इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग १९६७ साली ताब्यात घेऊन या संपूर्ण शहरावर आपला हक्क सांगितला. पण बहुतांश देशांना इस्रााएलचा हा दावा मान्य नाही. पॅलेस्टिनी जनता स्वतंत्र देशाची आशा करत असून पूर्व जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी व्हावी, असे त्यांना वाटते. ही इस्रााएल-पॅलेस्टाइन वादाची पार्श्वभूमी. त्यावरून गेल्या काही दशकांपासूनचा इस्राायल-पॅलेस्टाइन संघर्ष हा जगाकडे कान व डोळे लावून असणाऱ्या कोणासही ठाऊक असेलच. पण हा वाद आणि त्यावरून होणारा संघर्ष यास अनेक कंगोरे आहेत. त्यात इस्राायलची एक बाजू आहे, पॅलेस्टाइनची दुसरी, तर या दोघांव्यतिरिक्त जगभरातील अनेक कारक घटकांची तिसरी बाजू. या तीनपैकी एकच बाजू पाहणारे लोक बरेच असले, तरी केवळ अभ्यास आणि संशोधन यांतून या वादाला एक चौथी मिती देणारी पुस्तकेही आहेत. ‘द हिडन हिस्टरी ऑफ बेलफोर डिक्लरेशन’ (लेखक : सहार हुनैदी), किंवा ‘मोमेंट ऑफ ट्रुथ : टॅकलिंग इस्रायल-पॅलेस्टाइनस् टफेस्ट क्वेश्चन्स’ (संपादक : जॅमी स्टर्न- वायनर) ही पुस्तके भूतकाळ आणि वर्तमान नव्याने समजून घेणारी, तर लेखक नॉर्मन फिन्केल्स्टाइन यांची ‘धिस टाइम वुइ वेन्ट टू फार’, ‘मेथड अ‍ॅण्ड मॅडनेस’, ‘आय अ‍ॅक्यूज’, ‘नोइंग टू मच’ आदी  पुस्तके इस्राायलच्या प्रचारकी रूदनावर प्रचंड माहितीच्या आधारे घणाघात करणारी आहेत. अरि शावित यांचे ‘माय प्रॉमिस्ड लॅण्ड’ हे पुस्तक  इस्रायली नागरिकांची नैतिक दुविधा दाखवून देणारे, तर प्रख्यात विचारवंत नोम चॉम्की यांचे ‘फेटफुल ट्रँगल’ हे पुस्तक इस्राायल-पॅलेस्टाइन वादात अमेरिकेची लुडबूड उघड करणारे आहे.