‘ब्रेग्झिट’ अर्थात युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला त्याला आता दोन वर्ष होतील. पुढील वर्षी ब्रिटन अधिकृतरीत्या या युरोपीय महासंघातून बाहेर पडेल. या निर्णयाचे ब्रिटनला गंभीर आर्थिक परिणाम सोसावे लागतील, असं मत अनेक जाणकारांनी मांडलं आहे. त्या परिणामांना ब्रिटन कसा सामोरा जाईल हे येणाऱ्या काळात कळेलच. ब्रेग्झिटच्या निर्णयामागे इंग्रजी समाजाच्या स्वकेंद्री/आत्ममग्न प्रेरणाच कशा प्रभावी ठरल्या, हेही आता अनेकांच्या लिखाणातून येऊ लागलं आहे. त्यास पुष्टी देणारी चर्चा शुक्रवारी वेल्समधल्या ‘हे फेस्टिव्हल’मधल्या एका परिसंवादात रंगली. ही चर्चा होती इंग्रजी समाजाच्या भाषिक आत्ममग्नतेविषयीची. ब्रेग्झिटोत्तर लाटेत ब्रिटनमध्ये परकीय भाषांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढताना दिसत असल्याचे मत परिसंवादातील सहभागींनी मांडलं. मुख्य म्हणजे ही नुसती शेरेबाजी नव्हे; या म्हणण्याला आधार आहे तो ब्रिटिश कौन्सिलने केलेल्या एका सर्वेक्षणाचा. ब्रिटनमधल्या तब्बल ७०० भाषाशिक्षकांनी या सर्वेक्षणात आपले अनुभव सांगितले. ब्रेग्झिटनंतर ब्रिटनमधले पालकच नव्हे तर विद्यार्थीही परकीय भाषांकडे पाठ फिरवताना दिसतायत, असं या शिक्षकांचं म्हणणं.

वास्तविक युरोपमधील विद्यापीठांत, युरोपीय भाषांच्या  अनुवाद-शास्त्राचे पदवी अभ्यासक्रम चालतात, या पदवीसाठी ‘भाषणानुवाद’ किंवा ‘लिखित गद्य अनुवाद’ असे विशेष विषयदेखील (स्पेशलायझेशन) असतात. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन आणि अर्थातच, युरोपखेरीज दक्षिण अमेरिकेतही मोठय़ा प्रमाणावर बोलली जाणारी स्पॅनिश भाषा यांना मागणी असतेच; पण ‘बास्क’सारख्या – अवघे काही हजार लोक बोलतात अशा- भाषेच्या अनुवादकांनाही युरोपात मागणी होती.. यासाठी भाषेचं चलनवलन किती हे महत्त्वाचं उरलं नव्हतं. महायुद्धोत्तर काळापर्यंत अनुवादांची खरोखरच गरज होती, पण प्रत्येकाला किमान दोन युरोपीय भाषा येऊ लागल्या, अशा साठोत्तरी काळातही ‘सर्व युरोपीय भाषांचं आदानप्रदान’ हे सूत्र या अनुवादांमागे होतं. त्या साऱ्यालाच ब्रेग्झिटोत्तर ब्रिटन नकार देतो आहे.  इंग्रजीच्या आग्रहामुळे या भाषादुस्वासाला नवी वळणे मिळत आहेत.