अरुणा तेलुगु भाषा बोलते. आंध्र प्रदेशात राहाते. तिचे आईवडील दोघेही लांबच्या गावी आहेत कामानिमित्त. काम कसलं? इमारती बांधण्याचं. म्हणजे गवंडीकाम. मेहनत खूप. पैसे थोडे. राहायला नीट घर नाही मिळत आईवडिलांना. म्हणून अरुणा गावीच, आजीकडे राहाते. तिचे धाकटे काका आणि काकू आहेत, तेही प्रेमळ आहेत. आजीला अव्वा, काकांना चिन्नप्पा आणि काकूला पोन्नम्मा म्हणतात तेलुगुमध्ये, तसंच अरुणाही म्हणते.  शाळेला सुट्टी लागलीय. अरुणाला आता आईवडिलांची खूप आठवण येतेय. पण ते तर येऊ शकत नाहीत. मग अव्वाबरोबर ती जायचं ठरवते, ‘अम्मा-अप्पां’ना भेटायला शहरात. ती गाडीत बसण्यासाठी स्टेशनवर जातेसुद्धा. तिकीटही काढते. पण मग पुढे काय होतं?

ही गोष्ट पुढे इंग्रजीत, ‘नो टिकेट, विल ट्रॅव्हल’ या पुस्तकात वाचायला मिळते. सुबुही जीवानी यांनी ही गोष्ट लिहिली आहे. त्याहीपेक्षा, ही गोष्ट ‘पारी नेटवर्क’साठी त्यांनी लिहिली आहे. भारतीय शहरी- इंग्रजी वाचकांना ग्रामीण भारताच्या स्थितीची नेमकी जाणीव करून देणारे पत्रकार पी. साईनाथ (‘दुष्काळ आवडे सर्वाना’ हे मूळ पुस्तक त्यांचं आहे) यांच्या प्रेरणेतून ‘पारी नेटवर्क’ स्थापन झालं. मोठय़ा माणसांसाठी तर ‘पारी’ काम करतेच, पण शहरांतल्या लहान मुलांना ग्रामीण भारताचं भान यावं, यासाठी आतापर्यंत पाच पुस्तकं ‘पारी’ आणि ‘कराडी टेल्स’ यांनी प्रकाशित केली आहेत, त्यापैकी ‘नो टिकेट, विल ट्रॅव्हल’ हे सर्वात नवं. या सर्व पुस्तकांच्या किमती दोनदोनशे रुपये आहेत. घरी नसतील तर शाळांच्या लायब्ररीत मात्र असलीच पाहिजेत, अशी ही पुस्तकं आहेत!

विजयानंतरची पुस्तकचर्चा..

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ या नव्या पुस्तकाची घोषणा तेथील सार्वत्रिक निवडणुकीआधी झाली, आणि ते या आठवडय़ात, मंगळवारी प्रकाशित झाले. अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभव कथन करणारे हे डेमोक्रॅट ओबामा यांचे पुस्तक प्रसिद्धीपासून चर्चेत आहेच, पण यंदाच्या अमेरिकी निवडणुकीत डेमोक्रॅट्सचा विजय झाल्यानंतर जो बायडेन यांच्या सहकारी म्हणून उपराष्ट्राध्यक्ष पदी निवडल्या गेलेल्या कमला हॅरिस याही चर्चेत आहेत. त्या देशात या पदावर निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला, पहिल्या आशियाई-अमेरिकी, पहिल्या आफ्रिकी-अमेरिकी ठरल्या आहेत, ही त्या चर्चेतली काही कुतूहलकारणे. मात्र, सरत्या आठवडय़ापासून त्यात आणखी एका कारणाची भर पडली आहे. अर्थात त्यांच्या पुस्तकांची. कमला हॅरिस यांचे वरिष्ठ डेमोक्रॅट ओबामांप्रमाणे कमला यांचीही पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. त्यातल्या दोन पुस्तकांवर कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून केलेल्या कामाचा प्रभाव आहे. ‘स्मार्ट ऑन क्राइम’ हे त्यातले त्यांचे पहिले पुस्तक. ते काहीसे अकादमिक असले, तरी न्यायदान यंत्रणेतील सुधारणांचा आग्रह कमला यांनी त्यात धरला आहे. त्यांचे दुसरे पुस्तक गतवर्षी प्रसिद्ध झालेले ‘द ट्रथ्स वी होल्ड’ हे प्रारंभी त्यांच्या बालपणापासूनच्या आठवणी सांगणारे, पण पुढे स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यांची, तेव्हाच्या अनुभवांची मांडणी करणारे. या पुस्तकाची तुलना काहींनी ओबामांच्या ‘द ऑडॅसिटी ऑफ होप’ या पुस्तकाशी केली आहे. आता उपराष्ट्राध्यक्षपदी निवडल्या गेल्यानंतर कमला यांच्याविषयी असलेले सार्वत्रिक औत्सुक्य पाहता, ‘द ट्रथ्स वी होल्ड’ या पुस्तकाकडे वाचक वळले नसते तरच नवल. सरत्या आठवडय़ातील ‘बेस्ट सेलर’ पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाने पहिल्या दहांत स्थान पटकाविले आहे. या पुस्तकाबरोबरच गतवर्षी प्रसिद्ध झालेले कमला यांचे आणखी एक पुस्तक ‘बेस्ट सेलर’ यादीत आहे, आणि आबालवृद्धांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘सुपरहीरोज् आर एव्हरीव्हेअर’ हे ते पुस्तक. हे पुस्तक मात्र थेट लहानग्यांसाठी लिहिलेले. म्हणूनच बऱ्याच चित्रांनी व्यापलेले. नावातच स्वयंस्पष्ट असलेले हे पुस्तक लहानग्यांना रोजच्या आयुष्यातील नायकत्व शोधण्यास प्रेरणा देणारे आहे. आपल्या आयुष्यातील अनुभवांच्या आधारे गुंफलेल्या या पुस्तकात कमला यांनी बालवाचकांना ‘शूर बना, पण दयाभावही बाळगा’ असा संदेश दिला आहे.

ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’मध्ये त्यांनी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे माजी सहकारी जो बायडेन यांच्याविषयी- ‘ते प्रामाणिक आणि निष्ठावान’ असल्याचे म्हटले आहे. आता निवडणुकीतील विजयानंतर बायडेन यांच्याकडे तो तो देश आपापल्या दृष्टिकोनातून पाहील. पण बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांना बायडेन कसे दिसले, हे त्यांनी त्यांच्या ‘जोई : द स्टोरी ऑफ जो बायडेन’ या पुस्तकात मांडले आहे. यंदा जूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात जिल बायडेन यांनी जो बायडेन यांच्यातील अनेक गुणांचे वर्णन केले आहे. सहकाऱ्यांचा आदर राखणारे, शांततावादी माणूस बायडेन यांची घडण कशी झाली, हे या चित्रमय पुस्तकातून उलगडून सांगितले आहे. पुस्तक अर्थातच लहानग्यांसाठी लिहिलेले आहे. हेही पुस्तक ‘बेस्ट सेलर’ यादीत बऱ्याच वरच्या क्रमांकावर आले आहे.