|| राहुल सरवटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रीय बुद्धिवादी परंपरेचा चिकित्सक वेध घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

आपल्या घोंगावणाऱ्या वर्तमानात धर्मव्यवस्था आणि धार्मिक ओळखी एका व्यापक व खोलवर पसरलेल्या अस्वस्थतेचं प्रतीक बनून गेलेल्या दिसतात. अशा काळात धर्म, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची विज्ञानवादी चिकित्सा करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर अनेकच प्रश्न उभे राहिलेले दिसतात. जोहान्नेस क्वॅक यांचं ‘डिसएन्चाटिंग इंडिया’ हे महाराष्ट्रातल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा (अंनिस) अनेक पदरी अभ्यास करणारं पुस्तक अशाच काही प्रश्नांचा वेध घेतं.

बहुजिनसी धार्मिकता आणि तिची ऐतिहासिक गुंतागुंत ही भारताच्या जागतिक प्रतिमेचा एक भाग आहे. जगाच्या नजरेत भारतीयत्व हे धार्मिकतेपासून अभिन्न नाही. याउलट क्वॅकभारताच्या बुद्धिवादी, विशेषत: नास्तिक परंपरेकडे अभ्यासकांचं लक्ष वेधू पाहतात. एकूण चार भागांत आणि १८ प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकाच्या केंद्रस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्णनात्मक (एथ्नोग्राफिक) अभ्यास आहे. क्वॅक यांनी अंनिस या बुद्धिवादी आणि परिवर्तनवादी संस्थेसोबत एक वर्ष घालवलं आणि वर्णनात्मक पद्धतीनुसार अंनिसविषयीच्या अनेक गोष्टींचं तपशीलवार वर्णन केलं आहे.

पुस्तकाचा पहिला भाग- पहिली चार प्रकरणे- उलरिक बर्नर, मॅक्स वेबर आणि चार्ल्स टेलर यांच्या धार्मिकतेविषयीच्या सैद्धान्तिक चर्चानी व्यापलेला आहे. मॅक्स वेबर या १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातल्या समाजशास्त्रज्ञाचा पाश्चात्त्य जगातल्या भारतीय धर्माच्या अभ्यासकांवर अतिशय प्रभाव पडला होता. ‘भारत हा धार्मिकतेचा उगम आणि आश्रयस्थान आहे. भारतीय समाज त्याच्या दैनंदिन जगण्यात एका (धार्मिक) संमोहनाने भारलेल्या उद्यानात विहार करत असतो’- अशा आशयाचं वेबरचं वाक्य उद्धृत करून क्वॅक भारताच्या समीक्षेची पाश्चिमात्य चौकट स्पष्ट करतात. मात्र, ही चौकट ओलांडून क्वॅक एका नव्या दिशेनं भारतीय धार्मिकतेची मांडणी करतात. ‘धार्मिकता’ (मोड ऑफ रिलिजिऑसिटी) या संकल्पनेच्या विरुद्धार्थी ‘अश्रद्धा’ (मोड ऑफ अनबिलीफ) या संकल्पनेचा ते वापर करतात.

दुसऱ्या भागात- प्रकरण ५ ते ९- भारतीय बुद्धिवाद्यांनी कल्पिलेल्या व्यापक अशा नास्तिक परंपराचा क्वॅक विचार करतात. या भारतीय बुद्धिवादी परंपरेत बुद्ध, चार्वाकांपासून ते आधुनिक काळातल्या राममोहन रॉय, महात्मा फुले, गो. ग. आगरकर, डॉ. आंबेडकर आणि एम. एन. रॉय अशा अनेकांचा समावेश होतो. इथे ‘कल्पिलेल्या’ म्हणण्याचं कारण असं की, नास्तिकता किंवा बुद्धिवादाचा आग्रह जरी या सर्वाच्याच विचारांत आढळत असला तरी त्यांच्यात काही मूलभूत म्हणता येईल अशी ठळक भिन्नता आहे. त्यांच्या विचारांतून एक सलग आणि अखंड प्रवाह काही प्रमाणात तरी ‘कल्पावा’ लागतो. या भागात, बुद्धिवाद ही युरोपीय उसनवारी किंवा पाश्चात्त्यांचं अंधानुकरण नसून तिला भारतीय वैचारिक आणि तात्त्विक इतिहासात खोलवरचा पाया आहे, हा बुद्धिवादी मांडणीतला मुद्दा पुन:पुन्हा अधोरेखित होतो. महाराष्ट्रातल्या धर्मसुधारणा चळवळी आणि त्यांचा व्यापक पाया असणारी वारकरी भक्ती परंपरा अशा बुद्धिवादाला अनुकूल असणाऱ्या घटकांनी महाराष्ट्रीय बुद्धिवादाची परंपरा आकाराला आणली, असं क्वॅक दाखवून देतात. त्यामुळेच अंनिसचे अनेक कार्यकर्ते तुकारामांचा ‘ऐसे कैसे जाले भोंदू..’ हा अभंग उद्धृत करताना क्वॅक यांना आढळले. अर्थात, तुकोबांच्या वा इतर संतांच्या निव्वळ बुद्धिवादाला अनुकूल अशा घटकांनाच अंनिस प्राधान्य देते, असं क्वॅक म्हणतात.

मात्र २० व्या शतकातल्या महाराष्ट्रीय बुद्धिवादाचा इतिहास या विचारवंतांच्या निव्वळ नामनिर्देशापेक्षा अधिक गुंतागुंतीचा आहे. या काळात र. धों. कर्वे, ग. य. चिटणीस आणि पुढील काळात लक्ष्मणशास्त्री जोशींसारखे रॉयवादी, प्रभाकर पाध्ये आणि दि. के. बेडेकरांसारखे मार्क्‍सवादी विचारवंत अशा अनेकांनी बुद्धिवादाची मांडणी केलेली आहे. १९३५ साली प्रभाकर पाध्ये आणि श्री. रा. टिकेकर यांनी संपादित केलेल्या ‘आजकालचा महाराष्ट्र’ या पुस्तकातलं पहिलंच वाक्य होतं : ‘महाराष्ट्रात बुद्धीशिवाय दुसरे काहीच पिकत नाही असे म्हणतात.’ सदानंद मोरेंनी दाखवून दिल्यानुसार, महात्मा गांधींना महाराष्ट्राने जो बहुव्यापी राजकीय आणि वैचारिक विरोध केला त्याचा आधारच महाराष्ट्र तीव्र बुद्धिवादी असण्याचा दावा होता. मात्र ही सगळी गुंतागुंत क्वॅक लक्षात घेत नाहीत.

नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखालची अंनिस आणि श्याम मानवांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोन बुद्धिवादी चळवळी त्यांच्या अभ्यासाचा अधिक मोठा आणि महत्त्वाचा असा तिसरा भाग- प्रकरण १० ते १६- व्यापतात. इथं क्वॅक यांनी अंनिसचं विस्तृत वर्णनात्मक परीक्षण केलेलं आहे. अंनिसचं मुख्य कार्यक्षेत्र नाशिक- कोल्हापूर- नांदेड या त्रिकोणात असल्याचं ते नोंदवतात. क्वॅक नांदेड आणि नाशिक या भागात अंनिसच्या उपक्रमांमध्ये सुमारे दोन महिने सहभागी झाले होते. ‘अंनिस ही एक लोकाभिमुख आणि लोकशाही मानणारी संघटना असून समाजाच्या तळागाळातल्या समूहाला बुद्धिवादच तारू शकेल यावर या संघटनेचा आणि तिच्या सदस्यांचा दृढ विश्वास आहे. अंनिसचं सामाजिक कार्य जरी ग्रामीण भागातही असलं तरी तिचा सामाजिक पाया मात्र शिक्षित, शहरी, वरिष्ठ जाती आणि मध्यमवर्गच आहे,’ असं क्वॅक यांचं निरीक्षण आहे.

‘अश्रद्धा’ या संकल्पनेच्या वापरातून, तसेच कार्यकर्त्यांच्या भाषणांतून आणि पुस्तकांतून सहज स्पष्ट होऊ  शकेल असं अंनिसचं तत्त्वज्ञान शोधण्याचा प्रयत्न क्वॅक करतात. त्यांच्या मते, या तत्त्वज्ञानाचे मुख्य घटक दोन : १) नैतिकता आणि ज्ञान यांच्या परस्परसंबद्धतेचा- म्हणजे ज्ञान हे नीतिभिमुख असायला हवं असा आग्रह; आणि २) संशयाची विचारधारा- जी अवैज्ञानिक कथ्याची कसून परीक्षा करेल. अश्रद्धेचं तत्त्वज्ञान अशा प्रकारे अंनिसच्या ‘विज्ञान, निर्भयता आणि नीति’ या बोधवाक्यातूनच योग्य प्रकारे व्यक्त होतं.

१७ व्या प्रकरणात क्वॅक अंनिसवरच्या दोन मुख्य आक्षेपांचा विचार करतात. पहिला आक्षेप काहीसा तात्त्विक आहे आणि तो अंधश्रद्धेच्या मध्यमवर्गीय चौकटीतल्या आकलनाबाबत आहे. हा आक्षेप आहे अकादामिक चर्चेत ‘उत्तर-वसाहतवाद’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या विचारपद्धतीचा. अर्थात, त्यांचा विरोध अंनिस या संस्थेला नसून त्यात अनुस्यूत असणाऱ्या आधुनिकतावाद आणि विज्ञानवादाला आहे. त्यांच्या मते, अंनिसची विचारधारा युरोपीय आधुनिकतेतून आलेल्या एकरेषीय (लिनिअर) सार्वकालिकतेला (युनिव्हर्सलिटी) शरण गेलेली आहे.

आणखी एक म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विज्ञानाचं अधिक चिकित्सक आकलन आवश्यक आहे. म्हणजे २० व्या शतकाच्या पूर्वार्धात श्री. म. माटेंनी ‘विज्ञानबोध’ संपादित केला होता. त्याच्या प्रस्तावनेत ते म्हणतात : ‘महाराष्ट्रातील शिक्षितांनी भौतिकशास्त्रांचा अभ्यास जोराने सुरू करायला हवा.’ ‘प्रयोगशाळेला शरण जा’, ‘यंत्र हेच वरदान’ आणि ‘विज्ञान हाच वेद’ यांसारखी परवलीची वाक्यं त्या काळात वापरली जात. मात्र या विज्ञाननिष्ठेची परिणती उलट आपल्या प्राचीन परंपरेच्या गौरवीकरणातच झाली. आज संपूर्ण महाराष्ट्र भौतिकीची आराधना करत असूनही वैज्ञानिकता आपल्या सांस्कृतिक जीवनात का झिरपली नाही, हे यावरून पुरेसं स्पष्ट होऊ  शकेल.

दुसरा आक्षेप आहे तो हिंदुत्ववादी संघटनांचा. त्यांच्या मते, अंनिसचा बुद्धिवाद हा मूलत: धर्मविरोधी आहे आणि तो हिंदू धर्माचा उच्छेद करण्यासाठीच कार्यरत आहे. इथे क्वॅक यांनी एक अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय : हिंदू मूलतत्त्ववादी मंडळी अंनिसशी कडाक्यानं भांडत असली तरीही त्या दोन्ही चळवळींचा सामाजिक पाया हा मराठी मध्यमवर्गच आहे आणि त्यामुळे त्यांच्यात अनेक गोष्टी समान दिसतात. त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे त्या दोघांच्याही मते, मागासलेल्या आणि अशिक्षित वर्गातल्या अनेक चालीरीती अत्यंत अनिष्ट आहेत आणि त्या नष्ट व्हायला हव्यात. इथं आता सुधारणा याचा प्रत्यक्ष अर्थ अधिकाधिक मध्यमवर्गीय होत जाणं असा होत जातो. १९ व्या शतकात बिस्कीट खाऊन बाटणारा हिंदू माणूस २० व्या शतकाच्या उत्तरार्धात, आदिवासी, भटके, देवदासी अशी लोकांची विभागणी मान्य करून त्यांचा विकास कसा करावा वगैरे म्हणू लागतो. आणि विकास म्हणजे काय, तर अधिकाधिक प्रमाणात या (इतर) लोकांना आपल्यासारखं करणं! यातूनच मग गणपतीवर श्रद्धा ठेवणं योग्य आणि यल्लमा आणि काळूबाई म्हणजे अंधश्रद्धा अशा संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेचं कुठलंही भान नसलेल्या आकलनचौकटी आकाराला येतात. अर्थात, हे साम्य निव्वळ मध्यमवर्गीय नैतिक चौकटीपुरतं मर्यादित आहे. एरवी, कट्टर हिंदुत्ववाद्यांकडून अंनिसला सोसावी लागलेली टीका अतिशय विखारी आहे.

आज विवेकाची कास धरून जाऊ  इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांला भय वाटावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे खरं. द. के. केळकरांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्राला ‘बुद्धिवादाचा ध्रुवतारा’ म्हटलं होतं. आज कदाचित महाराष्ट्राला ‘असहिष्णुत्वाचं केंद्र’ म्हणावं लागेल काय?

  • ‘डिसएन्चाटिंग इंडिया: ऑर्गनाइज्ड रॅशनालिझम अ‍ॅण्ड क्रिटिसिझम ऑफ रिलिजन इन इंडिया’
  • लेखक : जोहान्नेस क्वॅक
  • प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
  • पृष्ठे : ३७८, किंमत : सुमारे ४८ डॉलर

rahul.sarwate@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disenchanting india organized rationalism and criticism of religion in india
First published on: 25-08-2018 at 03:43 IST