बातमी रिचर्ड प्रेस्टन यांच्या नव्या कोऱ्या पुस्तकाची आहे. पण त्याआधी हे प्रेस्टन कोण, हे जाणून घ्यायला हवं. १९८७ साली ‘फर्स्ट लाइट’ हे खगोलशास्त्राविषयीचं पुस्तक लिहून प्रकाशझोतात आलेले प्रेस्टन गेल्या तीन दशकांहून अधिक काळ लिहितेच आहेत. पण त्यांच्या लेखनाचे विषय हे निरनिराळे आहेत. म्हणजे त्यांनी कादंबरीलेखन केलं, त्यातही थरारकथा त्यांनी लिहिल्या आणि संशोधनात्मक लेखनही त्यांनी केलं. पण सोप्या भाषेत, सामान्य वाचकांनाही समजेल, अशी प्रेस्टन यांची शैली. ‘न्यू यॉर्कर’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या लेखनातून याचा प्रत्यय जाणत्या वाचकांनी घेतला असेलच. पहिल्या पुस्तकानंतर काही काळ खगोलशास्त्र आणि त्याशी निगडित घडामोडींभोवतीच लिहिणाऱ्या प्रेस्टन यांच्या लेखनास ‘न्यू यॉर्कर’मधील त्यांच्याच एका लेखानंतर निराळे वळण मिळाले. १९९२ साली प्रसिद्ध झालेला हा लेख ‘ईबोला’ या रक्तस्रावी तापास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूवर होता. त्या लेखानंतर काही काळात याच विषयावर प्रेस्टन यांनी ‘द हॉट झोन’ हे पुस्तक लिहिलं, ते गाजलं. त्यानंतर ‘द कोब्रा इव्हेण्ट’ ही जैवअस्त्रांच्या वापरातून घडणारा हाहाकार चित्रित करणारी कादंबरी आणि अशाच विषयावरचं ‘द डेमॉन इन द फ्रीजर’ हे किंवा २००८ साली प्रसिद्ध झालेलं जीवघेण्या विषाणूंबद्दलचं ‘द पॅनिक लेव्हल फोर’ हे पुस्तक किंवा प्रसिद्ध लेखक मायकल ख्रिस्टनच्या निधनानंतर त्याची अपूर्ण राहिलेली तंत्र-थरार कादंबरी ‘मायक्रो’चं लेखन पूर्ण करण्याची कामगिरी.. अशी लेखनकामाठी प्रेस्टन यांनी केली.

परंतु गेलं दशकभर प्रेस्टन यांचं स्वतंत्र पुस्तक आलं नव्हतं. ते का, याचं उत्तर त्यांच्या नव्या पुस्तकाच्या घोषणेनं मिळालं आहे. गेली तीन दशकं ‘ईबोला’ या विषाणूबद्दलच्या संशोधनाचा ध्यास घेतलेल्या प्रेस्टन यांचं नवं पुस्तकही त्याच विषयावरचं असून ‘क्रायसिस इन द रेड झोन’ या शीर्षकानं ते पुढील आठवडय़ात- २३ जुलै रोजी ‘पेंग्विन’तर्फे प्रकाशित होणार आहे!