|| मेघना भुस्कुटे

पाण्याची बाटलीबंद विक्री अंगवळणी पडली; अप्रदूषित, शुद्ध हवेसाठी झगडा सुरू  झाला; आता वामनाचं पुढचं पाऊल शब्दांच्या, आणि पर्यायानं भाषेच्या डोक्यावर पडेल का? ही शक्यता किती सहजसाध्य आहे, ते ही कादंबरी दाखवते…

मोबाइल-फोनच्या व्यसनाबद्दल आता लोकजागृतीला सुरुवात झाली असली, तरी त्याच्या अनेक संभाव्य धोक्यांबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. समाजमाध्यमांवरचं अवलंबित्व, एकाग्रतेची आणि सखोल आकलनाची आटलेली क्षमता, प्रत्यक्ष आयुष्यातली कृतिशून्यता, खासगीपणावर आणि पर्यायानं निर्णयस्वातंत्र्यावर झालेलं आक्रमण… हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. पण फास इतका आवळला गेला आहे, की त्याबाबत आपण उदासीन झालो आहोत. मामला खासगीपणापलीकडे चिंतेचा झाला आहे. पायाभूत नागरी सुविधांची दाणादाण उडालेल्या तथाकथित प्रगत समाजांमध्ये मोबाइल नसेल, तर प्रवासापासून वैद्यकीय सेवेपर्यंत अनेक अत्यावश्यक गोष्टींचीही पंचाईत होते, हे आपण गेल्या वर्षभराच्या करोनाकाळात अनुभवलंच. अवयवच होऊन बसलेल्या या मोबाइलच्या मदतीनं आपल्या तोंडचा शब्द शब्दश: हिरावून घेऊन आपल्याला मुकं करण्याचा आणि या मुस्कटदाबीसाठीच्या इलाजातून पैसे उकळण्याचा डाव एखाद्या कंपनीनं आखला तर?

कुठल्याही चांगल्या डिस्टोपियन गोष्टीनं विचारावा, असा हा प्रश्न. हात लांबवला तर सहज हाताला लागेल इतका जवळ येऊन ठेपलेला, आणि तरीही भीतीपोटी ‘छ्याऽऽ काही तरीच काय!’ म्हणत, कसंनुसं हसत उडवून लावता येणारा. ‘द वर्ड एक्स्चेंज’ ही अलेना ग्रेडनची कादंबरी हाच प्रश्न विचारते.

गोष्ट अशी : ‘मीम’नामक एक यंत्र सगळ्यांच्या आयुष्यात खोलवर झिरपलेलं. ते फोन करतं, ईमेल, टेक्स्ट धाडतं, इंटरनेट वापरून माहिती हुडकतं, गाणी ऐकवतं, छायाचित्र काढतं, पुस्तकं वाचू देतं, वाचून दाखवतं, टॅक्सी बोलावतं, गजर करून झोपेतून उठवतं, संभाषणात व्यत्यय नको असल्यास रिंगचा आवाज कमी करतं. मोबाइल फोन जे-जे काही करतो, ते-ते सगळं तेही करतं. मात्र हे करायला त्याला सांगावं लागत नाही. मालकाचे मूड ओळखून त्याबरहुकूम कामं करण्याची क्लृप्ती ‘मीम’ला अवगत झाली आहे. लोकांच्या ते पथ्यावर पडलं आहे आणि त्यांना त्याची सवयही लागलेली आहे. इतकी की, ‘मीम’वर नव्यानं अवतरलेल्या- ‘वर्ड एक्स्चेंज’ नावाच्या- शब्दांचे अर्थ माफक किमतीत विकणाऱ्या एका प्रोग्रॅमची चलती होऊ लागली आहे. ‘मीम’ला सरावलेल्या या जगात इंग्रजी भाषेच्या एका विख्यात, अवाढव्य शब्दकोशाची अद्ययावत आवृत्ती बाजारात येऊ घातली आहे. ‘मीम’मुळे छापील आवृत्त्यांना लागलेली घसरण बघता ती शेवटचीच कागदी आवृत्ती ठरेल की काय, अशी शंकाही कोशकारांना आहे. ‘मीम’ची विक्री मात्र तडाख्यात चालू. त्याची एक अतिप्रगत, अतिसंवेदनाक्षम, स्पर्शातून आज्ञा हेरणारी आवृत्ती बाजारात आणण्यासाठी ‘सिंक्रॉनिक’नामक कंपनीची तयारीही जोरात चालू. कोशावृत्तीचा प्रकाशन समारंभ आठवड्याभरावर येऊन ठेपलेला असताना कोशाचा प्रमुख गायब होतो. त्याच्यासमवेत काम करणारी त्याची लेक आणि त्याचा एक तरुण सहकारी काळजीत पडतात. त्याच वेळी माणसांना शब्द विसरायला लावणारा ‘वर्ड फ्लू’ नामक रोग आधी इंग्रजीभाषक जगतात आणि मग इतर भाषांमध्ये झपाट्यानं पसरू लागतो. शब्दच विसरायला होत असल्यामुळे, शब्दार्थ विकणाऱ्या ‘वर्ड एक्स्चेंज’चं उखळ पांढरं व्हायला लागतं. हा रोग नक्की कशामुळे होतो याची कल्पना नसल्यानं लोकांमध्ये घबराट उडते. क्लाउडमधले माहितीचे साठे वेगानं भ्रष्ट व्हायला लागतात. भाषेच्या आधारानं चाललेलं जग हा हा म्हणता अराजकाची वाट चालू लागतं.

एखाद्या थरारक, उत्कंठावर्धक रहस्यकथेच्या, पण ‘सुष्ट विरुद्ध दुष्ट’ अशा पारंपरिक वळणानं जाणाऱ्या या गोष्टीत लेखिका भाषेचं स्थान अधोरेखित करते. कोशप्रमुखाचं नाव ‘डग सॅम्युअल जॉन्सन’, त्याची लेक ‘अ‍ॅलिस’, तर सहकाऱ्याचं नाव ‘बार्टलबी’. अ‍ॅलिस आणि बार्टलबी यांच्या आलट-पालट निवेदनांतून कादंबरीचं कथानक पुढे सरकतं. जसजशी या दोघांना ‘वर्ड फ्लू’ची लागण होते, तसतशी निवेदनात अर्थहीन शब्दांची अंदाधुंद माजत जाते आणि भाषा हरपत चाललेल्या डिस्टोपिक जगाची चुणूक वाचकाला दिसू लागते.

‘आपण जे-जे बघतो, ज्याला-ज्याला स्पर्श करतो, ज्याच्या-ज्याच्यावर प्रेम करतो आणि जे-जे गमावून बसतो, त्या-त्या सगळ्यातून भाषा जन्म घेते. आपण जिथे जाऊ शकत नाही अशा ठिकाणी शब्द आपल्याला घेऊन जातात…’- हे काहीसं काव्यात्म आणि स्वप्नाळू वाक्य बार्टलबीच्या दैनंदिनीतलं. पण भाषा फक्त या स्वप्नाळू तत्त्वचिंतनापुरती मर्यादित थोडीच असते? माणसाची भाषिक क्षमता अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांइतकीच महत्त्वाची असते. तीच नष्ट करण्यात आली तर?

माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात जोवर बोलण्यानं आणि ऐकण्यानं संवाद पूर्ण होत होता, तोवर सोपं होतं. पण प्रगतीचं चक्र तिथे थांबतं थोडंच? संस्कृतीच्या इतिहासात संवादमाध्यमांमध्ये अनेकदा आणि आमूलाग्र क्रांती झाल्याचं दिसतं. पाठांतराच्या आधारे चाललेलं ज्ञानवहन अक्षरचिन्हांच्या आश्रयाला जाण्याचा टप्पा सगळ्यात पहिला. तत्कालीन जग या शोधानं हडबडलं असणार. तोवरचे सगळे ठोकताळे, आडाखे, नियम, नियोजन यांची वासलात लागली असणार. तेच छपाईचा शोध लागल्यानंतर पुन्हा नव्यानं झालं. भाषेच्या माध्यमांनी कूस पालटली. हस्तलिखित ग्रंथ देव्हाऱ्यातून बाहेर पडून त्यांतलं ज्ञान एकाएकी कुणालाही सहजी आणि स्वस्तात उपलब्ध झालं. यानं अनेक समाज तळापासून ढवळून निघाले असं इतिहास सांगतो. आज आपण त्याहीपुढल्या वळणावर आहोत. कागदावरचा शब्द आता डिजिटल पडद्यावर वसू लागला आहे. आजवर ज्ञान सामान्यजनांसाठी अधिकाधिक खुलं होत गेलं होतं. पण आताचा टप्पाही तसाच असेल, की शब्दासारख्या गोष्टीवरही भांडवलशाहीची पकड आवळली जाईल? पाण्याची बाटलीबंद विक्री अंगवळणी पडली; अप्रदूषित, शुद्ध हवेसाठी झगडा सुरू झाला; आता वामनाचं पुढचं पाऊल शब्दांच्या, आणि पर्यायानं भाषेच्या डोक्यावर पडेल का?

ही शक्यता किती सहजसाध्य आहे, ते ही कादंबरी दाखवते. शेतजमिनीत सलग घेतलेल्या पिकामध्ये कीड घुसते आणि मध्ये दुसऱ्या कुठल्याही मारक वनस्पतीचा अडथळा नसल्यामुळे उभं पीकच्या पीक फस्त करते. अशा एकाच पिकाऐवजी शेतात अनेक परस्परपूरक वनस्पतींचं सहअस्तित्व राखलं, तर किडीच्या फैलावाला आळा घालता येतो, ही सिद्ध झालेली बाब. त्याच धर्तीवर लेखिका सुचवते की, बहुभाषक, छापील पुस्तकं वाचणारे, हातानं लिहिणारे अशांना ‘वर्ड फ्लू’च्या संसर्गाचा धोका कमी असतो. हे वाचताना भारतीय भाषांच्या भवितव्याचा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. आपण अनेक बोली, भाषा लयाला नेत, भाषावैविध्यावर सपाटीकरणाचा इंग्रजी वरवंटा फिरवत चाललो आहोत. प्राथमिक शिक्षणाचं माध्यम म्हणून वा राज्यांतर्गत संवादाचं माध्यम म्हणूनही आपल्याला देशी भाषा नकोशा झाल्या आहेत. मग त्या भाषांमध्ये काळानुरूप शब्दनिर्मिती होणार कशी आणि भाषा वाहती राहणार कशी?

भाषा मेली म्हणजे एका संस्कृतीचा मुक्याने अपमृत्यू झाला, असा आशय मांडणारं रामू रामनाथन यांचं एक डिस्टोपियन नाटक दिग्दर्शक अतुल पेठे यांनी मराठीत ‘शब्दांची रोजनिशी’ या नावे गतवर्षी सादर केलं. त्यात धूसर राहून गेलेला आशय या कादंबरीत व्यवहाराचा अणकुचीदारपणा लेवून येतो. भाषेच्या प्रभावी वापराबद्दल उदासीन असणारे लोक ‘भाषेनं संवाद साधला जातोय ना, मग हे पुस्तकी चोचले कशाला?’ असा चिरपरिचित प्रश्न विचारतात. व्याकरणाचं दस्तऐवजीकरण नि अद्ययावतीकरण, कोशनिर्मितीमधलं सातत्य, भाषेच्या इतिहासाचा सांगोपांग अभ्यास, भाषेच्या नेमकेपणाचा आणि एका मर्यादेपल्याड तिच्यात भेसळ न होऊ देण्याचा आग्रह… या सगळ्या यंत्रणा ‘संवाद साधल्यास कारण’ या एका युक्तिवादासरशी मोडीत काढल्या जातात. वास्तविक भाषिक यंत्रणा लवचीक आणि कणखर राखण्यासाठी माहितीचा स्रोत जिवंत राहावा, यासाठीचे हे प्रयत्न होत. कादंबरीमधला एक प्रमुख युक्तिवाद लिखित दस्तावेजाच्या आणि संपर्कसाधनांच्या बाजूनं आहे. साधं उदाहरण, माझ्या ‘किंडल’मधली मी खरीदलेली पुस्तकं एका क्लिकसरशी नष्ट करण्याची ताकद अ‍ॅमेझॉन या कंपनीकडे आहे. पण छापील माध्यमाच्या बाबतीत मात्र ते शक्य नाही. माझ्या भाषेवर हल्ला झाला, तरीही कागदी शब्दकोशांच्या मदतीनं मी भाषेची साखळी आजपासून भाषेच्या ऐतिहासिक काळापर्यंत तपासत जाऊ शकते, कारण ती माझ्यापाशी समूर्त उपलब्ध असते. तीच जर कुणी नष्ट केली, तर बोलल्याक्षणी विरून जाणारा शब्द कुठवर पुरा पडेल? भाषायंत्रणेमध्ये लिखित दस्तऐवजीकरणाला काही स्थान आहे की नाही? विशेषत: देशी भाषांच्या बाबतीत त्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाची आपल्याला किती किंमत चुकवावी लागेल?

कागदी पुस्तकं सोडून ‘मीम’ वापरणारी आधुनिक नायिका, तर तिचा माजी तंत्रप्रेमी बॉयफ्रेंड सिंक्रॉनिक कंपनीचा हस्तक. डग आणि बार्टलबी हे ‘सुष्ट’ नायक  मात्र कागदी ग्रंथजगात रमणारे, जगाचे तारणहार. ही मांडणी काहीशी भाबडी, काळी-पांढरी आहे हे खरंच. पण कादंबरीतले नायक-नायिका कोशकार असल्याचं दाखवून लेखिकेनं भाषिक संचितासाठी राबणाऱ्या या उपेक्षित फळीला केंद्रस्थानी आणलं आहे, हेही खरंच.

आपल्या रोजच्या जगण्यात भाषेचं प्रभावीपणे झिरपणं दिसतं ते विशिष्ट शब्द वा वाक्यरचनांद्वारे आभासी गोष्टीही वास्तव म्हणून आपल्या गळी उतरवल्या जातात तेव्हा. डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाला ‘कुंग फ्लू’ म्हणणं, आपल्याकडे ‘लव्ह जिहाद’सारखे मुद्दाम घडवून चलनात आणलेले शब्दप्रयोग, ‘पुरोगामी’ आणि ‘भक्त’ या शब्दांचे जाणीवपूर्वक बदलण्यात आणि रुळवण्यात आलेले अर्थ हे सत्ताकारणामागचे हुकमी एक्के. याच वास्तवाचं भयावह बिंब डिस्टोपियन कहाण्यांतल्या भाषेच्या वापरात दिसतं. शब्दांच्या आणि / वा त्यांच्या अर्थाच्या वापरावर बंदी घालणं (‘नाइन्टीन एटी फोर’- जॉर्ज ऑर्वेल), फसवे शब्द जन्माला घालणं आणि बळजबरीनं चलनात आणणं (‘द हॅन्डमेड्स टेल’- मार्गारेट अ‍ॅटवुड), उच्चारित शब्दसंख्येवर निर्बंध आणणं (‘वॉक्स’ – ख्रिस्तिना डाल्शर)… असे नाना दिलचस्प आणि अर्थपूर्ण पर्याय चोखाळून भाषा या शस्त्राचं महत्त्व डिस्टोपियाचे लेखक ठसवताना दिसतात.

भाषावापराला निराळ्या बाजूनं न्याहाळून ही कादंबरी दस्तुरखुद्द भाषेलाच डिस्टोपियाचं सावज करते. पुस्तक इंग्रजीत आणि इंग्रजीला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं आहे. पण भाषेवर प्रेम करणाऱ्या, कोशात रमणाऱ्या कोणत्याही वाचकाला शब्दांशी खेळत, कोशकारांना नायकाचं स्थान बहाल करणाऱ्या या कादंबरीची भुरळ पडेल. त्याचबरोबर, एकीकडे इंग्रजीचं आक्रमण आणि दुसरीकडे स्वभाषकांनी चालवलेली हेळसांड अशा दुहेरी संकटाला तोंड देणाऱ्या देशी भाषांना या कादंबरीनं उपस्थित केलेले प्रश्न अधिकच तीव्रतेनं लागू पडतात, हेही आपल्या ध्यानात येईल का?

meghana.bhuskute@gmail.com