|| नर्मदा खरे
नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आणि सरकारकडून नागरिकांवर पाळत हे ‘डिस्टोपिया’चे घटक या कादंबरीत भरभरून आहेत…

समजा, तुमच्या विश्वासातल्या व्यक्तीनं सांगितलं, ‘आज त्या रस्त्यानं जाऊ नकोस. मला स्वप्न पडलंय की तिथं भयंकर अपघात होणारंय’ – तर तुम्ही काय कराल? एक भारतीय या नात्यानं तुम्हाला मुहूर्त, गंडे-दोरे, सामक्षा नव्या नाहीत; पण तुमचे डॉक्टर, वकील किंवा राज्यकर्ते त्या आभासी गोष्टींच्या आधारे तुमच्या आयुष्याशी खेळले तर? आता घटकाभर समजा की, तुम्ही अशा जगात राहताय जिथली सरकारं जीवन-मरणाचे निर्णय स्वप्नातल्या संकेतांवर बेततात; चालेल?

अल्बेनियन लेखक इस्माइल कदारे यानं ‘द पॅलेस ऑफ ड्रीम्स’ या कादंबरीत असंच जग रचलंय. नागरिकांच्या स्वप्नांचा अर्थ लावून सरकारी योजना आखण्यास मदत करणाऱ्या, साम्राज्याचा आधारस्तंभ असणाऱ्या ‘स्वप्नमहाला’ची ओळख करून देताना तो म्हणतो, ‘सहज विजेचा सपकारा मारावा किंवा उल्कापात व्हावा तसा अल्लाह् जगावर स्वप्नरूपी संकेत भिरकावतो. ते स्वप्न कुणाच्या निद्रेवर आघात करेल? अगणित फालतू, निरुपयोगी, निरर्थक स्वप्नांमधून ही भविष्यवाणी शोधून काढण्याचं काम आपलं आहे. लाखो निद्राधीन व्यक्तींपैकी एकीच्या मेंदूत भरकटलेल्या ठिणगीप्रमाणे शिरलेलं ते स्वप्न मिळवून त्याचा अर्थ जर आपण लावला, तर देशाला, देशाच्या सम्राटाला अनर्थापासून वाचवू शकू.’

१९७२ साली लेखकाच्या मनात ‘स्वप्नमहाला’च्या कल्पनेनं मूळ धरायला सुरुवात केली, तेव्हा अल्बेनियात एन्वेर होज्जाचं मार्क्सवादी-लेनिनवादी-स्टॅलिनवादी सरकार होतं. ‘खास माझं स्वत:चं असं नरकाचं चित्रण’ असं या कादंबरीचं वर्णन कदारेनं केलंय. १९८१ साली कादंबरी प्रसिद्ध झाली, तेव्हा उपसचिव रमीझ आलियानं अल्बेनियन लेखक-संघटनेची घाईघाईनं बैठक घेतली. दोनच आठवड्यांत अनेक धमक्यांसह पुस्तकावर बंदी घालण्यात आली, पण त्याआधीच २० हजार प्रतींची पहिली आवृत्ती पूर्णपणे खपली होती.

ऑटोमन साम्राज्यातील एका निनावी शहरात घडणाऱ्या, ‘कल्पनारम्य वास्तववाद’ वापरून रचलेल्या या कथानकावर अल्बेनियाच्या कम्युनिस्ट सरकारनं बंदी का घातली असेल?

तर, गोष्ट : मार्क आलम हा तरुण आईच्या बाजूनं राजकारणात प्रभावी अशा कॉप्रुलु कुटुंबाशी जोडलेला आहे. मार्कचा मोठा मामा ऑटोमन सम्राटाचा मुख्य वजीर आहे.

कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या प्रभावामुळे मार्कला रहस्यमय ‘स्वप्नमहाला’त नोकरी मिळते. साम्राज्याच्या कानाकोपऱ्यांतून नागरिकांच्या स्वप्नांची नोंद करून आणणाऱ्या साहसी स्वप्नवाहकांच्या प्रचंड जाळ्याचा हा केंद्रबिंदू. साम्राज्यातील परिस्थितीची खरी कल्पना कुठल्याही सर्वेक्षणापेक्षा इथंच येण्याची शक्यता अधिक. कारण समाजातला विखार, अंधकार, तशीच आशेची चमक निद्रादेवीच्या राज्यातच उघड होतात. सगळी संकटं, कारस्थानं प्रत्यक्षात उतरण्याआधी कुणाच्या तरी स्वप्नातच अवतरतात. अशी ‘खास स्वप्नं’ पारखून त्यांचा अर्थ लावणं, हे इथलं काम.

कामाला लागल्यानंतर मार्कला अवास्तव वेगानं बढत्या मिळू लागतात. एका कामाची सवय व्हायच्या आतच वरच्या स्तरावर ढकलला गेल्यामुळे त्याला स्वत:च्या आयुष्यावरचं, भविष्यावरचं नियंत्रण गेल्यासारखं वाटू लागतं. सुरुवातीला नुसत्याच क्लिष्ट, कंटाळवाण्या वाटणाऱ्या कामाचं फसवं स्वरूपही उघड होऊ लागतं. एखाद्वेळी चुकीचा अर्थ लावल्यानं एखादा ‘दैवी संकेत’ कचऱ्यात गेला आणि पुढेमागे ते स्वप्न खरं झालं, तर ते स्वप्न पाहणारे आणि त्याचा अर्थ लावणारे, दोघेही सत्तेच्या अणकुचीदार नखाखाली येणार, या काळजीचं सावट सगळ्या कर्मचाऱ्यांवर पसरलेलं जाणवतं.

स्वप्नमहालाची शक्ती स्वप्नांमध्ये नसून गुपितांमध्ये आहे, हेही हळूहळू उघडकीला येतं. मार्क आणि मोठा मामा यांच्यातलं एक बुचकळ्यात टाकणारं संभाषण कादंबरीत आहे. त्यातून मार्कला कळतं की, त्याच्या स्वप्नमहालातल्या नेमणुकीमागे कॉप्रुलुंची रणनीती आहे. कॉपु्रलु कुटुंब आणि स्वप्नमहाल शतकानुशतके एकमेकांचा दुस्वास करत आले असून कॉप्रुलुंना शह देण्याकरिता अनेकदा ‘खास स्वप्नां’चा वापर झालाय. अशा स्वप्नमहालात मार्कची नेमणूक करण्यामागे कॉप्रुलुंचा काय डाव असेल? त्यांच्या मार्ककडून काय अपेक्षा असतील? अननुभवी मार्कला संभाषणातल्या रहस्याच्या धुक्यात गुरफटलेल्या भाषेचा उलगडा होईपर्यंत वेळ निघून जाते आणि त्याच्या नजरेतून सुटलेल्या एका ‘संशयास्पद’ स्वप्नाच्या आधारे कॉप्रुलु कुटुंबावर आणखी एक आघात केला जातो. परिणामी झालेल्या राजकीय उलथापालथींमध्ये सम्राट, स्वप्नमहाल आणि कॉप्रुलु, सगळ्यांची पारडी वर-खाली होतात. राजकारणाच्या पटावर खेळल्या गेलेल्या खेळ्यांमध्ये काही निरपराध जीवांचे बळी जातात.

स्वत:ची पटावरची जागा, भूमिका, महत्त्व, पापातला वाटा या सगळ्यांबद्दल मार्कला प्रश्न पडत असतानाच, अनपेक्षितपणे आणखी एक बढती मिळून त्याच्यावर सगळ्या स्वप्नमहालाची जबाबदारी येऊन पडते. वरकरणी का होईना, कॉप्रुलुंची सरशी होते.

कादंबरीतलं सामर्थ्यशाली कॉप्रुलु घराणं कदारेनं इतिहासावर बेतलंय. ऑटोमन साम्राज्यातील ‘स्त्रियांच्या’ मानल्या गेलेल्या काळात यांच्यापैकी एक जण मुख्य वजीर म्हणून नेमला गेला, आणि त्यानंतर त्यांच्या शब्दाला खूप वजन आलं. ऑटोमन सम्राटांनी आपलं राजकीय सामर्थ्य कॉप्रुलुंबरोबर वाटून घेतलं, तशीच कुकर्मंही.

मेडिटरेनियन समुद्रकाठचा छोटासा देश आहे अल्बेनिया. रोमन, नॉर्मन, तुर्की, ग्रीक, इटालियन, जर्मन… अनेकांनी राज्य केलं त्यांच्यावर. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अल्बेनियाचा स्वत:चा एन्वेर होज्जा सत्तेवर आला. अल्बेनियाच्या मजूर पक्षाचा हा कम्युनिस्ट नेता. महायुद्धात वाताहत झालेला देश त्यानं परत उभा केला. वीज आली, रेल्वे आली, बायकांचे हक्क वाढले, साक्षरता वाढली, आयुर्मान वाढलं. पण हो, होज्जानं मरेपर्यंत, चाळीस वर्षं, अल्बेनियावर हुकूमशाही केली. त्याचा पुस्तकी कम्युनिझम ना क्रुश्चेव्हच्या रशियाला झेपला, ना सांस्कृतिक क्रांतीनंतरच्या चीनला. अल्बेनियाला जगानं वाळीत टाकलं.

होज्जाच्या व्यक्तिमत्त्वानं सगळ्या देशाला झाकोळलं आहे अशी संवेदना तो इतिहास वाचताना होते. युद्धशास्त्रापासून अर्थशास्त्रापर्यंत सगळीकडे त्याचा शब्द अखेरचा असे. पाठ्यपुस्तकांमधून त्याची भाष्यं असत. त्याचा उल्लेख ‘सर्वोच्च नेता’, ‘महान गुरू’ आदी विशेषणांनीच होई. पण होज्जाला कुठल्याशा भीतीनं ग्रासलं होतं. परकीय आक्रमण झालं तर तयारी असावी म्हणून जेमतेम ३० लाख लोकसंख्येच्या देशात त्यानं पाण्यासारखा पैसा ओतून दोन लाख ‘बंकर्स’ बांधून घेतले. असंख्य लोकांना कोणत्याही आरोपांवरून देहदंड देणं, लेबर कॅम्पमध्ये पाठवणं हे रोजचं होतं. त्याच्या निराधार भीतीची छाया सगळ्या देशावर पडली. अशा भयग्रस्त अल्बेनियात कदारेनं आपला ‘स्वप्नमहाल’ रचला.

नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आणि सरकारकडून नागरिकांवर पाळत हे डिस्टोपियाचे घटक या कादंबरीत भरभरून आहेत. कदारेच्या कथेतली राजसत्ता, नागरिकांच्या निद्रावस्थेत मनावरचा ताबा शिथिल झाला असताना स्वप्नरूपानं उफाळून बाहेर आलेल्या खासगी विचारांवरही अधिकार गाजवते. ऑर्वेलच्या ‘थॉट पोलीस’च्याही एक पाऊल पुढे जाते.

परवा कुणाशी तरी मासिक पाळीबद्दल गप्पा मारून झाल्यावर फेसबुक उघडलं, आणि समोर ‘मेंस्ट्रुअल कप’ची जाहिरात बघून अंगावर काटा उठला. पण फेसबुकनंही आक्षेप घ्यावा, असं ‘पेगॅसस’ सध्या माध्यमं व्यापून आहे. कादंबरीत काय वेगळं आहे? पाळत सरकारचीच आहे, पण स्वप्नांमार्फत. एक मेख आहे, ज्यामुळे नागरिक पूर्ण हतबल वाटत नाहीत. सरकारपर्यंत पोहोचणारी स्वत:ची स्वप्नं शब्दांत मांडणं हे त्यांच्या हातात आहे. स्वप्नांचा अर्थ सरकार हवा तसा लावू शकत असलं, तरी नागरिकही सरकार डळमळीत करण्यासाठी दिशाभूल करणारी स्वप्नं पाठवूच शकतात. कदारेच्या जगात हे केलंही जातं. पारंपरिक डिस्टोपियामध्ये नागरिकांच्या हातात एवढं मोठं शस्त्र दिलंय कोणी? म्हणूनही कदारेची कादंबरी रूढ ‘कुनस्थानी’ कथांच्या साच्यात बसत नाही. शिवाय मार्क आलम हा वेगळ्या धर्तीचा डिस्टोपियन नायक आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा ना तो प्रतिकार करत, ना त्यांवर टीका करत. अनेक आठवडे स्वप्नमहालात काम केल्यानंतर स्वप्नांमधल्या घडामोडींच्या विचित्रपणापुढे त्याला रोजचं जीवन फिकं भासू लागतं. त्याच्या आवडत्या कॉफीहाऊसमध्ये नेहमी काही आंधळे येत असत. त्यांची नजर ‘अनिष्ट’ असल्यानं ‘महान’ ऑटोमन सरकारनं ‘जनतेच्या सुरक्षितते’साठी त्यांचे डोळे कायमचे मालवून टाकले होते. ज्या आंधळ्यांच्या नुसत्या दर्शनानं एरवी मार्क अस्वस्थ होत असे, ते आता त्याला विलक्षण भासेनासे होतात. त्याच्या अशा नोंदींमध्ये एक अंगावर शहारा आणणारा सहज प्रांजळपणा जाणवतो. नायक नसून तो एक सामान्य माणूस, एक त्रयस्थ निरीक्षकच वाटतो.

मूळ अल्बेनियन भाषेतलं हे पुस्तक फ्रेंचमार्गे इंग्रजीत आलं. या दुहेरी भाषांतरात अनेक बारकावे हरवले असणारच, पण तरीही कादंबरीतल्या सहज, अनलंकृत भाषेमुळे वातावरणातली गूढता, ताण, भीती व काळजी जिवंत होते. मार्कनं स्वप्नमहालाला दिलेल्या पहिल्या भेटीचं वर्णन वाचकालाही भूलभुलैयात हरवून गेल्याची संवेदना देऊन जातं. तिथल्या कॉरिडॉर्सचं गुंतागुंतीचं जाळं, भिंतींतून येणारे निगूढ, दबलेले आवाज आणि कुजबुजी, दूर-दूर जात नाहीशा होणाऱ्या अंधूक आकृती आणि एकूणच दु:स्वप्नवत रचना. स्वप्नमहाल मग फक्त दगडमातीची इमारत राहात नाही. तिथलं कामही तसंच – मानवी विश्वासाच्या, श्रद्धेच्या काठावरचं. ज्याचं खरेखोटेपण सिद्ध करणं अवघड, पण ज्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य, अशा गूढ, तर्कातीत शास्त्राच्या आधारावर स्वप्नमहाल उभा असतो.

कदारेचा स्वप्नमहाल वाटतो तितका दूर नाही आपल्यापासून. पुराव्यानं शाबीत न झालेल्या अनेक विधानांवर आपणही विश्वास ठेवत असतो. एक जमाना होता, जेव्हा भारतातल्या कुठल्याही छोट्यामोठ्या गुन्ह््यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जायचं. ‘सद्दाम हुसैनची वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’, ‘हिंदू खतरे में है’, ‘असंख्य मुलं पैदा करून मुसलमान लोक भारत पादाक्रांत करताहेत’, ‘भारतीय जनतेच्या मालकीचा अपरिमित काळा पैसा स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये पडून आहे’, ‘करोना विषाणू हे चिन्यांनी जगावर मात करण्यासाठी घडवलेलं जैविक शस्त्र आहे’… यांतल्या कशाचे पुरावे आहेत? तरी आपल्या मनांनी या विधानांकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय? माझ्या मनानं तरी नाही केलं.

कदारेनं अतिशय कुशलतेनं स्वप्नमहालाचं रूपक वापरून अल्बेनियाच्या निरंकुश राजसत्तेकडे निर्देश केला. ऐतिहासिक, भौगोलिक तपशिलांमध्ये मुद्दाम बदल करून भ्रम निर्माण केला, जेणेकरून स्वत:च्या देशाच्या अन्यायकारक राज्यछत्राखालीच राहून तो लिहू शकला. जगातलं पहिलं ‘आंतरदेशीय बुकर पारितोषिक’ त्याला देण्यात आलं, तेव्हा त्याला राजाश्रय आहे, आणि त्यामुळे परिस्थितीवर टीका करण्याचा अधिकार त्यानं गमावला आहे, अशी विधानं काही जणांनी केली होती. मला मात्र कदारेच्या लेखनात शौर्य जाणवतं. बेईमानी नाही.

narmada.khare@gmail.com