हारुकी मुराकामी यांनी मुळात जपानी भाषेत लिहिलेली दीड डझन पुस्तके आज देशोदेशींच्या बाजारात आहेत; कारण जगातल्या ५० भाषांत या लेखकाच्या एका तरी पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. वाचन, संगीत ऐकणं, या साऱ्यांतून जे जागतिक संस्कार आपल्यावर होतच राहिले, त्यांना मुराकामी नाकारत नाहीत. पहिल्या दोन कादंबऱ्यांत कॉलेजकाळातल्या गोष्टी लिहितानाही या लेखकानं वापरलेलं कथनतंत्र असं आहे की, पुढल्या काळातल्या मुराकामींच्या महत्तेची बीजं तिथं सापडतात. या दोन कादंबऱ्यांच्या जोड-पुस्तकाची ओळख करून देतानाच, ‘जपानीतच लिहिणारे’ मुराकामी देशीवादी कधीच कसे नव्हते (आणि मराठीत त्यांच्यासारखा कोणीच का नाही), याचाही हा मागोवा..
आपल्याकडे ‘देशीवाद’ संकल्पनेचे स्तोम माजण्यासाठी १९६० ते १९९० चा सामाजिक आणि साहित्यकाळ उत्तम होता; पण परमपूज्य देशीवादकारांच्या अंधानुयायांनी जागतिकरणानंतरही या संकल्पनेला ताणून रेटण्याचा अट्टहास करीत मराठी साहित्याला चार पावले मागे नेले. देशातल्याच चार-दोन भाषांत अनुवाद, फार फार तर राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी कलाकृतींनी स्वत:चा प्रदेश मर्यादित करून घेतला. म्हणजे गेल्या २५ वर्षांत मराठीत निपजलेल्या एकाही कलाकृतीने वैश्विक पातळीवर जाण्याइतपत वकूब निर्माण केला नाही असे नक्कीच नव्हे; पण येथील यंत्रणांनी तेवढी ताकद असलेल्या कलाकृतींना तशा प्रकारे जगभरात पोहोचविण्यासाठी कोणते प्रयत्नच केले नाहीत. साहित्याच्या बाबतीत आपले आधीचे ‘डबके’ आज थोडे विस्तारून सॅन होजेला वगैरे गेले, म्हणून आपण सध्या समाधानी आहोत.
याच्या उलटा प्रवास आपण केला असता तर आपण जगभर गेलो असतो का, याचे ‘हो’ असे उत्तर आहे आणि त्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे हारुकी मुराकामी! भारताप्रमाणेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळणीतून तयार झालेल्या ‘अँग्री यंग’ मानसिकतेत अपघाताने लेखक बनलेल्या हारुकी मुराकामी यांनी तेथे फोफावलेल्या ‘देशीवादा’च्या विचारांना खुंटीवर टांगत मुक्तहस्ते ‘विदेशीवादा’चा पुरस्कार केला. आज दीड डझनांहून अधिक कथात्म आणि अकथनात्मक पुस्तके लिहिणारे मुराकामी जगभरातील पन्नासहून अधिक भाषांतील अनुवादांद्वारे विश्वसंचार करीत आहेत. जपानी भाषेतच लिहिल्या गेलेल्या त्यांच्या कादंबऱ्या, कथा, लेखांना असलेली मागणी, दरवर्षी नोबेल पुरस्काराआधी त्यांच्या नावावर लागणारा सट्टा आणि सर्वदूर देशांत वाढत जाणारा त्यांचा चाहतावर्ग थांबायची सुतराम शक्यता नाही. जगातील अनेकानेक साहित्य प्रकारांची, साहित्य संदर्भाची आणि अभिजात संगीताची केवळ तोंडदेखली यादी न करता या साऱ्याचा अस्तित्वगंध लाभलेले त्यांचे साहित्य कुठल्याही एका प्रदेशात बांधता येत नाही. मानवी नातेसंबंधांच्या ‘कोठेही- कधीही’ सापडणाऱ्या बृहद् पातळीवरल्या शक्यता आणि अशक्यतांचाही शोध मुराकामी घेतात आणि त्यांच्या साहित्याच्या नादाला लागणाऱ्यांना ‘वाचनआनंद सोहळ्या’चे भागीदार करतात. स्वत:चा ठसा असलेल्या त्यांच्या अत्याकर्षक कथनशैलीमुळे जगभरात त्यांनी घडविलेल्या कलाकृतींचे समपातळीवरील चाहते आहेत. त्यांच्या पहिल्या दोन कादंबऱ्यांचे इंग्रजीत पुनर्भाषांतर करून नुकतेच बाजारात दाखल झालेले ‘विंड-पिनबॉल’ हे मलपृष्ठविरहित पुस्तक या लेखकाने नादावलेल्यांसाठी तसेच त्यांच्या वाटेला अद्याप न गेलेल्या वाचकांसाठी ‘मौलिक’ आहेच. पण त्याहीपुढे, त्यांनी जपानी भाषेतच लिहूनही स्वीकारलेल्या ‘संपूर्ण विदेशीवादा’ची पाळेमुळे दाखवून देणारे आहे.
एका छोटय़ा रेस्तराँचा मालक अशी ओळख शाबूत असताना ‘बेसबॉल’च्या सामन्यातील एका निर्णायक क्षणी कादंबरी लेखनाचा किडा डोक्यात घेऊन घरी कागद-पेनासह परतलेल्या मुराकामी यांनी आपल्या किचन टेबलवर मिळेल तितक्या फावल्या वेळात कादंबरीचा स्वत:चा खास घाट तयार केला. आपल्या डोक्यात असलेल्या साहित्य-संगीतातील अमेरिकी-रशियन प्रभावांना कायम ठेवत ‘हिअर द विंड सिंग’ या छोटुकल्या कादंबरीची एकुलती एक हस्तलिखिताची प्रत १९७९ मध्ये एका स्पर्धेसाठी पाठवून दिली. तेथे पहिले पारितोषिक मिळाल्यानंतर कादंबरीचा पुढचा भाग ‘पिनबॉल-१९७३’ पुन्हा आपल्या त्याच किचन टेबलवर खरडला. मात्र १९८७ मधल्या ‘नॉर्वेजियन वूड’च्या प्रकाशनानंतर जपानमध्ये लाभलेल्या सेलिब्रेटीपदाच्या चक्रव्यूहापासून दूर राहण्यासाठी जपान सोडावे लागण्याइतपत या लेखकाला प्रसिद्धी लाभली आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक कादंबरीसोबत ती विस्तारतच गेली.
‘विंड/पिनबॉल’ या दोन आणि त्यालगोलग दाखल झालेली ‘ए वाइल्ड शीप चेस’ ही ‘रॅट’ नावाच्या कादंबरीतील पात्रामुळे ‘रॅट कादंबरी त्रयी’ म्हणूनही ओळखली जाते. मात्र ‘ए वाइल्ड शीप चेस’ या नव्या एकत्रीकरणात घेतली नाही, कारण रीतसर आपले रेस्टॉरंट विकून कादंबरी लिहिण्याचे ‘करिअर’ त्यांनी या कादंबरीपासून निवडले होते. म्हणजे या पुस्तकातल्या दोन्ही कादंबऱ्या, ‘पूर्णवेळ लेखका’च्या नाहीत.
मुराकामींच्या १९८७ नंतर लोकप्रिय झालेल्या सर्व कादंबऱ्यांमधील मूलभूत संदर्भ ‘विंड-पिनबॉल’मध्ये पक्के होताना दिसतात. पाश्चिमात्य अभिजात आणि पॉप-जॅझ युगातील कलाकारांच्या नामावलीसह संगीत वैशिष्टय़े व हेमिंग्वे-फित्झगेराल्ड यांच्या समांतर काळात (जणू) असलेल्या डेरेक हार्टफिल्ड नावाच्या काल्पनिक लेखकाचा प्रभाव त्यांनी पहिल्या ‘हिअर द विंड सिंग’ या कादंबरीत घेतला आहे. या कथानकशून्य कादंबरीमध्ये निनावी निवेदक आहे. जे नावाच्या चिनी स्थलांतरिताचा बीअर बार आहे आणि निवेदकाचा मित्र रॅट आहे. बाकी सगळा ऑगस्ट १९७० मधील जेमतेम १८ दिवसांचा काळ आहे. निवेदक प्राणिशास्त्राचा अभ्यासक असून सुटीमध्ये आपल्या मूळ शहरगावात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने भारावून गेलेल्या आणि प्रस्थापितविरोधी मानसिकतेचा अंमल असलेल्या या काळातील निवेदक व त्याचा मित्र रॅट श्रीमंतीच्या सर्व सुखांनी परिपूर्ण आहेत; परंतु श्रीमंतीतून निर्माण झालेल्या जगण्याच्या पोकळीतून बारमध्ये एकत्र आली आहेत. सतत बीअरवर बीअर रिचवून आणि जॅझ संगीताच्या रेकॉर्डवर रेकॉर्ड ऐकत भवतालामध्ये पसरलेल्या विलक्षण कंटाळ्याला संपवून टाकण्याचा चंग बांधत आहेत. बारमध्येच निवेदकाला हाताची ९ बोटे असलेली तरुणी अचानक भेटते. नंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या तीन प्रेमिकांची तसेच बीच बॉय बॅण्डच्या ‘कॅलिफोर्निया गर्ल्स’ची एलपी रेकॉर्ड उसनी देणाऱ्या- कॉलेजमधील खिजगणतीतही नसलेल्या- एका मुलीची आठवण त्याला होते. कॉलेजमधील राजकारणाच्या त्रोटक संदर्भापासून पॉप/जॅझ संगीतामधील पाश्चात्त्य दैवतांवर असलेल्या प्रेमाचे दाखले मुराकामीच्या ‘चित्रकथी’ शैलीमध्ये येथे सादर होताना दिसतात.
‘पिनबॉल-१९७३’मध्ये पुन्हा निवेदक आहे, रॅट नावाच्या मित्राची स्पष्टपणे अस्पष्ट प्रेमकहाणी आहे, त्यांचा लोकप्रिय बार आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे बारमध्ये आलेल्या पिनबॉल मशीनवरील गेम खेळण्यात नायकाने मिळविलेली अचाट सिद्धी आहे. नायकासोबत त्याच्या घरात नातेविरहित संबंधांनी राहत असलेल्या जुळ्या बहिणी, त्याने भागीदारीत उभारलेला भाषांतराचा व्यवसाय आणि कॉलेजमधील असंख्य आठवणींच्या तुकडय़ांतून तयार होणारी पारंपरिक कथाविरहित कथास्थिती आहे. पिनबॉल मशीनचा इतिहास, त्याच्या निर्मात्याची कहाणी अशा ज्ञानरंजक अवांतरापासून सुरू झालेली ही कादंबरी निवेदक व रॅटच्या आयुष्यातील क्षणांचे सुरस तुकडे मांडत जाते. पिनबॉल मशीनशी ताटातूट झाल्यानंतर महत्प्रयासाने या यंत्रापर्यंत पुन्हा पोहोचल्यावर, या यंत्राशी मानवी पातळीवर येथे संवाद साधण्यात आला आहे. तशा अनेक तऱ्हेवाईक अनुभवांची येथे घटनावळ आहे; पण पाहायला गेले तर दोन्ही कादंबऱ्यांमध्ये त्यामुळेच समानता आहे. एकटेपणावर मात करण्याची धडपड, परदेशी संगीत, चित्रपट आणि साहित्य यांचे अनंत दाखले, मांजरींचे अस्तित्व, प्रेम आणि नातेसंबंधांतील जटिलतेचा स्पर्श कादंबऱ्यांना लाभलेला आहे. पहिल्या ‘हिअर द विंड सिंग’ कादंबरीच्या अस्ताला नायकाचे शहरातून स्थलांतर आहे, तर पिनबॉलमध्ये रॅटचे. दोन्ही भावुकतेच्या पलीकडली अवस्था निर्माण करणारे. या दोन्ही कादंबऱ्यांच्या पुनर्भाषांतरामध्ये वाक्या-वाक्यांना आकर्षक करण्यासाठी नवे भाषांतरकार टेड गुसन यांनी मेहनत घेतली आहे. आधीच्या कादंबऱ्या वाचलेल्यांना ते स्पष्टपणे जाणवू शकेल.
नव्या भाषांतरासोबत ‘द बर्थ ऑफ माय किचन-टेबल फिक्शन’ हा निबंध वाचकांना व मुराकामीच्या अभ्यासकांना त्यांच्या सुरुवातीच्या लिखाणाविषयी आतापर्यंत अज्ञात असलेली बरीच माहिती देऊन जाईल. ‘बेसबॉल मॅच’मधील निर्णायक क्षणातून कादंबरी लिहिण्याची स्फूर्ती मिळालेल्या मुराकामींच्या सुरुवातीच्या लेखन प्रक्रियेवर त्यांनी आधी बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवले होते. मात्र त्यात नमूद न झालेल्या अनेक नव्या गोष्टींची येथे नोंद सापडू शकेल.
अमेरिकी संस्कृती, साहित्य, संगीत, सिनेमा यांच्या अमलाखाली १९६०-७० काळातील जपानमध्ये जडणघडण झालेली मुराकामींची लेखणी भौगोलिक स्थानांव्यतिरिक्त कुठेही स्थानिक संगीत वा साहित्याचा संदर्भ आणत नाही अन् वाचताना आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. ‘जे जे लोकल, ते ते ग्लोबल म्हणजेच ग्लोकल’ असल्याचा मध्यंतरीच्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला सिद्धांत मुराकामी वाचताना थिटा किंवा खोटा ठरतो.
कथनाच्या पद्धतीत नवनवे प्रयोग रचणारी मुराकामी यांची शैली वाचकांवर आरूढ होणारी आहे. या कादंबऱ्यांतील वैश्विकतेची रूपे त्यांच्या आस्वादानंतरच ठळकपणे जाणवू शकेल. ही कादंबरी जपानीतून अनुवादित झालेली नसून मूळ इंग्रजीच असल्याचे त्यातील संदर्भाच्या खाणींवरून जाणवते. मुराकामी-वाचनाची सुरुवात करण्यासाठी आधार ठराव्यात इतपत आकर्षक नवे इंग्रजी भाषांतर झाले आहे.
जागतिकीकरणाच्या चरकातून जाऊनही ‘देशीवादी’चा अट्टहास धरत कालबाहय़ ठरणाऱ्या १९४० ते १९६० च्या दशकातल्या कलाकृतींचा दुरभिमान बाळगणाऱ्या आपल्याकडल्या ‘जनसामान्य’ मानसिकतेच्या मंडळींनी आज आवर्जून मुराकामींच्या वाटेला जाण्याची गरज आहे, कारण जागतिकीकरणानंतर आपण पुरेसे ‘सामान्य’ राहिलेलो नाही. मुराकामींचा विदेशीवाद त्या ‘आजही सामान्यां’ना जागतिक जमिनीवर आणण्यास मदत वगैरे करू शकेल. शिवाय मुराकामीच्या साहित्यातील थोरपणाचा साक्षात्कार, ही जमेची बाजू असेल.

विंड/पिनबॉल – टू नॉव्हेल्स : हारुकी मुराकामी,
इंग्रजी अनुवाद : टेड गुसन
प्रकाशक : हार्विल सेकर, (पेंग्विन रॅण्डम हाऊस, यूके)
पृष्ठे : १५२ अधिक १६२, किंमत : ६९९

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब