लेखक म्हणून यशस्वी होण्यापूर्वी जॉर्ज ऑर्वेलने १९३४-३५ या काळात लंडनच्या हँपस्टेड भागातील ‘बुकलव्हर्स कॉर्नर’ या जुन्या पुस्तकांच्या दुकानात अर्धवेळ विक्रेता म्हणून काम केले. या दुकानातील अनुभव त्याने १९३६ साली लिहिलेल्या Bookshop Memories या लेखात मांडलेले आहेत. जागतिक ग्रंथ दिनाचा आठवडा सरताना ऑर्वेलच्या या ‘पुस्तकालयातील आठवणी’- अर्थात, स्वैर अनुवादरूपात..

जुन्या पुस्तकांच्या दुकानात काही काळ काम केल्यावर मला जाणवले की, खऱ्याखुऱ्या ‘पुस्तकी’ माणसांची या जगात वानवाच आहे. अशा ठिकाणी प्रत्यक्ष काम न केलेल्यांची त्याबद्दलची कल्पना काहीशी अद्भुतरम्य असते. पुस्तकांचे दुकान म्हणजे लोभस वृद्धांनी आकर्षक बांधणीच्या ग्रंथांवरून अनंतकाळ प्रेमाने हात फिरवीत राहावे यासाठी अस्तित्वात आलेला स्वर्गच! आमच्या दुकानात लक्षवेधी पुस्तकांचा बऱ्यापैकी साठा होता. मात्र आमच्या ग्राहकांपैकी दहा टक्के लोकांना तरी चांगले पुस्तक आणि वाईट पुस्तक यांच्यातील फरक कळत होता का, अशी मला शंका वाटते. साहित्यावर प्रेम करणाऱ्यांपेक्षा पहिल्या आवृत्तीचे शिष्ट संग्राहकच मला जास्त आढळले. आपल्या भाचे-भाच्यांना वाढदिवसाची भेट म्हणून पुस्तके शोधताना गोंधळलेल्या स्त्रियाही मला दिसल्या. आजारी व्यक्तींसाठी वाचायला काही शोधणाऱ्या प्रेमळ मावशी भेटल्या. विशेष म्हणजे, पन्नास वर्षांपूर्वी वाचलेले एखादे ‘छाऽन’ पुस्तक शोधण्याची विनंती करणाऱ्या गोड आजीही भेटल्या. पुस्तकाचे आणि लेखकाचे नावच काय, पण त्याचा विषयदेखील विसरलेल्या आजीबाईंच्या एवढे मात्र लक्षात असायचे की त्या पुस्तकाचे कव्हर लाल रंगाचे होते!

इतरत्र कुठेही डोकेदुखी ठरणाऱ्या माणसांना पुस्तक-दुकानात काही विशेष संधी मिळत असल्याने त्यांचा इथे बराच राबता असे. दोन प्रकारच्या तापदायक मंडळींनी जुन्या पुस्तकांचे दुकान ग्रस्त असते. एक म्हणजे, निरुपयोगी पुस्तके तुम्हाला विकण्याचा प्रयत्न करणारी काहीशी जीर्ण दिसणारी माणसे आणि दुसरी म्हणजे, जी विकत घेण्याचा आपला कोणताही इरादा नाही अशी पुस्तके मोठय़ा प्रमाणात ऑर्डर करणारे महाभाग. आमच्या दुकानात उधार विक्री होत नसली तरी ग्राहकांनी निवडलेली पुस्तके नंतर नेता यावीत म्हणून आम्ही बाजूला काढून ठेवायचो. नसलेली पुस्तके ऑर्डरही करायचो; पण ज्यांच्यासाठी आम्ही ऑर्डर द्यायचो त्यातील निम्मे ग्राहक पुन्हा आमच्याकडे फिरकत नसत. प्रथम एखादे दुर्मीळ किंवा किमती पुस्तक मागायचे, नंतर ते राखून ठेवण्याचे आमच्याकडून वचन घ्यायचे आणि मग कायमचे गायब व्हायचे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्यापैकी बरेच लोक कसल्या तरी भयाने किंवा न्यूनतेच्या भावनेने पछाडलेले असावेत. स्वत:बद्दल मोठी व्यक्ती असल्यासारखी बोलणारी ही माणसे पैसे जवळ नसल्याची कल्पक कारणे देत. त्यांनी कितीही मोठय़ा गप्पा मारल्या तरी त्यांच्या एकूण वागण्यात काही तरी दिशाहीन पोखरलेपण जाणवायचे. मात्र हे सांगायला हवे की, पैसे न देता पुस्तके घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांच्यापैकी कुणीच कधी केला नाही. केवळ ऑर्डर देणे त्यांना पुरेसे असायचे. खरेखुरे पैसे खर्च केल्याचे समाधान त्यांना त्यातून मिळत असावे!

सर्वच जुन्या पुस्तकांच्या दुकानांप्रमाणे आम्हीही अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींची विक्री करायचो- त्यात पोस्टाच्या तिकिटांपासून वापरलेल्या टाइपरायटर्सपर्यंत बरेच काही असायचे. पण आमचा खरा जोडधंदा होता लायब्ररी- जिथे दोन आण्यांत कोणत्याही अनामत रकमेशिवाय पाच-सहाशे कादंबऱ्यांपैकी कोणतीही तुम्ही घरी नेऊ  शकायचात. अनामत रक्कम मागून ग्राहकांना दूर लोटण्यापेक्षा एका मर्यादेपर्यंत संभाव्य पुस्तकचोरी खपवून घेणे दुकानदारांना जास्त फायद्याचे असे. आम्ही महिन्याला साधारणपणे डझनभर पुस्तके गमवायचो. हँपस्टेड आणि कॅम्डेन यांच्या मधोमध असल्याने आमच्या दुकानात जसे रावसाहेबी थाटाचे लोक येत, तसेच बसवाहकही येत असत. आमच्या लायब्ररीच्या सभासदांमध्ये लंडनमधील एकूण वाचक जनतेचे प्रातिनिधिक चित्रच दिसायचे. म्हणूनच या लायब्ररीतून कोणत्या लेखकांना सर्वात जास्त मागणी होती, हे पाहणे उद्बोधक ठरावे.

अशा लायब्ररीत लोकांची जगासमोर दाखवायची नव्हे तर खरीखुरी अभिरुची कळते. तुम्हाला चटकन लक्षात येते की, ‘अभिजात’ इंग्रजी लेखक सामान्य वाचकाच्या विश्वातून हद्दपार झालेले आहेत. जेन ऑस्टिन, चार्ल्स डिकन्स, विल्यम थॅकरे, अँथनी ट्रॉलप इत्यादींची पुस्तके तिथे ठेवून काहीही उपयोग नाही. एकोणिसाव्या शतकातील पुस्तक पाहताच ‘अरे, हे तर जुने झाले’ असे म्हणून लोक मागे हटतात. पुरुष एक तर ज्यांचा दबदबा असेल अशा कादंबऱ्या अन्यथा हेरकथा-कादंबऱ्या वाचतात. त्यांचे रहस्यकथांचे वाचन खरोखरच भन्नाट आहे! आमचा एक वर्गणीदार नियमितपणे आठवडय़ाला चार ते पाच रहस्यकथांचा फडशा पाडीत असे (इतर लायब्रऱ्यांमधून घेतलेली पुस्तके वेगळी). आश्चर्य वाटते ते या गोष्टीचे, की तो एकच पुस्तक दुसऱ्यांदा वाचताना कधीच दिसला नाही! लघुकथांची घटत चाललेली लोकप्रियता अशा ठिकाणी प्रकर्षांने समोर येते. लोक ‘मला लघुकथा नकोत’ अशीच सुरुवात करतात. कारण नव्या कथेगणिक नवीन पात्रे समजून घेणे तापदायक असते. त्यांना अशी कादंबरी हवी असते, जिच्या पहिल्या प्रकरणानंतर डोके वापरण्याची फारशी गरज भासू नये.

पुस्तकांच्या दुकानात काम करीत असताना अनेक कारणांनी माझे पुस्तकांविषयीचे प्रेम मात्र कमी झाले. पुस्तकांबद्दल बऱ्याचदा खोटे बोलावे लागत असल्याने विक्रेत्याचा पुस्तकांवरचा लोभ आटू शकतो. सतत पुस्तके इकडे-तिकडे हलविल्याने किंवा त्यांच्यावरची धूळ झटकावी लागल्याने त्यांच्याशी अतिपरिचय होतो. एक काळ होता, जेव्हा जुन्या पुस्तकांकडे पाहताना किंवा त्यांच्यावरून हात फिरवताना मला खूप बरे वाटायचे. एखाद्या छोटेखानी लिलावात एक शिलिंगमध्ये बसतील तेवढी जुनी पुस्तके विकत घेताना मला खूप आनंद व्हायचा. अशा अनपेक्षितपणे हातात पडलेल्या जीर्ण पुस्तकांचा एक वेगळा असा गंध असायचा. त्यात दोनशे वर्षांपूर्वीचे कवितासंग्रह, जुनी गॅझेटीयर्स, विस्मृतीत गेलेल्या कादंबऱ्या आणि बाइंड केलेली नियतकालिके असत. मात्र आज मला जर कुणी विचारले, की आयुष्यभर पुस्तकविक्रेता राहण्याची माझी इच्छा आहे का, तर त्याचे उत्तर नकारार्थी असेल.

एक गोष्ट खरी की, किराणा दुकानदार आणि दूधवाले यांना जसे सुपरमार्केटच्या साखळ्यांनी बाजूला काढले तसे ते छोटय़ा स्वतंत्र पुस्तक-दुकानदाराला बाजूला काढू शकत नाहीत. मात्र या व्यवसायात कामासाठी बराच वेळ द्यावा लागतो. मी तर केवळ अर्धवेळ कर्मचारी होतो, माझा मालक आठवडय़ाला सत्तर तास तरी दुकानासाठी देत असावा. शिवाय पुस्तक खरेदीसाठी वेळी-अवेळी आखाव्या लागणाऱ्या मोहिमा वेगळ्याच. एकूणच हा दिनक्रम फारसा पोषक नसतो. (इंग्लंडमध्ये) पुस्तकांचे दुकान हिवाळ्यात अतिशय गार असते. कारण आतले तापमान उबदार केल्यास तावदानावर पुसट दव साचते, ज्यामुळे पुस्तके बाहेरून पाहता येत नाहीत आणि त्यावर तर दुकानदाराचे आयुष्य अवलंबून असते! माणसाने शोधलेली कोणतीही गोष्ट करीत नसेल एवढी जास्त व त्रासदायक धूळ पुस्तके गोळा करतात. त्यातच प्रत्येक कीटकाला वाटते की, पुस्तकांच्या कव्हरवरच आपले जीवन संपावे!

हा सगळा अनुभव घेत पुस्तकांच्या दुकानातील माझे दिवस आनंदात गेले. दुकानाचा मालकही माझ्याशी प्रेमळपणे वागला. मोक्याचे ठिकाण आणि योग्य भांडवल उपलब्ध असेल, तर कुणीही सुशिक्षित व्यक्ती पुस्तक-दुकानातून हमखास चरितार्थ चालवू शकते. दुर्मीळ पुस्तकांच्या नादी लागायचे नसेल, तर हा व्यवसाय शिकण्यासही फारसा कठीण नाही. शिवाय एका मर्यादेपलीकडे ज्याला असंस्कृत करता येणार नाही, असा हा सभ्य व्यवसाय आहे. मात्र पुस्तकविक्रेत्याने पुस्तकांच्या ‘आत’ काय असते, याचीही माहिती ठेवली पाहिजे. ‘द हिस्ट्री ऑफ द डीक्लाइन अ‍ॅण्ड फॉल ऑफ द रोमन एम्पायर’ बोझ्वेलने लिहिलेले असून ‘मिडलमार्च’ टी. एस. एलियटची कादंबरी आहे, असे छातीठोकपणे सांगणारा पुस्तकविक्रेता वाचकांचा पुस्तकांबद्दलचा आदर कमी करण्याचीच शक्यता अधिक!

– डॉ. मनोज पाथरकर

manojrm074@gmail.com