ्रष्टाचार आणि प्रगती हातात हात घालून चालत असल्याचे त्यांना दिसते. लगडपती राजगोपाल यांचे आंध्र प्रदेशमधील ३०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण हे याचेच एक छोटेसे उदाहरण!

‘हाऊस ऑफ डेब्ट’ या प्रकरणात त्यांनी राकेश झुनझुनवाला या बिग बुलबरोबर चर्चा करून भारताचे शेअर-मनी-अ‍ॅसेट मार्केट जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरवर झुनझुनवाला खूप मोकळेढाकळे बोलत असले तरी ते खरे बोलत नाहीयत, याचा प्रत्यय हे प्रकरण वाचताना येतो. त्याचप्रमाणे कोटक फायनान्सचे उदय कोटक यांच्याशी वित्तबाजाराबाबत झालेल्या चर्चेचा संदर्भ कॅ्रबट्री देतात. या सगळ्या अचानक झालेल्या प्रगतीत असलेला बहुतेक आंतरराष्ट्रीय बँकांचाही सिंहाचा वाटा ते नमूद करतात. जसे की, बार्कलीज, रोथशिल्ड, नोमुरा, लेहमन ब्रदर्स, जे. पी. मॉर्गन, इत्यादी. तसेच जीएमआर, जीव्हीके आणि लगडपती राजगोपाल (लँको) यांनी उभारलेले भारतातील अद्ययावत विमानतळ, आशीष गुप्ता यांचे सीजे हाऊस प्रकरण, मल्याची बुडालेली किंगफिशर (आणि आता दुर्दैवाने नरेश गोयल यांची जेट एअरवेजसुद्धा या डुबीत सामील झाली आहे.) ही उदाहरणे कॅ्रबट्री वानगीदाखल नमूद करतात. जिंदाल समूहाची झालेली भरमसाट वाढ (पण येथे टाटांच्या भूषण स्टीलविषयी ते काही बोलत नाहीत), शशी व रवी रुईया यांची एस्सार समूहामधील प्रगती व नंतर कंपनी दिवाळखोरीला निघते त्याचा आढावा, नारायणस्वामी श्रीनिवासन या तमिळ सिमेंट किंगची राजकीय दादागिरी तसेच जयप्रकाश गौर (जेपी ग्रुप) यांचाही ‘कर्ज-घरा’तला वाटा कॅ्रबट्री या प्रकरणात दाखवून देतात.

पुस्तकाच्या शेवटात कॅ्रबट्री यांनी आयपीएल क्रिकेटमधील प्रकरणांचाही उल्लेख केला आहे. ललित मोदी यांचा आयपीएलमधील सहभाग आणि त्याविरुद्ध नारायणस्वामी श्रीनिवासन ऊर्फ श्रीनी यांनी बीसीसीआयचा घेतलेला ताबा याचाही थोडक्यात आढावा घेतला आहे. श्रीनी यांची वाढत गेलेली सत्ता-संपत्ती, आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलवरचे त्यांचे नियंत्रण आणि नंतर धडाधड होणारी अधोगती याविषयी काही गोष्टी आपल्याला या पुस्तकामुळे समजतात. कॉर्पोरेट भारत आणि बॉलीवूड तारे-तारका, राजकारणी व क्रिकेटपटू यांच्यात रंगणारी चुरस आयपीएलच्या खेळापेक्षाही मनोरंजक वाटते.

या सगळ्या प्रत्यक्षातील घटना आपल्या नजरेने आणि बुद्धीने बघताना कॅ्रबट्री यांना भारतात चांगले काय चालले आहे, हे मात्र दिसत नाही. साबणापासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत पसरलेली विप्रो कंपनी आणि तिचे आदर्श व दानशूर मालक अझीम प्रेमजी यांचा पुस्तकात साधा उल्लेखही नाही. पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोविषयी या काळातील चांगली-वाईट काही माहिती मिळत नाही. टाटांचे बॉम्बे हाऊस किंवा कुमार मंगलम बिर्ला यांचा बिर्ला समूह आधारभूत दळणवळण सुविधांमध्ये या काळात काय करत होते, त्याविषयीची माहिती पुस्तकात नाही. रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला यांच्याविषयी अगदी नगण्य माहिती येथे दिलेली आहे. एका बाजूने कॅ्रबट्री भारत कसा आर्थिक आणि तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक होत आहे, असे गोडगुलाबी स्वप्न दाखवतात; पण त्याच वेळी हाच भारत झपाटय़ाने कसा ‘करप्ट’ही होत आहे आणि खरे तर तो किती भ्रष्ट झाला आहे, उखडत चालला आहे, हे आडूनआडून ते दाखवतात. नरेंद्र मोदींवर पुस्तकाची बऱ्यापैकी पाने खर्च करूनही मोदींचे विकासाचे आर्थिक धोरण बरोबर की चूक यावर कॅ्रबट्री लिहिणे टाळतात. तसे ते प्रत्यक्षात सतत ‘बॅकफूट’वर राहून लिहितात. त्यांच्याकडून सनसनाटी लिखाणाची अपेक्षा नाही; पण अधिक सकारात्मक, तौलनिक, तार्किक, प्रामाणिकपणाची माफक अपेक्षा करावयास तर काही हरकत नाही ना?

पुस्तक संपते ते- अर्णव गोस्वामींच्या ‘टाइम्स नाऊ’वरील पराक्रमी कामगिरीबद्दल (जी आता अस्तित्वात नाही!), मोदी यांच्या दु:खान्तिकांबद्दल, भारताच्या १२०० वर्षांच्या गुलामीबद्दल, गोरखपूरमधील आदित्यनाथांच्या देवभोळ्या अंधारमय सत्तेबद्दल बोलत आणि पुस्तकाचे तात्पर्य काढायच्या आधीच, डोळ्यांसमोर पुन्हा येते सुरुवातीला उल्लेख केलेल्या अंबानींच्या अ‍ॅस्टन मार्टिन या महागडय़ा गाडीचे छायाचित्र! गावदेवी पोलीस ठाण्यात ठेवलेल्या या गाडीवर प्रेतावर झाकण्यासाठी ठेवावे तसे करडय़ा रंगाचे प्लास्टिकचे आच्छादन ठेवले आहे, असे हे छायाचित्र आहे. याचे नेमके काय प्रयोजन? पुस्तकाचे तात्पर्य काढतानासुद्धा ‘अ प्रोग्रेसिव्ह इरा?’ असे नकारात्मक आणि प्रश्नचिन्हांकित तात्पर्य काढून कॅ्रबट्री मोकळे होतात.

विशेषत: परदेशी अभ्यासकांसाठी या पुस्तकात भारतीय उद्योग जगताविषयी बरीच माहिती अत्यंत शैलीदार पद्धतीने मांडण्यात आली आहे. पण त्यास असलेली ब्रिटिश मुत्सद्देगिरीची तिरकस खमंग फोडणी मात्र तीक्ष्ण नाक असणाऱ्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही!

‘द बिल्यनिअर राज’

लेखक :  जेम्स कॅ्रबट्री

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स, इंडिया

पृष्ठे: ३५८, किंमत : ७९९ रुपये

jayraj3june@gmail.com