विद्युत भागवत

हे टकराव म्हणजे ‘चकमकी’ नव्हेत.. ते अगदी वेगळ्या प्रकारचे होते आणि आहेत. स्त्रिया आणि विकासाधिष्ठित अर्थशास्त्र यांच्या अभ्यासात आयुष्य घालवणाऱ्या अनेक महिला अर्थशास्त्रज्ञांनी ओळखलेले आणि संकल्पनांच्या पातळीवर स्वत:देखील झेललेले हे टकराव आहेत. अशा अर्थशास्त्रज्ञांपैकी एक देवकी जैन. त्यांच्या लिखाणातून त्यांची आणि त्यांच्या कार्याची होणारी ओळख..

देवकी जैन या स्त्रीवादी अर्थशास्त्राच्या चौकटीत भारतीय संदर्भात विशेषत स्त्रीप्रश्नाची गुंतागुंत लक्षात घेऊन काम करणाऱ्या एक महत्त्वाच्या विचारवंत आहेत. आपल्याला ज्या ग्रंथाचा परिचय करून घ्यायचा आहे त्यात १९७० आणि १९८० या दोन दशकांमध्ये लेखिकेने लिहिलेले निबंध येतात. या निबंधांमध्ये सार्वजनिक पातळीवरील धोरणांविषयी, विकासाधिष्ठित अर्थशास्त्राविषयी आणि स्त्रियांविषयी चर्चा केली आहे. सुरुवातीला विकासाच्या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांना सामावून घ्यावे यासाठी स्त्रियांविषयी पहिली जागतिक परिषद मेक्सिकोमध्ये १९७५ मध्ये झाली आणि १९७५ ते १९८५हे दशक स्त्रियांचे दशक म्हणून जाहीर झाले. त्यानंतर नरोबीमध्ये दुसरी जागतिक परिषद झाली आणि सर्व देशांमधील नोकरशाहीला एक प्रकारे शह बसला. विकासाच्या चर्चाविश्वाचे लिंगभावीकरण होताना आधी अस्तित्वात असणाऱ्या कल्पना, प्रकल्प आणि एकूणच विकासविषयक धोरणे आणि कार्यक्रम यांना आव्हान दिले गेले. देवकी जैन यांचे महत्त्व असे की, असे सगळे घडताना जागतिक पातळीवर उत्तर गोलार्धाच्या- पाश्चात्त्य देशांच्या- छायेखाली आणि त्यातील विचारवंतांच्या अधिपत्याखाली हे प्रयत्न होत आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. या ग्रंथात लेखिकेने भारताच्या भूमीवर विकासाच्या अनुभवाकडे झालेले दुर्लक्ष दाखवून दिलेले आहे.

३९८ पृष्ठांचा हा ग्रंथ एकूण १५ प्रकरणांमध्ये सिद्ध झालेला आहे, आणि विशेष म्हणजे फातिमा मेरीनिसी या दक्षिणेतून आलेल्या अत्यंत बुद्धिमान आणि धीट स्त्रीवादी विचारवंतांना अर्पण केला आहे. देवकी जैन आणि त्यांच्या बरोबरीने वीणा मुजुमदार, नीरा देसाई अशा पहिल्या पिढीतील अभ्यासकांनी भारतीय स्त्रियांच्या दर्जाविषयक अहवालाला भरीव आशय आणला आणि त्यांच्या प्रयत्नांमधून स्त्री-चळवळीला आणि स्त्रीप्रश्नाच्या आकलनाला नवे परिमाण लाभले. देवकी जैन यांनी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून विकास या संकल्पनेमध्ये मोजमाप करण्याच्या रीतीमध्ये नवी भर टाकून स्त्रियांच्या ‘अदृश्य’ कामावर प्रकाश टाकला. स्त्रिया फक्त पुनरुत्पादनाचे आणि संगोपन, संवर्धनाचे काम करतात अशा कल्पनांना शह देऊन स्त्रियांचे उत्पादनाचे कामही अधोरेखित केले. आपल्या हातात आहे तो खंड दुसरा आहे. त्यात स्थूलमानाने दारिद्रय़, सामाजिक आणि राजकीय सत्ता यामध्ये असणारी लिंगभावात्मक परिमाणे मांडली आहेत. अर्थात हे निबंध अर्थशास्त्राच्या बरोबरीने नीतिमत्ता आणि समभाग व्यवस्था याकडे लक्ष देऊन एकाअर्थी गांधीवादी विचारसरणीच्या दिशेने आपल्याला नेतात. यातील अंतिम निबंध हा ‘नव्या जगातील पुनव्र्यवस्था’ या शीर्षकाचा आहे. यामध्ये संपूर्ण जगभर दिसणारी विस्कळीत व्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत कशी होईल याविषयी सूचना दिल्या आहेत.

या खंडातील निबंध भारतातील विकासविषयक प्रारूपाच्या मागे असणाऱ्या सूक्ष्म धोरणांचा विचार करतात. लिंगभावाचे परिप्रेक्ष्य घेऊन त्या भिंगातून प्रमुख प्रवाही चौकटीत वापरल्या जाणाऱ्या सरधोपट कल्पनांवर लेखिका भाष्य करतात. मुख्य म्हणजे जी काही माहिती (डेटा) अशा धोरणांसाठी मिळविली जाते त्याबद्दलही चिकित्सक दृष्टिक्षेप या ग्रंथात आढळतो. म्हणजे, काय लपविले जाते, काय सांगितले जाते, कोणत्या हेतूने माहिती दिली जाते आणि आकडेवारी तयार केली जाते यावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. म्हणजे असे की, मोठमोठी प्रारूपे तयार केली जातात, त्यामधून धोरणे आणि विचारप्रणाली तयार केली जातात, ती आकडेवारीच नुसती चुकीची नसते तर अनेकदा प्रत्यक्ष जमिनीवर असलेल्या घटितातील महत्त्वाचे मुद्देच न ओळखणारी असते आणि त्यातून दिशाभूल होते. गोळा केलेली माहिती हीच विवेकाधिष्ठित निवड केलेली माहिती असे ठरविले जाते आणि मग त्यात होणाऱ्या चुका दुरुस्त करणे हेच एक मोठे आव्हान ठरते, असे लेखिकेने मांडले आहे.

या लहानशा पुस्तक परिचयात आपल्याला सर्व ग्रंथाचा आढावा घेणे शक्य नाही. परंतु, प्रकरण नववे, जे गाभ्याचे आहे, त्याचा धावता आढावा घेणे शक्य आहे. या प्रकरणात देवकी जैन यांचा व्यक्तिगत जीवनातील प्रवास एक संशोधक म्हणून कसा घडला याचा परिचय होतोच, परंतु विकासाच्या पर्यायी चौकटीची स्त्रीप्रश्नाच्या दृष्टीने मांडणी करण्यात त्यांनी सहभाग कसा घेतला हेही कळते. एकाअर्थी हा एक इतिहासाचा धांडोळा आहे. ‘विकास’ नावाच्या चौकटीची गृहीत धरलेली व्याख्या प्रमाण मानायची आणि त्यात स्त्रियांना घालून ते रसायन ढवळायचे, या गेली काही वर्षे दिसून आलेल्या आणि कमीअधिक प्रमाणात कायम राहिलेल्या प्रयत्नांबद्दल चिकित्साही आहे. हे प्रकरण आपल्याला ‘स्त्रिया’ नावाच्या साचेबंद विचाराबद्दल जागरूक करते आणि एकीकडे ‘भारतीय स्त्रिया’ नावाच्या विचाराकडे नव्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याची सुरुवात कशी व्हायला हवी हेही कळते. स्त्रियांनी पुरुषांसारखे होऊ नये आणि लिंगभावाची गुंतागुंत लक्षात घ्यावी हे लक्षात आल्यावर भारतातील अभ्यासकांनी संशोधन आणि कृती यासाठी पाया कसा निर्माण केला हेही कळते. त्या टप्प्यावर बिगर शासकीय संघटना तयार होताना अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी स्त्रिया आणि दारिद्रय़ या विषयावर मांडणी करण्यासाठी भारतातील अभ्यासकांना आमंत्रित केले. भारतातील स्त्री-अभ्यासाचे संस्थात्मीकरण, ‘काली फॉर विमेन’ यांसारखी स्त्री-अभ्यासकेंद्री प्रकाशने आणि ‘महिला हाट’ यांसारख्या बाजारपेठेतून स्त्रियांना उत्पादक म्हणून तीन दशकांपूर्वी कसा वाव निर्माण केला गेला याची मांडणी येथे आहे.

आत्ताच्या काळातील जागतिकीकरण आणि दारिद्रय़ाचे स्त्रीकरण लक्षात घेता अमर्त्य सेन यांनी ज्या प्रकारे ‘विकास म्हणजे स्वातंत्र्य’ असे म्हटले आणि भूक आणि निरक्षरता यापासून स्वातंत्र्य ही मांडणी केली त्याकडे येथे लक्ष वेधले आहे. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक न्याय या विषयावर काम करणारी बरीचशी मंडळी कोर्ट-कचेऱ्या, कायदा आणि न्यायव्यवस्था यांत गुंतलेली दिसतात. त्यांना हक्काविषयी बोलणे हे जास्त आकर्षक वाटते आणि त्यात घसरत गेल्यावर विकासाचा खरा दृष्टिकोन दुर्लक्षित होतो हा देवकी जैन यांच्या या मांडणीतील गाभा आहे. त्या त्या चौकटीत हक्काची मागणी करणे ही गोष्ट जेव्हा महत्त्वाची ठरते तेव्हा त्यातून काही सकारात्मक मूल्ये जरी येत असली तरी अशा प्रयत्नातून देशाच्या सार्वभौमत्वावर भर देणे कठीण होऊन बसते. तसेच वाढत्या जागतिकीकरणात, ध्रुवीकरणाच्या सार्वत्रिक भोवऱ्यामध्ये आपला देश सापडण्याची शक्यता वाटते. म्हणजे एकीकडे आर्थिक पातळीवर दक्षिण आशियाच्या बाहेर ‘यशस्वी विकासा’ची बेटे दिसतात. परंतु, दक्षिण गोलार्धातील आपण सर्वजण त्यात काहीतरी गमावतो आहोत. भारतीय स्त्रीवादी अभ्यासकांनी वेळोवेळी ज्ञानाच्या सिद्धांकनाला आणि व्यवहाराला प्रश्नांकित केले आहे. तसेच या घडणीकडेही चिकित्सकपणे पाहिले पाहिजे.

ज्या स्त्रीवादी अभ्यासक ‘विकास’ नावाच्या संकल्पनेचा आधार घेऊन उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील विभेदनाविरोधी विचार करतात त्यांनी एक शहाणे गटबंधन करून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे ठरविले आहे. देवकी जैन म्हणतात की, तरीसुद्धा उत्तर गोलार्धातील राजकीय आणि आर्थिक नियोजन अजूनही वर्चस्ववादी पद्धतीने या प्रयत्नांना शह देऊ पाहतात. लेखिकेच्या मते आता भारत देशाच्या मर्यादेमध्ये काम करताना, गटबंधने आणि संघर्ष उभे करताना आपापल्या देशांमधील लोकशाही खोलवर रुजवत राष्ट्रपातळीवरील आपले सार्वभौमत्व बळकट केले पाहिजे. आपण जर स्त्रीवादी असू तर जैन यांच्या मते, जागतिक पातळीवर आपली प्रादेशिकता मांडली पाहिजे. आर्थिक आणि राजकीय सत्तेसंदर्भात विकेंद्रीकरण यावे म्हणून अशा संस्था निर्माण झाल्या पाहिजेत की, ज्यामुळे आपल्याकडच्या प्रादेशिकतेला वाव मिळेल.

देवकी जैन यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास स्त्री-चळवळींशीसुद्धा संवाद साधणारा आहे. स्थूल आणि लघु पातळीवर काम करून स्त्री-चळवळीने जनांच्या डोक्यावर कोसळणाऱ्या आर्थिक कार्यक्रमांना शह देऊन, नवे वळण दिले पाहिजे अशी त्यांची मांडणी आहे. असे करण्यासाठी त्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाची दखल घेतात. तसेच अरुंधती रॉय यांच्या मांडणीचीही दखल घेतात. देवकी जैन सुचवितात की- स्त्रियांच्या चळवळी, ज्ञाननिर्मिती, स्त्रियांची बदलणारी कामे, आकाराला येत असलेली नवी विश्वपातळीवरील व्यवस्था आणि त्यातून घडणारी सार्वजनिक धोरणे याकडे लक्ष देतच स्त्रीवाद्यांना पुढे जाता येईल. सध्याच्या हुकूमशाही वातावरणात देवकी जैन सुचवतात की, आपली दिशा कामगारांना, कष्टकऱ्यांना मातीशी संबंध राखून संरक्षण देणे ही असली पाहिजे. तसेच ग्रामपंचायतीसारख्या तळागाळातील संरचना आणि रोजगार हमीसारख्या योजना जपणे अशा कृती झाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना मोठय़ा बाजारपेठेशी जोडले पाहिजे. पुन्हा एकदा मूठभर मिठाचा सत्याग्रह हीच संकल्पनात्मक दिशा स्त्री-चळवळीने घेतली पाहिजे आणि एकूण सनिकीकरण, शस्त्रास्त्रे, युद्धाची भाषा यांविरुद्ध उभे राहिले पाहिजे, याला पर्याय नाही.

सदर ग्रंथ अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना तर उपयोगी पडेलच, परंतु स्त्रीप्रश्नाच्या अभ्यासकांनाही दिशा दाखविणारा ठरेल.

परंतु, प्रश्न मनात राहतोच की, गांधीवाद, मार्क्‍सवाद आणि एकूण परिवर्तनाचा विचार यामध्ये काम करणाऱ्यांचा खरा संवाद कसा होईल? नाहीतर आजही सगळ्यांची दुकाने स्वतंत्रपणे चालूच आहेत आणि विजय मात्र मूठभरांच्या ‘आहे रे वर्गा’चाच होतो आहे..

क्लोज एन्काउंटर्स ऑफ अनदर काइंड 

लेखिका : देवकी जैन

प्रकाशक : सेज इंडिया + योडा प्रेस

पृष्ठे : ३९८, किंमत : ८८८ रुपये

(लेखासोबतचे छायाचित्र : सुमीत मल्होत्रा, एक्स्प्रेस वृत्तचित्र संग्रहातून)