27 May 2020

News Flash

ग्रंथमानव : समग्रदृष्टीचा भाष्यकार!

वॉलरस्टीन यांचा ग्रंथ येईतो प्रकार्यवादी सिद्धान्त आणि आधुनिकीकरण सिद्धान्त प्रचलित होते

श्रुती तांबे  shruti.tambe@gmail.com 

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेतील प्रगत भांडवलशाहीमुळे झालेल्या सामाजिक-सांस्कृतिक, नीतिशास्त्रीय अवमूल्यनाच्या समग्र अभ्यासाचा आग्रह धरणाऱ्या प्रख्यात समाजशास्त्रज्ञ इमॅन्यूएल वॉलरस्टीन यांचे अलीकडेच निधन झाले. ‘बुकमार्क’मध्ये कधी कधीच प्रकटणाऱ्या, ज्ञान-विचारांच्या समृद्धीत भर घालणाऱ्या महानुभावांची दखल घेणाऱ्या ‘ग्रंथमानव’ या स्तंभात इमॅन्यूएल वॉलरस्टीन यांच्या विचारांची ओळख करून देणारे हे टिपण..

मानवी आयुष्याचे मर्म शोधायचे असेल तर ते व्यक्ती आणि समष्टीच्या नात्यातून बघावे लागते. जगाच्या विविध भागांत माणसे आणि त्यांचे समूह निसर्गाचा, भौगोलिक बदलांचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावतात. साहजिकच उपजीविकेपासून घरबांधणीपर्यंत सर्वच बाबतींत अगणित प्रकारचे वैविध्य दिसते. वसाहतवादामुळे आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका खंडाचे भविष्य जगण्याच्या भौतिक पैलूपासून ते विश्वास, उपासना या बाबतीत कायमचे बदलले. युरोपातील अतिरिक्त भांडवलनिर्मितीमुळे वसाहती म्हणून मोठे भूभाग अंकित झाले. भारतासह संपूर्ण तिसऱ्या जगात लाखो लोकांचे आर्थिक आयुष्य एकीकडे शासन, राज्यकर्ते घडवत/ बदलत असतात, तर त्याच वेळी पडद्यामागून सत्तेच्या दोऱ्या कधी अगदी साधे सामान्य लोक, कधी व्यापारी वर्ग, कधी पैसा आणि सत्तेच्या दोऱ्या एकत्र पकडलेले भांडवलदार नाचवत असतात. जगाच्या रंगमंचावर या प्रक्रियांचा अन्वयार्थ इमॅन्यूएल वॉलरस्टीन यांनी आर्थिक, सामाजिक व राजकीय घटकांच्या संदर्भात लावला.

जागतिक आर्थिक प्रवाहांचे मूलगामी विश्लेषण करणारे महत्त्वाचे विचारवंत इमॅन्यूएल वॉलरस्टीन यांचे नुकतेच निधन झाले. ते न्यू यॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. समाजशास्त्राच्याच नव्हे, तर एकूण सामाजिकशास्त्रांच्या संपूर्ण वैचारिक विश्वात त्यांनी गेली चार दशके त्यांच्या मूलभूत लिखाणाने गाजवली. या प्रथितयश सामाजिक भाष्यकाराचे आणि मानवी भूतभविष्याच्या हजारो वर्षांचे दिशादर्शक विश्लेषण केल्यामुळे विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरणाऱ्या अशा या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञाचे जाणे हे एका पर्वाची अखेर होणे आहे. त्यांनी स्थापनेत पुढाकार घेतलेल्या ‘फर्नान्ड ब्रॉडेल सेंटर फॉर द स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स, हिस्टोरिकल सिस्टीम्स अ‍ॅण्ड सिव्हिलायझेशन्स’ या संस्थेचे ते संचालक होते. अमेरिकन समाजशास्त्र परिषद आणि युनिसेफ पुरस्कृत आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र परिषद यांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली होती. अनेक सन्माननीय पदव्या मिळालेले ते मान्यवर संशोधक होतेच. अलीकडे २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ही त्यांची औपचारिक ओळख. परंतु त्यापलीकडची त्यांची खरी ओळख आहे ती त्यांनी ज्या संस्था उभारल्या, घडवल्या त्यातून. सोबतच त्यांनी अक्षरश: हजारो संशोधकांच्या लिखाणाला वेगळी दिशा दिली.

१९६० च्या दशकात त्यांनी आफ्रिका खंडातील विविध देशांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जडणघडणीवर आपले लक्ष केंद्रित केले होते. घाना आणि आयव्हरीकोस्ट या देशांचे समग्र अध्ययन करून त्यांनी आफ्रिकेतील देशांच्या वसाहतवादाविरुद्धच्या संघर्षांचा लढा जगासमोर आणला. युरोपातील सरंजामशाहीच्या अस्तानंतर तेथील धनाढय़ शेतकरी आपली पुंजी अधिक नफ्यासाठी गुंतवण्याच्या संधी शोधत होते. त्याच वेळी होकायंत्र, वाफेची इंजिने, साहसी दर्यावर्दीच्या मोहिमा यांतून युरोपपलीकडची भूमी त्यांना आपल्या कब्जात आणता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. जुन्या मोठय़ा संपत्तीतल्या नफ्याची पुंजी, काहींनी जमिनी विकून मिळवलेली संपत्ती नव्या युगातल्या नव्या आर्थिक रचनेत भांडवल म्हणून ओळखली जात होती. त्याच काळातला युरोपातल्या एकेका देशातला व्यापारी वर्ग सरकारने मदत करावी, रस्ते बांधावेत, कर माफक असावेत असा प्रयत्न करत होता. काही देशांत राष्ट्रीय बँकांची स्थापना झाली. राष्ट्रवादाची निर्मिती झाली, ती या नव्या भांडवलदार गटाकडून. यातून राष्ट्रप्रेम, राष्ट्र-राज्य या घटितांची निर्मिती झाली, हे ऐंशीच्या दशकापर्यंत सर्वमान्य होते. वॉलरस्टीन यांनी या सर्व सिद्धांतांना, सर्वमान्य निष्कर्षांना समूळ उडवून लावले. त्यांच्या ग्रंथांतून अनेक युरोपीय राष्ट्रांची अनेक शतकांतील आर्थिक आकडेवारी देऊन त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केले, की भांडवलशाही व्यवस्था जागतिक पातळीवरच चालते. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, राष्ट्र-राज्य या चर्चा भांडवलशाहीच्या जन्माच्या आणि विस्ताराच्या काळात घडल्या असल्या, तरीही त्या संकल्पनांचे कोणतेही योगदान भांडवलशाहीचा विस्तार साध्य करत नाही.

भांडवलशाहीने संपूर्ण जगच एक आर्थिक एकक बनवले. म्हणूनच १६ व्या शतकापासून उत्पादन, विक्री, वितरणाची सर्व गणिते ही भांडवलाच्या सोयीने आखली गेली आणि राबवली गेली, असे ते दाखवून देतात. त्यामुळे हळूहळू युरोपातील शेतजमिनीचे एकत्रीकरण केले गेले. नंतर यंत्रे, मोठी गुंतवणूक, सतत तंत्रज्ञानातील शोध व नावीन्य यांची मदत घेऊन भांडवली शेतीचा विस्तार केला गेला. या मोठय़ा भांडवलावर आधारलेल्या नफाकेंद्री प्रकल्पाला आयात-निर्यात या अत्यावश्यक प्रक्रिया होत्या. त्यामुळे संपूर्ण जगच या खेळात एकत्र आणून गुंफले गेले. त्यामुळे भाषा ‘राष्ट्र-राज्य’ आणि ‘राष्ट्रवादा’ची असली, तरी युरोपातील विविध देशांना एकमेकांशिवाय आर्थिक व्यवहार करणे अशक्य झाले. या गुंतागुंतीच्या आर्थिक खेळाला वॉलरस्टीन ‘वर्ल्ड इकॉनॉमिक सिस्टम’ म्हणतात. यात राष्ट्रांना परस्परांवर अवलंबून राहावे लागले. म्हणूनच या सिद्धांताला ‘परावलंबन सिद्धान्त’ या नावाने ओळखले जाते.

वॉलरस्टीन यांचा ग्रंथ येईतो प्रकार्यवादी सिद्धान्त आणि आधुनिकीकरण सिद्धान्त प्रचलित होते. भांडवलशाही उपयुक्त होती म्हणूनच जगभरच्या लोकांनी स्वीकारली, असे प्रकार्यवादाचे प्रतिपादन होते. तर युरोपातील आधुनिकीकरणाने जगभरच्या जनतेला युरोपचे अनुकरण करावेसे वाटले; युरोपातील भांडवलशाही वा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन पद्धती, जीवनसरणी जगभर का पसरली, याची ही दोन उत्तरे वॉलरस्टीन यांनी रद्दबातल ठरवली. त्यांनी भांडवलशाहीच्या जागतिक विस्तारामागे युरोपीय भांडवलशहांनी केलेले सीमान्तिक वसाहतींचे शोषण हे एकमेव कारण असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच त्यांच्या मते, या नव्या व्यवस्थेचे युरोप हे केंद्र ठरले. तर स्पेन वा ऑस्ट्रिया या ढासळत्या सत्ता आणि रशिया व जपान या नव्या औद्योगिक सत्ता या अर्धपरीघ बनल्या. त्याचप्रमाणे तिसऱ्या जगातील वसाहती या जागतिक भांडवलशाहीचा परीघ झाल्या, अशी नवी परिभाषा त्यांनी निर्माण केली. परिघाचे कार्य कायमच कच्चा माल पुरवणे, तयार माल सतत विकत घेणे आणि स्वस्त श्रमिक पुरवणे हे ठरले. आधुनिक काळात निर्माण झालेले हे पूर्ण जोडले गेलेले नवे जग. केंद्र, अर्धपरीघ आणि परीघ या नव्या संकल्पना त्यांनी निर्माण केल्या, कारण नव्या सिद्धान्ताला नवी परिभाषाही लागते याचे सुयोग्य भान त्यांना होते आणि म्हणूनच ते जागतिक दर्जाचे भाष्यकार ठरतात.

अलीकडच्या काळात वॉलरस्टीन यांनी एक अनोखा, अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प राबवला. तो म्हणजे गुलबेन्कियन फाऊंडेशनमार्फत जगाच्या विविध भागांतल्या शास्त्रज्ञांना ब्रॉडेल सेंटरमध्ये एकत्र आणून ‘ओपन सोशल सायन्सेस’ हा अहवाल लिहून घेऊन प्रकाशित करणे. हा अहवाल वैशिष्टय़पूर्ण ठरला. कारण २१ व्या शतकातील मानवतेसमोर कोणती आव्हाने असतील आणि त्यांना सामोरे कसे जायचे, याची ती भविष्यवेधी संहिता होती. भौतिकशास्त्र, इतिहास, विज्ञान-तंत्रज्ञान, रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान या क्षेत्रांतील दिग्गजांच्या सहकार्याने त्यांनी ती स्वत: लिहिली. जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांना एकत्र आणून दीड वर्ष विमर्श करून हा ऐतिहासिक दस्तावेज त्यांनी निर्माण केला.

मुळात सामाजिकशास्त्रे म्हणजे काय? ती नैसर्गिक शास्त्रांपेक्षा वेगळी का व कशी? हे सर्व कोणी, कधी व का ठरवले? अशा सर्व प्रश्नांचा या अहवालात गंभीरपणे सखोल ऊहापोह केला आहे.

भांडवलशाही व वसाहतवाद या जगाची पुनर्माडणी करणाऱ्या दोन प्रक्रियांनी मानवाच्या सत्याच्या आणि त्यातही शास्त्रीय सत्याच्या शोधाची दिशा आणि स्वरूप बदलून टाकले. नवे विषय, व्याख्या व अभ्यासक क्षेत्रे साचेबद्ध पद्धतीने ठरविली गेली. अ‍ॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र, देकार्तची तत्त्वे, हेगेलचा द्वंद्ववाद हे संपूर्ण मानवजातीच्या जगण्यामागचे सारतत्त्वशोधाचे साधन म्हणून मान्य झाले. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील नवस्वतंत्र समाजांनी याविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. देशांच्या सीमारेषांसोबतच ज्ञानक्षेत्राचीही पुनर्माडणी करण्याची मागणी हळूहळू जोर धरू लागली. आधुनिक होण्याचा इतिहास म्हणजे इतिहास हे ज्ञानक्षेत्र, स्वायत्त राज्यसंस्था आणि सार्वभौम राष्ट्र-राज्य हे राज्यशास्त्राचे विषय, तर मानवी आर्थिक वर्तन हा अर्थशास्त्राचा आणि नागरी समाज हा समाजशास्त्राचा विषय ठरला. मानवशास्त्र हे आधुनिकतापूर्व, मागास, वासाहतिक समाजांच्या अध्ययनासाठी निर्मिले गेले. वॉलरस्टीन यांचा अहवाल या प्रकारच्या सत्याच्या शोधातील श्रमविभागणीच्या प्रस्तुततेविषयी तर प्रश्न विचारतोच; परंतु ती अधिकाधिक बळकट करण्यामागचे जागतिक अर्थराजकारण दाखवून देतो. त्याचबरोबर ज्ञानक्षेत्रातील पाश्चिमात्य प्रभुत्व कमी करून नवस्वतंत्र समाजांतील ज्ञानव्यवस्थांची स्वायत्तता जपण्यासाठीचे उपाय सुचवतो. यात एक धोकाही आहे. संपूर्ण मानवजातीला बोलता येईल अशी एक भाषा मात्र या पुनर्रचनेत गमावता कामा नये. वसाहतकाळापूर्वीच्या ज्ञानप्रकारांकडे चिकित्सा न करता वळल्यास पारंपरिक विषमतेत अडकण्याचा धोका आहे. जसे, ब्रिटिश वसाहतवादामार्फत राजा राममोहन रॉय यांनी, महात्मा फुलेंनी, महर्षी कर्वेनी स्त्रियांना दिलेला ज्ञानाचा अधिकारही अमान्य करायची वेळ यायची!

वॉलरस्टीन २१ व्या शतकात जगाच्या सर्वच भागांत सामाजिकशास्त्रांच्या ज्ञानव्यवस्थेची फेरमांडणी करण्याचा आराखडाच ठेवतात. आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र परिषदेमार्फत हीच फेररचना संस्थात्मक पातळीवर घडवून आणण्याचा प्रयत्न वॉलरस्टीन यांनी केला. संकल्पना, संज्ञा, परिप्रेक्ष्य, सिद्धान्त, पद्धतीशास्त्र यापासून ते ज्ञानव्यवहारामागची सत्ताशास्त्रीय प्रमेये आणि ज्ञानाचे अर्थकारण, राजकारण यांची उभी-आडवी चिकित्सा त्यांनी पाच दशके केली. अकादमिक क्षेत्रात अनेक सुप्रसिद्ध, सुप्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे असतात. त्यातील अनेकांना जगन्मान्यताही लाभते. काही सैद्धांतिक शिखरे असतात, तर काही शैक्षणिक विस्ताराची पठारे. वॉलरस्टीन यांनी या दोन्हींसोबत क्रियाशील राजकीय भूमिका आणि दैनंदिन व्यवहारातील विमर्शाधारित बदल हेही त्यांनी सक्रिय वैचारिक जीवनातून सिद्ध करून दाखवले. सामाजिक शास्त्रातील जगभरच्या तरुण, बुद्धिमान तळमळीच्या संशोधकांना त्यांनी पोषक खाद्य पुरवले आहे, हे नक्कीच. सामाजिक शास्त्रांच्या विस्तीर्ण पटावरचा ‘समाजशास्त्र म्हणजे समूह, कुटुंब, धर्म, शहरीकरण अशा ‘सामाजिक’ पैलूंचा तीन-चार दृष्टिकोनांतून अभ्यास करणारे दुय्यम अभ्यासक्षेत्र’ ही कोती व्याख्याच त्यांनी धुडकावून लावली. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेतील प्रगत भांडवलशाहीमुळे झालेल्या सामाजिक-सांस्कृतिक, नीतीशास्त्रीय अवमूल्यनाच्या समग्र अभ्यासाचा आग्रह धरला. १७ व्या शतकापासून भांडवलशाहीचा पट आर्थिक मक्तेदारीसाठी राष्ट्रांची प्यादी कसे वापरतो, हे दाखवले. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र यांच्या कप्पेबंद विभागणीचे राजकारण पुढे आणले आणि समाजशास्त्र म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय, याची नवी मांडणी केली.

लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समाजशास्त्राचे अध्यापन करतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 2:51 am

Web Title: bookmark author immanuel wallerstein book review zws 70
Next Stories
1 बुकबातमी : ‘राधेय’ आता इंग्रजीत!
2 अन्यायकारी विकृतीचा वृत्तान्त..
3 आयरिसची पत्रं..
Just Now!
X