पंकज भोसले

‘आफ्रो-अमेरिकी कादंबऱ्यांचा प्रवाह बदलणारी कलाकृती’ म्हणून ब्रॅण्डन टेलर यांच्या ‘रिअल लाइफ’ या कादंबरीचे कौतुक झाले आणि ती ‘बुकर’ पुरस्काराच्या लघुयादीतही आली. वर्णद्वेष, समलैंगिकता, विद्यापीठीय हेवेदावे यांचे हे मिश्रण समतोल वगैरे असले, तरी दुखणे कुठे आहे, हे वाचकाला कळतेच..

साधारणत: १९५०च्या दशकात अमेरिकेत ‘कॅम्पस नॉव्हेल’ किंवा विद्यापीठीय कादंबरी हा कथात्म साहित्यातील उपप्रकार म्हणून गणला जाऊ लागला. तोवर लिहिल्या गेलेल्या साऱ्याच कादंबऱ्या या जीवनाच्या विद्यापीठाशी निगडित कथाद्रव्याच्या आधारावर रचल्या जात होत्या. पण लेखिका मेरी मक्कार्थी यांच्या ‘द ग्रूव्ह्ज ऑफ अकॅडीम’ या कादंबरीतून पहिल्यांदाच जीवनाच्या विद्यापीठाऐवजी विद्यापीठातील जीवनाला कथेचा मुख्याधार बनविण्यात आले. त्यानंतर शिक्षणसंस्थांच्या अवती-भवतीच्या आवरणासह प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांच्या नजरेतून कथा घडविणाऱ्या कादंबऱ्यांना उल्लेखण्यासाठी ‘कॅम्पस नॉव्हेल’ ही संज्ञा उगम पावली.

या प्रकारच्या कादंबऱ्यांमध्ये साधारणत: घरापासून, रक्ताच्या नात्यांपासून अचानक तुटल्यामुळे एकारलेले नायक (नायिका अंमळ कमीच) शिक्षणाच्या चरकातून जाताना आपल्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाची बैठक ठरविताना दिसतात. थोडय़ाफार कमी-अधिक प्रमाणात अन्यायदाह, अपमानदाह यांनी त्यांची विचारभट्टी सतत धगधगती राहिल्याने स्वकीयांसोबत परकीयांविषयीची मते भंपकोत्तमापलीकडे नसतात. काहीतरी थोरच करून दाखविणे याबाबत या नायकांची इच्छाशक्ती प्रबळ असते. अन् ते थोर घडत नसल्याने आयुष्य प्रचंड नीरस आणि अर्थशून्य वाटणे हे स्वाभाविक असते. विद्यापीठाच्या भवतालात घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि रोमॅण्टिक धाडस यांच्या संघर्ष मालिकांची धार नायकांना अनुभवसंपन्न बनवत कथानकाचा डोलारा उभारते. मेरी मॅक्कार्थी यांच्या कादंबरीपासून सुरू झालेली ‘कॅम्पस नॉव्हेल’  संकल्पना पुढे जगभरातील इंग्रजी तरुण-तुर्की (यंग अ‍ॅडल्ट- चिकलिट) कादंबऱ्यांमध्ये झिरपत गेली.

हिंदी चित्रपटांत नायक-नायिकांची भेट विद्यापीठात धक्का लागून हातातील पुस्तके पडताना होण्याच्या काळापासून भारतात ‘कॅम्पस नॉव्हेल’ अस्तित्वात आहेत. पण मराठीत साहित्याला गटा-तटांत किंवा श्रेणींमध्ये टाकण्यात पारंगत असलेल्या साहित्य व्यवहाराने या संकल्पनेची उपेक्षाच केली. अन्यथा साठच्या दशकापासून गाजण्याची मक्तेदारी हस्तगत केलेल्या ‘कोसला’, तसेच ऐंशी-नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय साहित्यातून मुख्य धारेत सामावण्याची धडपड करणारी ‘दुनियादारी’ या कादंबऱ्यांच्या आकलनाला नवी मिती मिळाली असती. गेल्या दशकात भारतात इंग्रजीतील ‘स्टार्टअप कादंबरी उद्योगा’तून उत्पन्न झालेल्या ‘फाइव्ह पॉइण्ट समवन’ या कादंबरीचा ‘कॅम्पस नॉव्हेल’ म्हणून उत्तम अभ्यास त्यावर आधारलेल्या चित्रपटानेच अधिक केला. हिंदीत लिहून देशभर ओळख असलेल्या उदय प्रकाश यांच्या ‘पीली छतरीवाली लडकी’ या कादंबरीत नव्वदोत्तरीतील कॉलेजवयीन तरुणांच्या भवतालातील निर्थक पसाऱ्याला आणि सांस्कृतिक अडगळीला अचूक लक्ष्य करण्यात आले. पण तिचाही अभ्यास ‘विद्यापीठीय कादंबरी’ म्हणून झाल्याचे ऐकिवात नाही. त्याहीआधी आपल्याकडच्या साहित्य शिरोमणींनी या उत्तम कादंबऱ्यांचे थोरवी-स्तोत्र गाताना त्यांतील ‘डोळे पाणावणाऱ्या’ प्रसंगांची री ओढत वाचकांच्या पिढीला स्वतंत्र किंवा समृद्ध मते तयार करण्यास अक्षम बनवून टाकले. पण वर उल्लेख झालेल्या सर्व भारतीय कादंबऱ्या आणि त्यांच्या लेखकांची भक्तावळ प्रचंड आणि तितकीच भिन्न गटांतील आहे. पण राज्यभरातील बहुतांश शहरगावांत (उदय प्रकाशांची कादंबरी वगळता) ‘कोसला’, ‘दुनियादारी’ आणि ‘फाइव्ह पॉइण्ट समवन’ पदपथांवरील ग्रंथविक्री दालनात एकाच पंगतीत उपलब्ध दिसले, की या स्वस्तात साहित्य पुरविणाऱ्या यंत्रणेकडे कर्मधर्मसंयोगाने आलेल्या आकलनाला दाद द्यावीशी वाटते.

यंदाच्या बुकरच्या लघुयादीतील ‘रिअल लाइफ’ या ब्रॅण्डन टेलर यांच्या कादंबरीकडे पाहण्यासाठी आपल्याला ‘कॅम्पस नॉव्हेल’ची वर नमूद केलेली सारी गुणवैशिष्टय़े लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय साहित्यवर्तुळात सांप्रतकाळी सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या ‘इलेक्ट्रिक लिटरेचर’ आणि ‘लिट हब’, ‘बझ फीड’ आदी वैचारिक व्यासपीठांवर ब्रॅण्डन टेलर संपादक किंवा सक्रिय लेखक म्हणून कार्यरत आहेत. आत्मकथनात्मक निबंध आणि कथा लिहून त्यांनी स्वत:च्या समलैंगिक जगण्याची, अमेरिकेतील वंशविद्वेषाच्या उघड तसेच प्रच्छन्न वावराची, लाभलेल्या विचित्र बालपणाची, विज्ञानाचे शिक्षण सोडून साहित्यात रमण्याच्या कारणांची या व्यासपीठांवरून बेधडक चर्चा केली. या चर्चाचा प्रदीर्घ पल्ला ‘रिअल लाइफ’ या कादंबरीद्वारे व्यक्त झाला आहे.

वॉलेस नावाच्या आफ्रो-अमेरिकी नायकाच्या आयुष्यातील एका वीकान्त कालावधीत (शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार पहाट) ‘रिअल लाइफ’ घडते. हा वॉलेस हुशारी आणि मेहनतीच्या बळावर अलाबामातील मुर्दाड कृष्णवंशीय वस्तीतून प्रसिद्ध विद्यापीठात दाखल झालेला आहे. तीन वर्षांपासून त्याचा जीवशास्त्राचा खडतर अभ्यास सुरू आहे. विद्यापीठातल्या बहुतांश श्वेतवर्णीयांच्या गर्दीत त्याची आर्थिक-सामाजिक आणि वांशिक सूक्ष्मत्वाची जाणीव तीव्र आहे. प्रयोगशाळेत अतिसूक्ष्म गोलकृमींवर (नेमाटोड्स) उत्परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेवर अभ्यास करण्यात त्याचे तास-दिवस आणि महिने खर्च होत असताना त्याच्या संशोधनाची आकडेवारी काही घटनांमुळे नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. अन् या साऱ्या अनंत पसाऱ्यात एका गोऱ्या मित्रासोबत त्याच्या गुप्त प्रेम-प्रकरणालाही दिशा प्राप्त झाली आहे.

तृतीयपुरुषी निवेदनातून कादंबरीच्या आरंभी हा नायक भेटतो तो वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक दिवसांनी विद्यापीठ संकुलात असलेल्या थोडक्या मित्रपरिवाराच्या भेटीला जाताना. स्थानिक तलावाशेजारी जमणाऱ्या या मित्रांमध्ये वेगवेगळ्या राज्यांतून दाखल झालेले तरुण-तरुणी आहेत.  शुक्रवारी संध्याकाळपासून चर्चा-गप्पा-भोजन-अल्पोपाहार आणि भटकंतीसह आपल्या अभ्यासपर्वातील सुख-दु:खांची देवाण घेवाण करणारा हा गट वेगवेगळी आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेला आहे. शैक्षणिक वर्ष संपून सुट्टी लागण्याआधीचा शेवटचा वीकान्त असल्याने विद्यापीठातील या मित्र-मैत्रिणींना भेटणे त्याला आवश्यक वाटते.

त्यांना भेटायला जातानाही तलावाशेजारी मौज-मजा करायला आलेल्या स्थानिक नागरिकांच्या आनंदाचे, तिथल्या निसर्गाचे जीवशास्त्राच्या अभ्यासकाच्या खुबीने वर्णन येते. आपल्या शेजारी असलेल्या गोऱ्या माणसांना वंशामुळे मिळालेला दर्जा किंवा आर्थिक स्थितीतून त्यांच्यात असलेल्या आत्मविश्वासाच्या जवळपासही आपण फिरकू शकणार नसल्याचे त्याचे ठाम मत असते.

तलावानजीक तो मित्र-मैत्रीणींना भेटतो. वडील गेल्याचे आणि त्यांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठीही वेळ नसल्याचे मित्रांना कोरडेपणाने सांगतो. साऱ्यांकडून मिळणारे सांत्वन स्वीकारतो. पुढल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी ठरविलेल्या वीकान्त खानपान उपक्रमांत सहभागी होण्याचा निर्णय घेतो. भूतकाळातील दुर्घटनांनी पछाडलेल्या मिलर नावाच्या मित्राला घरी नेऊन मुखमैथुनाचे सुख देतो. समलिंगी नसलेला मिलर या उत्स्फूर्त प्रेमवर्षांवाने त्याच्या प्रेमात पडतो. दुसऱ्या दिवशी योजलेल्या स्नेहभोजनात वॉलेस या मित्रांमध्येच असलेल्या एका समलैंगिक जोडप्यातील वाद चलाखीने मिटवितो. मात्र, प्रयोगशाळेतील अनेक महिन्यांपासून यशाकडे चाललेले त्याचे संशोधन तेथे दुसऱ्या प्रयोगात कार्यरत असलेली तरुणी त्याच्यावरच्या सूडामुळे नष्ट करते. तिच्याशी त्याचा कडाक्याचा वाद होतो, पण  मार्गदर्शक शिक्षिकेकडून उलट त्यालाच हाकलून देण्याची अप्रत्यक्ष शब्दांत धमकी दिली जाते.

कितीही ज्ञान असले, तरी आत्तापर्यंत शिष्यवृत्ती किंवा कुणाच्या मेहेरबानीच्या आधारे त्याच्या शिक्षणाचा गाडा अविरत राहिलेला असतो. गोऱ्यांचे वर्चस्व असलेल्या जगाकडून सतत कमी असल्याचे जाणवून देणारे अपमानकढ पचवत स्वत:ला सिद्ध करण्याचे, काहीतरी अर्थपूर्ण ‘थोर’ करण्याचे त्याचे प्रयत्न थकत नाहीत. तरी सातत्याने मिळणारी हीन, दुय्यम वागणूक शिक्षण सोडून स्वत:च्या नरकयातना संपुष्टात आणाव्यात या विचारांवर येण्यास त्याला भाग पाडू पाहते. पण तरीही विलक्षण निराशाजनक परिस्थितीत असतानाही कुणीतरी पुढे खुंटय़ाला बांधणारच आहे, तर आपणच स्वत:हून खुंटय़ासमोर उभे का राहू नये, ही पलायनवादी भूमिका वॉलेस घेऊ इच्छित नाही.

वॉलेसच्या भोवती त्याच्याविषयी राग असणाऱ्यांचा गोतावळा आहे, तसाच त्याला समजून घेणाऱ्या व्यक्तिरेखांचाही कादंबरीत समावेश आहे. त्यांच्याशी वंशभेदावर आणि रोजच्या जगण्यातल्या अडचणींवर विस्तृत आणि वैविध्यपूर्ण चर्चा रंगविण्यात आल्या आहेत. ‘रिअल लाइफ’मधील बराच भाग हा समलिंगी संबंधांच्या विस्तृत तपशीलपूरक वर्णनांनी भरला आहे. जो आपल्याकडे व्यक्तीनुरूप भला वा बुरा ठरू शकेल.

कादंबरी कृष्णवंशीय नायकावर बेतली असली, तरी त्यात गौरवर्णीयांकडून होणाऱ्या वंशद्वेषाचा एककल्ली पाढा येत नाही. तो अन्याय किंवा वागणूक त्याने पूर्णपणे स्वीकारली आहे. शिक्षणाद्वारे मिळू शकणाऱ्या आदर्श जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाची ही गोष्ट आहे. कादंबरीतील पात्रांच्या संवादातून अनेकदा त्या समाजमान्य आदर्श जीवनाचे वर्णन येते. त्याच्या आदर्श अवकाशाची संकल्पना त्याने अनुभवलेल्या बिकट आणि शोषित बालपणातून निर्माण झाली आहे. शिक्षणातील अखंडता आपल्याला ईप्सित स्थळी नेऊ शकेल, याची त्याला खात्री आहे.

संपूर्णपणे विद्यापीठाच्या आवरणात घडणाऱ्या या कादंबरीत नायकाचा अनुभवपसारा, कटुस्मृती, इतरांपासून असुरक्षिततेची भावना धारदारपणे व्यक्त झाली आहे. आफ्रो-अमेरिकी कादंबऱ्यांचा प्रवाह बदलणारी कलाकृती म्हणून या कादंबरीचे बुकरच्या दीर्घयादीत समावेश होण्याआधीपासूनच कौतुक होत आहे. या कौतुकाचे पुरस्कारात रूपांतर होते का याचा उलगडा होण्यासाठी नोव्हेंबर उजाडावा लागणार.

तोवर ब्रॅण्डन टेलर यांची अधिक ओळख करून घेण्यासाठी हे दोन दुवे उपयोगी पडोत :

https://www.buzzfeednews.com/article/brandontaylor/i-dont-miss-being-a-scientist-except-when-i-do

All About My Mother: Brandon Taylor on Love, Rage, and Family

pankaj.bhosale@expressindia.com