कॅमिला शम्सी या ख्यातकीर्त ब्रिटिश (मूळच्या आशियाई) लेखिका. ज्यांच्या नावाचा दबदबा ब्रिटनमध्ये आहे, अशा साहित्यिकांपैकी एक! त्यांनी २०१७ च्या अखेरीस सर्व ब्रिटिश प्रकाशकांना एक आवाहन केलं होतं.. ते असं की, २०१८ या वर्षांत ‘आम्ही फक्त महिलांनीच लिहिलेली पुस्तकं प्रकाशित करू’ असा चंग प्रकाशनसंस्थांनी बांधावा. त्यांचं हे म्हणणं अर्थातच, अजिबात कुणीही मनावर घेतलं नाही. जी परिस्थिती शम्सी पालटू पाहात होत्या, ती कायम आहे. ‘आजही’- म्हणजे २०१९ चा ८ मार्च उजाडायला ३६३ दिवस उरले असतानाही- साहित्यक्षेत्रात स्त्रियांची संख्या लक्षणीय असूनसुद्धा लेखक आणि लेखिका यांमध्ये भेदभाव आहेच!

हा भेदभाव एरवीही दिसत असतो. पण शम्सी यांनी तो, गेल्या पाच वर्षांतले ‘बुकर पुरस्कार’ व  अन्य ब्रिटिश/युरोपीय पुरस्कारांचा अभ्यास करून आकडेवारीनं सिद्धच केला होता. या पुरस्कारांसाठी प्रकाशक फारतर ४० टक्के पुस्तकंच लेखिकांची पाठवतात. त्यापैकी पहिल्या चाळणीतून उरलेल्या (‘लाँगलिस्ट’मध्ये आलेल्या) लेखिकासुद्धा ४० टक्केच. दुसरी चाळणीही पार करणाऱ्या (‘शॉर्टलिस्ट’मध्ये येणाऱ्या) लेखिकांचं प्रमाण थोडं अधिक, म्हणजे ४६ टक्के. पण पुरस्कार विजेत्या लेखिका पुन्हा ४० टक्केच. वास्तविक ब्रिटनमध्ये लेखिकांची कमतरता नाही.  ‘बुकर’साठी जगभरच्या साहित्यिकांचा विचार होत असल्यानं उत्तम लिहिणाऱ्या महिला ५० टक्के वा त्याहून अधिक दिसण्यास हरकत नाही. गेल्या ५० वर्षांत, त्यातही गेल्या २० वर्षांत साहित्यक्षेत्रातील महिलांची स्थिती सुधारल्याचं शम्सीही मान्य करतात.. पण, ‘त्याचमुळे तर माझा आग्रह ग्राह्य़ ठरतो’ असं ठसवतात!

महिला वाचकांचं प्रमाण समाधानकारक असूनही लेखिकांकडे दुर्लक्ष सुरूच राहतं, हे विशेष. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रानं महिलादिनी एका ब्रिटिश पाहणीचा हवाला दिला. इंग्रजी पुस्तकांच्या दुकानांत (अथवा ऑनलाइन) खरेदी करणाऱ्यांपैकी तब्बल ५७ टक्के महिला असतात. लोकप्रिय इंग्रजी पुस्तकांच्या ग्राहक-वाचकांमध्ये तर महिलांचा वाटा ७० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. अविकसित देशांत मात्र पुरुष जास्त वाचतात, असं नायजेरीयातल्या एका (लाडिपो व ग्बोटोशो, २०१५) अभ्यासान्ती आढळलं. भारतात गेल्या काही वर्षांत मेलुहा, नाग वगैरे विषयांवर, पुरुषकेंद्री पुस्तकं अधिक लोकप्रिय होऊ लागली आहेत. अशी पुस्तकं महिला किती वाचतात, याविषयी ठोस निष्कर्ष मात्र उपलब्ध नाही!