इंटरनेटच्या महाजालाने २५ वर्षांपूर्वी जगात प्रवेश केला आणि नंतर ते वापरणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातही. एका क्लिकच्या जोरावर माणसाने स्वत:ला माहितीपूर्ण बनवत यशस्वी प्रगती केली. अनेकांनी स्वत:ला आणि बरोबरीने अनेकांना वाढवले, मोठे केले, पण त्याच माणसाची क्रूर, विकृतीची काळी बाजूही याच इंटरनेटच्या गरवापराने समोर आली. पुरुष किती टोकाचा विकृत, खुनशी वागू शकतो, स्वत:च्या मनाविरुद्ध काही घडले तर किती टोकाला जाऊ शकतो, मुख्यत्वे स्त्रियांच्या बाबतीत आणि तेही केवळ काही शब्दांच्या जोरावर, हे दाखवून देणारे देबारती हलदर आणि के. जयशंकर यांचे ‘सायबर क्राइम्स अगेन्स्ट वूमन इन इंडिया’ हे पुस्तक म्हणजे गेली कित्येक वष्रे सायबर क्षेत्रात स्त्रियांवर होत असणाऱ्या अत्याचाराचा सज्जड पुरावा तर आहेच, शिवाय त्याच्याविरोधात ठोस, कडक आणि थेट कायद्याची गरज अधोरेखित करणारे आहे.

देबारती हलदर स्वत: वकील आणि कायदातज्ज्ञ असून के. जयशंकर क्रिमिनॉलॉजीचे प्राध्यापक आहेत. दोघांनी मिळून एकूणच सायबर गुन्हेगारीच्या सर्व बाजूंचा तपशीलवार ऊहापोह केला असून मुख्यत्वे त्यातल्या कायद्याची, त्यांच्या मर्यादांची विस्तृत आणि मुद्देसूद माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या विस्तृत अभ्यासाची माहिती प्रत्येक पानातून डोकावते आणि म्हणूनच हे पुस्तक संदर्भासाठीही महत्त्वाचे ठरलेले आहे.

आत्तापर्यंत उजेडात आलेल्या आणि न आलेल्या अनेक कटू कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. स्त्रियांवरील अत्याचार, अन्यायाच्या घटनांमध्ये तिचे चारित्र्यहनन करणे हे विकृत पुरुषाच्या हाती मिळालेले कोलीत असते आणि आत्तापर्यंत त्याच माध्यमातून तो कित्येक वष्रे तिचा छळ करत आलेला आहे. अगदी ‘वासुनाक्या’वरच्या तिच्याविरुद्धच्या विकृत कॉमेंट्स असो, तिला पाहून शीळ घालत अर्वाच्य बोलणे असो, अश्लील भाषेत नको त्या मागण्या करणे असोत, स्त्रियांची छेडछाड हा टारगट पुरुषांसाठी वर्षांनुवर्षे विकृत आनंदाचा भाग असायचा ज्याकडे स्त्रियांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र तेच दुर्लक्ष आत्ताच्या काळात अधिकाधिक घातक ठरू लागले आहे, कारण या पुरुषांच्या हाती इंटरनेटचे कोलीत लागले आहे. एका क्षणात लाखो, कोटय़वधी लोकांपर्यंत तुमची बदनामी पोहोचू शकते आणि त्यासाठी त्या व्यक्तीला समोर यायचीही गरज लागत नाही. गेली कित्येक वष्रे सुरू असलेल्या विकृत मुखवटय़ाआड दडून केलेल्या या अश्लाघ्य, अश्लील शेरेबाजीतून ना सामान्य स्त्री सुटली आहे ना नामवंत सेलेब्रिटी, उद्योजक, विचारवंत!

अगदी अलीकडे कविता कृष्णनसारख्या सामाजिक कार्यकर्त्यां असोत किंवा बरखा दत्त, सागरिका घोष या माध्यमकर्मी, त्यांच्यावर केलेल्या ‘ट्रोलिंग’मधून ‘तुम्ही बोलायचं नाही’ हाच जणू अप्रत्यक्ष आदेश दिला जातो आणि तेही अत्यंत अपमानास्पद शब्दांत. स्त्रीत्वाचा अपमान करणारी शेरेबाजी माणसाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचीच पायमल्ली करणारी आहे.

इंटरनेटवरील समाजमाध्यमे, विशेषत: फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप हे फारसे खर्चीक नसलेले, सहज उपलब्ध असणारे, सुशिक्षित-अशिक्षित, सुसंस्कृत-असंस्कृत, कुणालाही वापरता येण्याजोगे, एका क्षणात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचणारे, मुख्य म्हणजे कुणाचाही धाक नसलेले, सेन्सॉरशिप नसणारे, कोणत्याही वेळेस लॅपटॉप, टॅब-पॅड, मोबाइल, संगणक कोणत्याही माध्यमातून वापरता येणारे माध्यम असल्याने त्याचा गरवापर झाला नाही तरच नवल होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून सायबर गुन्ह्य़ांचे फार मोठे जाळे जगभरात पसरत चालले आहे. त्यात पशांचे गुन्हे, फसवणूक, इतर अनेक गंभीर गुन्ह्य़ांचाही समावेश असला तरी स्त्रियांवरील होणाऱ्या सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण दिवसेंदिवस घातक आणि वाढत चालले आहे. भारतातही त्यांचे प्रमाण धोकादायक वळणावर आले आहे.

ईमेल, चॅट, समाजमाध्यमावरील प्रोफाइल, एसएमएस, मोबाइल व्हाइस कम्युनिकेशन, ब्लॉग, चॅट लॉग आदी माध्यमांतून अत्यंत कठोर, जीवघेणी, अपमानास्पद लैंगिक शेरेबाजी, थेट धमकी, सायबरस्टाकिंग, ट्रोलिंग, बुलींगच्या माध्यमांतून शाब्दिक, फोटोंच्या वा इमोटिकॉन्सच्या माध्यमातून सर्वदूर पसरवणे खूपच सामान्य होत चालले आहेच; परंतु समाजमाध्यमातून छायाचित्रांचा गरवापर, त्यांचे विकृतीकरण करणे, अश्लील छायाचित्र, व्हिडीयो पाठवणे, पोर्न साइट्स पाठवणे, छायाचित्र व्हायरल करण्याच्या धमक्या देणे हाही या विकृतांच्या आनंदाचा खेळ ठरत आहे. प्रेमाच्या जाळ्यात फसवून किंवा गुंगीचे औषध देऊन स्त्रीचा उपभोग घेऊन वर त्याचे चित्रीकरण करून तिला धमकावण्याचे प्रमाणही काळजी करायला लावणारे ठरत आहे. या साऱ्याचा ऊहापोह देबारती यांनी अनेक उदाहरणांसह या पुस्तकात केला आहे.

यातली आणखी एक धोकादायक बाजू देबारती यांनी प्रकाशात आणली आहे ती म्हणजे ‘रिव्हेंज पोर्न’. भारतातही त्याचे आता पडसाद उमटू लागले आहेत. आपल्या प्रेयसीने नकार दिला म्हणून किंवा एखाद्या स्त्रीवर सूड उगवायचा म्हणून तिची अश्लील छायाचित्रे (अनेकदा फोटोशॉपमध्ये तयार केलेले) थेट  इंटरनेटवर टाकून तिची बदनामी केली जाते. हा सरळ सरळ  सुडाचा प्रकार आहे. दुर्दैवाने अद्याप भारतात ‘रिव्हेंज पोर्न’साठी थेट कायदा नाही, त्यामुळे तक्रार करणाऱ्या स्त्रियांची प्रचंड बदनामी होते आहे. आपल्याकडे आजही स्त्री दुय्यम स्थानावरच असल्याने रिव्हेंज पोर्न असो वा तिचा गरफायदा घेऊन मानसिक छळवणूक करणारी छायाचित्रे सर्वत्र पसरवण्याची धमकी देणाऱ्या घटना असोत, तिच्या बाजूने उभे राहण्याच्या ऐवजी कुटुंबातूनही अनेकदा तिची उपेक्षाच होते किंवा तिला दुर्लक्ष करायला सांगितले जाते. यातून अनेकदा तिचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त होतेच, पण निराशा, आजारपण, निद्रानाश याला बळी पडणे एवढेच तिच्या हाती राहते. स्त्रीचा कमकुवतपणाच याला कारणीभूत असल्याचे सांगून अशा स्त्रियांनी ठामपणे त्याविरोधात उभे राहायला हवे, अशी सूचनाच देबारती आणि जयशंकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे. दुर्दैवाने काही घटनांत स्त्रियाच स्त्रियांच्या विरोधात वावरताना दिसतात.

अर्थात, पुढे जात सायबर गुन्ह्य़ांच्या संदर्भात एखाद्या स्त्रीने आवाज उठवला तर त्यावर तातडीने कारवाई करणारा थेट, कठोर कायदा आहे का, हाच लेखकद्वयांचा प्रश्न आहे. दाखल केल्या जाणाऱ्या तक्रारी आणि त्यांचा शोध यांच्यातले प्रमाण व्यस्त आहे. तसेच इंटरनेट वा सायबर गुन्हे ही अलीकडच्या काळातली प्रकरणे असल्यामुळे असेल, परंतु अशा घटनांमध्ये त्यांच्याशी संबंधित पूर्वीच्या कायद्यांचाच आधार घेतला जातो.

खरे तर २००० सालापर्यंत सायबर सेक्स क्राइमच्या संदर्भात नेमके कोणते कायदे आहेत हेच स्पष्ट नव्हते किंवा गोंधळ होता. मनीष कथारिया या व्यक्तीने रीतू कोहलीवर स्वत: समोर न येता समाजमाध्यमांतून केलेली चिखलफेक ही पहिली सायबरस्टाकिंग केस मानली जाते; पण त्यानंतर ही प्रकरणे वाढतच गेली किंवा उजेडात येत गेली असे म्हणायला हवे, कारण स्त्रियांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तोपर्यंत बदनामी, अपमान या भीतीपोटी आणि दाद कुठे मागणार या कारणास्तव अनेक घृणास्पद गोष्टी बंद दरवाजाआड घुसमटत होत्या.

हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे. जे आत्तापर्यंतच्या सायबरक्षेत्रात स्त्रीविषयक होणाऱ्या अत्याचार, अन्यायाची विस्तृत माहिती तर देतेच, शिवाय कायद्याच्या ताकदीची आणि मर्यादांचीही कल्पना देते. म्हणूनच सायबरस्टाकिंग, सायबर-बुलींगविरुद्धच्या कायद्याची अधिक वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करण्याची, निरीक्षण करण्याची, विस्तारण्याची गरजही यात व्यक्त झाली आहे. स्त्रीला सायबर गुन्ह्य़ांच्या विरोधात सुरक्षा देणारे थेट कायदे खूपच कमी आहेत. याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करता येत नसल्याने आणि आधी अस्तित्वात असलेल्या फसवणूक, लैंगिक छळ  संबंधीत कायद्यांचा वापर केला तरी त्यातील शिक्षा कमी असल्याने ती शिक्षा भोगून आल्यावर तो आपल्यावर सूड उगवू शकतो या भीतीपोटीही स्त्रिया गुन्हा दाखल करायला घाबरतात. म्हणूनच लैंगिक छळ करणाऱ्यांना हॅकिंग, वायोरिझम, स्टाकिंगविरुद्धच्या कायद्यांचा वापर करत गुन्हेगारी कक्षेत आणण्याची गरज असल्याचे यात म्हटले आहे.

‘फेक अवतार’ ही या माध्यमाची मोठी डोकेदुखी आहे. अर्थात, धाडस नसलेले आणि अत्यंत घाबरट, दुबळी माणसेच मुखवटय़ाचा आधार घेत स्त्रियांवर चिखलफेक करतात आणि त्यासाठी कोणत्याही टोकाला जातात. अत्यंत ज्वलनशील, खोटारडे, अपमानास्पद आरोप करणारेच अशा ‘फेक अवतारा’चा आधार घेतात, मात्र यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. समाजमाध्यमाचा कानोसा जरी घेतला तरी ओळख लपवून वावरणारी ही माणसे आज समाजमाध्यमांतून स्त्रियांविषयी अत्यंत घाणेरडय़ा, शिवराळ, नतिकतेची चाड नसलेल्या भाषेतून अर्वाच्य भाषेत बोलताना, अनेकदा गरळ ओकताना, धमकी देताना दिसू शकतात. सामाजिक कार्यकर्त्यां कविता कृष्णन यांनी रेडिफमेलच्या माध्यमातून ‘फेमिनिझम’ या विषयावर लाइव्ह चॅटमध्ये सहभाग घेतला असता ‘रेपिस्ट’ याच नावाने आपली ओळख दाखवणाऱ्या अनाहूत कॉलरने त्यांना थेट लाइव्ह चॅटवर बलात्काराची धमकी दिली होती. आजकाल स्त्रीवादी भूमिका घेणारे, निधर्मी, मानवी हक्क मानणारे हेही या लोकांचे सॉफ्ट टाग्रेट ठरत आहेत.

२०१७ सालच्या आकडेवारीनुसार जगातल्या ७ अब्ज लोकांपकी सुमारे ३ अब्ज म्हणजे ५४ टक्के लोक इंटरनेट वापरतात आणि त्यातले २ अब्ज म्हणजे ३७ टक्के लोक समाजमाध्यमांचा अर्थात सोशल नेटवर्किंगचा वापर करतात. तर ४ अब्ज लोक मोबाइल फोनचा वापर करतात, ही संख्या आहे ६६ टक्के. गेल्या वर्षीच्या तुलनेत समाजमाध्यम वापरणाऱ्यांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचाच अर्थ इंटरनेट हे आजच्या घडीला अत्यंत उपयुक्त माध्यम ठरते आहे. त्याचे फायदे जसे आहेत तसे त्याचे तोटे असणारच आहेत. कारण त्याचा वापर करणारी माणसे भावनेने जगणारी असतात. त्या भावनांमध्ये दुसऱ्यांप्रति प्रेम आणि आदर जसा असेल तसा स्पर्धा, असूया, तिरस्कार, खुनशी स्वभावही असणार आहे. शिवाय अलीकडे ‘आम्ही म्हणू तेच खरे’ हे मानणारी प्रवृत्तीही वाढताना दिसत आहे.

हे सारे गृहीत धरूनच या सर्वव्यापी माध्यमाचा वापर करायला हवा. त्यातही आपले खासगीपण जोपासणाऱ्या (प्रायव्हसी सेटिंगसारख्या) अनेक गोष्टींचा अभ्यास प्रत्येकाने करायला हवा. कोणती छायाचित्रे स्वत:च्या मोबाइलवर काढायची, कोणती शेअर करायची याचेही भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, कारण अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहेच तरीही उद्या अनेक मुख्य शहरांमध्येही वायफाय मोफत उपलब्ध होईलच. त्या वेळी स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाणही अधिक वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच हे पुस्तक फक्त स्त्रियांनाच नव्हे तर पोलिसांना, कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना, कायद्याचा मसुदा तयार करणाऱ्यांना, राजकारण्यांनाही मोलाचे ठरणार आहे.

मात्र मुळात त्यासाठी अन्यायग्रस्त स्त्रियांनी जास्तीत जास्त पुढे येऊन तक्रार करण्याची आवश्यकता आहे. अधिक बदनामी होईल या भीतीपोटी स्त्रिया मागे राहिल्या तर त्याची शिकार दुसरी स्त्री होऊ शकते. या पुढे येणाऱ्या स्त्रीला योग्य संरक्षण आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा लवकरात लवकर दिली गेली तर या पुस्तकाच्या लिखाणाचे सार्थक होईल, असे वाटते.

  • ‘सायबर क्राइम्स अगेन्स्ट वूमन इन इंडिया’
  • लेखक: देबारती हलदर / के. जयशंकर
  • प्रकाशक : सेज पब्लिकेशन
  • पृष्ठे : २५२, किंमत : ७९५ रुपये

आरती कदम

arati.kadam@expressindia.com