News Flash

कथा‘सार’

यंदाचे वर्ष वेगवेगळ्या कारणांनी गाजविणाऱ्या काही महत्त्वपूर्ण देशी-विदेशी इंग्रजी कथात्म साहित्याविषयी..

पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

यंदाचे वर्ष वेगवेगळ्या कारणांनी गाजविणाऱ्या काही महत्त्वपूर्ण देशी-विदेशी इंग्रजी कथात्म साहित्याविषयी..

सारी एकाग्रता हातातील गॅझेट्स आणि सारा मोकळा वेळ मनोरंजनाच्या जादूई दिव्याला वाहून घेणाऱ्या जागतिक साधारण वातावरणात वाचनसोस टिकवून ठेवणाऱ्या आणि लेखन व्यवहाराची जपणूक करणाऱ्या गटांमुळे आज साहित्य व्यवहार शाबूत आहे. नियतकालिकांचा आटत चाललेला पसारा आणि जाहिरात-वाचकसंख्येअभावी देशोदेशीच्या इंग्रजेतर साहित्यिक मासिकांचा आटपत चाललेला डोलारा यांमुळे ‘फिक्शन’ मरू घातले आहे काय, हा प्रश्न जगव्यापी होत चालला आहे. वेळीच लक्ष दिले नाही, तर प्रादेशिक भाषांतील साहित्यिक व्यासपीठांची घरघर पुढील काळात आणखी तीव्र होणार असली, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजीतून प्रकाशित होणाऱ्या कथात्म साहित्याला किमान काही काळ ओहोटी येणे अशक्य आहे.

विकीकोशाच्या अधिकृत आकडेवारीनुसार एकटय़ा अमेरिकेमधील साहित्यिक मासिकांची संख्या ३५२ आहे. २००२ ते २००८ या काळात शेकडो नियतकालिके बंद पडली असली, तरी २०१२ साली विविध विषयांवरील ७३९० नोंदणीकृत मासिकांचा आकडा २०१८ साली ७२१८ इतका भरगच्च होता. घरसजावटीपासून ते अमली पदार्थाची माहिती देण्यापर्यंत आणि गिटार शिकण्याच्या कलेपासून बागकामाची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या अशा विशिष्ट विषयांना वाहिलेली मासिके अमेरिकेत आहेत. अन् गंमत म्हणजे याच देशातून ‘टाइम’, ‘न्यू यॉर्कर’, ‘न्यूजवीक’ (ऑनलाइन), ‘हार्पर्स’, ‘अटलांटिक’ ही जगभरात विचार-माहितीची निर्यात करणारी नियतकालिके आणि ‘पॅरिस रिव्ह्य़ू’, ‘ऑक्सफर्ड अमेरिकन’, ‘द सन’, ‘काव्‍‌र्ह’ यांसारखी दर अंकागणिक लक्षवेधी मजकूर उभा करणारी साहित्यिक मासिके आहेत. ‘लिटररी हब’, ‘इलेक्ट्रिक लिटरेचर’ आणि किमान शेकडाभर ऑनलाइन व्यासपीठांची गर्दी आहे. या साऱ्यांचे एकगठ्ठा तुलनात्मक कार्य आहे, ते अमेरिकी फिक्शन जिवंत ठेवण्याचे! ताज्या पुस्तकांतील भलेबुरे ताबडतोब समोर आणून त्यांचे विच्छेदन होत असल्यामुळे वर्षभरामध्ये आलेल्या दोनशे पुस्तकांतून पन्नास खरेदीयोग्य पुस्तकांच्या जाणिवा वाचकांमध्ये तयार होतात. वाचकांचे हेच जाळे समाजमाध्यमांमध्ये आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करते. यांतून ताज्या लेखनाच्या वकुबावर सातत्याने घुसळण होत राहते. ब्रिटनमधील ‘इकॉनॉमिस्ट’ हे वृत्तलेख साप्ताहिक आणि ‘ग्रॅण्टा’ हे साहित्यिक नियतकालिक युरोप खंडापुरते मर्यादित न राहता जगभर वाचक राखून आहेत. ‘बीबीसी’ची कित्येक हजार पौंडांचे पारितोषिक असणारी कथास्पर्धा, राष्ट्रकुल देशांची कथास्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांपासून कथात्म साहित्यप्रेमींचे सारखेच लक्ष असलेल्या बुकर पारितोषिकामुळे देशोदेशीच्या लेखकांच्या डझनभर वेगळ्या पुस्तकांचा प्रचार जगभरामध्ये सारख्याच प्रमाणात होतो. तुलनात्मक विचार करायला गेल्यास आज मराठीमध्ये उरलेल्या नियतकालिकांची संख्या मोजायला एका हाताची बोटे अधिक होतात. (याच महिन्यात पुण्यातील एका नव्या मासिकाचा शेवटचा अंक निघाला आहे.) इथल्या ताज्या साहित्याच्या ‘संपन्न’तेवर किंवा दुखण्यावर बोलायला चार-दोन मासिकांनंतर केवळ फेसबुक हे एकमेव माध्यम आहे. अन् त्या सगळ्यांतून होणाऱ्या गंभीर चर्चेतूनही म्हणावी तितकी ग्रंथोत्तेजना साधली जाऊ शकत नाही.

जगभरातील नियतकालिकांमध्ये वर्षअखेर प्रकाशित होणाऱ्या सर्वोत्तम दहा पुस्तकांची यादी इंग्रजी वाचकांना दिशादर्शक ठरणारी असते. ‘टाइम’, ‘न्यू यॉर्कर’, ‘द गार्डियन’ आणि कित्येक साहित्यिकांनी प्रकाशित केलेल्या ऑनलाइन याद्यांमधील क्रमवारी बदलली असली, तरी वर्षांतील सर्वोत्तम पुस्तकांच्या निवडीबाबत बऱ्यापैकी एकवाक्यता दिसून येते. यात प्रामुख्याने व्यक्तिनिष्ठ विचारसरणीपेक्षा अधिक त्या पुस्तकाने जनमानसावर केलेला परिणाम, समाजमाध्यमांतून सामान्य वाचकांनी दिलेला कौल, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी परीक्षकांच्या कठोर छाननीमधून निवडली गेलेली पुस्तके यांचा समावेश असतो. यंदाचे वर्ष वेगवेगळ्या कारणांनी गाजविणाऱ्या काही महत्त्वपूर्ण देशी-विदेशी कथात्म साहित्याविषयी जाणून घेऊ या..

‘द फार फील्ड’ (माधुरी विजय) :

पहिल्याच कथेमुळे गाजणारे साहित्यिक फार कमी असतात. तिशीतील माधुरी विजय यांनी ते सहज साध्य केले आहे. मूळच्या बंगळूरुच्या असलेल्या माधुरी विजय यांनी अमेरिकेतील आयोवा येथून कथात्म साहित्यात पदवी मिळविली आहे. ‘नॅरेटिव्ह मॅगझिन’साठी काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेल्या ‘लॉरी राजा’ या कथेने अमेरिकेमध्ये अनेक नामांकित पुरस्कार पटकावले होते. दक्षिण भारतातील एका खाणीमधल्या मुर्दाड वस्तीमध्ये लॉरीचालक बनलेल्या तरुण पोराची ही गोष्ट चीनमधील ऑलिम्पिक खेळांसाठी बनविल्या जाणाऱ्या स्मारकापर्यंत जाऊन पोहोचते. जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘गुंतवळ’ या कथेची आठवण करून देणारी ही कथा एकाच वेळी स्थानिक आणि वैश्विक पातळीवर वाचनीय आहे. ‘लॉरी राजा’ या कथेमुळे या लेखिकेच्या या वर्षी आलेल्या ‘द फार फील्ड’ कादंबरीचे आंतरराष्ट्रीय साहित्यवर्तुळात स्वागत झाले. दक्षिण भारतातून काश्मीरमध्ये आलेल्या तरुणीचा भवताल तेथील स्थितीवर्णन आणि आपण सातत्याने अनुभवत असलेल्या राजकीय-धार्मिक घटनांशी जुळवत तयार झालेली ‘द फार फील्ड’ परदेशांत गाजली. दक्षिण भारतीय बुकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डीएससी’ पारितोषिकासाठी यंदा तिला नामांकनही मिळाले होते. आपल्या देशात कादंबरीचा अधिक बोलबाला झाला नसला, तरी या कादंबरीचे पाश्चिमात्य जगात बऱ्यापैकी कौतुक होत आहे.

‘किशॉट’ (सलमान रश्दी) :

पौराणिक, ऐतिहासिक कथानकांतील बीज घेऊन त्याआधारे आजच्या जगावर व्यंगात्मक टिप्पणी करणाऱ्या सलमान रश्दी यांचे या वर्षी आलेले ‘किशॉट’ हे त्यांच्या नेहमीच्या लक्षवेधी वैशिष्टय़ांना सामावून घेते. त्याचबरोबर समाजाच्या श्वासोच्छ्वासाला पकडण्याचा प्रयत्न करते. स्पॅनिश कादंबरीकार म्युगुअेल दी सर्वातिस यांच्या सोळाव्या शतकात प्रसिद्ध झालेल्या ‘डॉन किहोटे’ कादंबरीचे हे समांतरकालीन पुनर्लेखन आहे. इथला नायक जरी ‘किशॉट’ असला, तरी कथानकातला कादंबरी-पुरुष सॅम डुशॉ हा सुमार दर्जाचा अपयशी हेरकथा लेखक आहे. मुंबईत जन्मलेला आणि अमेरिकेत राहून टोपणनाव धारण करणाऱ्या या लेखकाने लिहिलेल्या हेर-रहस्यकथा किंचितही गाजलेल्या नाहीत. तरी ‘किशॉट’ नावाची एक व्यक्तिरेखा तो नव्या कादंबरीद्वारे घडवितो. ब्रेग्झिटमध्ये अडकलेले ब्रिटन, वंशद्वेशामुळे गोऱ्यांकडून कृष्णवंशीयांच्या नाहक हत्या वारंवार घडणारी प्रगत अमेरिका व नरेंद्र मोदींचे भाजप सरकार आल्यानंतर बदललेला भारत हे मुद्दे कथानकामध्ये बेमालूमपणे मिसळण्यात आले आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर स्वयंघोषित गोरक्षकांनी घातलेला हैदोस, आठ वर्षांच्या मुलीवर मंदिरात झालेला अत्याचार, बॉलीवूड गाजवून पुढे हॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या प्रियंका चोप्राचेही संदर्भ या कादंबरीमध्ये येतात.

‘गर्ल, वुमन, अदर’ (बर्नार्डिन एव्हरिस्टो) :

अनेक वर्षे लिहीत असल्या तरी आफ्रो-ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो यंदा बुकरच्या लघुयादीत स्थान मिळाल्यामुळे पहिल्यांदाच जगभरात चर्चेचा विषय झाल्या. स्पर्धेत असलेल्या मार्गारेट अ‍ॅटवूड यांच्या ‘द टेस्टामेण्ट्स’ कादंबरीसमवेत त्यांचे पुस्तक विभागून बुकरचे मानकरी ठरले. ब्रिटनमधील कृष्णवंशीय, त्यातही डझनभर स्त्रियांमध्ये चार आई, त्यांच्या चार मुली आणि या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या इतर चार महिला, अशा मिळून बारा जणींच्या गोष्टींनी एकत्र झालेले ‘गर्ल, वुमन, अदर’ हे वर्षांतील महत्त्वाच्या कथापुस्तकांमध्ये ओळखले जाते. मूळ आफ्रिकी देशातील प्रथा-परंपरांच्या पगडय़ातून मुक्त होऊन स्वातंत्र्य कमाविलेल्या महिलांनी लंडनमध्ये तयार झालेल्या नव्या मूल्य-जाणिवांचा डोलारा पुढल्या पिढीकडून मोडला जाण्याचा प्रवास जवळजवळ प्रत्येक कथेमध्ये आला आहे. इथल्या प्रत्येकाला उभे राहण्यासाठी आपापल्या पातळीवर तीव्र संघर्ष करावा लागला असून त्यात कुणीही मोडून पडलेले नाही.

‘एक्झेलेशन’ (टेड चँग) :

चिनी वंशाचे अमेरिकी लेखक टेड चँग नव्वदच्या दशकातील आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून विज्ञानकथा लिहीत आहेत. केवळ दीड डझन कथांच्या बळावर त्यांनी आजच्या विज्ञानकथा जगतामध्ये मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. ‘द स्टोरी ऑफ यूवर लाइफ’ या त्यांच्या कथेवर काही वर्षांपूर्वी ‘अरायव्हल’ हा चित्रपट आला होता. परग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या जीवांशी संवाद साधणाऱ्या भाषाशास्त्रज्ञाची ही गोष्ट चँग यांच्या सर्वोत्तम गोष्टींपैकी आहे. ‘एक्झेलेशन’ हा त्यांचा या वर्षांत आलेला नऊ कथांचा संग्रह बहुचर्चित कथासंग्रह म्हणून ओळखला जातो. यातील काही कथा पाच पानांच्या, तर काही शंभर पानांचा ऐवज असलेल्या आहेत. परग्रहवासी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भल्याबुऱ्या अवस्थेत पोहोचलेली मानवी समाजव्यवस्था यावर भाष्य करणाऱ्या यातील कथा आहेत.

‘सिंग टु इट’ (एमी हेम्पेल) :

सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये संपादक म्हणून गॉर्डन लीश हे नाव अमेरिकी कथाविश्वात परमोच्च स्थानी होते. आपल्याकडच्या ‘सत्यकथा’तील राम पटवर्धनांसारखे कथा ‘रिपेअर’ करण्यात निष्णात ही त्यांची ख्याती. फक्त त्यांना उपाधी दिली गेली ‘कॅप्टन फिक्शन’! या कथाशिपायाने दोन लेखकरत्ने घडविली. त्यात रेमण्ड काव्‍‌र्हर हे पहिले, तर एमी हॅम्पेल हे दुसरे नाव. या बुजुर्ग लेखिकेचा ‘सिंग टु इट’ हा कथासंग्रह या वर्षी प्रकाशित झाला. अतिशय कमी पात्रसंख्या, छोटी घटना आणि मर्यादित काळात परिणामकारक कथा लिहिण्यात या लेखिकेचा हातखंडा आहे. सहज-सोपी भाषा आणि खिळवून ठेवणारे विषय यांमुळे पहिल्या परिच्छेदापासून वाचकाला बोट धरून आत नेणाऱ्या गेल्या काही दशकांत मासिकांत आलेल्या कथा या संग्रहात एकत्रित करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:31 am

Web Title: domestic and foreign english fiction literature popular for different reasons zws 70
Next Stories
1 ‘सीईओ’ काय वाचतात?
2 सरत्या वर्षांतील ग्रंथखुणा..
3 कठीण समयाचे शुभ अर्थशास्त्र!
Just Now!
X