चंद्रकांत पाटील

जगाचा साकल्यानं विचार करणाऱ्या एका लेखकाशी साधलेला दीर्घ-संवाद तीन खंडांमध्ये पुस्तकरूपानं येतो, तेव्हा लेखकाची जीवनदृष्टी तर कळतेच, पण त्यातले अंतर्विरोध आणि सुसंगती हेही ध्यानात येत राहातं.. 

लॅटिन अमेरिकी साहित्याकडे जगाचं विशेष लक्ष गेलं ते १९६०-७० च्या दशकांत. हा लॅटिन अमेरिकी कथात्म साहित्याचा सुवर्ण काळ होता. हूलिओ कोर्टाजर, कार्लोस फ्युएन्ट्स, मारिओ वर्गास योसा आणि गॅब्रिएल गार्सिया मार्केस यांच्या या काळातील लेखनानं केवळ स्पॅनिशच नाही तर जगभरातल्या कथात्म लेखनाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या लेखकांमुळेच ‘जादूई वास्तववादा’ची संकल्पना जगभर  पोहोचली. या संकल्पनेची पाळंमुळं आधीच्या पिढीतल्या होरहे लुइस बोर्हेस (किंवा खोरखे लुइस बोर्खेस) या प्रतिभाशाली लेखकाच्या साहित्यात होती. बोर्हेसनं सगळ्या परवर्ती स्पॅनिश साहित्यावर खोलवरचा परिणाम केलेला आहे, हे कोर्टाजरपासून अगदी अलीकडच्या रॉबेर्तो बोलॅनोपर्यंत सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. बोर्हेसला नोबेल पुरस्कार न मिळाल्याची खंतही सगळ्यांनीच बोलून दाखवली आहे. बोर्हेस हा असा संपूर्ण स्पॅनिश साहित्याच्या केंद्रस्थानी असलेला ‘लेखकांचा लेखक’ आहे!

बोर्हेसचा जन्म २४ ऑगस्ट १८९९ रोजी झाला. घरची परिस्थिती संपन्न आणि वडील (बोर्हेसच्या मते अपयशी) साहित्यिक होते. बोर्हेसनं शाळेत असतानाच स्पॅनिशसोबत इंग्रजी शिकून इंग्रजी साहित्याचं सखोल वाचन केलं होतं. त्यामुळे आपोआपच त्याला इंग्रजीतून जगभरचं अभिजात साहित्य वाचायला मिळालं. वयाच्या ५० व्या वर्षीच त्याची दृष्टी गेली. दृष्टी असती तर आपण कधीच घराबाहेर न पडता कायम वाचत राहिलो असतो, असं त्यानं लिहून ठेवलं आहे. बोर्हेसला ८६ वर्षांचं दीर्घ आयुष्य लाभलं होतं. अंधत्व आल्यावर त्यानं कविता लिहिण्याकडेच जास्त लक्ष दिलं. मात्र तो ओळखला जातो त्याच्या कथांमुळे. त्यानं कथा, निबंध, समीक्षा, स्तंभलेखन, टिपा असं चौफेर आणि अफाट लिहून ठेवलेलं आहे. शिवाय अनेक अनुवाद करून त्यानं लॅटिन अमेरिकी वाङ्मयीन संस्कृतीत मोलाची भर घातलेली आहे. इंग्रजी साहित्याचा प्राध्यापक आणि राष्ट्रीय ग्रंथालयाचा प्रमुख म्हणून दीर्घ काळ व्यग्र राहिल्यानंतर त्यानं बराच जगप्रवास केला. त्याला अभ्यागत प्राध्यापकाचं व्याख्यानांचं आणि अनेक विदेशी पुरस्कारांचं निमित्त होतं. त्याचं समग्र साहित्य इंग्रजीत अनुवादित झालेलं आहे.

बोर्हेसच्या १९४० च्या दशकात प्रकाशित झालेल्या ‘फिक्सिओनेस’ आणि ‘अल अलेफ’ या दोन कथासंग्रहांमुळे लॅटिन अमेरिकी साहित्यात एक नवा अध्याय सुरू झाला. या कथा रूढ आणि प्रस्थापित कथांपेक्षा खूप वेगळ्या होत्या. कथानकाचा अभाव, दररोजच्या जगण्यातून अनुभवाला येणाऱ्या घटनांचा अभाव, इतरांच्या कथात्म साहित्यातून उचललेली किंवा कल्पनेतून निर्माण केलेली पात्रं, एखाद्या गहन प्रमेयाची उकल करावी तशी गहन प्रश्नांची उकल करण्याची वृत्ती, आधिभौतिक समस्यांना केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न, प्रख्यात तात्त्विकता आणि अद्भुतरम्यता यांची अविश्वसनीय सरमिसळ, अचंबित करणारी कल्पनाशीलता, फँटसीची अतीव ओढ, अंतर्मनातील गूढतेसाठी विलक्षण प्रतिमा-प्रतीकांचा वापर, अंत:प्रज्ञेवरचा दृढ विश्वास, संदिग्धतेचा सढळ वापर अशा अनेक कारणांमुळे बोर्हेसच्या कथा आकलनासाठी कठीण, गुंतागुंतीच्या, तात्त्विक समस्यांचा घट्ट पीळ असलेल्या आणि जादूई वास्तवाचं संसूचन करणाऱ्या आहेत. जगभरातल्या विविध धार्मिक- सांस्कृतिक- साहित्यिक संदर्भामुळे त्या जास्तच संदिग्ध होतात. बऱ्याचदा तर त्या कथात्म आणि निबंधात्म होतात आणि त्यांचं स्वरूप ‘एसे-फिक्शन’ असं होतं.

एवढय़ा लांबलचक प्रस्तावनेनंतर मूळ मुद्दय़ाकडे वळू या.

ओस्वाल्डो फेरारी या तरुण प्राध्यापकाने १९८४ मध्ये म्युनिसिपल रेडिओवर बोर्हेसशी संवादाचा कार्यक्रम ठरवला. बोर्हेस त्याला तयार झाला. तो कार्यक्रम बराच गाजला. त्यानंतर काही ठरावीक अंतरानं असा उत्स्फूर्त कार्यक्रम घ्यायचं ठरलं. आणि अशा संवादाचे एकूण ११८ कार्यक्रम झाले. हा संवाद नंतर पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. त्याचे एकूण तीन खंड झाले. त्यांचा इंग्रजी अनुवाद ‘कन्व्हर्सेशन्स- १, २, ३’ नावाने अनुक्रमे २०१४, २०१५ आणि २०१७ मध्ये प्रकाशित झाला.  हे तिन्ही भाग कोलकात्याच्या ‘सीगल प्रकाशन संस्थे’नं प्रकाशित केले आहेत. यातल्या पहिल्या भागाचा अनुवाद जेसन विल्सन यांनी केला असून त्यात एकंदर ४५ संवादनं आहेत. दुसऱ्या भागाचा अनुवाद टॉम बोलनं केला आहे आणि यातही ४५ संवादनं आहेत. तिसऱ्या भागाचे अनुवादक अँथनी एडकिन्स असून यात फक्त २८ संवादनं आहेत. जवळपास ९०० पेक्षा पानांचा हा मजकूर अतिशय वाचनीय आहे. हे संवादन ज्या काळात घडलं त्यावेळी बोर्हेस ८४ वर्षांचा होता, तर त्याच्याशी संवाद करणारा फेरारी वयाच्या तिशीत होता. फेरारी हादेखील बहुश्रुत वाचक होताच, शिवाय संवेदनाशील कवी, समीक्षक, प्राध्यापक आणि अनुवादक म्हणूनही विख्यात होता. समृद्ध, परिपूर्ण, गतिमान आयुष्य जगणारा बोर्हेस आयुष्याच्या अखेरच्या पर्वात प्रगल्भतेनं बोलत होता आणि तेवढय़ाच उत्कटतेनं त्याला बोलतं करणारा फेरारी त्याला नवीन नवीन विषय पुरवत होता. यातला प्रत्येक संवाद वेळेच्या निश्चित मर्यादेमुळे तीन-चार पानांच्या वर जात नाही, तरीही त्यातील वाचनीयता गुंतवून ठेवणारी आहे. साहित्याविषयी खोलवर आस्था असणाऱ्या वाचकांसाठी हा सहज बौद्धिक संवादनाचा ठेवा अंतर्मुख करणारा आणि साहित्याबद्दल नव्या जाणिवा निर्माण करणारा, विचारांना उद्युक्त करणारा आहे.

बोर्हेसनं आपल्या दीर्घ आयुष्यात अनेक मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्या प्रकाशितही झालेल्या आहेत. मेलव्हील पब्लिशिंग हाऊसनं ‘द लास्ट इंटरव्ह्य़ू’ या मालिकेत बोर्हेसच्या तीन मुलाखतींचं एक पुस्तक २०१३ मध्ये प्रकाशित केलं होतं. पण ‘कन्व्हर्सेशन्स’चं स्वरूप मुलाखतींपेक्षा खूप वेगळं आहे. इथं प्रत्येक वेळी फेरारी बोर्हेसला एक विषय सुचवतो, तो उत्स्फूर्तच असतो, आणि त्यावर बोर्हेस बोलत राहतो. अधूनमधून फेरारी त्याला काही विचारातही असतो किंवा बोर्हेस काही विसरल्यास त्याला आठवण करून देत असतो. बोर्हेसच्या बोलण्यात आठवणी  असतात, चिंतनातून आलेलं ज्ञान असतं, अंत:प्रज्ञा असते, थक्क करून सोडणारी निरीक्षणं असतात, एखाद्या परिचित विषयाची नव्यानं लावलेली संगती असते, अफाट माहिती असते, इतर आवडत्या कवींच्या कवितांची उजळणी असते, इतरांवरची संतुलित टीका असते, खटकणाऱ्या जागांबद्दलची मतं असतात. त्या संवादात साहित्य, संस्कृती, सभ्यता, राजकारण, भौगोलिक प्रदेशांपासून सिनेमाची समीक्षा, क्रिकेटपर्यंतचे असंख्य विषय असतात. वाचकांना विचार करायला लावणारी वाक्ये असतात आणि त्या वाक्यांना सुभाषितांचा, उद्धृतांचा दर्जा लाभलेला असतो. ही उद्धृते अंत:प्रज्ञेतून आणि सखोल चिंतनातून आलेली असतात. तो निव्वळ शाब्दिक पातळीवरचा खेळ न राहता मनात घर करून राहणारा शोध असतो. बोर्हेससारखा सतत आत्मचिंतनात गढून जाणारा, तत्त्वज्ञानावरची पकड ढिली होऊ न देणारा प्रगल्भ लेखकच अशी उद्धृते सहजपणे व्यक्त करू शकतो, हे त्याच्या सर्जनातून दिसून येतं तसं या संवादनातूनही स्पष्ट होतं. सहजपणासोबतच त्याच्या बोलण्यात विनोदबुद्धीही असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संवादनात फेरारी नेहमीच संयत सहभागाची भूमिका बजावतो.

शास्त्रीय संगीताच्या मफलीत एखादा परिपक्व वादक ज्या विनम्रपणे गायकाची साथ करत असतो आणि गायकाचं गाणं फुलवत नेतो तशीच भूमिका फेरारी घेतो. बोर्हेसच्या समग्र साहित्याचं सूक्ष्म वाचन आणि लॅटिन अमेरिकन व जागतिक वाङ्मयाची जाण असलेला फेरारी या संवादनांना वेगळीच उंची मिळवून देतो.

‘कन्व्हर्सेशन्स’च्या तिन्ही भागांत मिळून जास्तीत जास्त संवादनं लेखकांवर आणि साहित्यकृतींवर आहेत. एकूण ११८ पैकी साहित्यविषयक संवादनांचा वाटा ५० टक्के आहे. त्यातही केवळ २५ टक्के संवादनं लॅटिन अमेरिकी लेखकांवर तर ७५ टक्के लॅटिन अमेरिकेबाहेरच्या लेखक आणि साहित्यकृतींवर आहेत. बहुतेकदा लॅटिन अमेरिकी साहित्याचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीशी ओळख नसल्यामुळे त्यावरची संवादनं कंटाळवाणी असतील असा वाचकांचा ग्रह होऊ शकतो. पण या संवादनांतूनही बोर्हेस खूप मोलाच्या गोष्टी सांगून जातो. लॅटिन अमेरिकी लेखकांत फक्त रूबेन देरिओ हाच कवी ओळखीचा वाटतो. बाकीचे लोक बोर्हेसचे समकालीन लेखक म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे बोर्हेसच्या आणि लॅटिन अमेरिकेतल्या वाङ्मयीन संस्कृतीच्या जडणघडणीतील महत्त्व लक्षात येते. जागतिक वाङ्मयातल्या प्लेटो, सॉक्रेटिसपासून आर्थर शोपेनहावर, नीत्शे, बटरड्र रसेलपर्यंतच्या तत्त्ववेत्त्यांची चर्चा करतानाच तो सनातन भारतीय परंपरेतल्या तत्त्वज्ञानाचीही चर्चा करतो. ‘भारतीयांनी युरोपच्या फार आधीच तत्त्वज्ञानातले सगळे शोध लावलेले आहेत, पण त्यांची शोधपद्धती वेगळी असल्यामुळे युरोपियनांना ती कळणे अवघड आहे,’ असा त्याचा निष्कर्ष आहे! ‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानही भारतीयांना समजण्यास अभ्यासपद्धतीचाच अडसर आहे,’ असेही त्याचे मत आहे. त्याने पाश्चिमात्य महाकाव्याची केलेली मीमांसा नवीनच आहे. शेक्सपिअरबद्दल तर त्याचे स्पष्टच मत आहे की, ‘शेक्सपिअर जेवढा लॅटिन अमेरिकनांना कळाला आहे तेवढा इंग्लंडमधील विद्वानांनाही कळालेला नाही!’ त्याच्या एकूण संवादनांत आलेली फ्लाबेर, व्हर्जिनिया वूल्फ, किपलिंग, जॉइस, मार्क ट्वेन, स्टीव्हन्सन, दोस्तोव्हस्की, काफ्का, ऑस्कर वाइल्ड, बर्नार्ड शॉ  इत्यादी लेखकांबद्दलची मतं अगदीच वेगळी आणि अनपेक्षित आहेत. तिन्ही खंडांच्या अनुक्रमणिकांवर नुसती नजर टाकली तरी त्याच्या व्यापक साहित्य चिंतनाची कल्पना येऊ शकते. उदाहरणादाखल काही शीर्षकं : ‘ऑर्डर अ‍ॅण्ड टाइम’, ‘कॉनरॅड, मेल्व्हील अ‍ॅण्ड द सी’, ‘आर्ट शुड फ्री इटसेल्फ फ्रॉम टाइम’, ‘काफ्का कूड बी पार्ट ऑफ ह्य़ुमन मेमरी’, ‘एथिक्स अ‍ॅण्ड  कल्चर’, ‘पोएटिक इंटेलिजन्स’, ‘न्यू डायलॉग इन पोएट्री’, ‘बुद्धा अ‍ॅण्ड पर्सनॅलिटी’, ‘रिअ‍ॅलिस्ट अ‍ॅण्ड फँटसी लिटरेचर’, ‘फँटॅस्टिक लिटरेचर अ‍ॅण्ड सायन्स फिक्शन’, ‘स्कँडिनेव्हियन मायथॉलॉजी अ‍ॅण्ड अँग्लो-सॅक्सन एपिक्स’ ‘द डिटेक्टिव्ह स्टोरी’, ‘लिबरॅलिझम अ‍ॅण्ड नॅशनॅलिझम’, ‘द मून लँडिंग’, ‘रशियन रायटर्स’, इत्यादी.

या पुस्तकांतून कथात्म साहित्याबद्दलची बोर्हेसची निरीक्षणं कळतात तशी त्याच्या सर्जनाची प्रक्रियाही कळते. त्यामुळे त्याच्या गुंतागुंतीच्या  साहित्याची उकल होण्यास मदत होते. कविता हा त्याच्या विशेष आवडीचा साहित्यप्रकार आहे. ‘कवितेसाठी भावना आवश्यक असतात, पण भावनिक उत्कटता आवश्यक असतेच असे नाही. उत्कटतेशिवायही बौद्धिकता आणि भावात्मकता यांचं रसायन श्रेष्ठ कवितेला जन्म देत असतं,’ असं तो मानतो. कवितेच्या संदर्भात त्यानं केलेली इमर्सन, व्हिटमन, अ‍ॅलन एडगर पो यांची चर्चाही उद्बोधक आहे. येटसबद्दलही त्याचं मत असंच विलक्षण आहे. तो म्हणतो, ‘वूण्डेड, वूण्डेड बाय ब्यूटी’! काळाविषयीचं त्याचं निरीक्षण : ‘काळातून मुक्त होऊन काळाच्या बाहेर जगणं ही माणसाची एक महत्त्वाची आकांक्षा आहे.’ धर्म हा फक्त नैतिकतेच्या आधारावरच स्वीकारला जाऊ शकतो, यावर तो ठाम होता. तो बौद्ध धर्माला सर्वात उन्नत आणि श्रेष्ठ मानतो. भविष्यात बौद्ध धर्मच विश्वधर्म होऊ शकतो, असं त्याला वाटत होतं. विनोदात काही तरी अविवेकत्व असते आणि जादूही असते, असं त्याचं मत होतं. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यकच आहे, पण त्यावर बंधन असलंच पाहिजे;  त्याशिवाय सर्जनाच्या नव्यानव्या शक्यता आणि प्रयुक्त्या निर्माणच होणार नाहीत,’ असाही त्याचा युक्तिवाद होता. सौंदर्यात्मक साहित्यकृती दु:खातूनच निर्माण होतात, कारण सुख हे अंतिमत: साध्यच असते, हे त्याचं मत. स्वत:ला तो ‘निरुपद्रवी अराजकवादी’ मानत असे; कमीत कमी शासन आणि जास्तीत जास्त व्यक्तित्व जपणं त्याला आदर्श वाटत असे. त्याच्या सगळ्या मतांमागे कमालीची स्पष्टता आणि सहजपणा दिसून येतो.

तो हुकूमशाहीचा कट्टर विरोधक होता आणि त्याची किंमतही त्याने चुकवली होती. शिवाय साम्यवादाचाही तो प्रखर विरोधक होता. पण आश्चर्य म्हणजे १९६७ मध्ये नोबेल पुरस्काराच्या यादीत अगदी अखेरच्या क्षणी त्याचे नाव गळाले आणि त्या वर्षीचा पुरस्कार लॅटिन अमेरिकेच्याच मिगुएल अँजेल अस्तुरियासला मिळाला; कारण : बोर्हेसने लॅटिन अमेरिकी साहित्याचा सर्वोच्च पुरस्कार एका हुकूमशहाच्या हस्ते स्वीकारला होता.

‘कन्व्हर्सेशन्स’मुळे विसाव्या शतकातल्या एका प्रतिभाशाली लेखकाचं अंतरंग उलगडत जातं आणि वाचकांच्याही जाणीव विस्तारायला मदत होते, एवढं निश्चित!

‘कन्व्हर्सेशन्स’

लेखक : होरहे लुइस बोर्हेस / ओस्वाल्डो फेरारी

इंग्रजी अनुवाद : खंड १- जेसन विल्सन,  खंड २- टॉम बोल,  खंड ३- अँथनी एडकिन्स

प्रकाशक : सीगल बुक्स, कोलकाता

पृष्ठे : अनुक्रमे ३५२, ३५२, २०८

किंमत : अनुक्रमे ५९५ रु., ७५० रु., ५९९ रु.

patilcn43@gmail.com