23 March 2019

News Flash

बुकबातमी : आफ्रिकी कथेचा वानवळा

यातली पहिली कथा आहे- ‘अमेरिकन ड्रीम’! नोनेलम इकवेम्पू या नायजेरियन लेखिकेची ही कथा.

गेल्या तीन वर्षांतील ‘केन प्राइझ’च्या नामांकन यादींतील कथांचे संग्रह

एकूणच जागतिक साहित्यपटलावर ‘कथा’ या साहित्य प्रकाराला ओहोटी लागली असल्याची चर्चा २००० सालानंतर तीव्र होत गेली. या चर्चाविषयामागची तथ्यं आणि त्याची कारणं तपासणं हा आजच्या ‘बुकबातमी’चा विषय नसला तरी, ही चर्चा ज्या काळात अतितीव्र होत गेली त्या सुमारासच, म्हणजे २०१३ साली अ‍ॅलिस मन्रो या कॅनडाच्या कथालेखिकेला नोबेल पुरस्कार मिळाला आणि पुन्हा एकदा कथालेखनाला उभारी मिळाली, असे मानले जाते आणि त्यात बरेच तथ्यही आहे. विशेष म्हणजे, त्याच वर्षीचं मॅन बुकर पारितोषिकही लीडिया डेव्हिस या कथालेखिकेलाच मिळालं होतं. या दोन्ही घटना जगभरच्या कथालेखकांना सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या ठरल्या.

ही अशी सकारात्मकता आफ्रिकी कथेच्या बाबतीतही घडली, तीही वरील घटनांच्या चौदा वर्ष आधी. ती म्हणजे- ‘केन प्राइझ’ या ‘आफ्रिकी बुकर’ समजल्या जाणाऱ्या आणि निव्वळ कथेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा आरंभ. मॅन बुकर पुरस्कार समितीचे तब्बल पाव शतक अध्यक्ष राहिलेले मायकेल केन यांच्या स्मरणार्थ १९९९ पासून सुरू झालेल्या या पुरस्काराने मागील १८ वर्षांत नव्या दमाचे आफ्रिकी कथालेखक जगासमोर आणले. केनिया, झिम्बाब्वे, नायजेरिया, सुदान, युगांडा, दक्षिण आफ्रिका आदी आफ्रिकी देशांमधील नवे कथालेखक शोधणं हा या पुरस्कारामागचा अंतस्थ हेतू. मागील १८ वर्षांतील पुरस्कारप्राप्त आणि नामांकन मिळालेल्या कथा वाचल्या, की हा हेतू साध्य झाल्याची प्रचीती येते. आफ्रिकी जीवनाचं चित्रण याआधी चिनुआ अचेबे, बेन ओकरी आणि इतर काही मोजक्या आफ्रिकी लेखकांनी केलं होतं. त्यांच्या साहित्यातून आफ्रिकेचा परिचय जगभरच्या वाचकांना झाला. पुढे चिमामांदा गोझी अदिची, ई.सी. ओसोंडू, नो व्हायोलेट बुलावायो, ए. इगोनी बॅरेट, टोप ई. फोरलेन, हेलोन हबीला या नव्या लेखकांची पिढी समोर आली. या यादीत दरवर्षी ‘केन’ पुरस्काराच्या निमित्ताने भर पडतेच आहे. आफ्रिकेतील अज्ञात जगाचं दर्शन हे नवे लेखक घडवत आहेत. त्यासाठीच दरवर्षीच्या केन पुरस्काराच्या नामांकन यादीकडे जगभरच्या कथावाचकांचे लक्ष असते.

यंदाची नामांकन यादीही त्यास अपवाद नाही. अलीकडेच जाहीर झालेल्या या यादीत पाच कथांचा समावेश आहे. यातली पहिली कथा आहे- ‘अमेरिकन ड्रीम’! नोनेलम इकवेम्पू या नायजेरियन लेखिकेची ही कथा. सध्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या नोनेलमने या कथेत आफ्रिकेतील स्थलांतराचा प्रश्न हाताळला आहे. या यादीत आणखी दोन नायजेरियन कथालेखकांचा समावेश आहे. वोल तालाबी आणि आलुफन्के ओगुन्डिमो हे ते लेखक-लेखिका. ओगुन्डिमोची ‘द आम्र्ड लेटर रायटर्स’, तर तालाबीची ‘वेड्नेस्डेज् स्टोरी’ या कथा या यादीत स्थान पटकावून आहेत. विचक्षण वाचकांना तालाबीने संपादित केलेला ‘दीज् वर्ड्स एक्स्पोज अस्’ हा नायजेरियन ब्लॉग-लेखनाचा संग्रह आठवत असेलच. तर ओगुन्डिमोच्या कथा आजवर अनेक आफ्रिकी नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या आहेत.

या यादीतली चौथी कथा आहे केनियाच्या मकेना ओंजेरिकाची. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध ‘एमएफए’ या लेखन-कार्यशाळेतून कथालेखनाचे धडे गिरवलेल्या ओंजेरिकाच्या कथेचं शीर्षक आहे- ‘फॅन्टा ब्लॅककरन्ट’! गेली जवळपास तीन दशकं अनवट लिखाण प्रसिद्ध करणाऱ्या ‘वासाफिरी’ या नियतकालिकात गतवर्षी ओंजेरिकोची ही कथा प्रसिद्ध झाली होती. तर, यादीतील अखेरची कथा आहे ती स्टॅसी हार्डी या दक्षिण आफ्रिकेतील लेखिकेची. हार्डी ही यादीतील एकमेव श्वेतवर्णीय लेखिका. तिच्या ‘इन्व्होल्यूशन’ या कथेला ‘केन’साठी नामांकन मिळाले आहे. गतवर्षी निवडक आफ्रिकी कथांचा ‘मायग्रेशन’ हा संग्रह प्रसिद्ध झाला होता, त्यात हार्डीची ही कथाही समाविष्ट होती. या नामांकन यादीतून कोणत्या कथेला यंदाचा पुरस्कार मिळतो ते २ जुलैला कळेलच; तोवर या पाचही कथा http://caineprize.com/the-shortlist/ या संकेतस्थळावर वाचायला उपलब्ध आहेतच!

First Published on May 26, 2018 2:02 am

Web Title: caine prize for african writing 2018