News Flash

अध:पतनाचा भविष्यकाळ

थोरपणा मान्य करून अन् प्रभाव घेऊनही हा लेखक अमेरिकेतर जगताबाहेर अज्ञात राहिला.

चक पाल्हानिक

चक पाल्हानिक या लेखकाची ओळख त्याच्या आजवरच्या कादंबऱ्यांतून करून घेता येईलच, पण या लेखकाचा नवा कथासंग्रह आला आहे! अमेरिकेसारख्या प्रगतसमाजातील विकृती नेमक्या हेरणाऱ्या या लेखकानं, कथांमधून भावी काळातले धोकेच मांडले आहेत.  या नव्या कथासंग्रहाची धावती ओळख करून देतानाच, त्या निमित्तानं पाल्हानिकच्या लिखाणाची जातकुळी  शोधण्यासाठी त्याच्या आधीच्या काही लेखकांबद्दलही सांगणारं हे टिपण..

नेल्सन अल्ग्रन नावाच्या कथालेखक आणि पत्रकाराने हयातभर तळागाळातील अज्ञात अमेरिकेला साहित्य आणि पत्रकारितेचा विषय बनविले. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ठोसेबाज रिपोर्ताजमुळे आणि कादंबऱ्यांचे माध्यमांतर चित्रपटांत झाल्यामुळे लेखक म्हणून जनप्रियतेचे शिखर लाभलेल्या या नेल्सन अल्ग्रनची पुस्तके खपली मात्र नाहीत.. त्याच्या सामाजिक लेखनविषयांतील धारदार वास्तववादामुळे, त्याची पुस्तके पहिल्या आवृत्त्यांमध्येच दडपली गेली. वारांगना, ड्रग अ‍ॅडिक्ट, मुर्दाड वस्त्या, जुगारी अड्डे असे तळागाळातील अमेरिकी आयुष्य मांडणारा हा लेखक वकूब असूनही अर्नेस्ट हेमिंग्वे ते रेमण्ड काव्‍‌र्हर या कथनदिग्गजांच्याच काय पण दुसऱ्या धारेच्या अभिजात अमेरिकी लेखनपंथींच्या पंगतीपासूनही लांबच राहिला. अवघड असली तरी तुलनाच करताना आपल्याकडे भाऊ पाध्ये यांच्या लेखनाकडे ज्या पद्धतीने मराठी साहित्यजगत (यात त्यांचे समकालीन तुपट वा विद्रोही लेखक अन् प्रचंड प्रमाणात वाचकही आले.) पाहते. तसेच काहीसे अल्ग्रन यांच्याकडे अमेरिकेमध्ये पाहिले गेले. थोरपणा मान्य करून अन् प्रभाव घेऊनही हा लेखक अमेरिकेतर जगताबाहेर अज्ञात राहिला. पण अलिकडच्या दशकांत ब्रेट इस्टन एलिस यांनी ‘अमेरिकन सायको’ कादंबरीतून , डेनिस जॉन्सन यांनी ‘जीझस सन’ या कथासंग्रहातून समाजवास्तवाचे टोक पकडण्याची अल्ग्रन यांचीच वाट अंगिकारली. गंमत म्हणजे या पुस्तकांवर बऱ्यापैकी परिचित चित्रपट आले असले, तरी त्यांचाही वाचक मर्यादित प्रमाणात राहिला. पण या सगळ्यांसारखेच लिहून चक पाल्हानिक नावाच्या लेखकाची अन् त्याच्या अतिअग्रेसर लिखाणाची कीर्ती थांबायला तयार नाही..

‘साहित्यबाह्य़ साहित्य’ प्रसवत असल्याची टीका चक पाल्हानिकवर सुरुवातीपासून होत राहिली. तरी त्याच्या कादंबरीवरून बेतलेल्या ‘फाइट क्लब’ चित्रपटानंतर गेल्या दीड दशकात या लेखकाने उच्चभ्रूंपासून तळागाळापरयत वाचकवर्ग विस्तारत नेला. साहित्यवर्तुळाची तमा न बाळगता, साहित्यिक भाषेतील मर्यादांच्या उल्लंघनातूनच समाजातील प्रकृतीपेक्षा विकृतीकडे बोट दाखविण्याची किमया त्याच्या प्रवाही लिखाणातून दिसते. आपल्या भवतालात बदललेल्या गोष्टींनी माणूस आपली ओळख कशारीतीने हरवत चालला आहे, त्याकडे लक्ष वेधणारे अतिरेकी वास्तव चित्रण त्याच्या लिखाणातून नेहमी येते.

‘चोक’, ‘स्नफ’ यांसारख्या पोर्न अ‍ॅडिक्ट्सपासून अमेरिकी पोर्न उद्योगाचे सूक्ष्मलक्ष्यी चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या, ‘ललबाय’, ‘डायरी’सारखे भयवास्तववादी प्रयोग आणि ‘रॅण्ट’सारखी विचित्र विज्ञानिका यांतून आजच्या माणसांचे आफाट अवघड सत्य साहित्यातून वाचायला लावण्याची तयारी या लेखकाने जगाला करून दिली. हॉण्टेड या कथामालिका कादंबरीमधील त्याची ‘गट्स’ नावाची कथा वाचन वादग्रस्तेच्या अनंत दंतकथा मायाजालावर बनवून आहे. एकूण काय, तर दर वर्षांगणिक बदलत्या समाजाला, बदलत्या सांस्कृतिक परिघाला आणि साहित्य जगताला तिरकस नजरेने पाहून, या अनुभवविश्वाला कथनरूपी साहित्यातून पुनर्जीवित (रीसायकल) करण्याकडे या लेखकाची प्रवृत्ती आहे.

हा लेखक वाचायला खूप सोपा असला, तरी प्रत्येकाला झेपेलच इतक्या तोडीचा नाही, हे दर्शविणाऱ्या कथांचा ‘मेक समथिंग अप : स्टोरीज यू काण्ट अनरीड’ नामक कथासंग्रह काही महिन्यांपूर्वी दाखल झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने लिहिलेल्या दीर्घकथांचे हे एकत्रित रूप आहे. पण यातील सगळ्याच कथा शीर्षकाबरहुकूम वागत नाहीत. इथलेही जग सामान्य माणसांचे नाही. यात आलेल्या पात्रांचे आयुष्य कल्पनातीत अवस्थेत बिघडलेले आहे. अन् या आयुष्यांतील बिघाडांची सर्व टोके शोधण्याचा पराक्रम पाल्हानिकने केला आहे.

पहिलीच कथा आहे, ‘नॉक नॉक’ नावाची. आयुष्यभर छोटे जोक्स सांगायला अन् ऐकायला आवडणाऱ्या वडिलांना मरणासन्न अवस्थेत निवेदक मुलगा जोक सांगून हसवू पाहतोय. वडिलांनी सांगितलेल्या एकापेक्षा एक चावट, वात्रट, तिरकस विनोदी किश्श्यांची मालिकाच तो वडिलांपुढे अन् वाचकांपुढे ओतत राहतो. त्या विनोदावर वडील हसत नाहीत आणि त्याचे सांगणे अवघड वळणांपर्यंत येईस्तोवर कथा सर्वप्रकारच्या धारदार विनोदांना कवेत घेते. रुग्णालयात सहा आठवडय़ांचा काळही जगू न शकणाऱ्या वडिलांच्या भावी मृत्यूशी विनोदाने लढताना रीडर्स डायजेस्टपासून ते तत्त्ववेत्यांच्या, लेखकांच्या संदर्भाची येथे तऱ्हेवाईक मांडणी येते.

‘झॉम्बी’ नावाची एक कथा हायस्कूल मधील मुलांना लागलेल्या अद्भूत व्यसनाची आहे. हे अमली पदार्थाचे वा आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही, तर विशिष्ट प्रकारचा शॉक शरीराला घेऊन काही काळासाठी ‘लहान मुलांच्या मेंदू’समान अवस्थेत जाण्याचे. ही बालिश आनंदाची अवस्था येण्यासाठी आजच्या जगातील तरुणाईची सर्वच बाजूंनी मानसिक कुतरओढ होत आहे का, या प्रश्नावर कथा येऊन पोहोचते. म्हणजे आज जाणीव अवस्थाच शाप वगैरे आहे की काय, असे भीषण सत्य ऐकायला लावते. यात शेक्सपिअरच्या ‘टु बी ऑर नॉट टु बी’ची निवेदकाकडून खिल्ली उडविली जाते, सोबत पॉप्युलर कल्चरमधील कैक ज्ञात संदर्भाना रिचवण्यात येते. अशाच एका ‘एलेनॉर’ नामक कथेतील नायकाला झाडांचा प्रचंड तिरस्कार असतो. वडलांच्या व्यवसायाला लाथाडून तो कॅलिफोर्नियामध्ये झाडरहित परिसराच्या शोधात निघतो. तेथे प्रेमात पडतो आणि गमतीशीर प्रकारे त्याचा वृक्षतिरस्कार त्याच्या अंगाशी येऊ पाहतो.

‘द टोड प्रिन्स’ नामक अगदीच परिकथेचे नाव शोभणारी कथा नायक जीवशास्त्राच्या उपयोजित ज्ञानाआधारे उपभोग आनंदाच्या कृत्रिम अवस्था कशा निर्माण करतो, याची आहे. हायस्कूलमधील हा नायकवीर आजाराचा प्रसारच भीषण प्रकारे राबवतो. किंवा, ‘रोमान्स’ या कथेतला अगदीच जाडगेला अन् कुरूप नायक ब्रिटनी स्पिअरसारख्या दिसणाऱ्या सुंदरीशी लग्न केल्याच्या बढाया मारताना दिसतो. मात्र या सुंदरीची बुद्धी गतिमंदासमान असते, म्हणून त्याचे मित्र त्याची खिल्ली उडवत राहतात, त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रयत्नातली त्याची निवेदनशैली कथेचे तिरपागडे स्वरूप ठरवून टाकते.

‘इन्क्लिनेशन’ नावाच्या कथेमध्ये समलिंगी विचारांच्या तरुण, तरुणींचे शुद्धीकरण करून त्यांना ‘नॉर्मल’ बनविणारा आरोग्य विभाग आहे. मात्र यातील गंमत अशी आहे, की तेथे दाखल होणारा किंवा होणारी प्रत्येक तरुण-तरुणी साधारण होण्याच्या मोबदल्यात आपल्या पालकांकडून काहीतरी मिळविण्याच्या हेतूने खोटी समलिंगी व्यक्ती झालेली असते. नैतिकतेचा बडिवार माजवणाऱ्या उच्चभ्रू जगतातील खोटे अन् छोटेपण मांडण्याचा अफलातून कथावतार येथे पाहायला मिळतो. अन् येथले तुरुंगासारखे रुग्णालयवजा ‘शुद्धीकरण केंद्र’ हेही पाल्हानिकच्या सुपीक डोक्यातून तयार झालेले रसायन आहे.

अतिशुद्धतेतून वंगाळ अवस्थेपर्यंत वळविली जाणारी भाषा, स्त्री अवयवांच्या, वांशिक विद्वेषवाचक शिव्यांच्या वाटेल तितक्या अवस्थेला जाण्याचे धाडस हे पाल्हानिकच्या लेखनाचे वैशिष्टय़ आहे. इथल्या दर दोनेक नावाला म्हणता येतील इतक्या सोज्ज्वळ कथांनंतर तीनेक अतिभडक भाषा असलेल्या कथा येतात. लहान मुलांसमोरच वाईट अश्लील विनोद करणारा किंवा श्लील-अश्लील समजवून देण्यासाठी शब्दांत अडकलेला बाप, ड्रग्जपेक्षा औषधे/प्रयोगशाळा यांतून सुख मिळविण्यासाठी आसुसलेली पिढी, पोर्न उद्योगाचे सामान्य जीवनात रुतलेले संदर्भ, पुरुष डान्स बारमध्ये भलत्याच प्रकारच्या अडकित्त्यात पिचलेला बारबालक. मसाज पार्लरमध्ये वृद्धांना दिली जाणारी विशेष सेवा, असे असामान्य व्रात्यकथानमुने पाल्हानिकच्या या संग्रहात एकत्र पाहायला मिळतात. त्यांना वल्ली म्हणणे लहान वाटावे, इतक्या त्या व्यक्तिरेखा तिकडमपणाचा अर्क आहेत. हा लेखक वाचण्याची सुरुवात करण्यासाठी मात्र या कथा उपयुक्त नाहीत. त्याच्या तऱ्हेवाईक तरी योग्य तत्वज्ञानाचा परिचय करून घेण्यासाठी त्याच्या कोणत्याही कादंबरीच्या वाटेलाच आधी जाणे इष्ट ठरेल.

सुरुवातीला उल्लेख केलेल्या नेल्सन अल्ग्रन या लेखकाची ‘द मॅन विथ द गोल्डन आर्म’ ही कादंबरी अमली पदार्थाच्या अमलाखाली आलेल्या तरुणाची पडझड दाखविणारी, अशा प्रकारची पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या महायुद्धकालीन संहारात नष्ट झालेल्या माणुसकीच्या पटलावर समाजात मानसिक सुखाच्या ओढीसाठी व्यसनांधतेचा स्वीकार करतानाची पहिली पायरी त्यात दाखविली होती. मधल्या काळात चित्रपट आणि कादंबऱ्यांनी अल्ग्रेनची वाट जिवंत ठेवली. पण पुढे ब्रेट इस्टन एलिसची ‘लेस दॅन झिरो’, ‘अमेरिकन सायको’, ह्य़ुबर्ट सॅल्बेची ‘रिक्वायर फॉर ए ड्रीम’, स्कॉटिश लेखक आयर्विग वेल्श याची ‘ट्रेन्स्पॉटिंग’ या कादंबऱ्यांनी संपूर्ण समाजाची सार्वत्रिक व्यसनांधता यांना लक्ष्य करून जे वातावरण तयार केले, ती चक पाल्हानिकला सेलेब्रिटी बनविणारी शिदोरी बनली. पाल्हानिकच्या उदयाचा काळ हा इंटरनेटच्या उदयाचा काळ असल्याने त्याचा प्रसार आधीच्या लेखकांहून द्रुतगतीने झाला. अन् नंतर इंटरनेटच्या विस्तारासोबत तद्अनुषांगिक व्यसनांनी समाजामध्ये घडणाऱ्या व्यसन बदलांनाही त्याच्या कथांनी अंगिकृत केले. अतिशय शिस्तबद्ध अपाल्हाळिक निवेदनातून समाजाची मूल्य, नैतिकता हरविलेली स्थिती. दांभिक, रासवट आणि विकृतीकडे चाललेली मानवी वाटचाल पाल्हानिकच्या कथांमध्ये पाहायला मिळू शकते. विज्ञानकथा लेखकांनी पाच ते सात दशकांपूर्वी रंगविलेल्या साऱ्या कल्पना हल्ली वास्तवात साकारलेल्या पाहायला मिळाव्यात, त्याचप्रमाणे अल्ग्रनपासून ते पाल्हानिकपर्यंत समाजविज्ञानाचे अभ्यासक साहित्याद्वारे अधपतनाचा मानवी भविष्यकाळ मांडताना दिसत आहेत. त्यांच्या साहित्याचा अभ्यास म्हणूनच त्यांच्या बेधडकपणाला टाळून स्वीकारणे क्रमप्राप्त झाले आहे.

pankaj.bhosale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 6:04 am

Web Title: chuck palahniuk writer
Next Stories
1 परीकथांचं गारूड..
2 विविधांगी लेखकाचे स्मरण
3 विकासपुरीचा मुकाबला..
Just Now!
X