वेस्ट इंडिजचा वादग्रस्त क्रिकेटपटू ख्रिस गेल यानं स्वतच्या जडणघडणीबद्दल आणि काही वेळा आपल्याबद्दल गैरसमज कसे झाले, याबद्दल वाचकांना अगदी खुलेपणानं, बिनधास्तपणेच सांगितलं आहे.. त्यातून ख्रिस गेल हा माणूस असाच का, नाइट क्लब, ‘पिणंयांबद्दल तो इतक्या खुलेपणानं का बोलू शकतो, हे समजायला मदत होते.. पण कारकीर्दीतल्या वादग्रस्त क्षणांबद्दल हे पुस्तक काही सांगत नाही..

एखाद्या माणसाबद्दल वाचल्यावर, ऐकल्यावर आपण त्याच्याबद्दल आपले मत बनवतो. पण खराच तो तसा आहे किंवा नाही, याची खातरजमा करत नाही. त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण ‘तेवढा वेळच आपल्याकडे नसतो’! असे करून आपल्याला कुठे जायचे असते कुणास ठाऊक; पण मत बनवतो, एवढे मात्र नक्की. एखादा माणूस बेफामपणे वागायला लागला तर त्याला आपण काहीवेळा ‘हा आपल्यातला नाही’ असे समजतो. पण त्याच्यामागे असलेल्या गोष्टींचा आपण अभ्यास करत नाही किंवा अंदाज घेत नाही..

..तोही तसाच. अगदी रूमानी. आपल्याच विश्वात जगणारा, रमणारा. लोकांना खिजगणतीमध्ये न धरणारा. कारण लोकांच्या अपेक्षा आपल्याला आनंद घेऊ देणार नाहीत, हे त्याने मनाशी ठरवलेले. स्वच्छंदी, लहरी, मनस्वी, असा एक हा माणूस. जो खरं बोलताना कसलीही तमा बाळगत नाही. लोकांची, समाजाची तर नाहीच नाही. त्याला तुम्ही बंडखोर म्हणा किंवा बेधडक किंवा कदाचित बीभत्स. पण तो राजा (स्वत:ला समजणारा). त्यामुळेच जिवावर बेतलेली शस्त्रक्रिया झाल्यावरही तो घरी परतल्यावर काही तासांमध्येच नाइट क्लबमध्ये गेला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही. आदल्या दिवशी काय केले ते आठवत नसतानाही, त्याची त्याला गरजही वाटली नाही. आईचे आमच्या वडिलांपासून आम्ही तीन भाऊ आणि बाकीची भावंडे आईच्या अन्य रिलेशनमधून जन्माला आलेली, हे सांगायला तो कचरत नाही. सेक्स म्हणजे काय, याचा पहिल्यांदाच घेतलेला अनुभव, हेदेखील तो थेटपणे सांगतो. कसलीच तमा न बाळगता!

..तुम्ही आम्ही त्याला ओळखतो षटकारांचा बादशाह, गोलंदाजांचा कर्दनकाळ, धावांची बुलेट ट्रेन, फलंदाजीतले वादळ, अशा काही बिरुदांनी. ख्रिस गेल हे त्याचे नाव. त्याची मैदानातली फलंदाजी, मैदानाबाहेरची ‘बोलं’दाजी आणि पाटर्य़ामधले किस्से किंवा फोटो पाहिल्यावर तुमचे मत त्याच्याबद्दल नक्कीच काही तरी बनले असेल. पण ‘तो खरंच तसा आहे का?’ हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल आणि त्याचे उत्तर देते ते ख्रिस गेलचे ‘सिक्स मशीन’ हे आत्मचरित्र. ते गेलने स्वत: लिहिलेले नाही, हे आतल्या पानावर, ‘ख्रिस गेल – विथ टॉम फोर्डाइस’ या उल्लेखामुळे कळेलच, पण पुस्तकातून ख्रिसच आपल्याशी थेट बोलतो आहे.

गेलच्या वर्तनाबद्दल बरेच लिहून आले आहे, पण ते वाचून त्यावर थेट मत बांधून त्याला बाहेरख्याली समजणे कदाचित चुकीचे ठरू शकेल. त्यापूर्वी या कॅरेबियन बेटांची संस्कृती समजून घ्यायला हवी. तिथली माणसं बिनधास्त. आजचा दिवस मजेत घालवणं, हे त्यांचं जगण्याचं तत्त्वज्ञान. आपल्याला आनंद कशात मिळतो हे ओळखून, तो थेट उपभोगायची तयारी त्यांच्यात असते. मग काही लोक त्याला अश्लील का म्हणेनात, मुळात ते त्यांनी का ठरवावे, इथपासून या कॅरेबियन बिनधास्तपणाची सुरुवात होते. ख्रिस जेव्हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी दाखल झाला तेव्हा वेस्ट इंडीजचा संघ नाइट क्लबमध्ये मद्यपान करत होता. काही वरिष्ठ खेळाडूंनी, ‘बीअर पी आणि आनंदी राहा’ असे त्याला सांगितले. यामधून कॅरेबियन बेटांवरची लोकसंस्कृती समजता येऊ शकते. ख्रिस काही आकाशातून जमैकामध्ये नक्कीच पडलेला नाही, तर या संस्कृतीचा तो एक भाग आहे. ही संस्कृती त्याच्या आत मुरलेली आहे. आपली संस्कृती आणि अन्य देशांतील संस्कृती भिन्न असते आणि त्याप्रमाणे वागायचे असते, हे आपण जाणतो. पण गेलला त्यामध्ये काहीच गैर वाटत नाही. त्याचे बरोबर आहे, याचे समर्थन करता येणार नसले तरी तो असे का वागतो, हे जाणून घेण्यासाठी त्याचे हे आत्मचरित्र मदत करते.

ख्रिसचा जन्म झाला तेव्हा त्याचे बाबा ५० वर्षांचे होते. ते पोलीसमध्ये असले तरी घरात काही सुबत्ता नव्हती. परिस्थिती अगदी बेताचीच. त्यामुळे वेळेवर पोटभर जेवणही मिळायचं नाही. एका छोटय़ा रूममध्ये हे पाच भाऊ आणि एक बहीण दाटीवाटीने राहायचे. नवीन कपडे नाहीत. जगण्याचा रोजचाच सामना. न्याहारीसाठी ख्रिसने बऱ्याचदा पक्षीही मारून खाल्ले आहेत, तर कधी लोकांच्या घरातील रिकाम्या बाटल्या चोरून बेकरीतून केकही खाल्ले आहेत. घरापेक्षा त्याचे आयुष्य जास्त रस्त्यावरच गेले. भरपूर उनाडक्या केल्या. घराच्या बाजूला असलेल्या लुकास क्लबने त्याला क्रिकेटचे वेड लावले. तिथेच तो जास्त रमला. अगदी दिवस-रात्र क्रिकेट खेळणे, हे त्याच्यासाठी नित्याचेच होते. तिथून दरमजल करत, धावांच्या राशी उभारत तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आणि काही वर्षांत अनेकांच्या गळ्यातला ताईतही झाला. या प्रवासाचे अप्रतिम वर्णन ख्रिसने आत्मचरित्रामध्ये केले आहे. यामध्ये कुठलीही गोष्ट सांगायला तो कचरला नाही. त्याने आतापर्यंतच्या जवळच्या माणसांना नेहमीच जपले. पैसा आल्यावर तो त्यांना विसरला नाही. त्यांना हवं नको ते दिलं. त्यांचे लाड पुरवले. पैसे नसताना मित्रांनी, हितचिंतकांनी, कुटुंबीयांनी दिलेली साथ तो विसरला नाही. या साऱ्यांबद्दल तो अशा आत्मीयतेने लिहितो की या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.

ख्रिसचे हे आत्मचरित्र काहीसे चमत्कारिक वाटेलही. कारण ख्रिसने लिहिलेल्या काही गोष्टी चौकटीबाहेरच्या आहेत. पण आत्मचरित्र लिहिताना नावाजलेली मंडळी साऱ्याच खऱ्या गोष्टी मांडत नाहीत. अगदी ख्रिसनेही या आत्मचरित्रामध्ये काही गोष्टी मांडल्या असल्या तरी काही राहून गेल्या आहेत. मात्र ज्या मांडल्या आहेत त्या सरळपणे मांडल्या आहेत. त्यामध्ये लपवाछपवी दिसत नाही. या आत्मचरित्राच्या प्रत्येक भागात एक वेगळा ख्रिस आपल्याला दिसतो. तो त्या-त्या वेळी होता, तसा. पण आपल्या या पद्धतीने लिहिताना सुसंगतपणा मात्र त्याला ठेवता आलेला नाही. त्याच्या तो रक्तातच नसावा. काही वेळा हे आत्मचरित्र वेगळ्या वळणावर घेऊन जातं, तर काही वेळा या गोष्टींची खरंच गरज होती का, असंदेखील वाटतं. पण अखेर, ख्रिस हा त्याच्या मनाचा राजा! या राजाच्या आयुष्यात शिरकाव करत असताना तुम्ही बऱ्याचदा त्याचे होऊन जाता. पण त्या वेळी तुम्ही तुमची संस्कृती, आचार-विचार, चौकटी बाजूला ठेवायला हवीत, तरच तुम्ही त्या विश्वामध्ये जाऊ शकता आणि एक नवा ख्रिस पाहू शकता.

ख्रिस जसा स्वकीयांबद्दल भरभरून बोलतो, तसाच स्वत:बद्दलही. त्याची कसोटी क्रिकेटमधली दोन त्रिशतके, विश्वचषकातील द्विशतक, ट्वेन्टी-२० क्रिकेटमधली १७५ धावांची वादळी खेळी, याबद्दल ख्रिस भरपूर काही सांगतो. त्यामागची पाश्र्वभूमीही अलवारपणे मांडतो. आईची तब्येत बरी नसताना घरी निघालेला ख्रिस जेव्हा तिच्याच सांगण्यावरून मैदानात उतरतो आणि तिला हे त्रिशतक समर्पित करतो, तेव्हा हाच का तो बाहेरख्याली ख्रिस, असा प्रश्न पडतो. स्वत:बद्दलचा माज दाखवायलाही तो मागेपुढे पाहत नाही.

अशा माणसांबद्दल बऱ्याच अफवाही पसरतात आणि त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. अशीच दोन प्रकरणे या आत्मचरित्रात आहेत. पहिले श्रीलंकेतले. एका मध्यरात्री ख्रिससह त्याचे दोन संघसहकारी तीन ब्रिटिश महिलांना हॉटेलच्या रूममध्ये आणतात आणि सारे मद्यपानाचा आस्वाद घेत असतात. तेवढय़ात ड्वेन ब्राव्हो येऊन तुम्ही काही वेश्या आणल्या आहेत का? असे विचारतो आणि त्यानंतर पोलिसांकडून हे वृत्त जगभर पसरते. तेव्हा फक्त गेलचेच नाव या वृत्तामध्ये घेतले जाते. त्यानंतर ‘ट्वेन्टी-२०’ स्पर्धा भरवणाऱ्या स्टॅनफोर्ड यांना ख्रिस आणि आपल्या प्रेयसीचे अफेअर असल्याचे समजते. ख्रिस जगाला ओरडून सांगत असतो की असे काही नाही, पण त्यावर विश्वास ठेवणार कोण? ही दोन्ही प्रकरणे खुबीने हाताळण्यात आली आहेत. पण ख्रिसच्या बाबतीत फक्त अशी दोनच प्रकरणे घडली, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

या आत्मचरित्राची सुरुवात ज्या प्रकारे केली आहे, त्याला तोडच नाही. प्रस्तावना वाचल्यावरच तुम्ही थेट आत्मचरित्रामध्ये शिरता. उत्सुकता वाढू लागते. त्यानंतर काही सुरुवातीच्या गोष्टींची एवढी भुरळ तुम्हाला पडते की तुम्ही थेट डोहात शिरता. पण डोहात शिरल्यावर मात्र काहीसा अपेक्षाभंग होतो. उत्सुकता काही प्रमाणात कमी होत जाते. कारण सुरुवातीचा थरार, वेग, नावीन्य तुम्हाला पुढे तितक्या प्रमाणात आढळत नाही. एव्हाना ख्रिसची कारकीर्द सुरू झालेली असते. त्यातल्या यशाचे तपशील कळतात, पण वादावादीचे झाकलेही जातात. एखादा सिनेमा मध्यंतरानंतर फिस्कटावा तसेच काहीसे या आत्मचरित्राचे झाले आहे. पण तरीदेखील थोडासा संयम दाखवलात तर, माणूस म्हणून जो ख्रिस तुम्ही पाहता तो तसाच आहे किंवा नाही, याचे उत्तर तुम्हाला मिळू शकेल. कदाचित काही गोष्टी ख्रिसने यानंतरच्या- पुढल्या भागासाठी राखूनही ठेवल्या असतील. पण ख्रिसची जडण-घडण समजून घेण्यासाठी हे आत्मचरित्र नक्कीच साह्य़भूत ठरेल. या पुस्तकात ख्रिसने सुरुवातीला गगनभेदी षटकार मारले आहेत, पण उत्तरार्धात हे ‘षटकार यंत्र’ थोडे थंडावलेले दिसते.

  • सिक्स मशीन
  • लेखक : ख्रिस गेल वटॉम फोर्डाइस
  • प्रकाशक : पेंग्विन व्हायकिंग
  • पृष्ठे : २७६ , किंमत : ५९९ रुपये.

 

प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com