18 February 2020

News Flash

एका मूलतत्त्ववादय़ाच्या मशागतीची (सत्य)कथा

गोष्ट इंग्लंडमधली आहे. झैद भट्ट हे पाकिस्तानातून व्यवसायाच्या मिषाने मँचेस्टर येथे स्थायिक झालेले.

गोविंद डेगवेकर govind.degvekar@expressindia.com

बीबीसीवर मुलाखत घेण्याच्या निमित्ताने भेट झालेल्या हसन भट्टशी लेखक आणि शोधपत्रकार शिव मलिक नंतरही संपर्कात राहिले.. असा संपर्क कायम ठेवताना काही अडचणीही आल्या पण त्या सोसून मूलतत्त्ववादी कसा घडतो, याचा ठाव ते घेत राहिले. त्यातून लिहिली गेलेली ही दोन पिढय़ांची कहाणी कादंबरीच्या स्वरूपाची असली, तरी तिला वास्तवाचा आधार आहे..

दहशतवाद का, कसा आणि कोठून आला? म्हणजे समजा एखाद्या मुलाला शाळेतून काढून टाकले गेले असेल किंवा घरात कडक शिस्तीचा बाप ‘ऊठ म्हणजे ऊठ..’ असे आदेश सोडत असेल, तर तो मुलगा भविष्यात दहशतवादी होईल, अशी अटकळ बांधता येईल? कदाचित नाही.. पण हे सगळे असे, म्हणजे त्या मुलाच्या मनाच्या विरोधात पुढे पुढे घडत गेले असेल आणि तो दहशतवादी झाला असेल, असेही छातीठोकपणे म्हणता येणार नाही. मुलेच असतात ती. नाही घडले मनासारखे बिचाऱ्याच्या म्हणून तो मन मारून घरात वावरत असेल. शाळेत कसेबसे गुण मिळवीत असेल. घर ते शाळा, शाळा ते घर असे चालू असेल कित्येक वर्षे त्याचे. शाळेत ‘सर’ वा ‘मॅम’कडून फेकले जाणारे शेरे किंवा ‘सर’ वा ‘मॅम’ त्याच्या तोंडाकडेही बघायला तयार नाहीत म्हणून रोजच डबडबलेल्या डोळ्यांनी पुस्तकात डोके घालून बसत असेल नाइलाजाने. पण म्हणून तो?.. नाही!

पण असेच अगदी वरच्या वर्णनातील सर्व काही एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले असेल आणि असे काही त्याने त्याच्या आईच्या काळजाला चिरणारे तिच्याजवळ बोलून दाखवले असेल, तर काय?

गोष्ट इंग्लंडमधली आहे. झैद भट्ट हे पाकिस्तानातून व्यवसायाच्या मिषाने मँचेस्टर येथे स्थायिक झालेले. त्याआधी त्यांनी नोकरीही केली. पण ती काही कारणाने गेली. झैद हे लहानपणीच पोलिओग्रस्त असल्याने इस्लामसाठी- म्हणजे एक मुसलमान म्हणून आवश्यक असलेल्या तत्त्वांचा त्यांच्याकडून अव्हेर झाला, किंबहुना ते इस्लामला मानत नव्हते. अपंग असल्याने ते इतरांसारखे कोणात मिसळले नाहीत. ना त्यांना कुणी मिसळून घेतले. लग्न झाल्यानंतर इंग्लंडमध्ये ते केवळ आणि केवळ रग्गड पैसे मिळविण्याच्या उद्देशानेच आले होते. त्यांचा तो हेतू हळूहळू सफल होऊ लागला. त्यांना पाकिस्तानात वा नंतर कुठेही चांगल्या शिक्षणाची संधी मिळालेली नव्हती. म्हणून मुलांच्या शिक्षणाबाबत ते आग्रही होते. सर्वोत्तम शिक्षण म्हणजे सर्वोत्तम गुण आणि अव्वल गुण म्हणजे हव्या त्या क्षेत्रात हुकमी पदावर काम करण्याची संधी, असे पक्के गणित त्यांच्या डोक्यात होते. यासाठी त्यांनी चांगल्या शाळांमधून मुलांना घातले. पण इंग्रज माणसाविषयी त्यांच्या मनात एक अढी होती. ती म्हणजे ही माणसे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळतात. त्यांच्या जास्त नादाला लागू नका, असे ते त्यांच्या मुलांना सांगायचे.

झाले. रोज शाळेत जाणारा त्यांचा मुलगा हसन भट्ट याने शेवटपर्यंत वडील झैद यांचे हे वाक्य तेवढे लक्षात ठेवले. हसन हुशार होता. भरभक्कम गुण त्याच्या प्रगतीपुस्तकात भरलेले असायचे. यासाठी त्याच्या उरात आनंद असायचाच; पण आणखी एका कारणासाठी त्याची छाती गर्वाने फुलून यायची. ते कारण असे होते, की हसनचे वडील हसन आणि त्याच्या भावाला बेशिस्त वागल्यास घरातली हाती लागेल ती वस्तू फेकून मारत असत. छडीने फोकटवून काढणे महिन्यातून तीन-चार वेळा तर व्हायचेच. हसन या साऱ्या शिस्तीबद्दल एक पुस्ती जोडायचा; ती म्हणजे, त्याच्या वडिलांनी त्याला मुलापेक्षा ‘माणूस’ म्हणून वाढवले. हसनसाठी दारू पिणे हा हराम होता. तो दारू ‘सव्‍‌र्ह’ केल्या जाणाऱ्या हॉटेलातही जात नव्हता. पण मित्रांना पोटभर जेवू घालण्याचा त्याचा नेम त्याने कधी मोडलेला नव्हता.

हसनच्या मनात नेमके काय चालू आहे, हे तोवर कुणाच्याच ध्यानात आलेले नव्हते. पण वडील जे काही करताहेत ते कसे बरोबर आहे, हे तो त्याच्या वर्गमित्रांना, भेटीगाठीतील लोकांना पटवून द्यायचा. इतके की, वडिलांनी त्यांच्या कापड व्यवसायात पैसे कमी पडले म्हणून विमा कंपनीला फसवले, हे तो चुकीचे मानत नव्हता. उलट ब्रिटनच्या सरकारमुळे वडिलांना असे करावे लागल्याचे तो ठासून सांगायचा. हवे ते हव्या त्या मार्गाने मिळवता येते, ही वृत्ती त्याच्या मनात घट्ट रुजली होती.

सतत उपेक्षिला गेलेला, अतिरेकी वागणे, आक्रमकता आणि तडजोड न करण्याची वृत्ती या साऱ्याचे मिश्रण हसनमध्ये तयार होऊ लागले. महाविद्यालयात या साऱ्याचा एकसंध प्रभाव जाणवू लागला. इंग्लंडमधील काही प्राध्यापक वर्णभेद पाळायचे. पाकिस्तानातून मँचेस्टरमधील चितम हिल इथे शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांप्रति तो बाळगला जायचा. त्याची शिकार हसनचे काही मित्र झाले. त्यावरून हसनला महाविद्यालयात डोकी फुटेस्तोवर हाणामारी करावी लागली.

वडिलांनी पाकिस्तानात सगोत्र विवाहाचा मांडलेला प्रस्ताव हसनने फेटाळून त्याच्या महाविद्यालयातील रुबिया या तरुणीशी कुटुंबीयांच्या परोक्ष ‘निकाह’ लावला. तो परंपरेच्या आणि नियमांच्या मुद्दय़ांवर टिकला नाहीच, पण रुबियाच्या घरच्या लोकांनी हसनविषयी तिच्या मनात द्वेष भरवून त्यांची कायमची ताटातूट केली.

हसन मूलतत्त्ववादी होण्यासाठीची ही मशागतच होती, इतकी परिस्थिती झपाटय़ाने बदलत होती. म्हणजे ब्रिटनमधील ‘अल मुहाजिरों’ आणि ‘हिज्ब-उत- तेहरीर’ संघटनेसाठी तो काम करू लागला. म्हणजे इस्लामची आज्ञा पाळण्यासाठी प्रत्येक तरुणाने लढण्यासाठी आणि जमल्यास मरण्यासाठी तयार राहिले पाहिजे, या आशयाची बरीच वाक्ये त्याने उच्चारली, भाषणे दिली, पत्रे लिहिली आणि मुलाखतीही हसनने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांना दिल्या. धर्माच्या पायावरच राष्ट्राची उभारणी व्हायला हवी, हे त्याच्या प्रत्येक उक्ती-कृतीमागचे सार होते.

बीबीसीच्या एका माहितीपटासाठी विचारलेला प्रश्न असा होता, की २००४ मध्ये माद्रीद स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांचे तू समर्थन करतोस का? यावर हसनचे उत्तर होते, की निर्मात्यासाठी ज्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही, त्यांच्या या महान कृत्याविषयी मला कोणताही खेद वाटत नाही. उलट या कार्यासाठी मी माझ्या जिवाचे मोल का देऊ शकलो नाही, याविषयी मला खंत आहे.

अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर आधी अफगाणिस्तान, नंतर इराकमध्ये जाऊन लढावे यासाठी ब्रिटनमधील तरुणांच्या फौजा तयार करण्याच्या कामी ‘अल मुहाजिरों’ आणि ‘हिज्ब-उत-तेहरीर’ संघटनांना हसनने मदत केली. परंतु निव्वळ धर्माच्या शिकवणीनुसार राष्ट्रउभारणीसाठी तरुण लढत आहेत, अशीही परिस्थिती नसल्याचे हसनच्या ध्यानात आले होते. कारण धर्माच्या पायावर राष्ट्रउभारणी करायची, पण हिंसा करायची नाही, असे मानणारे अनेक गट हसनच्या अवतीभवती होते. त्याच वेळी हिंसेशिवाय धर्मराष्ट्रनिर्मिती शक्य नाही, या विचारांचे नेतेही हसनला ‘माध्यम’ मानायचे. एकाच वेळी अनेक मोबाइल (फोन) हाताळायचे कसब हसनकडे होते. यासाठी तो काहींसाठी मदतनीस, काहींसाठी ‘दूत’ आणि काहींसाठी निरोप्या होता. हसनला जवळ करण्याचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा होता. मूलतत्त्ववादाचा उच्चरवात प्रसार करणारा आणि पाश्चिमात्य देशांतील अभियंते, डॉक्टर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘इच्छुकां’ना एक करण्यासाठी धडपडणारा हसन हा ‘चेहरा’ होता. निष्ठा बदलणाऱ्यांसाठी हसन हा कधी-कधी वाटेतला दगड वाटत होता. म्हणून हसनवर जीवघेणा हल्लाही झाला होता. पुढे दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याला अटक होते. २०१८ मध्ये ऑनलाइन आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या गुन्ह्य़ावरून हसनला अटक करण्यात आली. त्याला त्यासाठी १३ वर्षांची सजा सुनावण्यात आली आहे, अशी हसनची कथा आहे.

कुटुंबातील विश्वास, प्रेम आणि अभिमान या तीन तत्त्वांसाठी झटणाऱ्या हसनच्या आईला हसनच्या बाबतीत असे काही घडू नये, असे वाटत होते. मात्र, तेच सगळे घडत जाते.

ते सारे ‘देअर आर मोर दॅन टू साइड्स टु एव्हरी स्टोरी : द मेसेन्जर’ या पुस्तकात चित्रित करण्यात आले आहे. ही सत्यकथा आहे. एखाद्या रहस्यकथेत जसे घडत जाते, तसे प्रसंग ‘द मेसेन्जर’मध्ये येतात. कथा मोठी असल्याने कादंबरीही म्हणता येईल, इतके अकल्पित सत्य या पुस्तकातून समोर येते. लेखक शिव मलिक यांच्या कथनाच्या दर्जेदार शैलीने अनेक प्रसंगांची उभारणी वाचकासमोर अत्यंत प्रभावीरीत्या झाली आहे. शिव हे शोध पत्रकारितेतील मातबर आहेत. बीबीसीच्या एका माहितीपटासाठी त्यांची हसनशी ‘मैत्री’ झाली. आणि त्यातून हे पुस्तक आकारास आले. यातील मनावर ठसणारा मुद्दा म्हणजे लेखक आणि हसन यांच्यातील समान धागा. दोघेही मूळचे दक्षिण आशियातील पर्वतीय प्रदेशात राहणारे आणि समान दु:खाचा धागा म्हणजे दोघांच्या वडिलांनी दुसऱ्या स्त्रीसोबत केलेला घरोबा हा आहे.

हसनशी नियमित संपर्कात राहिल्याने लेखकाला आलेल्या अडचणींचा उल्लेख या पुस्तकात जागोजागी आढळतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दहशतवादविरोधी कायद्याचा धाक दोघांच्या संबंधात असतो. कधी-कधी हसन जे सांगत आहे ते खरे आहे की खोटे, अशी शंकाही लेखकाच्या मनात येते.

तरीही लेखक हसनमधला एक माणूस शोधण्याचा प्रयत्न संपूर्ण पुस्तकात वारंवार करतो, हे या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ ठरावे. ही सत्यकथा एका घटनेमागच्या अनेक शक्यता उलगडून दाखवते.

‘देअर आर मोर दॅन टू साइड्स टु एव्हरी स्टोरी : द मेसेन्जर’ 

लेखक : शिव मलिक

प्रकाशन : पेंग्विन-व्हिन्टाज

पृष्ठे : ३२१, किंमत : ५९९ रुपये

 

First Published on December 7, 2019 4:28 am

Web Title: book review the messenger there are more than two sides to every story book by shiv malik zws 70
Next Stories
1 बुकबातमी : त्या आणि या..
2 भारताच्या ओळखबदलाची आत्मकथा
3 ग्रंथमानव : सुवर्णयुगाचा सांगाती!
Just Now!
X