|| पंकज भोसले
‘बुकर पारितोषिका’च्या लघुयादीतील पुस्तकांचा परिचय करून देणाऱ्या वार्षिक लेखमालिकेचा हा परिचयलेख; लघुयादीत नसलेल्या पुस्तकांबद्दल आणि करोनाकाळात वाचन-असोशी जागीच कशी, याबद्दलही..

गेल्या दीड-पावणेदोन वर्षांत, महासाथीने लादलेल्या अतिरिक्त फावल्या वेळेत एकाग्रचित्ताने वाचणारे अधिकाधिक वाचत कसे राहिले याचे पुरावेच उपलब्ध होऊ शकतात. ‘ग्लोबल इंग्लिश एडिटिंग’ नावाची एक संस्था आहे. ती जगभर लेखन आणि मुद्रितशोधनाची सेवा पुरविते. या संस्थेने गेल्यावर्षी टाळेबंदीने माणसे घरांत कोंडली जात असताना फक्त पुस्तकविक्री यंत्रणांची हालहवाल घेण्याचा प्रयत्न केला. विकीनोंदींपासून अ‍ॅमेझॉनसह दोन डझन लोकप्रिय स्रोतांद्वारे दाखल होणाऱ्या माहितीचे त्यांनी एकत्रीकरण केले. त्यातून फक्त आपल्यासाठी एक सुखद धक्क्याची बातमी होती. जगभरात मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात (सर्वेक्षण फक्त इंग्रजी ग्रंथांसाठीच मर्यादित होते.) एका आठवड्यात वाचनासाठी सर्वाधिक वेळ देणाऱ्यांत भारतीय अग्रभागी होते. गंमत म्हणजे या सर्वेक्षणात ग्रंथनिर्मिती-विक्री आणि ग्रंथालयसुसज्ज अमेरिका बावीसाव्या स्थानावर होती. दर‘वाचक’डोई भारतीय हा या काळात आठवड्याला १० तास ४२ मिनिटे वाचनासाठी देत होता. भारतीयांनतर थायलंड या चिमुकल्या देशातील नागरिक (९ तास २४ मिनिटे) वाचनमग्न होते, तर चीन तिसऱ्या स्थानावर (आठवड्याला ८ तास) वाचननिष्ठा जागवत होते. हेही केव्हा, तर मृत्यूचे तांडव, बाधितांचा प्रतिदिनी वाढता प्रवाह, नोकऱ्यांचा ऱ्हास, शहरांतून गावाकडे चालत जाणाऱ्या स्थलांतरितांचे भोग आणि उद्योगांची घसरण यांच्या बातम्यांच्या देशोदेशी सारख्याच आवृत्त्या असताना. वाचन ही आपल्याकडे जीवनावश्यक बाब नसल्याने या विस्तृत (आणि रंजकही) अहवालाची दखल आपल्या माध्यमांनी तरी घेतल्याचे पाहण्यात आले नाही.

स्थानिक भाषांतील पारंपरिक ग्रंथविक्रीयंत्रणा या काळात विविध प्रकारची रडगाणी, सरकारी मदत आणि आपल्या नुकसानीच्या आरत्या ओवाळत बसली असताना घरपोच सवलतीत हवे ते पुस्तक पोहोचवून देणारी ‘ऑनलाइन स्टार्टअप्स’ देशातील सगळ्या शहरांमध्ये उघडली गेली. केवळ मराठीतच पाहायला गेलो, तर असे अर्ध्या डझनाहून अधिक ऑनलाइन बुकखरेदी पर्याय गेल्या वर्षभरात उभे राहिले. त्यामुळे पुस्तकविक्रीची मुंबई-पुणे शहरांची मक्तेदारी संपुष्टात आली असून अमरावती, कोल्हापूर, फलटण आणि कितीतरी शहरगावांतून वाचकांना करोनापूर्वी मिळत नव्हती ती पुस्तके सहज मिळू लागली आहेत. दुर्मीळ पुस्तकांची-जुन्या पुस्तकांची समाजमाध्यमांद्वारे आठवडी ऑनलाइन लिलाव पद्धत, पुस्तकभिशी प्रकल्प ही या वर्षात महाराष्ट्राची वाचनाबाबत झालेली प्रगती. इतकेच नाही तर मुंबईतील फाऊंटनपासून पुणे-कोल्हापूरमधील पदपथांवर विक्री करणाऱ्या ग्रंथविक्रेत्यांकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्रंथ-वेड्यांची शमवली जाणारी वाचनभूक हा प्रकार केवळ आणि केवळ करोनाने बदललेल्या वाचनशैलीतून तयार झाला. यांतून अनेकदा भरताड-रद्दीलाही दुर्मीळतेचा मुलामा लावल्यामुळे लोकांच्या अनावश्यक गटातील खरेदीत वाढ होत चालली असली, तरी ती पुस्तकांची होत असल्याने कधीही स्वागतार्हच.

खरेदी आणि वाचन यांतील तफावतीच्या टक्क्यांचा विचार केला तरी विषाणूवर्षात जागतिक वाचनपटलात अमूलाग्र सकारात्मक बदल झाले. करोनामुळे पट्टीच्या वाचक-लेखकांच्या अकाली मृत्यूवार्ता, त्यांच्या ग्रंथसंग्रहाचे चलन-वलन यांतूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ग्रंथवाचनाकडे कल वाढत गेला.  करोनासारख्या विषाणूग्रस्त अवस्थेत शतकांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रंथांना अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले. जिवोवोनी बोकॅशिओ  या इटालियन लेखकाने चौदाव्या शतकातील जीवघेण्या प्लेगच्या दरम्यान लिहिलेल्या ‘डिकॅमेरन’ या ग्रंथाला अचानक महत्त्व प्राप्त झाले. विलगीकरणातल्या या लोकविलक्षण कथांचा वाचकवर्ग वाढतच चालला आहे. अव-काळात लिहिल्या गेलेल्या कथा-कल्पनांचा आजच्या मितीत विचार होतोय हा देखील एक बदलच.

२०१८ सालातील ऑगस्ट महिन्यात लिंग मा या चिनी-अमेरिकी लेखिकेने ‘सेव्हरन्स’ नावाची कादंबरी लिहिली. प्लेबॉयमधील वृत्ततपासणी विभागात अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या मोहिमेत तिची नोकरी गेली होती. बेरोजगारीच्या पर्वात लिहिली गेलेली ही कादंबरी आधी पुरस्कार वगैरे पटकावून गेली. मात्र २०२० साली ते सर्वाधिक वाचले गेलेले पुस्तक बनले. कारण , चीनमधून पसरलेला ‘शेन’ नावाचा एक विषाणू जगभर व्यापतो आणि जगण्याची उलथापालथ करतो असे या कादंबरीचे कथानक होते. एका वर्षातच कादंबरीच्या कथानकासारखी परिस्थिती सर्वत्र झाल्यामुळे फुटकळ कथा लिहिणाऱ्या या लेखिकेवर द्रष्टेपणाचा मुकुट चढविला गेला.

आता मुद्द्याचा विषय हा, की कथासाहित्याच्या वार्षिक खरेदी-विक्री चक्रावर पगडा पाडणाऱ्या, चोखंदळ वाचकांकडून कठोर निकषांच्या आधारावर वर्षातील सर्वोत्तम कादंबऱ्यांचे अर्धा डझन पर्याय उभे करणाऱ्या बुकर पारितोषिकाच्या वार्षिक निवड चाळणीत विषाणूवर्षात कोणता बदल झाला?

यंदा दीडशेहून अधिक कादंबऱ्यांमधून पाच जणांच्या परीक्षक मंडळाने बदललेल्या जागतिक मितीत पटणारे, पचणारे असे कथनसाहित्य निवडल्याचा दावा केला आहे. यातील बहुतांश कादंबऱ्या करोनाकाळात लिहिल्या-प्रकाशित झालेल्या. मात्र प्रत्येकाच्या कथेतील काळ वेगवेगळा. काहींना इतिहासाचा संदर्भ, काहींना विज्ञान-संशोधनाचे अस्तर, काही समाजमाध्यमांतील भाषेचा भलाबुरा लहजा संभाळत आपापला आशय मांडणाऱ्या आहेत.

बुकरच्या दीर्घयादी मधील कादंबऱ्यांत यंदा(ही) विविधता हे सूत्र अनेकार्थाने पाळले गेले. बुकरवर नाव कोरणाऱ्या आणि आपली प्रत्येक आवृत्ती काही लाखांच्या संख्येत काढणाऱ्या काझुओ इशिगुरो यांच्यासारख्या दिग्गज लेखकाचे दीर्घयादीत स्थान होते. तसेच दोन महिन्यांपूर्वीपर्यंत वाचक जगताशी अपरिचित असलेल्या लेखिकेच्या फक्त ५०० प्रती छापल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कारेन जेनिंग्ज या लेखिकेचाही परीक्षक मंडळाने वाचनीयता या निकषांवर यादीत समावेश केला होता. पुस्तक छापून यावे म्हणून सशर्त शिष्यवृत्ती मिळालेल्या या नवख्या लेखिकेची ‘अ‍ॅन आयलंड’ ही छोटेखानी कादंबरी दीर्घयादीत समाविष्ट झाल्यापासून मंगळवारी लघुयादीतून ती वगळली जाईस्तोवर तडाखेबंद विकली गेली. तिच्या प्रकाशकांनी बुकरयादीच्या हर्षोल्हासात सुरुवातीला पाच हजार आणि नंतर अधिकाधिक प्रतींची मुद्रणे काढून पुस्तक जगात पोहोचविले. बुुकर मिळणार नसले, तरी या लेखिकेने वाचकांचे पुरते लक्ष मात्र वेधून घेतले. रेचल कस्क या जन्माने अमेरिकी आणि कर्माने ब्रिटिश असलेल्या लेखिकेच्या ‘सेकंड प्लेस’ या कादंबरीची चर्चा लघुयादीत दाखल झालेल्या कोणत्याही पुुस्तकापेक्षा अंमळ अधिक होती. आत्मकथांना कादंबरीचा घाट देऊन गेल्या दशकभरात विविध प्रायोगिक कादंबऱ्या निर्माण करणाऱ्या या लेखिकेला लघुयादीतून डावलत बहुप्रियतेशी फारकत राखण्याची परंपरा यंदा कठोरपणे जपली गेली आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि ब्रिटिश इतिहासाच्या अभ्यासक असलेल्या माया जेसनऑफ (छायाचित्रात मध्यभागी) यांच्या अध्यक्षतेखाली यंदाच्या निवड समितीत यंदा फायनान्शियल टाइम्समधील ‘वीकेण्ड’ पुरवणी पाहणाऱ्या हॉरेशिया हॉरोड, गेल्या सात वर्षात दोन वेळा बुकरच्या नामांकनात दाखल होऊनही पारितोषिकाने हुलकावणी दिलेला नायजेरियातील कादंबरीकार चिगोझी ओबियामा, आयरिश अभिनेत्री नताशा मॅकलहोन (जी जिम कॅरीच्या ‘ट्रूमन शो’ चित्रपटाची नायिका म्हणून अनेकांना परिचित आहे)  कवी आणि ब्रिटनमधील चर्चचे आर्चबिशप असलेले डॉक्टर रोवन विल्यम्स यांचा समावेश आहे. जानेवारी ते जून या कालावधीत या समितीने १५८ कादंबऱ्यांचा फडशा पाडून १३ पुस्तकांची दीर्घयादी केली. गेल्या दोन महिन्यांत ऑनलाइन बैठकांद्वारे लघुयादीचा निर्णय दिला. आता पुढील दीड महिन्यात वाचन-पुनर्वाचन आणि ऑनलाइन बैठकांद्वारे अंतिम पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड होईल. त्या दरम्यान या पुस्तकांचे वितरण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत होईल. वाचनवेड्यांची या पुस्तकांवरची मतमतांतरे समाजमाध्यमांतून तरंगू लागतील.

‘ग्लोबल इंग्लिश एडिटिंग’ संस्थेच्या पाहणीनुसार या विषाणूपर्वात जगभरातील ३५ टक्के वाचक आदल्या वर्षीपेक्षा अधिक ग्रंथवाचनात बुडालेले होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनमध्ये पुस्तक दुुकाने बंद असतानाही या व्यावसायिकांना ऑनलाइन यंत्रणेद्वारे १६ टक्के अधिकचा लाभ झाला. २०२१ मध्ये अमेरिकी ग्रंथउद्योगाने वर्षारंभापासूून फायदाच कमावला. हे दाखले आपल्यासाठी महत्त्वाचे का, तर त्या देशांतील प्र्रकाशकांनी ग्रंथनिर्मिती करोना लाटेच्या भीतीने, टाळेबंदीतील संभाव्य नुकसानाचा अंदाज घेत थांबविली नाही. करोना टिपेवर असतानाही नवी पुस्तके येत राहिली. त्यांची विक्री तेव्हा जोमात नसली, तरी खंडित झाली नाही. आपल्याकडे याच्या उलट पावले उचलली गेल्याचा परिणाम अनेक पुस्तकांची प्रकाशने अडकण्यात, बाजारात टाळेबंदीपूर्वी आलेल्या पुस्तकांच्या वितरण अडचणी वाढण्यात आणि ग्रंथदालन या पारंपरिक यंत्रणेपासून वाचक तुटण्यात झाला. उत्साह आणि गावोगावातील वाचकांच्या प्रतिसादावर उभारण्यात आलेली आपल्याकडली ‘ऑनलाइन बुकस्टोर्स’ची साखळी सध्या रांगत आहे. पारंपरिक यंत्रणेचे सहाय्य तिला मिळाल्यास ती दुडूदुडू धावू लागेल. अन् तसे झाले, तर आपला वाचनपैस कुठल्याही विषाणूवर्षात अबाधितच राहील.

pankaj.bhosale@expressindia.com