News Flash

अव-काळाचे आर्त : …पण येथिल हर्ष नि शोक हवा!

रोजच्या आयुष्यात, जवळपास प्रत्येक मिनिटाला, आपल्यासमोर काही पर्याय समोर ठाकतात.

|| नंदन होडावडेकर

केवळ हलाखीच्या परिस्थितीतच नव्हे; तर खाण्यापिण्याची, कायदासुव्यवस्थेची वा नोकरीधंद्यांच्या उपलब्धतेची कसलीही ददात नसतानाही उपलब्ध पर्यायांचा आणि स्वातंत्र्याचा संकोच होऊ शकतोच, हे दाखवून देणाऱ्या कादंबरीविषयी…

रोजच्या आयुष्यात, जवळपास प्रत्येक मिनिटाला, आपल्यासमोर काही पर्याय समोर ठाकतात. त्यांतल्या एकाची निवड करणं (‘कुठलाच पर्याय न निवडणं’ हाही एक पर्यायच झाला) तर भागच असतं. प्रत्येक माणूस आपला कल, स्वभाव, पूर्वानुभव, त्या-त्या वेळची मन:स्थिती आणि नीरक्षीरविवेकबुद्धी पणाला लावून त्या-त्या वेळचा निर्णय घेत असतो. या सतत चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या मानसिक ऊर्जेचा, ज्याला ‘माइण्डफुलनेस’ म्हणता यावं अशा भानाचा मर्यादित साठा सतत खर्च होत असतो. सध्याच्या आधुनिक युगात आपल्यासमोर उभ्या असणाऱ्या प्रश्नांची आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची संख्या तसेच व्यामिश्रता वाढत चालली आहे.

या मानसिकदृष्ट्या थकवून टाकणाऱ्या सततच्या निवडप्रक्रियेला एक पर्याय म्हणजे, कमी महत्त्वाच्या गोष्टी आपसूकच आपल्या दैनंदिन चाकोरीचा भाग बनतील हे पाहणं. उदाहरणार्थ, क्रिकेटच्या एखाद्या खेळाडूनं सततच्या सरावानं अंगी बाणवलेला एखादा फटका असो वा माजी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखे एकाच रंगाच्या कपड्यांचे अनेक जोड आपल्या कपाटात ठेवणं असो (जेणेकरून रोजचा एक बिनमहत्त्वाचा निर्णय कमी होईल). याच मानसिकतेचं तार्किक टोक म्हणजे कुण्या जाणत्या व्यक्तीवर वा संस्थेवर आपल्या दैनंदिन विवंचनांचा भार सोपवून आपण मोकळं होण्याचा आणि जमेल तसं दडपणरहित आयुष्य जगण्याचा मोह पडणं.

अशी मानसिकता असणाऱ्यांना पूर्वी केवळ धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या दिशेने जाणारा मार्ग उपलब्ध होता. ‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्’ – अर्थात, जे अनन्यभावाने माझी उपासना करतात, त्यांच्या कल्याणाचा भार मी वाहतो, अशी गीतेतली ग्वाही असो वा ‘तोच भुलवितो, तोच तारुनि नेणार’ असा भक्तिभाव असो. परमेश्वर, त्याचे अवतार किंवा अन्य संकल्पना (पूर्वसंचित, कर्मविपाक) हा भार वाहण्यास समर्थ होत्या.

आजच्या आधुनिक युगात विज्ञानाचा पर्यायी मार्ग अशा मानसिकतेला उपलब्ध झाला आहे. गेल्या काही शतकांत विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानानं भौतिक आयुष्य अधिक सुखकर करण्यात घडवून आणलेली क्रांती केवळ स्तिमित करणारी आहे. माणसाचं आयुर्मान वाढलं आहे, दळणवळणाच्या आणि दूरसंचारांच्या सुविधांनी जग कधी नव्हे इतकं जवळ आलं आहे. निसर्गावर विजय मिळवणं ही कविकल्पना असली, तरी त्या मार्गावर बरीच प्रगती झाली आहे. उपयोजनातील (अ‍ॅप्लिकेशन) उणिवा दूर केल्या तर वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करणं सहज शक्य आहे. थोडक्यात, आज जरी वैज्ञानिक प्रगतीला मर्यादा असल्या तरी भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञान इतकं सर्वव्यापी होईल, की दररोज पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तत्कालीन विज्ञानाकडे असेल.

***

लोईस लॉवरीची ‘द गिव्हर’ ही भविष्यकाळात घडणारी कादंबरी अशाच एका- विज्ञानाचं नेटकं उपयोजन करून वसवलेल्या- सुबक वसाहतीत घडते. या वसाहतीत गरिबी वा उपासमार नाही; कारण चलनी पैसे ही संकल्पनाच नाही- जीवनावश्यक गरजा घरपोच आणि आपोआप भागवल्या जात आहेत. चोऱ्यामाऱ्या किंवा अन्य गुन्हे नाहीत; कारण सर्वसंचारी आणि सर्वदृष्टी यंत्रणा साऱ्या हालचालींवर नजर ठेवून आहे. वर्णद्वेष नाही; कारण मुळात रंग म्हणजे काय, हेच यातल्या रहिवाशांना ठाऊक नाही.

जोनस हा जवळजवळ १२ वर्षांचा मुलगा अशाच एका आदर्श वसाहतीत एका चौकोनी कुटुंबात राहतो. या वसाहतीत हिंसा नाही, खाण्यापिण्याची ददात किंवा अन्याय नाही. प्रत्येक नागरिकाला समाजात काय भूमिका पार पाडायची, हे त्याच्या बाराव्या वर्षी एका समारंभात नेमून देण्यात येतं. उदाहरणार्थ, जोनसचे वडील हे ‘पोषक’ (नर्चरर) आहेत. त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून गॅब्रिएल नावाचं एक लहान मूल त्यांनी घरी आणलं आहे. एका विशिष्ट मर्यादेहून कमी प्रगती वा वाढ होत असणाऱ्या तान्ह््या मुलांकडे विशेष लक्ष पुरवता यावं, यासाठीची ही तरतूद आहे. तसं न झाल्यास, गॅब्रिएलला ‘मुक्ती’ (रिलीज) देण्यात येईल. ‘मुक्ती’ म्हणजे काय हे नेमकं जोनसला ठाऊक नाही; पण अन्य गंभीर गुन्ह्यांची शिक्षा म्हणून क्वचित काही जणांना अशी ‘मुक्ती’ मिळते आणि त्यानंतर ते वसाहतीत दिसत नाहीत, हे साऱ्यांनाच ज्ञात आहे.

बाराव्या वर्षपूर्तीच्या समारंभात, जोनसच्या अन्य मित्रमैत्रिणींचं भावी कार्यक्षेत्र त्यांच्या वकुबानुसार आणि कलानुसार त्यांना नेमून देण्यात येतं; मात्र ही नेमणूक करणारं अनुभवी नागरिकांचं मंडळ जोनसला ‘स्मृतिप्राप्तकर्ता’ (रिसिव्हर ऑफ मेमरी) म्हणून निवडतं. अतिशय मानाचं असणारं हे पद काही दशकांतून एखादे वेळीच भरलं जातं. सध्याचा ‘स्मृतिदाता’ (द गिव्हर) वृद्धत्वाकडे झुकल्यानं विशिष्ट प्रकारची संवेदनशीलता अंगी असणाऱ्या (उदाहरणार्थ, अन्य नागरिक रंगांधळे असताना क्वचित रंगांचा भास होणं वा अस्फुट स्मृतींचे पडसाद जाणवणं) जोनसचं हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रशिक्षण चालू होतं.

या प्रशिक्षणादरम्यान जोनसला हळूहळू आपल्या वसाहतीच्या रचनेमागची पार्श्वभूमी उलगडू लागते. फारा वर्षांपूर्वी, एकसारखेपणा (सेमनेस) हे ध्येय साध्य करण्यासाठी स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांचा, वैयक्तिक आणि सामूहिक स्मृतींचा, इतकंच नव्हे तर रंग ओळखण्याच्या क्षमतेचाही बळी देण्यात आलेला आहे. बाराही महिने हवामान नियंत्रित राहतं. नद्या, पर्वत, पाऊस, हिमवर्षाव या गोष्टी वसाहतीत अनुभवायला मिळत नाहीत; त्यामुळे या गोष्टींशी निगडित असणारे शब्द, त्या शब्दांना लगडून येणारे सांस्कृतिक संदर्भ हे सारं काही या वसाहतीत सापडणार नाही. मात्र त्याचबरोबर युद्ध, हिंसाचार, गुन्हे, रोगराई, वर्णद्वेष किंवा वैयक्तिक पातळीवर वेदना, दु:ख यांचा लवलेशही नाही.

स्मृतिदाता हळूहळू जोनससमोर हे स्मृतींचं आणि अनुभवांचं भांडार खुलं करतो. ‘बिल्डंग्सरोमन’ या विधेतील अन्य कादंबऱ्यांप्रमाणे जोनसलाही निरागसता आणि जगाचं ज्ञान या गोष्टी व्यस्त प्रमाणात आहेत, याचं भान येतं. निरुपयोगी ठरत चाललेल्या वृद्ध व्यक्तींना आणि गॅब्रिएलसारख्या अपेक्षेहून कमी वाढ होत असणाऱ्या लहान मुलांना ‘मुक्ती’च्या गोंडस नावाखाली वेदनारहित पद्धतीने का होईना, पण यमसदनास पाठवण्यात येतं ही आजवर नजरेआड असणारी बाब जोनसला या मुखवट्याआडच्या निर्मम परिस्थितीची जाणीव करून देते. या कृत्रिम एकसारखेपणाच्या हव्यासापायी सामूहिक पातळीवरच नव्हे, तर वैयक्तिक जीवनातही अनेक गोष्टी गमावाव्या लागल्या आहेत आणि या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे, हे तो स्वत:बरोबरच स्मृतिदात्यालाही पटवून देतो.

बा. भ. बोरकरांच्या ‘स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा; तृप्ति नको, मज मुक्ति नको, पण येथिल हर्ष नि शोक हवा’ या जाणत्या ओळींची आठवण करून देणाऱ्या या टप्प्यावर ही कादंबरी संपते.

***

कुठल्याही कादंबरीच्या जडणघडणीत लेखकाची वैयक्तिक पार्श्वभूमी डोकावतेच; पण त्याचबरोबर ज्या समाजात आणि काळात लेखक वावरत असतो, त्याचेही पडसाद उमटतात. प्रथम वडील आणि नंतर पती सैन्यात असल्यामुळे, लोइस लॉवरीचं बालपण आणि लग्नानंतरचं आयुष्य हे बरंचसं देशविदेशांतील अमेरिकी लष्करी तळांत गेलं. कडक शिस्त आणि काटेकोर नियम, प्रत्येकाची साधारण सारखी राहण्याची व्यवस्था, प्रत्येक व्यक्तीला आपण अधिकाराच्या उतरंडीवर कुठे आहोत आणि आपली भूमिका काय याचं असलेलं भान आणि एकदा का ठरवून दिलेले नियम पाळले की त्या वसाहतीच्या बाह््य जगाशी किमान संबंध असणाऱ्या, आखीव, मर्यादित जगात इतर कुठल्याही गोष्टीची (खाणंपिणं, राहती जागा, शिक्षण, कायदा सुव्यवस्था आदींची) करावी न लागणारी चिंता, ही ‘द गिव्हर’मधल्या सुनियोजित, आपल्या नागरिकांसाठी ‘सर्वे सन्तु निरामया’चं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रचलेल्या वसाहतीची वैशिष्ट्यं दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जगभर पसरलेल्या अमेरिकी लष्करी ठाण्यांनाही लागू पडतात. ही कादंबरी लिहिताना, अशा एकाच वेळी कल्याणकारी व ‘बिग ब्रदर’सारख्या सर्वव्यापी व कठोर व्यवस्थेचे फायदेतोटे आपल्या डोळ्यांसमोर होते, असं लेखिकेनंच या पुस्तकामागची प्रेरणा सांगताना स्पष्ट केलं आहे.

ही कादंबरी अमेरिकेत १९९३ साली प्रसिद्ध झाली. हा काळ अर्थातच सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर एकमेव जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेच्या उदयाचा. अमेरिकी पातळीवर बोलायचं तर याच काळात एकीकडे बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाखाली आर्थिक भरभराट होत होती आणि रॉडनी किंग या कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे प्रतिसाद लॉस अँजेलिससारख्या आर्थिक महत्त्वाच्या शहरात वांशिक दंगलींच्या स्वरूपात कित्येक दिवस उमटत राहिले होते.

कादंबरीतल्या जोनस या मुख्य पात्राप्रमाणेच याच सुमारास अमेरिकेत ‘मिलेनियल’ पिढी (साधारणत: १९८१ ते १९९६ काळात जन्मलेली) वयात येऊ लागली होती. आर्थिक सुबत्तेच्या आणि शांततेच्या काळात, लहानातल्या लहान गोष्टीपासून (उदा. कपडे) ते मोठ्यातल्या मोठ्या (उदा. कार्यक्षेत्राची निवड) बाबीपर्यंत असंख्य पर्याय या पिढीसमोर हात जोडून उभे होते. मात्र, बऱ्याचदा प्रमाणाबाहेर पर्याय उपलब्ध असले की, नेमका कुठला निवडायचा यात अधिकच गोंधळ उडतो आणि परिणामी अनेक पर्यायांच्या उपलब्धतेचा उलटा परिणाम होतो, याचाही याच सुमारास पडताळा येऊ लागला होता (पॅराडॉक्स ऑफ चॉइस). यंग अ‍ॅडल्ट, अर्थात कुमारवयीन वाचकगटासाठी असलेली ‘द गिव्हर’ ही कादंबरी नेमकी याच वयोगटातील मुलांच्या अनिश्चिततेची भीती आणि नवीन जगाचं कुतूहल, अशा संमिश्र भावनांचा वेध घेते.

***

डिस्टोपियन (कुनस्थानी) कादंबऱ्या म्हटलं की, सतत दडपणाखाली जगणारी जनता, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आलेली बंधनं आणि एकंदरीतच दु:सह झालेलं जगणं आणि सतत भोगाव्या लागणाऱ्या नरकयातना असं चित्र समोर येतं. मात्र, केवळ हलाखीच्या परिस्थितीतच स्वातंत्र्याचा संकोच होतो असं थोडंच आहे? खाण्यापिण्याची, कायदासुव्यवस्थेची वा नोकरीधंद्यांच्या उपलब्धतेची कसलीही ददात नसतानाही निराळ्या संदर्भात उपलब्ध पर्यायांचा आणि स्वातंत्र्याचा संकोच होऊ शकतोच.

भविष्यकाळातील सर्वंकष व दमनकारी अशा राजवटींचं भयावह चित्र डोळ्यांसमोर उभं करणाऱ्या अनेक कुनस्थानी कादंबऱ्या आहेत; मात्र प्रगतीची कामधेनू वापरून मर्यादित, निवडक स्मृतींच्या आणि पर्यायांच्या सुखद पिंजऱ्यात बंदिस्त करणाऱ्या समाजव्यवस्थेचा धोका अधिक सूक्ष्म आणि कदाचित, त्यामुळेच अधिक संभाव्यही आहे. अगदी मोजक्या शब्दांत ‘द गिव्हर’ ही कादंबरी आपल्यासमोर प्रत्ययकारीपणे मांडते.

nandan27@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:07 am

Web Title: critical conditions law and order jobs mindfulness akp 94
Next Stories
1 बुकबातमी : संग्रहमूल्य! 
2 वेदनेची घरंदाज बाजारपेठ
3 नेहरूंचा नायक…
Just Now!
X