21 November 2017

News Flash

सुन्न करणाऱ्या ‘सत्य’कथा..

दहशतवादी कारवायांच्या सुन्न करणाऱ्या ‘सत्य’कथा सांगणारे हे पुस्तक..

अनिरुद्ध अष्टपुत्रे | Updated: September 9, 2017 2:41 AM

‘डेंजरस माइन्डस्’ लेखक : एस. हुसेन झैदी/ ब्रिजेश सिंह

दहशतवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या प्रचाराला भुलून भारतातील काही मुस्लीम तरुण आयुष्याच्या एका टप्प्यावर या संघटनांचेच एक भाग होऊन गेले. कौटुंबिक आणि शैक्षणिक पाश्र्वभूमी समाधानकारक असतानाही हे तरुण असे विखारी का बनले? आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांना संपवून टाकणारे विष यांच्या मनात कुणी पेरले? अशा प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत दहशतवादी कारवायांच्या सुन्न करणाऱ्या ‘सत्य’कथा सांगणारे हे पुस्तक..

पोलिसांच्या विशेष कृती दलाभोवती हळूहळू बुरखाधारी महिला, संतापलेले मुस्लीम तरुण यांचा वेढा पडायला सुरुवात झाली होती.  साकीब नाचनला यापूर्वीही अटक झाली होती, पण आता त्याच्या राहत्या गावामधून- पडघ्यातून इतक्या मानहानिकारकरीत्या, त्यातही एन्काऊंटरफेम पोलीस अधिकाऱ्यांनी घेऊन जाण्याची ही पहिलीच वेळ होती. आता आपला प्रिय साकिब भाई आपल्याला दिसणार नाही या समजुतीने शेकडो लोकांनी अक्षरश: पोलीस पथकाला घेरावच घातला. दया नायक यांनी परिस्थिती पाहून अक्षरश: नाचनला कॉलरला धरून उचलून जीपमध्ये टाकले. लोक संतप्त झाले होते. ‘साकिब भाई को छोड दो’चे नारे  लावत होते. साकिबला हे कळून चुकले होते, की कायदा आपल्या पद्धतीने जाणार  व आपल्याला पोलिसांबरोबर जावेच लागणार आणि म्हणून गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांची उमेद कायम ठेवण्यासाठी सर्वश्रेष्ठ अल्लाची प्रशंसा करणारी घोषणा त्याने ओरडून दिली.. ‘नारा-ए-तकबीर’. पण त्याने दिलेली घोषणा ही अल्लाची साधी प्रशंसा करणारी नव्हती. साकिबच्या तोंडून चुकून बाहेर पडलेली घोषणा म्हणजे मुस्लिमांसाठी युद्धाची तुतारी होती, आणि मग क्षणार्धात ‘अल्ला हु अकबर’चे नारे दिले जाऊ लागले. जमावातील काहींनी एकमेकांना इशारे केले आणि बघता बघता परिस्थिती विकोपाला गेली. नाचनचा मेहुणा सोबन मुल्लाने पहिले पाऊल उचलले आणि दया नायक यांच्यावर हल्ला केला. पोलीस कमांडोना शेकडो महिला, तरुण यांनी जबरदस्त वेढा टाकला. त्यांना त्यांच्या बंदुकादेखील रोखता येईनात अशी परिस्थिती झाली. काही तरुण जीपपर्यंत पोहोचले आणि त्यांनी नाचनला बाहेर काढण्यात यश मिळवले. प्रदीप शर्मानी त्यांची पिस्तूल रोखली होती, पण बोट ट्रिगरवर तसेच होते. फायरिंगचे आदेश नसल्याने काही करता येत नव्हते. संतप्त जमावाने आता पोलीस पथकाला लक्ष्य केलं होतं. पडघ्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घाईघाईने गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आणि वखारीचे मालक नासीर मुल्ला यांना जमावाला शांत करण्यासाठी बोलावले, जेणेकरून पोलिसांचे प्राण वाचतील आणि अनर्थ टळेल. पोलीस फायिरगच्या आदेशासाठी प्रदीप शर्माकडे पाहात होते, पण केवळ एका माणसाच्या पापाची शिक्षा शेकडो निरपराधी लोकांना द्यायची नाही हे शर्मा यांनी ठरविले होते. नाचन तर सटकून गेला होता, आता पोलिसांनाही रक्ताचा सडा पडू न देता तिथून जायचे होते. आणि मग एक क्लृप्ती सुचली.. अचानक पोलिसांनीदेखील जमावाच्या सुरात सूर मिसळून ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली! जमाव गोंधळला. वातावरण भारून गेले होते. पोलीस मोठमोठय़ाने घोषणा देत होते. तुम्ही आणि आम्ही काही वेगवेगळे नाही आहोत, आपल्यात कुठलीही धार्मिक तेढ नाहीये हे सिद्ध करण्याची पोलिसांची कल्पना एकदम प्रभावी ठरली. जमावाच्या घोषणा एकदम कमी झाल्या. तेवढय़ात नासीर मुल्लाही येऊन पोहोचले आणि त्यांनी पोलिसांची जमावापासून सुटका केली. हा सगळा थरार एक तासभर चालला होता..

हे सगळे वर्णन  त्या वेळच्या प्रसारमाध्यमांनीही केले होतेच; पण ज्या पद्धतीने ते या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आले आहे, त्यावरून अंगावर  काटा आणणारी एखादी  काल्पनिक साहसी कांदबरी आपण वाचतो आहोत, असे वाचकांना वाटू शकते. पेंग्विन प्रकाशनने नुकतेच प्रकाशित केलेले हे पुस्तक म्हणजे- ‘डेंजरस माइन्डस्’. लेखकद्वय आहे प्रसिद्ध  गुन्हेविषयक पत्रकार-लेखक एस. हुसेन झैदी आणि ज्यांची ख्याती पोलीस वर्तुळात ‘टॉप कॉप’ अशी आहे ते ब्रिजेश सिंह.

हुसेन झैदी यांनी त्यांच्या मनोगतात लिहिले आहे त्याप्रमाणे, हे पुस्तक म्हणजे मोहम्मद पगंबर यांच्यासारख्या सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या प्रेषिताच्या विचारांविरुद्ध जाऊन ओसामा बिन लादेन, मुल्ला ओमार यांसारख्या दहशतवाद्यांना आणि ‘आयसिस’सारख्या दहशतवादी संघटनांना आपले प्रेरणास्थान मानणाऱ्या तरुणांच्या ‘सत्य’कथा आहेत. मात्र ‘डेंजरस् माइन्डस्’ या पुस्तकाकडे केवळ ‘दहशतवाद्यांच्या कारस्थानांवरील सत्यकथा’ एवढय़ाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. कारण या कथांमधले खलनायक आणि त्यांची कृष्णकृत्ये त्या त्या काळात माध्यमांतून जगजाहीर झालेली होतीच; पण या पुस्तकाचा खरा गाभा आहे तो म्हणजे, अनेक माहीत नसलेले पलू आपल्या प्रभावी लेखनशैलीने लेखकांनी यात उलगडून दाखवले आहेत.

कुटुंब राष्ट्रभक्तच, पण..

पडघ्यातील काही मुस्लिमांची मालमत्ता जळून बेचिराख होताना पाहून सूडाने पेटलेला १० वर्षांचा नाचन पुढे ‘सिमी’च्या माध्यमातून कसा मोठा होत गेला, हे त्याने झैदी यांना दिलेल्या मुलाखतीतून वाचायला मिळते. ‘स्वातंत्र्य चळवळीतील सरोजिनी नायडू आणि कितीतरी मोठे काँग्रेस नेते पडघ्यातल्या आमच्या घरी यायचे, आमचे एक राष्ट्रभक्त कुटुंब आहे,’ असेही तो ठणकावून सांगतो; ते वाचताना आश्चर्य वाटते.

मध्य मुंबईच्या मदनपुऱ्यातील अहले हदीस समाजाची जमेहा मशीद आणि बंगाली मशीद या कडव्या मुस्लीम चळवळीचे केंद्रस्थान कशा बनल्या आणि त्यातूनच जलिस अन्सारी कसा मोठा होत गेला याची माहिती देणारे प्रकरण वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी घेऊन कालांतराने कुपर रुग्णालयात क्ष-किरण विभागप्रमुख असलेल्या डॉ. अन्सारीचा रस वैद्यकीय क्षेत्रातून कमी कमी होत गेला आणि कडवेपणा वाढत गेला. मधल्या काळात त्याला बॉम्ब बनविण्यातील तांत्रिक माहिती असलेला अब्दुल करीम टुंडा भेटला. मग एक छोटी चाचणी करण्याचे ठरले. त्यात अपयश आले, पण जलीस पकडला गेला. त्याच्या कुटुंबीयांनी जलीसला अपस्माराचे झटके येतात आणि त्या भरात तो काहीही करतो, असे प्रमाणपत्र न्यायालयात दिले आणि त्याची सुटका होते. पुढे मग अन्सारी आणि कंपनी मुंबईत आणि रेल्वेत अनेक छोटे छोटे सुमारे ८० स्फोट घडविते. त्यात जीवितहानी होत नाही, पण काही जण किरकोळ जखमी होतात. पण पोलिसांना त्यामागची संगती मात्र कळत नाही. अखेर शोध लावत लावत पोलीस जलिस अन्सारीचा उजवा हात सलीमपर्यंत पोहोचतात. तो माझगाव डॉकमध्ये नोकरीला असतो. मग सलीमपर्यंत पोहोचणारा एक पोलिसांचा खबऱ्या डॉकमध्ये सुपरवायझर म्हणून घुसविला जातो. नंतर हा खबऱ्या तेथे सलीमचा विश्वास संपादन करतो, एवढेच नव्हे तर तो चक्क धर्मातर करून मुस्लीम होतो. ५ डिसेंबर १९९३ला रेल्वेमध्ये स्फोट केले जातात, पण त्याचा अपेक्षित परिणाम न झाल्याने अस्वस्थ झालेला जलिस मग २६ जानेवारी १९९४ ला दिल्लीत मोठय़ा घातपाताचे नियोजन करतो. पण गुप्तचर विभागाचा खबऱ्या ही माहिती अगोदरच कशी पोहोचवतो वगरे प्रसंग अतिशय रोचक आहेत. मदनपुरामध्ये मध्यरात्रीनंतर पोहोचलेली विशेष कृती दलाची तुकडी आणि अन्सारीच्या दारावर टकटक केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी त्यागी, झा यांच्यातले आणि अन्सारीमधील संवाद, तेथील चिघळलेली परिस्थिती याचा जणू काही ‘आँखो देखा हाल’ झैदी यांनी दिला आहे. इथेसुद्धा पोलिसांना मोहल्ल्यातील संतप्त मुस्लिमांना सामोरे जावे लागते. मोठय़ा संख्येने लोक गोळा झाले, त्या तुलनेने हे पथक लहान आणि शस्त्रसज्ज नव्हते. जमावाचे मानसशास्त्र जाणणाऱ्या त्यागींनी मग जलीसच्या घरापासून पोलीस वाहनापर्यंत त्याच्या खांद्यावर मित्रासारखा हात टाकून जणू काही विशेष झाले नसल्याची क्लृप्ती कशी केली आणि अतिशय अस्खलित ऊर्दूत बोलून जमावाला कसे शांत केले, हे सगळे वाचताना वाचकांना हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागते.

२००२ मधील गोध्रा जळित आणि नंतरची भीषण दंगल यांमुळे अस्वस्थ झालेला हनीफ त्या वेळी दुबईतल्या हिल्टनमध्ये इलेक्ट्रिशियन होता. तो आणि त्याची सालस बायको फहमिदा म्हणजे अगदी आदर्श जोडपे. हनीफ जेव्हा दुबई सोडून मुंबईत आला तेव्हा हे कुटुंब आपल्या दोन मुलींसमवेत अंधेरी पूर्वमधील चिमटपाडा येथील एका चाळीत गुण्यागोविंदाने राहात होते. शेजाऱ्यापाजाऱ्यांशीही हे जोडपे  शांत आणि मिसळून वागणारे होते. अशा या हनीफच्या मनात चाललेल्या जिहादच्या कल्पनांना फहमिदाने साथ देणे आणि तेही मुलींना सोबत घेऊन, हे निव्वळ अतक्र्य होते. अंधेरीला ३४० क्रमांकाच्या बसमध्ये सीटखाली बॉम्ब असलेली पिशवी अतिशय थंड डोक्याने सरकवून फहमिदा मरोळ मरोशी स्थानकाला उतरते, शांतपणे भाजी मंडईत जाऊन भाजी व काही किराणा सामान घेऊन घरी येते, संध्याकाळचा स्वयंपाक करते आणि दुपारच्या आपल्या कृत्याचे काय परिणाम झाले हे पाहण्यासाठी तितक्याच शांतपणे टी.व्ही. लावते.. हे सगळे वर्णन सुन्न करणारे आहे.

इतका विखार यांच्या डोक्यात कुठून आला, देशाविरुद्ध तर सोडूनच द्या, पण आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांना संपवून टाकणारे विष यांच्या डोक्यात कुणी भरले याचे विवेचन या पुस्तकात एकेक प्रकरणात केले आहे. प्रत्येक प्रकरणांना न्यायालयीन कागदपत्रांतील नोंदी, वृत्तपत्रांतील मजकूर, पोलीस नोंदी, प्रत्यक्ष वरिष्ठ पोलीस आणि चौकशी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा, त्यांचे महत्त्वपूर्ण इनपूट यांचा आधार आहे. आणि यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, प्रत्यक्ष या दहशतवाद्यांशी बोलून, त्यांचे मित्र-नातेवाईक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच वाचनीय झाला आहे.

‘सिमी’ ते ‘आयसिस’

२००९-१०च्या दरम्यान मध्य प्रदेशातील काही भागांत अचानक मोठय़ा प्रमाणावर सुरू झालेल्या बँक दरोडय़ांच्या घटनांनी पोलीस चक्रावतात. यामागे डोके असते ते आझमगडमध्ये जन्मलेल्या अबू फझलचे. मुंबईत वाढलेला आणि श्री गुजराती समाज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेला अबू सिमीशी जोडला गेला आणि बघता बघता सिमीतील मोठय़ा पदावर पोहोचला. संघटना चालवायची तर पसा पाहिजे, मग बँकांवर दरोडे घालण्याशिवाय पर्याय नाही. काफिरांची संपत्ती लुटायचा मुस्लिमांना अधिकार आहे असे कुराण आणि हदीथमध्ये लिहिले आहे, अशी अनुयायांची समजूत काढली आणि मग दरोडय़ांचे सत्र सुरू झाले. सिमीच्या तुरुंगातील साथीदारांवर जेल प्रशासन अन्याय करतंय या भावनेने सूडाने पेटलेला अबू हा इंदोर तुरुंगाचे अधीक्षक संजय पांडे यांच्यावर कसा डूख धरून बसतो, तसेच खांडव्याचा एक पोलीस हवालदार सीताराम यादव याला कट करून यमसदनाला पाठविले जाते याविषयीची माहितीही या पुस्तकात आहे.

खानापूर स्थानकावर आपल्या भावांबरोबर जंगलातून वेचून आणलेली फळे विकणारा लाडसाब तेलगी बेळगावच्या गोगटे महविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेऊन बाहेर पडलेला. पण नोकरीपेक्षा पटकन पसा कसा मिळेल या आशेने केलेल्या इमिग्रेशनच्या भानगडीत त्याने पहिलावहिला तुरुंगवास भोगला. तिथे भेटलेल्या रतन सोनी या महाठगाने त्याला मंत्र दिला- ‘क्राइम करना पडा तो चिल्लर पैसे के लिये नही, बल्की करोड रुपये के लिये करो’. तेलगीचे प्रकरण म्हणजे पोलीस दलातील अंतर्गत लाथाळ्या, राजकीय नेते व गुन्हेगारांचे लागेबांधे आणि सरकारचे एकूणच करोडो रुपयांचे नुकसान करणाऱ्या तेलगीसारख्या बदमाश व्यक्तीच्या जीवनाचा केलेला पर्दाफाश आहे. पोलिसांकडून तेलगीला दिली जाणारी रॉयल ट्रीटमेंट, सावंतसारख्या क्राइम ब्रांचमधील दबंग अधिकाऱ्याची पुढे या प्रकरणात झालेली वाताहत, रणजित शर्मा, श्रीधर वगळ या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर अटकेचा न भूतो न भविष्यती ओढवलेला प्रसंग हे वाचताना मन सुन्न होऊन जाते.

कल्याणच्या सर्वोदयसारख्या एका चांगल्या सोसायटीत राहणाऱ्या ईझाज बद्रुद्दीन माजीद या युनानी डॉक्टरला आपला मुलगा अरीब हा ‘इस्लाम बचाव’चा नारा देत थेट सीरिया गाठेल असे स्वप्नातही वाटले नसेल. दहावीत ८४ टक्के गुण मिळविलेला अरीब महाविद्यालयात दाखल झाला खरा, पण अभ्यासाऐवजी ‘आयसिस’वर संशोधन करणे त्याला आवडू लागले. त्याचे दैनंदिन जीवन बदलले. आपली आई व बहीण नोकरी करतात हे त्याला धर्माविरुद्ध वाटू लागले. पाहता पाहता मित्रमंडळी गोळा झाली. शाळा सोडलेला शाहीम टंकी आणि फाहद शेख, अमन तांडेल, अरीब माजीद असे अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे सर्व मुंबईतल्या राहत टूर्सच्या माध्यमातून पळून जाण्याचे नियोजन करतात. त्यासाठी पैसेही जमा करतात. या तरुणांची ही कहाणी वाचताना आपण अक्षरश: सुन्न होतो. आयसिस जगभरातून युवकांना आपल्याकडे आकृष्ट करताना सुंदर तरुणींचा उपयोग करते. अरीबलाही फेसबुकद्वारे अशीच एक ताहिरा नावाची युवती फेसबुकवरून मित्रविनंती पाठवते आणि मग त्यांच्यातले हे व्हर्च्युअल प्रेम कसे फुलते, अगदी पार लग्नापर्यंत कशा गोष्टी जातात, ताहिराचे फेसबुकवर कसे वेगवेगळे तीन प्रोफाइल असतात हे सगळं एखाद्या कथेप्रमाणे आहे. याच दरम्यान इकडे भारतात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) शांत बसलेली नसते. या मुलांचे असे अचानक गायब होणे आणि आयसिसमध्ये सामील होणे हा राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला असताना अरीब आणि त्याच्या मित्रांना तिकडे फिदायीन म्हणून काही कामे मिळतात, पण अरीबच्या लक्षात आता येऊ लागले असते की, आयसिसमध्ये भारतीयांना तुच्छतेची व कमी प्रतीची कामे मिळतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हळूहळू त्याला आपण कुटुंबाला सोडून आल्याचा पश्चाताप होऊ लागतो आणि मग इस्तंबूलमाग्रे तो मुंबई विमानतळावर पोहोचतो. हे सर्व लेखकाने अगदी प्रभावीपणे मांडले आहे. आयसिसकडे कशा हुशार तंत्रज्ञांचा गट आहे आणि समाजमाध्यमं हे त्यांचे प्रमुख अस्त्र ते कसे वापरतात यावर झैदी यांनी संशोधन करून अभ्यासपूर्ण लिहिले आहे. ही संघटना प्रत्यक्ष मनुष्यबळाच्या मदतीने एकीकडे मदानात लढते, तर दुसरीकडे त्यापेक्षाही अधिक प्रभावीपणे समाजमाध्यमांतून आभासी युद्ध खेळण्यात येते, हे वाचताना वाचकांना अधिक माहिती मिळते.

झैदी आणि सिंह यांनी हे सगळे पुस्तकबद्ध करताना ते कुठेही अतिरंजित किंवा उथळ होणार नाही याची काळजी घेतली आहे. प्रत्येक प्रकरणात माहिती अचूक, अधिकृत आणि विश्वासार्ह असेल यावर भर दिल्याने हे पुस्तक वाचताना गोष्टी वाचण्याचा आनंद तर मिळतोच, पण दुसरीकडे त्यातील भयानक वस्तुस्थिती समोर आल्याने आपण अस्वस्थ होतो.

‘डेंजरस माइन्डस्’

लेखक : एस. हुसेन झैदी/ ब्रिजेश सिंह

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठे : २२४, किंमत : २९९ रुपये

अनिरुद्ध अष्टपुत्रे  asht2007@hotmail.com

First Published on September 9, 2017 2:41 am

Web Title: dangerous minds book by hussain zaidi and brijesh singh