03 June 2020

News Flash

बुकबातमी : पुन्हा एकदा ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’!

सद्य: करोना संकटकाळ म्हणजे थोडे थांबून या साऱ्या प्रवासाकडे पाहण्याची संधी आहे असे अनेकांना वाटते आहे.

संग्रहित छायाचित्र

‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ हे शब्द शेक्सपीअरच्या ‘द टेम्पेस्ट’ या नाटकातल्या मिरांडा नामक स्त्री-पात्राच्या तोंडी होते आणि त्याच शीर्षकाची अल्डस हक्सले यांची डिस्टोपियन (युटोपियाच्या विरुद्धार्थी संकल्पना) कादंबरी गेल्या शतकाच्या चौथ्या दशकात लिहिली गेली, हे अनेकांना ठाऊक असेल. हक्सले यांच्या कादंबरीत विस्मयकारक तंत्रज्ञानामुळे जगाचा आणि एकूणच मानवी संस्कृतीचा चेहरामोहरा संपूर्ण बदलेल, असा भविष्यवेध रेखाटला होता. कादंबरीत हक्सले यांनी निर्माण केलेले ‘फिक्शन’ प्रत्यक्षात अवतरल्याचा अनुभव आता जवळपास ९०  वर्षांनंतर ठायी ठायी येत असतो. पुढे दुसरे महायुद्ध, शीतयुद्धाचा काळ अनुभवलेले हक्सले म्हणाले होते, ‘‘मानवजात  आत्मविनाशाच्या मार्गावर आहे हे आधीच लक्षात आले होते. त्याचा वेग माझ्या कल्पनेहून काही पटींनी अधिक आहे, एवढेच!’’ हक्सले यांनी १९५८ साली ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड रीव्हिजिटेड’ हे चिंतनपर पुस्तकही लिहिले होते. लोकशाही आणि स्वातंत्र्य यांच्या वाटचालीबद्दल त्यात त्यांनी आपली परखड मते मांडली होती. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा संकोच वाढतच जाईल, असे भाकीत त्यांनी त्यात केले होते.

सद्य: करोना संकटकाळ म्हणजे थोडे थांबून या साऱ्या प्रवासाकडे पाहण्याची संधी आहे असे अनेकांना वाटते आहे. काहींनी तर करोनापूर्व आणि करोनोत्तर अशी काळाची विभागणी करून मांडणी करायलाही सुरुवात केली आहे. करोना संकट सरल्यानंतरचे जग बदललेले असेल, ते अधिक मानवीय झालेले असेल, असा आशावादही अनेकांना वाटतो आहे. त्या आशावादाला प्रतिसाद देऊ पाहणाऱ्या एका उपक्रमाची घोषणा या आठवडय़ात झाली. विशेष म्हणजे, या उपक्रमाचे नावही ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ असेच आहे!

‘जयपूर लिट फेस्ट’ या नावाने गेली १४ वर्षे जयपूरमध्ये दरवर्षी जानेवारीत साहित्यमेळा भरवणाऱ्या आयोजक गटानेच हा नवा उपक्रम सुरू केला असून शनिवार, ४ एप्रिल अर्थात आजपासून त्याची सुरुवात होत आहे. काय आहे हा उपक्रम? तर ज्याप्रमाणे जयपूर साहित्य मेळ्यात जगभरच्या नामवंत लेखकांना  त्यांच्या  पुस्तकांच्या अनुषंगाने बोलते केले जाते, तसेच ‘जेएलएफ प्रेझेंट्स ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या शीर्षकाच्या या नव्या उपक्रमातूनही केले जाणार आहे. मात्र, टाळेबंदीच्या काळात स्वाभाविकपणे हा उपक्रम ऑनलाइन स्वरूपाचा असणार आहे. ‘ऑनलाइन लिटरेचर सीरिज’ असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. लेखक आणि वाचकांची ‘व्हर्च्युअल’ गाठभेटच नव्हे, तर विविध विषयांवर त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होणार आहे. सुरुवात होणार आहे ती कायदे अभ्यासक आणि ‘सुप्रीम व्हिस्पर्स’, ‘रिपब्लिक ऑफ रिलिजन’, ‘द इन्फॉर्मल कॉन्स्टिटय़ुशन’ अशा पुस्तकांचे लेखक अभिनव चंद्रचूड यांच्याशी होणाऱ्या संवादाने. महाराष्ट्रात १८९६ साली आलेली प्लेगची साथ हा त्यांना दिलेला संवादविषय आहे. याचबरोबर पोर्तुगीझ राजकारणी आणि ‘द डॉन ऑफ युरेशिया’, ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ अशा पुस्तकांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतलेल्या ब्रुनो मकाय् हे अमेरिका, चीन आणि युरोप यांच्या भूतवर्तमानाचे कंगोरे उलगडून दाखवणार आहेत. तसेच शशी थरूर हे त्यांच्या ‘द न्यू वर्ल्ड डिसॉर्डर अ‍ॅण्ड द इंडियन इम्पेरेटिव्ह’ या यंदाच्या जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या अनुषंगाने जगाची वाटचाल आता कुठल्या दिशेने होत आहे, याचा वेध घेणार असून या पुस्तकाचे सहलेखक समीर सरण हेही त्यात सहभागी होतील. हक्सले यांच्या कादंबरीप्रमाणेच, फिक्शनची वास्तव अनुभूती अल्पकाळातच देणाऱ्या ‘लैला’ आणि ‘द सिबियस नॉट’ या कादंबऱ्यांचे कर्ते अनुक्रमे प्रयाग अकबर आणि अम्रिता त्रिपाठी हेही या ‘लिटरेचर सीरिज’मध्ये सहभागी होणार आहेत. ही संवादमाला तूर्त जयपूर लिट फेस्टच्या समाजमाध्यमी खात्यांवर पाहता-ऐकता येणार आहे. विशेष म्हणजे, जगाकडे डोळे उघडे ठेवून पाहणाऱ्या या लेखकांना प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षक-श्रोत्यांना यात मिळणार आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 12:02 am

Web Title: brave new world book review abn 97
Next Stories
1 बंदिवासातल्या जगात..
2 विज्ञानाच्या आभासातील छद्मविज्ञान!
3 ‘नेटफ्लिक्स’च्या जन्माची कहाणी..
Just Now!
X