News Flash

माणुसकी लयास जाताना..

तर आइनस्टाइन यांचं ‘हे विश्व आणि मानवी मूर्खपणा दोन्ही अमर्याद आहे’ हे प्रतिपादन सर्वश्रुत आहे. 

तीन पिढय़ांतल्या लेखकांनी मानवजातीच्या भवितव्याबद्दल त्या – त्या काळच्या संदर्भात व्यक्त केलेली चिंता आजही विसरू नये अशीच!

अतुल देऊळगावकर   atul.deulgaonkar@gmail.com

सामान्य माणसे आयुष्यातील प्रसंगांना वैयक्तिक मानण्याची गल्लत नेहमीच करतात. तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, विचारवंत व कलावंत मात्र प्रश्नांचे मूळ स्वरूप समजावून देतात आणि त्याच प्रसंगामधील व्यक्तिकेंद्रितपणा काढून त्यांना सार्वत्रिक करतात. या द्रष्टय़ांना काळाची पावले आधीच दिसतात आणि त्यामुळे ते समाजाला ‘सावध’ करीत पुढल्या हाका ऐकण्याची विनवणी करतात. तर कधी कोणीही ऐकत नाही, हे पाहून दोन्ही बाहू उंचावत आक्रंदून सांगतात. १८ व्या शतकात रूसो म्हणाले होते, ‘संस्कृतीविना मानव हा मूर्खाच्या नंदनवनातील हिंस्र पशू ठरेल.’ तर आइनस्टाइन यांचं ‘हे विश्व आणि मानवी मूर्खपणा दोन्ही अमर्याद आहे’ हे प्रतिपादन सर्वश्रुत आहे.

एकाच घटनेकडे पाहण्याचा वैज्ञानिक व कलावंत यांचा दृष्टिकोन भिन्न असू शकतो. मात्र, दोघेही दोन वेगळ्या दिशांनी प्रवास करीत एकाच निष्कर्षांला येत असतात. वैज्ञानिकता ही निरीक्षण व प्रत्यक्ष प्रमाण यांच्या आधाराने जाते. तर कला हा प्रत्ययवादी ज्ञानाचा स्रोत आहे. काव्य, चित्र व संगीत थेट हृदयाला भिडते. हिंसा वा क्रौर्य पाहून तत्त्वज्ञ, वैज्ञानिक व कलावंत यांनी अजरामर निर्मिती करून ठेवली आहे. मानवी वर्तनाचा अन्वय लावत भवितव्याविषयी भाकीतही करून ठेवले आहे.

पहिल्या महायुद्धातील विध्वंस पाहिल्यानंतर मनोविश्लेषणशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉईड यांनी १९२९ साली ‘सिव्हिलायझेशन अ‍ॅण्ड इट्स डिसकन्टेन्ट्स’ हे पुस्तक लिहिले होते. त्यांच्या या अखेरच्या पुस्तकात व्यक्ती व समाज यांच्या स्वरूपातच मूलभूत तणाव असल्याचे विश्लेषण त्यांनी केले होते : ‘मनुष्यस्वभावाचे स्वरूप हेच समूहाच्या विरोधी असते. मनुष्याची मूल:प्रेरणा ही सुखप्राप्ती (प्लेझर प्रिन्सिपल) असते. कुठलीही व्यक्ती स्वसुखासाठी अमर्याद व सहजस्फूर्त (इन्स्टिंक्टिव्ह) स्वातंत्र्याच्या शोधात असते. तर समाजाकडून (सिव्हिलायझेशन) त्या प्रेरणांचे दमन करून जुळवून घेण्याची मागणी असते. वैयक्तिक आकांक्षांना बंधने घालण्यासाठी समूहाकडून नियम व कायदे केले गेले. अतृप्त इच्छांची पूर्तता करण्यासाठी मनुष्य कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि या आदिम प्रेरणा मानवी समूहास घातक आहेत.’ फ्रॉईड यांनी सभ्यता व संस्कृतीच्या वाटचालीसमोरील जटिल आव्हाने तेव्हाच सांगून ठेवली होती. धर्म केवळ घरापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक उन्माद करू लागला तर संपूर्ण जग धोक्यात येईल, हे त्यांनी ओळखले होते. त्या वेळी हिटलरने धर्माच्या आधारे ‘आपण विरुद्ध ते’ अशी फाळणी करीत निरंकुश सत्ता प्रस्थापित केली होती. फ्रॉईड यांनी- ‘धर्म ही एक भ्रामक अथवा आभासी कल्पना (इल्युजन) आहे. कुठल्याही धर्माची ‘प्रश्न न विचारता, पुरावे न मागता शिकवण स्वीकारा’ अशी आज्ञा असते. झापडबंद पोथीनिष्ठतेमुळे धर्म ही समूहास झालेली मज्जाविकृती (न्यूरॉसिस) ठरते. आमचा धर्म हाच सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगावर राज्य करण्याचा अधिकार आम्हालाच आहे, अशी प्रत्येक धर्माची ठाम धारणा असते. त्यामुळे समाजात तणाव अटळ आहे,’ असे बजावले होते.

या विश्लेषणानंतर दोनच वर्षांनी १९३२ मध्ये अल्डस हक्सले यांची ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ ही भविष्यकाळातील आतंकाच्या राज्याचे (‘डिस्टोपियन’; युटोपियाच्या विरुद्धार्थी) विस्ताराने चित्रण करणारी कादंबरी आली. तीत- ‘त्या वेळी विस्मयकारक तंत्रज्ञानामुळे मानवाचे रूपच भिन्न असेल. तेव्हा जनुकीय स्थानांतरित माणसे असतील. तंत्रज्ञानाच्या आधारे बुद्धिमान व निरोगी मुले निर्माण करता येतील आणि त्यासाठी स्त्री-पुरुषांची गरज असणार नाही. सामाजिक श्रेणीबद्धता ही बुद्धिमत्तेच्या आधारावर असेल. मात्र, हे सारे काही अजस्र कंपनीच्या ताब्यात असेल. पुस्तकांवर बंदी येणार नाही, कारण कोणी पुस्तक वाचणारच नाही. माहितीच्या प्रसारावर बंधन असणार नाही, कारण माहितीच्या प्रसारावरच कोणाचा तरी ताबा असेल. संस्कृती बंदिस्त करण्याची गरज भासणार नाही, इतकी क्षुद्रावस्था संस्कृतीला येईल. वेदनादायक वातावरण करून लोकांवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा त्यांना सुखलहरीत गुंतवल्यामुळे ते निष्क्रिय वा आत्ममग्न होतील. स्वातंत्र्य असल्याच्या भ्रमात जग वावरत असेल’ असे भयंकर भविष्य हक्सले यांनी रेखाटले होते. ९० वर्षांपूर्वी हक्सलेंनी रेखाटलेल्या जगात आपण जगत आहोत! माणुसकीचा ऱ्हास ही एक दुर्धर सामाजिक व्याधी आहे, याची जाणीव फारच मोजक्या लोकांना होते. या रोगाची कारणे व उपाय याकडे लक्ष केंद्रित करणारे तर अतिशय दुर्मीळ आहेत. हक्सले हे त्यांपैकी एक प्रज्ञावंत होते.

‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ ही कादंबरी विलक्षण लोकप्रिय झाली. अभिजात कादंबऱ्यांच्या सर्व सूचींमध्ये तिचा समावेश झाला. या कादंबरीला २७ वर्षे उलटल्यावर हक्सले म्हणाले, ‘मानवजात  आत्मविनाशाच्या मार्गावर आहे हे आधीच लक्षात आले होते. त्याचा वेग माझ्या कल्पनेहून काही पटींनी अधिक आहे, एवढेच!’ त्यांनी १९५८ साली आधीच्या कल्पनेला पुनभ्रेट देऊन तिचा विस्तार करीत ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड रीव्हिजिटेड’ हे वैचारिक पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते :  ‘निवडणुका, संसद, सर्वोच्च न्यायालय या संस्था वगैरे सर्व काही तसेच असेल, फक्त लोकशाहीचे स्वरूप पूर्णपणे बदलून ती नाममात्र उरलेली असेल. सर्व व्यवहार हे खासगी संस्थांकडे गेल्यामुळे लोकांची मानसिकता घडविण्यासाठी (मॅनिप्युलेशन) परिणामकारक पद्धती अस्तित्वात येईल. यामागे एक अभिनव अिहसक एकपक्षीय सत्ता (टोटलेटेरियनिझम) असेल. जुनी पारंपरिक नावे, संज्ञा व घोषवाक्ये अगदी तशीच राहतील. दरम्यान सत्तेवर असणारा कंपू (ऑलिगार्ची) आणि त्यांचे उच्च प्रशिक्षित सैनिक, पोलीस, विचारांचे उत्पादक (थॉट मॅन्युफॅक्चरर) आणि मानसिकता घडविणारे (माइंड मॅनिप्युलेटर) हे त्यांच्या मर्जीप्रमाणे शांतपणे राज्य करीत राहतील. लोकशाही व स्वातंत्र्य या संज्ञा वारंवार घोकल्या जातील. अति लठ्ठ व्यक्तीस जलद गतीने अथवा दीर्घश्वसन करता येत नाही, तशीच अवस्था लोकशाही व स्वातंत्र्य यांची होऊन जाईल.’ हक्सले यांनी भविष्यवेध करीत रेखाटलेले हे चित्र आज सर्वत्र अवतरले आहे.

१९६२ साली आलेल्या राशेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’मुळे संपूर्ण जगाचे पर्यावरण धोक्यात येत असल्याचे भान आले होते. हे प्रदूषण केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नसून ते सर्वव्यापी आहे. पर्यावरणीय विनाश करण्यामागील मानसिकता व राजकारण आणि सांस्कृतिक ऱ्हास हे हातात हात घालूनच पुढे जात आहेत याची चाहूल विविध ज्ञानशाखांच्या शास्त्रज्ञांना लागली. एकंदरीत जग झपाटय़ाने जवळ येत होते. माणसे एकमेकांपासून व निसर्गापासून दूर होऊ लागली होती. हे पाहून डॉ. कॉनरॅड लॉरेन्झ अस्वस्थ झाले. पक्षी व प्राण्यांच्या वर्तनाच्या सखोल अभ्यासातूनच डॉ. लॉरेन्झ यांनी प्राणिवर्तनशास्त्र (इथॉलॉजी) ही नवीन ज्ञानशाखा विकसित केली होती. १९७३ साली त्यांना नोबेल मिळाले आणि त्याच वर्षी लॉरेन्झ यांनी ‘सिव्हिलाइज्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ या पुस्तकातून मानवजातीच्या आठ प्रमादांमुळे पृथ्वी धोक्यात येत असल्याचा इशारा दिला होता; ते असे- १) लोकसंख्येचा स्फोट २) निसर्गाचा विनाश ३) तंत्रज्ञानाच्या विकासाचा अतिरेक ४) नष्ट होत चाललेली भावनिकता ५) जनुकीय ऱ्हास ६) परंपरांचा भंग  ७) मतरोपण (इनडॉक्ट्रिनेशन) व ८) अण्वस्त्रे. यांमुळे मानवप्राणी आत्मघाताच्या मार्गावर आहे, असे लॉरेन्झ यांनी म्हटले होते.

लॉरेन्झ यांना माणूस विवेकी व सुसंस्कृत होत नसल्याची खंत होती. तसेच माणुसकी लोप पावत असल्याची वेदना त्यांना छळत होती. यामागील अनेकांगी कारणांचा ते प्रदीर्घ काळ शोध घेत राहिले. लॉरेन्झ यांनी ‘ऑन अ‍ॅग्रेशन’ (१९६३) या ग्रंथातून मानवी आक्रमक वृत्तीचा वेध घेतला होता. तर वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी ‘वेिनग ऑफ ह्य़ूमननेस’ (१९८३) या पुस्तकातून संस्कृतीचा आधार असलेली माणुसकीच लयाला का व कशी जात आहे, याची सखोल मांडणी केली. उत्क्रांतीवादी डार्विन यांनी ‘जीवसृष्टी ही आपोआप उत्क्रांत पावत आहे, आपण अधिक सु-संस्कृत व प्र-गत होत आहोत हे भ्रम आहेत. निसर्ग सर्व काही आपोआप जुळवून घेतो, त्यामुळे आपण काही काळजी करू नये’ असा सिद्धांत मांडला होता. त्याबाबत लॉरेन्झ म्हणतात : ‘या जगात घडणारी कुठलीही गोष्ट ही पूर्वनियोजित नाही. या घटनांमागे काही हेतू वा उद्देश नाही. या सृष्टीचा कर्ता व नियंता परेमश्वर नसून मनुष्य हाच कर्ता व विनाशक आहे. यापूर्वी अस्तित्वात नव्हती अशी सुव्यवस्थित रचना निर्माण करण्याची क्षमता असणारा मानव अतोनात अव्यवस्था करून ठेवत आहे.’ त्यांनी हेतुशास्त्र व जीवशास्त्राचा आधार घेऊन (उत्क्रांतीमध्ये कुठल्याही घटनेमागे काही हेतू वा उद्देश आहे का, हे तपासताना ‘टेलिऑलॉजी’ ही संकल्पना पुढे आली)- ‘जीवसृष्टीय उत्क्रांती ही काही सरळरेषीय (लिनियर) नाही. कित्येकांना ही जातिविकसित उत्क्रांती (फायलोजेनेटिक इव्होल्युशन) असून सर्जनशील निवडीतून (क्रिएटिव्ह सिलेक्शन) अधिकाधिक वरच्या श्रेणीकडे जाणारी आहे, असेही वाटत असते. वनस्पती व प्राणी जगतात एकापाठोपाठ एक नव्या व प्रगत प्रजाती निर्माण होत गेल्या नाहीत’ हे दाखवून दिले आहे. लॉरेन्झ यांना मानवी संस्कृतीचा इतिहास पाहता जीवसृष्टीय उत्क्रांती व सांस्कृतिक उत्क्रांती यांत खूप साम्य आढळते. सांस्कृतिक उत्क्रांती हीदेखील सरळरेषीय नसून तिने अनेक नागमोडी वळणे घेतली आहेत. उत्क्रांतीमध्ये जुळवून घेण्यातूनच (अ‍ॅडाप्टेशन) टिकून राहण्याची सक्षमता येते आणि जुळवून घेण्याचा बोध होणे हेच महत्त्वाचे आहे. जुळवून घेणे ही काही सर्जनशील क्रिया नव्हे.

मानवी जीवनात विविध संस्कृती उगम पावल्या, उन्नत अवस्थेस गेल्या व अस्त पावल्या. जिज्ञासा, अंतर्दृष्टी व मानवी मूल्यांमुळे मानवी संस्कृती उन्नत अवस्थेला जाऊ शकली. यासंबंधी विचारवंत नोम चोम्स्की म्हणतात, ‘सभोवतालच्या परिस्थितीवर मात करण्याच्या इच्छांतून संकल्पनांचा विचार सुरू (कन्सेप्शियल थिंकिंग) झाला.’ संकल्पनांचा विचार आणि बोली भाषा (व संवाद) यांमुळे जग पालटत गेले. केव्हा तरी कुणाला धनुष्य व बाण यांचा शोध लागला असेल, तेव्हा त्याने तत्काळ ती माहिती कुटुंबाला व टोळीला दिली असणार. पाठोपाठ संपूर्ण मानवजातीला त्याचे ज्ञान होत गेले. त्यानंतर विश्वाच्या उत्पत्तीपासून आजूबाजूच्या घटनांचा वेध घेण्याची धडपड सुरू झाली. मानवी जिज्ञासेतून भाषेचा उगम झाला. असंख्य शोध लागत गेले. ज्ञानाची लालसा आणि भाषा यांमुळे माणसांमधील बंध तयार झाले. त्यातून ज्ञानाचा प्रसार कमालीच्या वेगाने झाला. कौशल्य वाढत गेले तशा आकांक्षा वाढत गेल्या. भाषिक व्यवहार व ज्ञानामध्ये सहभागी होण्याची परंपरा यातून सांस्कृतिक एकता निर्माण होत गेली. दोन भिन्न टोळ्या एकत्र आल्या आणि उत्तम ते घेत गेल्या. या संकरातून संस्कृती उन्नत होत गेल्या. बहुविधतेमुळेच संस्कृती बहरत गेली. ही संस्कृती अधिकाधिक उन्नत करण्याची व उक्रांतीला सर्जनशील करण्याची जबाबदारी स्वीकारली तरच भविष्याची आशा करता येते.

आज पक्षी-प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. स्थानिक भाषा, पाककला व वास्तुकला नाहीशा होणे हा स्थानिक संस्कृतीचा विनाश आहे. एकल संस्कृती (मोनो कल्चर) घातक आहे. संस्कृती ही इतर सजीव यंत्रणांसारखीच वृद्धिंगत होते. त्यात उत्परिवर्तन (म्युटेशन) घडत जाते, तशीच ती कालांतराने कमकुवत होऊन ऱ्हास पावते. आपण अशाच सभ्यतेच्या कडेलोटाच्या टप्प्यावर उभे आहोत. हे ऱ्हासपर्व समजून घेणे आवश्यक आहे. यासंबंधी लॉरेन्झ यांनी केव्हाच सांगून ठेवले आहे :  ‘आपल्या सभोवताली असलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाच्या बदलाचा वेग मानवाला असह्य़ होत असून त्याच्याशी जुळवून घेताना दमछाक होत आहे. पूर्वी िहसक होणाऱ्या मनोरुग्णास आवरण्याकरिता अजिबात हालचाल होऊ नये म्हणून करकचून बांधून ठेवणारे जाकीट घातले जायचे. आपण घातलेले असे ‘सांस्कृतिक जाकीट’ वरचेवर तंग होत आहे.’

लिओनार्दो दा विंची हा मानवी इतिहासातील अद्वितीय प्रज्ञावंत होता. त्याने चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला, संगीत, गणित, अभियांत्रिकी, शरीररचनाशास्त्र, नकाशाविज्ञान.. अशा अनेक ज्ञानशाखांमध्ये अनन्यसाधारण कार्य करून ठेवले. त्याच्या तार्किक विचारपद्धतीमुळे प्रबोधन युग अवतरले. लॉरेन्झ म्हणतात : ‘पंधराव्या शतकातील तो एक चमत्कार होता. परंतु यानंतर अशी व्यक्ती होणे नाही. विशेषीकरण, जीवघेणी स्पर्धा व घाई यांमुळे आता प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानाचा आवाका हा वरचेवर आकुंचित होत आहे. नोकरी वा व्यवसायाकरिता विशेषीकरणाचा दबावदेखील प्रचंड आहे. या विशेषीकरणामुळे जगाविषयी समग्र दृष्टिकोन तयार होऊ शकत नाही. विखंडित दृष्टीमुळे जिज्ञासा कमी होत जाते आणि जग किती सुंदर आहे हे लक्षात येऊ शकत नाही.’

मनुष्य हा सामाजिक व सांस्कृतिक प्राणी आहे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय, हा प्रश्न विचारी माणसाला सदैव पडत असतो. त्यातूनच एकटय़ा व्यक्तीच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे काय, असा उपप्रश्न निर्माण होतो. विवेकी गटाचा सदस्य झाल्यावरच व्यक्तीला पूर्णत्व येते. व्यक्ती व तिचे नातेसंबंध यामुळे व्यक्तीच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. एका पिढीकडून पुढील पिढय़ांना ज्ञान, कला व कौशल्य यांचा वारसा दिला जातो. परंतु लॉरेन्झ यांच्या मते, ‘तंत्रज्ञानाच्या वेगामुळे आणि अतिरेकी व्यक्तिवादामुळे दोन पिढय़ांमधील साम्य जवळपास नाहीसे झाले. एवढेच नाही तर त्यांच्यातील संवाद खुंटत चालला आहे. दोन पिढय़ांमधील हितसंबंधात कमालीचे अंतर पडले असून त्यामुळे नातेसंबंध संपुष्टात येताहेत. दोन पिढय़ा एकमेकांना परग्रहावरील मानू लागल्या आहेत. पुढील पिढीला कुठलीही परंपरा नकोशी झाली आहे. याचा अर्थ परंपरा जपून व धरून ठेवा असा अजिबात नाही. परंपरेला सध्याच्या काळानुसार आधुनिक करणे हेच प्रत्येक काळाचे प्रमुख आव्हान व आवाहन असते.’

एकाच कल्पनेने पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ताबा घेतला आणि त्या कल्पनेने इतर प्रेरणांना दाबून टाकले, तर त्या व्यक्तीस मज्जाविकृती झाली असे निदान करण्यात येते. मानवी मन हे काही स्वतंत्र वा अलिप्तपणे घडत नसते. ते माहिती, ज्ञान, क्षमता व आकांक्षा या सामुदायिक घटनांचा आविष्कार असते. सध्या समस्त मानवजातीस जडलेली मज्जाविकृती ही संपत्तीसाठीच्या हावरटपणातून आल्याचे स्पष्टपणे दिसते. हाव व त्यासाठीची स्पर्धा ही मानवाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला बळकावून बसली आहे. सध्याच्या काळात चालू मतप्रवाहाने जगावर नियंत्रण मिळवले असून ते अतिशय घातक आहे. मानवाचा निसर्गापासून काडीमोड झाला आहे. हवा, पाणी व माती यांच्यामध्ये विष कालवले जात आहे. मूल्यांचा व नीतीचा पूर्णपणे विसर पडल्यामुळे तंत्रज्ञान हे साधन न मानता तेच साध्य ठरत आहे. जगाचे नियंत्रण हे असंस्कृतांच्या हातात जात आहे.

समस्त मानवजातीसमोरील धोके दाखवून लॉरेन्झ यांनी म्हटले होते : ‘आपल्यासमोरील संकटांची जाणीव होणारे आता वाढत आहेत. तरुण हे कसे समजून घेतात, यावर आपल्या सर्वाचे भविष्य अवलंबून आहे. त्यांच्यामुळे जनमताचा रेटा वाढू शकतो व परिवर्तन होऊ शकते.’

स्वत:ला संवेदनशील समजणाऱ्यांकरिता लॉरेन्झ यांनी प्रश्न विचारून ठेवले आहेत. मात्र, ते अनिवार्य की ऐच्छिक ही निवड आपली!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 4:01 am

Web Title: civilization and its discontents brave new world civilized man eight deadly sins
Next Stories
1 .. आणि पुस्तके युद्धावर गेली!
2 बुकबातमी : फ्रान्स आणि भारताचं (असंही) साटंलोटं!
3 काही उत्तरे, नवे प्रश्न..
Just Now!
X