X

करण थापरांचं ‘रडगाणं’

करण थापर हे निव्वळ दरबारी पत्रकार आहेत, त्यांना पाचपोच नाही

करण थापर हे निव्वळ दरबारी पत्रकार आहेत, त्यांना पाचपोच नाही, त्यांनी पत्रकारितेची साधीसुधी मूल्यंसुद्धा मातीला मिळवलेली आहेत..  अशी टीका आत्ताच होण्याचं कारण म्हणजे, या थापर यांचं पुस्तक २५ जुलै रोजी समारंभपूर्वक प्रकाशित झालं. ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट: द अनटोल्ड स्टोरी’ हे या पुस्तकाचं नाव!

थापर यांनी अनेक मान्यवरांच्या मुलाखती ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ नावाच्या चित्रवाणी कार्यक्रमात घेतल्या होत्या. त्यापैकी काही मुलाखतींच्या मागच्या आणि पुढल्याही सत्यकथा या पुस्तकात आहेत. ‘भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना मी, त्यांचं नाव कधीच उघड करणार नाही असं आश्वासन दिलं’ असं एक वाक्य या टीकेच्या केंद्रस्थानी आहे! ज्याला गोपनीयतेचं- नाव उघड न करण्याचं- आश्वासन दिलं त्याचंच नाव थापर सांगताहेत. याला काय म्हणावं?

ज्याचं त्यानं ठरवावं हे; पण ठरवण्याच्या आधी, त्या संबित पात्रांचं नाव जिथं छापलंय ते अख्खं प्रकरण वाचावं. हे प्रकरण मोदींबद्दल आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे माजी मुख्यमंत्री. २००७ मध्ये  थापर यांच्या ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’मधली मुलाखत अध्र्यावर टाकून उठून गेलेले एकमेव राजकीय नेते आणि पहिलेच भारतीय. यानंतर दहा वर्षांनी, ‘मोदींनीच माझी गळचेपी चालवली आहे आणि म्हणूनच माझ्या चर्चा-कार्यक्रमांना भाजपचे मंत्री वा प्रवक्ते उपस्थित राहात नाहीत,’ असा आरोप थापर यांनी या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात केलेला आहे. त्या आरोपांचा आधार म्हणजे थापर यांनी सांगितलेली हकिगत आणि त्या हकिगतीचा भाग म्हणजे संबित पात्रा हे भाजप प्रवक्ते आणि लेखक पवन वर्मा यांनी दिलेली माहिती.

याच प्रकारे, अमिताभ बच्चनच्या मुलाखतीतला काही भाग (परवीन बाबी आणि रेखा यांच्याशी प्रेमसंबंध होते का, हा प्रश्न आणि त्यावर ‘नाही’ हे उत्तर) शोभना भारतीय आणि अमरसिंह यांच्या इच्छेखातर वगळावा लागला, हेही थापर यांनी लिहिलं आहे.

‘हे रडगाणं आहे’ म्हणून पुस्तक बाद करता येईल.. पण एक प्रकारे, भारतीय पत्रकार कसे बांधलेले आहेत, याचा लेखाजोखा मांडणारं आत्मकथन नाही का हे? – यावर मतांतरं असू शकतात. कदाचित, या पुस्तकाचं पुढेमागे याच पानावर परीक्षण आलं, तर तेही वादग्रस्त ठरू शकतं.