10 December 2018

News Flash

स्वतसकट सगळे..

भल्यामोठय़ा हिंस्र जबडय़ामध्ये, ‘पाण्यात मगर, जमिनीवर वाघ’ अशा अर्थाचं इंग्रजी नाव दिसतं.

भल्यामोठय़ा हिंस्र जबडय़ामध्ये, ‘पाण्यात मगर, जमिनीवर वाघ’ अशा अर्थाचं इंग्रजी नाव दिसतं. पण लेखकाचं किंवा चित्रकाराचं नाव काही केल्या सापडत नाही.. अगदी स्वामित्त्वहक्कसुद्धा ‘क्रोकोडाइल इन वॉटर, टायगर ऑन लँड’ याच नावानं आहे. लेखक पुरुष आणि चित्रकार स्त्री असं हे जोडपं असणार, एवढं वाचकाला पुढे कधीतरी (पान १४ ते १६) कळतंच. या पुस्तकाचे वाचक हे ‘प्रेक्षक’देखील असतात, कारण हे पुस्तक ‘पोलिटिकल कॉमिक’ या प्रकारात मोडणारं आहे. चित्रशब्दपट (कॉमिक स्ट्रिप) या प्रकारात केवळ वेताळ आणि बॅटमॅनसारखे सुपरहीरोच नसतात तर गंभीर आशय मांडणारे किंवा थेट टीकाभाष्य करणारे चित्रनिबंधदेखील लिहिले जातात, हे तरुण वाचकांना वेगळं सांगायला नकोच.. कारण त्यांनी काही गंभीर ‘ग्राफिक नॉव्हेल्स’ – म्हणजे चित्रकादंबऱ्या- आतापर्यंत वाचल्या असतील. यापैकीच, चित्रमय भाष्य करणाऱ्या प्रकरणांचं हे पुस्तक आहे.

‘क्रोकोडाइल इन वॉटर, टायगर ऑन लँड’ या जोडप्याने २०१० साली हा उपक्रम सुरू केला. फेसबुकसारख्या समाजमाध्यमावर लिंक देऊन, स्वतच्या ब्लॉगवजा पानावर ही चित्रमालिका दर सोमवारी अपलोड करायची असा या जोडप्याचा नेम. क्वचित एखाद्या सोमवारी वीज गेली किंवा सव्‍‌र्हर ‘उडाला’ तर फेसबुकवरच ‘येणार की नाही’ वगैरे अनेक पृच्छा येत असत, इतपत निष्ठावंत वाचक या उपक्रमाला लाभले, असं या द्वयीनं अलीकडे एका इंग्रजी वेब-नियतकालिकात म्हटलं आहे. अशा वाचकांची संख्या अर्थातच थोडी होती. का, ते पुस्तकाच्या आशयावरून कळतं! त्याच ब्लॉग-उपक्रमातून २०१० ते मे २०१४ या काळातील फक्त ५७ चित्रमालिका या पुस्तकासाठी निवडण्यात आल्या आहेत.
आजचा सुशिक्षित, बऱ्यापैकी स्थिरावलेला आणि स्वतला विवेकी समजणारा माणूस- म्हणजे पुरुषही आणि महिलाही- हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. या माणसाचं बोलणं आणि वागणं यांत फरक कसा आहे, यावर मार्मिकपणे बोट ठेवता ठेवता अनेक विषयांची चर्चा इथं येते. ही चर्चा दोन पातळय़ांवर आपोआप घडते- चित्रांमधली माणसं जे काही बोलताहेत ती पहिली (वाच्यार्थाची) पातळी, आणि वाचकाला यातून जे उमगतं ती दुसरी (ध्वन्यर्थाची) पातळी! अर्थात, अगदी डेनिस द मेनेस किंवा डिल्बर्टसारख्या चित्रमालिकांतूनही या दोन पातळय़ा असतातच. पण इथे दुसऱ्या पातळीपर्यंत जाण्यासाठी वाचक अधिक ‘तयार’ असावे लागतील. ही तयारी कुठली?
स्वतला तासून घेण्याची तयारी! ‘तासून घेणं’ हा शब्दप्रयोग हल्लीच्या मराठीतल्या नाक्यावरल्या अर्थानं केलेला नाही. ज्याला ‘तावूनसुलाखून घेणं’ असं म्हणता येईल, अशी चटके सोसून काहीतरी चांगलं मिळवण्याची तयारी. शाब्दिक चटके भरपूर देणारं हे पुस्तक आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मेणबत्त्या लावणारा माणूसही सिग्नलवर अडवणाऱ्या वाहतूक-पोलिसाच्या हाती एखादी नोट टेकवतोच आणि वर ‘भ्रष्टाचार खरंच नाहीसा झाला पाहिजे’ असंही म्हणतो- आता तर उलट, अधिकच वैतागानं म्हणतो. तो वैताग चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी नसून, फक्त स्वतला कमीतकमी त्रास व्हावा यासाठी आहे असं हे पुस्तक सांगतं. पर्यायाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झालेले अनेक जण हे याच हेतूपायी आले होते, असंही यातून सूचित होतं. या पुस्तकात ‘राजकीय व्यंगचित्रं’ अगदी कमी आहेत, पण आजचं राजकारण कुठे चाललं आहे याबद्दल चपखल भाष्य मात्र या चित्रांमधून होत राहातं.
अण्णा हजारे यांचं जंतरमंतर आंदोलन काय किंवा मोकाट वासनांना एक दिल्लीकर मुलगी बळी पडल्यानंतर झालेली निदर्शनं काय, या साऱ्याचं गांभीर्य सुशिक्षितांना तरी खरोखर कळलं होतं का? प्रतिक्रियात्मक अशी ही आंदोलनं समाजमाध्यमांच्या साथीनं वाढली. मग लोक या समाजमाध्यमांनाच आंदोलनं आणि निदर्शनांची भूमी बनवू लागले. ‘रस्त्यावर उतरणं’ या कृतीला (जर तरी गांभीर्यपूर्वक केली गेली तर) राजकीय महत्त्व आणि महत्तासुद्धा असते, हे या माणसांना माहीतच नाही, की आता ही माणसं मद्दड झाली आहेत? असे प्रश्न हे पुस्तक ध्वन्यर्थानं उपस्थित करतं. अजगरासारखा पहुडलेला एक जाडगेला कुणी, ‘आज मी व्हच्र्युअल आंदोलन करणाराय’ म्हणताना पाहून वाचकाला किळस आणि चीड येईलच, मात्र याच भावना स्वतलाही लागू पडतात, हे त्याला कळायला हवं. ही ‘तयारी’!
संगणकयुगातले तरुण – कुणी केसाळ, कुणी मोठ्ठा चष्मा लावणारं किंवा तत्सम काहीतरी ‘स्टाइल स्टेटमेंट’ करणारं आणि अशा अपत्यांचं भारी कौतुक असलेले त्यांचे आईबाप, या आदल्या पिढीतली आता उच्चपदस्थ झालेली किंवा निवृत्त होऊन देशप्रेमाची वेळोवेळी उबळ येणारी अशी माणसं या पुस्तकात आहेत.. हे सारे ‘वाचकां’चेच प्रतिनिधी! पण त्याखेरीज दोन पात्रं इथं आहेत.. रस्त्यावरचा एक भिकारी आणि काही भटके कुत्रे.
भटक्या कुत्र्यांमध्येही माणसाचे अवगुण शिरलेले आहेत, असा कथाभाग काही चित्रपट्टय़ांतून येतो. रस्त्याकडेचा भिकारी मात्र मलूलच असतो, पण भारतीय संघानं क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकल्याच्या रात्री हा भिकारी थेट एका ‘कोटय़वधी भारतीयांची शक्ती.. सारे एकदिलाने टीमच्या पाठीशी.. आम्ही सारे एकच’ वगैरे बोलणाऱ्या एक टीव्हीप्रेक्षकाच्या (नेत्याच्या नव्हे) बेडरूममध्ये शिरतो. सकाळी टीव्हीप्रेक्षकाची झोपबीप आटोपल्यावर हा भिकारी त्याच्या नजरेस येताच तो त्याला झिडकारतो. किंवा ‘तुम्हाला एवढय़ा निरनिराळय़ा विषयांवर लिहायला बरं जमतं’ असं हा भिकारी एका स्तंभलेखकाला म्हणतो, त्यावर ‘तू तुझ्याच विवंचनांमध्ये असतोस’ असं भिकाऱ्याला सुनावताना आपलीच विकेट उडाली आहे हे स्तंभलेखकाच्या गावीही नसतं!
‘खरं सांगताय? आम्ही काय आता जनतेसाठी काम करायचं की काय? तुमच्यासाठी नाही?’ असं सांगणारा एक ढेरपोटय़ा (पण अनामिक) अधिकारी किंवा मुठी आवळून आणि बोटांच्या विविध हालचाली करत बोलणारा एक नेता (ज्याचं नाव आज कसं का होईना, सर्वतोमुखी आहे!) यांच्याखेरीज थेट राजकीय पात्रं या चित्रमालिकेत नाहीत. ‘आमच्यावर टीका करताना आधी स्वतकडे पाहा’ ही हल्लीच्या सत्तासमर्थकांनी लादलेली अट हे पुस्तक अगदी तंतोतंत पाळतं. ५७ पैकी केवळ दोन चित्रपट्टय़ांमध्ये विद्यमान नेत्यांचा उल्लेख येतो. बाकीच्या ५५ चित्रपट्टय़ा, वाचकाला स्वतकडे पाहायला लावतात! मासिकाच्या आकारातल्या अवघ्या १३१ पानांवरच थोडाफार मजकूर असलेलं हे पुस्तक तुलनेनं इतकं महाग आहे की अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नरेंद्र मोदीपूर्व काळातला (किंवा मोदीयुगाच्या आरंभापूर्वीचा म्हणू..) एक दस्तऐवज आपल्या संग्रही हवाच असं वगैरे मानणारे पैसेवाले लोक तेवढे हे पुस्तक खरेदी करण्याच्या वाटेला जातील!
पुस्तकाचं नाव आणि पुस्तककर्त्यां जोडप्याचं टोपणनाव हे मुळात एका बंगाली म्हणीचं शब्दश: भाषांतर आहे. मराठीत ज्याला ‘इकडे आड, तिकडे विहीर’ किंवा ‘आगीतून फुफाटय़ात’ असं म्हणतात, तशी ही म्हण. विचार करण्याची प्रक्रिया ‘द्वंद्वात्मक’ असते यावर या जोडप्याचा भारीच विश्वास असल्याखेरीज हे नाव निवडलं जाणं शक्य झालं असतं का? याचा विचार वाचकांनीच करावा.

क्रॉकोडाइल इन वॉटर, टायगर ऑन लँड
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
पृष्ठे : १३२, किंमत : ५९९ रु.

First Published on October 31, 2015 1:08 am

Web Title: crocodile in water tiger
टॅग Crocodile,Tiger,Water