News Flash

.. आणि पुस्तके युद्धावर गेली!

जर्मन संस्कृतीला हानी पोहोचवणारी २५ हजार पुस्तके या कार्यक्रमात जाळण्यात आली.

रवींद्र कुलकर्णी kravindrar@gmail.com

१९३३ च्या जानेवारीत अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मनीत सत्तेवर आला आणि पुस्तके जाळण्याचा पहिला कार्यक्रम सहा महिन्यांतच बर्लिनच्या बॅबेलप्लाझ या मध्यवर्ती चौकात पार पडला. वाद्यांचा घोष करत, गाणी गात आणि अग्नीच्या साक्षीने शपथा घेत सुमारे २५ हजार पुस्तके या कार्यक्रमात जाळण्यात आली. ग्रंथदहनाचे असे कार्यक्रम जर्मनीत नंतरही अनेक ठिकाणी झाले;

पण म्हणून माणसांनी पुस्तकांची आणि पुस्तकांनी माणसांची सोबत सोडली का?

पुस्तके जाळण्याचे प्रकार लोकशाहीतही घडतात. ते लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असतात. पुस्तकातले विचार मान्य नाहीत, हे सार्वजनिकरीत्या सर्वाना सहज समजेल अशा रीतीने दाखवण्याचा तो मार्ग असतो. पुस्तके जाळण्याला लोकचळवळीचे स्वरूप येते तेव्हा तो चिंतेचा विषय असतो व त्याला उत्तर लोकांच्या चळवळीनेच द्यावे लागते. ‘व्हेन बुक्स वेन्ट टू वॉर’ (प्रकाशक : हॉवटन मिफिन हारकोर्ट पब्लिशिंग कं., पृष्ठे- २६७, किंमत- सुमारे ८०० रुपये) या लेखिका मॉली गप्टील मॅनिंग यांच्या पुस्तकात हिटलरशाहीत सुरू झालेल्या पुस्तके जाळण्याच्या चळवळीला अमेरिकी जनतेने, सरकारने, विविध वाचनालये व व्यावसायिक प्रकाशन संस्थांनी कसे उत्तर दिले आणि त्या प्रक्रियेत पुस्तकांचे स्वरूप कसे बदलत गेले, याची कहाणी सांगितली आहे. ती रंजक झाली आहे.

१९३३ च्या जानेवारीत हिटलर सत्तेवर आला आणि पुस्तके जाळण्याचा पहिला कार्यक्रम सहा महिन्यांतच बर्लिनच्या बॅबेलप्लाझ या मध्यवर्ती चौकात पार पडला. हा कार्यक्रम सरकारी नव्हता. नाझी पक्षाच्या बजरंगी तरुणांनी तो योजला होता व शिस्तीत पार पाडला. खुद्द सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोबेल्स महाशय कार्यक्रमाला जातीने हजर होते. जर्मन संस्कृतीला हानी पोहोचवणारी २५ हजार पुस्तके या कार्यक्रमात जाळण्यात आली. ही तथाकथित ‘अ-जर्मन’ पुस्तके जळत असताना वाद्यांचा घोष, गाणी व अग्नीच्या साक्षीने शपथा घेणे असे प्रकार चालू होते. प्रसंगी जमलेल्या ४० हजार लोकांसमोर बोलताना मंत्री म्हणाले, ‘फीनिक्स पक्ष्याप्रमाणे या राखेतून जर्मन राष्ट्राचा नवा आत्मा जन्म घेईल!’ अशा वृत्तीतून जन्मलेल्या नवीन जर्मन राष्ट्राने फारसे बाळसे धरले नाही हे आपण जाणतोच. पण पुस्तकांच्या पॉकेटसाइज व पेपरबॅक या आवृत्त्यांचा जन्म झाला व हे बाळ पुढे चांगलेच नावारूपाला आले. त्याबरोबरच काही पुस्तके व लेखक- जे विस्मरणात गेले होते- त्यांना नवसंजीवनी मिळाली.

जर्मनीत ग्रंथदहनाचे कार्यक्रम नंतरही अनेक ठिकाणी झाले. ज्यू लेखकांच्या साहित्यकृतींवर तर बंदी आलीच; पण १९४० पर्यंत ज्या १४८ लेखकांच्या साहित्यकृतींवर बंदी आली, ती यादी या पुस्तकात शेवटी दिली आहे. त्यात हेलन केलर, एच. जी. वेल्स यांसारखे लेखकही आहेत. या वृत्तीला उत्तर देणे जरुरीचे होते. लेखकांनी आपापल्या परीने ते काम चोख केले. हेलन केलर म्हणाली, ‘पुस्तके जाळल्यावर त्यातले विचार जास्त वेगाने पसरतील.’ एच. जी. वेल्सने तर जर्मनीत बंदी घातलेल्या पुस्तकांचे वाचनालय पॅरिसमध्ये सुरू केले. हे प्रयत्न प्रामाणिक असले, तरी तुटपुंजे होते. मात्र, अमेरिका युद्धात आली तसे हे चित्र बदलू लागले.

अमेरिकेत सैन्यभरती सुरू झाली तसे अनेक तरुण मोठय़ा संख्येने सैन्यात भरती झाले. प्रशिक्षण कालावधीत बराच वेळ सैनिकांना मोकळा असे. नंतरदेखील युद्धभूमीवर दाखल होईपर्यंत वा युद्धनौकेवर, कधी प्रत्यक्ष युद्धभूमीवरही सैनिकांना खूप वेळ मोकळा असे. अशा वेळी त्यांचा कंटाळा घालवणे व त्यांचे नीतिधैर्य टिकवून ठेवणे या आवश्यक गोष्टी होत्या. यासाठी सहज, कमी वेळात, स्वस्तात व वाहतुकीला सोयीस्कर अशा साधनांचा विचार सैन्याने सुरू केला, तसे त्यांना वाचनाचे व पुस्तकांचे महत्त्व लक्षात आले. पुस्तके फारच तुटपुंज्या संख्येत सैन्याकडे उपलब्ध होती. मग ‘अमेरिकन लायब्ररी असोसिएशन’ने हे काम अंगावर घेतले आणि देशभरात सैनिकांसाठी पुस्तके गोळा करण्याची मोहीम आखण्यात आली. ‘व्हिक्टरी बुक कॅम्पेन’ असे तिचे नाव ठेवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या पत्नीने- एलेनॉर यांनी जातीने यात लक्ष घातले. नंतरचे सारे काम अमेरिकी पद्धतीने पार पाडले गेले. कॅथरिन हेपबर्न हिच्यासारखे चित्रपट कलाकार, गायक, रेडिओ स्टार्स यांना या मोहिमेत सामील करून घेण्यात आले. अमेरिकी जनतेला जर्मनव्याप्त युरोपमधल्या ग्रंथहोळ्यांची आठवण करून देण्यात आली. या प्रसंगी न्यू यॉर्क पब्लिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर झालेला सोहळा सर्वात मोठा होता. पहिल्या पंधरा दिवसांतच चार लाख २३ हजार पुस्तके गोळा झाली. काही महिन्यांतच ही संख्या ९० लाखांपर्यंत पोहोचली. यातली अनेक पुस्तके दूधवाले, स्काऊटमधली मुले व वर्तमानपत्रे टाकणारे यांनी गोळा केली होती. सैनिकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. सरकारी वाचनालयांनी सैनिकांकडून मिळणारा पत्ररूपी प्रतिसाद फलकावर लावला. त्यांची पत्रे आफ्रिका वा युरोपमधल्या तसेच अमेरिकेतल्या विविध प्रशिक्षण केंद्रांवरून आलेली असत.

पण या मोहिमेला मर्यादा होत्या. वर्षांच्या अंताला पुस्तकांचे स्रोत आटत चालले. शिवाय दर्जाचा प्रश्नही निर्माण झाला. कोणी घरची रद्दीही दान केली होती. विणकाम, स्वयंपाक वा घर सजावट अशा विषयांवरची पुस्तकेही त्यात होती. सारी पुस्तके पुठ्ठा बांधणीची होती. शिवाय त्यांचे वजन व आकार या दोन्ही गोष्टी सैनिकांसाठी सोयीस्कर नव्हत्या. इसाबेल डय़ुबोइस या नौदलाच्या ग्रंथपालाने या ‘व्हिक्टरी बुक कॅम्पेन’वर सडकून टीका केली. तिच्या मते, या भेट मिळालेल्या पुस्तकांची हाताळणी व वाहतुकीवरील खर्च हा मनस्ताप देणारा होता.

एक वर्षांने या मोहिमेची मृत्युघंटा वाजू लागली. पण सैनिकांना वाचनासाठी काही लागते. त्याचा उपयोग असतो हे अधिकाऱ्यांच्या ध्यानात आले. मग मासिकांचा विचार केला गेला. ‘रीडर्स डायजेस्ट’, ‘पाप्युलर फोटोग्राफी’ अशा प्रकारच्या मासिकांचा प्रयोग यशस्वी झाला. मुद्दाम ती आकाराने छोटी व वजनाला आणखी हलकी करण्यात आली. सैन्यासाठी म्हणून काढलेली ‘सॅटरडे इव्हनिंग पोस्ट’ची आवृत्ती केवळ तीन इंच रुंद व साडेचार इंच लांब होती. मग पुढचे पाऊल पुस्तकांसाठी टाकण्यात आले. ही पुस्तके सैनिकांच्या गणवेशाच्या खिशात सहज मावत व वजनाला हलकी असत.

सैन्यासाठी म्हणून काढलेल्या पॉकेट बुक्सनी अमेरिकी ग्रंथ व्यवसायात क्रांती केली. आर्मी सव्‍‌र्हिस एडिशनची पुस्तके पातळ कागदावर आडवी छापलेली असत आणि त्यावर मुळातल्या हार्ड कव्हर आवृत्तीचे चित्र असे. नेहमीच्या प्रकाशकांनी ही पुस्तके प्रकाशित केली नाहीत. फक्त एक टक्का रॉयल्टी लावून ती ‘नॉर्टन पब्लिशिंग’ व इतर कंपन्यांनी छापून सैन्याला विकली. हा एक टक्काही लेखक व मूळ प्रकाशकात विभागला जाई. आर्मी सव्‍‌र्हिस एडिशनमध्ये आपले पुस्तक आले, की लेखकालाही अभिमान वाटे.

‘द एज्युकेशन ऑफ हायमन कॅप्लन’ (लेखक- लिओनार्ड रॉस) हे विनोदी पुस्तक वा कौटुंबिक वातावरणाचे चित्रण असलेले ‘ए ट्री ग्रोज् इन ब्रुकलीन’ (लेखिका- बेट्टी स्मिथ) अशा प्रकारची पुस्तके सैन्यात लोकप्रिय होती. अनेक ठिकाणी ‘द एज्युकेशन ऑफ हायमन कॅप्लन’मधल्या प्रकरणांचे रोज एक याप्रमाणे शेकोटीभोवती वाचन जाहीररीत्या चाले. जखमी सैनिकांसाठी इस्पितळात वाचन हा मोठा विरंगुळा होता. हॉलंडमध्ये नियुक्त असलेला एक अधिकारी आर्मी सव्‍‌र्हिस एडिशनची बरीच पुस्तके पाठीवर घेऊन फिरत असे. पण त्याचे आवडते ‘टारझन : द एप मॅन’ हे त्याला मिळत नव्हते. ते त्याला अमेरिकेतून पाठवण्यात आले. धकाधकीच्या व अनिश्चिततेच्या वातावरणापासून सैनिकांना अशी पुस्तके दूर नेत. जीवनाविषयी आशा निर्माण करत. एखादे ठरावीक पुस्तक हाताशी असेल तर आपल्याला मृत्यू येणार नाही, अशीही काही सैनिकांची श्रद्धा असे. नर्ॉमडीच्या आक्रमणासाठी दोस्तांचे मोठे सैन्य ब्रिटिश किनाऱ्यावर गोळा झाले होते. विशेषत: यातल्या पहिल्या फळीच्या तुकडय़ांची हानी खूप होणार होती. या साऱ्याचा विचार करून जवळपास या वेळी दहा लाख पुस्तके सैनिकांसाठी आणण्यात आली.

सैनिकांचे काम सारखे असले तरी वाचनात विविधता होती. एखादा सैनिक शेक्सपीअर वाचत असेल, तर त्याचा सहकारी कॉमिक्समध्ये दंग असे. लैंगिक वर्णने असलेल्या पुस्तकांना अर्थातच मागणी असे. काहींवर अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये बंदी होती. पण ती सैनिकांना पुरवण्यात आल्याचे लेखिकेने लिहिले आहे. काही वाचकसैनिक आपल्या आवडत्या लेखकांना पत्रे लिहीत. त्याला लेखकाचे उत्तर आले तर ती सैनिकांसाठी आनंदाची पर्वणी असे. बेट्टी स्मिथला रोज सरासरी चार पत्रे येत. त्या सर्वाना ती उत्तरे लिही. युद्धकाळात सैनिकांना वाचनाची आवड लागली. युद्ध संपल्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणात त्याचा उपयोग झाला. टाइम मासिकाने लिहिले : ‘युद्धापूर्वी वाचन हे विशिष्ट वर्गाचे होते तसे नंतर ते राहिले नाही. सर्वसामान्य जनता मोठय़ा संख्येने वाचू लागली आहे.’ युद्ध संपेपर्यंत सुमारे १४०० पुस्तकांच्या लाखो आवृत्त्या युरोपात होत्या. हिटलरने जाळलेल्या पुस्तकांपेक्षा ही संख्या किती तरी अधिक होती.

या पुस्तकातली चित्रे मोहवणारी आहेत. मृत्यूच्या छायेत, मशीनगन चालवताना वाचणारे सैनिक यात भेटतात. युद्धात नवीन गोष्टींच्या संशोधनाला, वापराला गती येते हे पुस्तकांच्या रूपांतराचा जो आलेख लेखिकेने मांडला आहे त्यातून ध्यानात येते. मॉली मॅनिंग यांचे हे पुस्तक इतिहास तसेच पुस्तकांविषयीची पुस्तके या दोन्ही प्रकारात मोडते. दोन्ही प्रकारच्या वाचकांना ते आवडावे!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 3:59 am

Web Title: books wanted for our men in camp and over there when books went to war
Next Stories
1 बुकबातमी : फ्रान्स आणि भारताचं (असंही) साटंलोटं!
2 काही उत्तरे, नवे प्रश्न..
3 ग्रंथमानव : इतिहासलेखनाच्या अनवट वाटेवर..
Just Now!
X