X

निर्णायक भूमिका, अनिर्णीत वाद..

नोबेल समितीनेदेखील, त्यांनी इस्लामी जगताच्या केलेल्या विश्लेषणाचा विशेष उल्लेख केला होता

राजेंद्र येवलेकर

भारताविषयी पुन्हा पुन्हा लिहिणारे दोन लेखक.. एक मूळ भारतीय वंशाचा, इंग्लंडमध्ये राहणारा; दुसरा मूळचा स्कॉटिश आणि भारतात अधिक काळ घालवणारा.. एक वर्तमानातील माणसांकडे पाहून इतिहासाविषयी मतप्रदर्शन करणारा, तर दुसरा इतिहासाचे बारकावे पाहात वर्तमानाचा अर्थ लावणारा! या दोघांत वाद होणे साहजिकच होते; तसा तो झालाही. गेल्या शनिवारी निवर्तलेले ‘नोबेल’ मानकरी लेखक व्ही. एस. नायपॉल यांच्याविषयीच्या एका वादाला हा उजाळा..

२००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचा काळ. भाजपच्या ‘इंडिया शायनिंग’ची चर्चा सगळीकडे सुरू होती. त्यातच फेब्रुवारीच्या अखेरीस एकेदिवशी व्ही. एस. नायपॉल यांनी पत्नी नादिरासह दिल्लीतील भाजप कार्यालयास भेट दिली. इतकेच नव्हे, तर तिथे बोलताना त्यांनी हिंदू राष्ट्रवादास पाठिंबा दिला. बाबरी मशीद पाडण्याचेही त्यांनी समर्थन केले. नायपॉल यांनी केलेल्या भाजपच्या पाठराखणीमुळे मात्र नव्या वादाला तोंड फुटले. तसेही नायपॉल यांनी भारताविषयी लिहिलेल्या तीन पुस्तकांमुळे- ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ (१९६४), ‘इंडिया : अ वून्डेड सिव्हिलायझेशन’ (१९७७), ‘इंडिया : अ मिलियन म्यूटिनीज् नाऊ’ (१९९०) – भारतीय वाचकांचे त्यांच्याविषयीचे मत प्रतिकूलच होते. शिवाय त्यांच्या ‘अमंग द बीलिव्हर्स : अ‍ॅन इस्लामिक जर्नी’ (१९८१) आणि ‘बीयॉण्ड बीलिफ : इस्लामिक एक्स्कर्शन्स अमंग द कन्व्हर्टेड पीपल्स’ (१९९८) या दोन पुस्तकांमधून इस्लामी जगताचा त्यांनी घेतलेला वेध वादग्रस्त ठरला होताच.. आणि आता तर नायपॉल यांनी थेट बाबरी उद्ध्वस्तीकरणाचेच समर्थन केले होते. त्यामुळे त्याचे पडसाद वैचारिक जगतातून उमटणे स्वाभाविकच होते.

नायपॉल यांच्या विचारांची आणि त्यामागच्या वैचारिकतेची मुद्देसूद झाडाझडती घेतली ती इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी. लेखक म्हणून नायपॉल थोर असले तरी भारतातील हिंदू-मुस्लीम समाजेतिहासाचे त्यांचे आकलन फारसे परिपूर्ण नाही. त्यामुळेच भारताच्या घडणीत इस्लामचा मोठा वाटा आहे हे समजून घेण्यात नायपॉल कमी पडले, अशी टीका डॅलरिम्पल यांनी केली. त्या वेळी हा वाद चांगलाच गाजला.

दिल्ली भेटीत नायपॉल यांनी भाजपची भलामण करताना म्हटले होते की, ‘भाजप जे करीत आहे ते योग्यच आहे असे मला वाटते. अयोध्येतील वास्तूबाबत त्यांच्या (भाजप / हिंदुत्ववादी) काही तीव्र भावना असू शकतात. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीच्या ध्यासातूनच सर्जनशीलता जन्म घेत असते. त्यामुळे अशा ध्यासाला आपण पाठिंबाच द्यायला हवा!’ नायपॉल यांच्या या म्हणण्यावर डॅलरिम्पल यांनी आश्चर्य व्यक्त केले. खरे तर, नायपॉल यांनी त्याआधी कधी असे राजकीय दुराग्रहांचे धोके नजरेआड केले नव्हते. इराणमधील इस्लामी क्रांतीवर त्यांनी मांडलेले विचार हे त्याचे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. असे असताना अयोध्येबाबत मात्र त्यांनी अशी भूमिका घेणे धक्कादायक होते. बाबरी पाडावानंतर उसळेल्या दंगली आणि दूषित झालेले वातावरण पाहता नायपॉल यांनी केलेले समर्थन या दंगलींना आणि सामूहिक हत्याकांडांना मान्यता देणारे ठरते, अशी टिप्पणी डॅलरिम्पल यांनी केली.

या भेटीत नायपॉल यांनी ‘भूतकाळात रमू नका, पुढे जा’ असा सल्ला भाजपला दिला असला, तरी नायपॉल यांची मुस्लीमविषयक दृष्टी मात्र भूतकाळात रमणारीच होती. विशेषत: पहिला मुघल सम्राट बाबर याच्याविषयीचे त्यांचे मत. ‘बाबराच्या आक्रमणामुळे भारतावर खोल जखमा झाल्या,’ असे त्यांनी सत्तरच्या दशकात म्हटले होते. भारतातील मुस्लीम राजवटीविषयी त्यांनी पुढील काळात केलेली मांडणीही त्यांच्या याच मताचा विस्तार होता. १९९८ मधील एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते : ‘जेव्हा तुम्ही दहाव्या शतकातील वा त्याआधीची हिंदू मंदिरे भग्नावस्थेत पाहता तेव्हा पूर्वी येथे काहीतरी महाभयंकर घडून गेले आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. त्या आक्रमणाने भारतीय संस्कृती जखमी झाली. ते जुने जग.. प्राचीन हिंदू भारत उद्ध्वस्त झाला.’ नायपॉल यांनी ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’पासूनच हा धागा पकडलेला दिसतो. नोबेल समितीनेदेखील, त्यांनी इस्लामी जगताच्या केलेल्या विश्लेषणाचा विशेष उल्लेख केला होता. ‘इंडिया : अ वूंडेड सिव्हिलायझेशन’मध्ये त्यांनी मध्ययुगीन हिंदू राजवटीची राजधानी असलेल्या विजयनगरच्या भग्नावशेषांचा उल्लेख केला आहे. मध्ययुगीन सत्ताकेंद्र असलेल्या विजयनगरच्या सामर्थ्यांचे वर्णन त्यांनी केले आहे. मात्र, हिंदू संस्कृतीचा विध्वंस होण्यास त्या काळचे हिंदू राजे मुस्लीम सुलतानांच्या आक्रमणास तोंड देण्यासाठी सज्ज नव्हते, हे कारण असल्याचे नायपॉल यांनी म्हटले आहे. विजयनगरचे साम्राज्य लयास जाणे हा भारतावरचा मोठा मानसिक आघात होता. त्या जखमांमुळे भारताचा आत्मविश्वास कमी होत गेला, असे ते म्हणतात. इतकेच नव्हे, तर उत्तरेकडील ताजमहाल व इतर स्मारके ही जुलूमशाही व दडपशाहीची प्रतीके आहेत, असे त्यांचे मत होते.

मात्र डॅलरिम्पल यांच्या मते, नायपॉल यांनी भारतामधील इस्लामी इतिहास हा नकारात्मक दृष्टीने पाहिला आहे. त्यांची ही दृष्टी ब्रिटनमधील वसाहतवादी इतिहासाने ग्रासलेली होती. विशेषत: विजयनगरबद्दलचे नायपॉल यांचे विचार रॉबर्ट सेवेल लिखित ‘विजयनगर : अ फरगॉटन एम्पायर’ (१९००) या पुस्तकावर बेतलेले होते. या पुस्तकात ‘इस्लामी आक्रमणाविरोधात लढणारे हिंदू साम्राज्य’ असे विजयनगरचे वर्णन सेवेल यांनी केले आहे. हिंदू राष्ट्रवाद्यांनीही नेमकी हीच मांडणी उचलून विजयनगरला दक्षिणेतील हिंदू संस्कृतीच्या रक्षणाचे प्रतीक मानले होते. त्यामुळे भारतातील मुस्लीम राजवटींच्या इतिहासाविषयीचे नायपॉल यांचे आकलन इस्लाम भयातून साकार झालेले आहे, असा आरोप डॅलरिम्पल यांनी केला. ‘बीयॉण्ड बीलिफ’ या पुस्तकात नायपॉल यांनी ‘भारतीय मुस्लीम हे आयात केलेल्या धर्माचे गुलाम आहेत, अरेबिक भाषा समजत नसताना त्यांच्यावर इस्लामी संस्कृती लादण्यात आली’ असे म्हटले आहे. मात्र, त्या काळातही निजामुद्दीन वा अजमेर शरीफसारखी देशी श्रद्धास्थाने भारतीय मुस्लिमांमध्ये केंद्रस्थानी होतीच आणि देशी भाषांतही इस्लामी साहित्य विपुल लिहिले गेले याकडे नायपॉल यांचे दुर्लक्ष झाल्याचे डॅलरिम्पल दाखवून देतात. शिवाय मुघल सम्राटांच्या धार्मिक सहिष्णुतेचा, उदा. अकबर वा दारा शुकोह यांचा उल्लेखही त्यांच्या लेखनात येत नाही; मग अकबराचे हिंदू मंदिरांना मदत करणे वा दारा शुकोहने भगवद्गीता पर्शियन भाषेत नेणे नायपॉल यांच्या वाचकांना कसे कळणार! मिर्झा गालिबने ‘बनारस ही भारताची मक्का आहे’ असे म्हणणे किंवा मुघल वास्तुरचनेचा येथे पडलेला प्रभाव यांकडेही नायपॉल जाणीवपूर्वक डोळेझाक करतात, असे डॅलरिम्पल म्हणतात.

नायपॉल हे लेखक म्हणून मोठेच आहेत, परंतु त्यांच्या लेखनातील दिशाभूल करणारा तपशील लक्षात आणून देणे एवढाच आपला हेतू असल्याचे डॅलरिम्पल यांनी स्पष्ट केले होते. स्वत: नायपॉल त्यांच्यावरील कोणत्याही टीकेकडे ठरवून दुर्लक्षच करीत, त्यामुळे त्यांनी यावर स्वत:ची बाजूही मांडली नाही आणि हा वाद अनिर्णीत राहिला.

rajendra.yeolekar@expressindia.com