अभिजीत ताम्हणे

जगभरातल्या पाच नेत्यांविषयीच्या पुस्तकांची नावं पाहूनच, हे पुस्तक कुठे नेणार एवढं लक्षात येतं..

राजकीय नेत्यांविषयीची अनेक पुस्तके २०१९ मध्ये आली.. तशी ती दरवर्षी येतातच, पण यंदा त्यांची संख्या लक्षणीय होती. इंग्रजी पुस्तकविक्रीच्या कोणत्याही दुकानात सरत्या वर्षभरात, दरमहा एकातरी राजकीय नेत्याचा चेहरा ‘न्यू अरायव्हल्स’पैकी एखाद्या तरी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसायचाच! हे झालं भारतातलं.. जगभरच्या पाच ‘प्रमुख’ नेत्यांचा पुस्तकानुनय सुरू आहे की कसं, याचा शोध पुस्तकविक्रीच्या संकेतस्थळांवर आणि ‘बुकमार्क’प्रमाणेच इंग्रजी वृत्तपत्रांतही पुस्तकांविषयीची पानं असतात त्यांवर घेतला असता राजकीय नेत्यांविषयीची पुस्तकं आणखीही कितीतरी आहेत, हे लक्षात आलं. ही सारी पुस्तकं विद्यमान राजकीय नेत्यांविषयी आहेत, पुस्तकाच्या नावात किंवा मुखपृष्ठावरल्या चित्रात संबंधित नेताच दिसतो आहे..

उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्प. ‘अ केस फॉर ट्रम्प’ हे विद्यमान अमेरिकी अध्यक्षांची बाजू मांडणारं पुस्तक मार्चमध्ये आलं. त्याचे लेखक व्हिक्टर डेव्हिस हेसन हे १९८३ पासून लिहिताहेत, लष्करी इतिहासकार म्हणून त्यांचं नाव झालेलं आहे, त्यांनी लिहिलेली किंवा सहलेखन केलेली पुस्तकं २० हून अधिकच असली तरी थेट राजकीय उच्चपदस्थाबद्दल असं त्यांचं हे पहिलंच पुस्तक आहे. अमेरिकी उजव्या राजकारणाचे सारे आग्रह हे पुस्तक मांडतं. ट्रम्पच कसे योग्य, हे दाखवू पाहातं. बॉब वुडवर्ड यांच्या ‘फिअर’ या २०१८ गाजवणाऱ्या आणि अर्थातच ट्रम्प यांच्या सोप्पेपणावादी राजकारणाला चारी मुंडय़ा चीत करू पाहणाऱ्या पुस्तकानंतर सहा महिन्यांत हेसन यांचं पुस्तक बाजारात आलं, हे विशेष. मात्र लगेच जूनमध्ये, ट्रम्प यांचे खंदे टीकाकार मायकल वूल्फ यांचं ‘सीज’ हे पुस्तक आलं. मग नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘अ वॉर्निग’ हे ट्रम्प यांच्या चुकीच्या राजकारणाची चार प्रकरणं सांगोपांग चव्हाटय़ावर मांडणारं पुस्तक आलं, त्याचे लेख अनामिक आहेत, पण ‘अ सीनिअर ट्रम्प अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिशियल’ नं हे पुस्तक लिहिल्याचा उल्लेख मुखपृष्ठावरच असल्यानं पुस्तकाबद्दलची उत्कंठा वाढली.. न्यू यॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नल यांच्या आठवडी ‘बेस्ट सेलर’ यादीत हे ‘वॉर्निग’ दिसू लागलं! ट्रम्प यांच्या निर्णयक्षमतेवरच या पुस्तकानं प्रश्नचिन्ह उमटवलं. आता जानेवारी २०२० मध्ये ‘अ व्हेरी स्टेबल जीनिअस : डोनाल्ड जे. ट्रम्प्स टेस्टिंग ऑफ अमेरिका’ या नावाचं, पत्रकारद्वयानं लिहिलेलं पुस्तक येणार आहे. लेखकांपैकी एक पुलित्झरविजेता आहे आणि पुस्तक ट्रम्प यांच्या कारभारातून अमेरिका कशी तरली, याबद्दल आहे! आणखीही बऱ्याच पुस्तकांवर ट्रम्प यांचा चेहरा दिसतोच, शिवाय त्यांचे चिरंजीव (ज्युनिअर) हेही २०१९ मध्ये ‘ट्रिगर्ड’ या प्रचारकी (‘डाव्यांना फक्त तिरस्कार करता येतो’ असा प्रचार!) पुस्तकाचे लेखक ठरले आहेत. हे पुस्तक खपतही असेल, पण ट्रम्पकन्या इव्हान्का आणि तिचे पती यांच्या ‘कुशनर प्रकरणा’चे वाभाडे काढणारं पुस्तकही यंदा आलं आहे.

थोडक्यात, अमेरिकी पुस्तकबाजारात (सखोल, अनुभवी) पत्रकारिता आणि ग्रंथलेखन यांची सीमारेषा किती धूसर असते हे यंदाही ट्रम्प-पुस्तकांमुळेच दिसून आलं.. ओबामाकाळात हा मान इराक वा अफगाणिस्तानविषयक पुस्तकांकडे होता. असो.

मोदी हे ट्रम्पनंतरचे एकमेव लोकप्रिय-  आणि पुस्तकप्रियही-  नेते असल्याचं मानावं, तर तुर्कस्तानचे एदरेगन आडवे येतात. नरेंद्र मोदींवर चार पुस्तकं यंदा निघाली हे खरं, त्यापैकी अगदी ताजं ‘मोदी ३०३’ – म्हणजे मोदी यांच्या तीनशेतीन वाक्यांचा संग्रह- असंही आहे. मोदी यांच्यामुळेच लोकसभेत ३०३ जागांवर भाजपचे सदस्य बसू शकले, म्हणून ३०३! या वाक्यांचं एकत्रीकरण करणाऱ्या रवी वल्लुरी यांचं नाव लेखक म्हणून पुस्तकावर आहे.  ‘मोदीवाक्यं प्रमाणम्’ हे सूत्र अन्य दोन पुस्तकांतूनही दिसतं, त्यापैकी भारत सरकारच्या प्रकाशन विभागानं ‘सबका साथ, सबका विकास’ हा पंतप्रधानांचा भाषणसंग्रह (पृष्ठसंख्या ९१२, किंमत सवलतीत ९०७ रुपये) निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच, अगदी वेळेत प्रकाशित केला, हे लक्षणीय. ‘सबका साथ’ प्रमाणेच ‘मन की बात’चंही जाडजूड पुस्तक झालं, तेही निवडणुकीपूर्वीच आलं.  २०१८ सालच्या नोव्हेंबरपासूनच मोदी यांच्या कारकीर्दीची गौरवगाथा सांगणारी चार पुस्तकं आली होती, शिवाय राजदीप सरदेसाई यांनी यंदाच्या निवडणुकीविषयी लिहिलेल्या पुस्तकाच्या नावात मोदी यांचा ठळक उल्लेख आहे. याखेरीज दिल्लीच्या प्रकाशकांनी, मोदी यांची चरित्रं प्रकाशित केलेली आहेत, त्यापैकी सरत्या वर्षांत प्रकाशित झालेल्या चरित्रांची संख्या तीन भरते. शशी थरूर यांचं ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर : नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया’ हे पुस्तक मे २०१९ नंतरही मागणीत असलं, तरी त्याचा प्रकाशनदिनांक ऑक्टोबर २०१८ असा आहे. आता कदाचित मोदी-पुस्तकांची संख्या थोडी कमी होईल आणि पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नवी पुस्तकं येतील, कदाचित.

रिसिप तयिप एदरेगन हे तुर्कस्तानचे शीर्षस्थ नेते. आपल्याकडल्या ‘न्यू इंडिया’ प्रमाणे एदरेगन यांनीही तिथे ‘न्यू टर्की’चा नारा दिलेला आहे. ‘रूटलेज’ या विद्यापीठीय, पण बलाढय़ प्रकाशनसंस्थेनं ‘एदरेगन्स न्यू टर्की’ हे पुस्तक ऑक्टोबर २०१९ अखेरीस प्रकाशित केलं असून त्याचा भर २०१६ चा विरोधी उठाव एदरेगन यांनी कसा चिरडला आणि तेव्हापासून हुकूमशाहीच कशी सुरू झाली, यावर आहे. त्याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये आलेलं – ‘एदरेगन रायझिंग : द बॅटल फॉर द सोल ऑफ टर्की’ हे पुस्तक तुलनेनं ‘सकारात्मक’ आहे, तर ‘एदरेगन्स एम्पायर : टर्की अँड द पॉलिटिक्स ऑफ द मिडल ईस्ट’  हे रशिया-तुर्कस्तान संबंध, सीरियावरील हल्ल्यांत एदरेगन सरकारचा हात, आदी आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांचा वेध घेणारं आहे.

चीनचे क्षी जिनपिंग यांच्यावर इंग्रजीत पुस्तकं कमी आहेत. ऑस्ट्रेलियातून पेन्ग्विन बुक्सनं प्रकाशित केलेलं ‘क्षी जिनपिंग : द बॅकलॅश’ ( जुलै २०१९) हे पुस्तक व्यूहात्मक राजनैतिक संबंधांचा अभ्यास करणाऱ्या प्रख्यात ‘लोवी इन्स्टिटय़ूट’च्या निरीक्षणांवर आधारित आहे. ‘द गव्हर्नन्स ऑफ चायना’ ही क्षी यांच्या चिनी भाषणांची इंग्रजी मालिका तिथला प्रकाशन विभाग २०१४ पासून काढत असतो, पण यंदा या भाषणसंग्रहाचा नवा (क्रमांक तीन, पण प्रत्यक्षात चौथा) खंड आलेला नाही. तो बहुधा २०२० मध्ये येईल.

पुतिन यांच्या राजवटीला २० यंदा वर्ष झाली. त्याच सुमारास, ‘वी नीड टु टॉक अबाउट पुतिन- हाउ द वेस्ट गेट्स हिम राँग’ असं मार्क गॅलिओटी यांचं पुस्तक प्रकाशित झालंय. त्याआधीच मे २०१९ मध्ये येल विद्यापीठ प्रकाशनगृहानं ‘पुतिन व्हर्सस द पीपल’ हे सॅम्युअल ग्रीन यांचं पुस्तक काढलं. त्याहीआधी फेब्रुवारीत अँजेला स्टेन्टलिखित, ‘पुतिन्स वर्ल्ड : रशिया अगेन्स्ट द वेस्ट, अँड द रेस्ट’ हे पुस्तक आलं.

जगभरातल्या या पाच नेत्यांच्या पुस्तकांची नावं पाहूनच काय ते लक्षात येतं. तरीही औपचारिक निष्कर्ष असा: ‘क्षी जिनपिंग यांच्याविषयी माहितीच मिळत नाही आणि पुतिन यांची दहशत कायम आहे, मोदींपेक्षा एदरेगन यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातलं स्थान अभ्यासकांना महत्त्वाचे वाटते आहे, अमेरिका ट्रम्पमाणच झालेली आहे, या निष्कर्षांकडे २०१९ मधले हे एकेक पुस्तक आपल्याला नेते आहे’.