News Flash

आरमारी दरोड्याची थरारकथा…

मुंबईतील गव्हर्नर जॉन गेयरने इंग्लंडला पत्रे लिहून परिस्थितीचे गांभीर्य तपशीलवार वर्णन करून यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली.

‘एनेमी ऑफ ऑल मॅनकाइंड’ लेखक : स्टीव्हन जॉन्सन प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस पृष्ठे : २१७, किंमत : २,१४० रुपये

|| निखिल बेल्लारीकर

सतराव्या शतकातील एका आरमारी दरोड्याचा आणि त्यानंतरच्या, पहिल्या जागतिक स्तरावरील शोधमोहिमेचा भारताशी काय संबंध आहे?

प्रबळ राजसत्तेच्या नाकावर टिच्चून अनिर्बंध लुटालूट करणाऱ्या समुद्री चाच्यांच्या कैक कहाण्या मध्ययुगीन इतिहासात नमूद आहेत. अलीकडे ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबिअन’सारख्या प्रसिद्ध हॉलीवूडपटांमुळे मध्ययुगीन समुद्री चाच्यांचे विश्व काही प्रमाणात अनेकांना परिचित असले, तरी त्यांपैकी कैक गोष्टी आजही तितक्याशा प्रसिद्ध नाहीत. सन १६९५ साली ‘गंज-इ-सवाई’ या मुघल जहाजावर इंग्रज चाच्यांनी टाकलेल्या दरोड्याची कहाणीही त्यातच मोडते. इतिहासातील सर्वात मोठ्या रकमेचा यशस्वी नाविक दरोडा म्हणून ही घटना प्रसिद्ध असून, याच्या सूत्रधारास पकडण्याकरिता जागतिक स्तरावर मोठी शोधमोहीमही राबवण्यात आली. अमेरिकी लेखक स्टीव्हन जॉन्सन यांच्या ओघवत्या शैलीत ही कथा वाचणे हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

या दरोड्याचा सूत्रधार होता हेन्री एव्हरी नामक इंग्रजी माणूस. इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागातील डेव्हनशरमध्ये सन १६५९ साली एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. सन १६७० च्या दशकात तो रॉयल नेव्हीत रुजू झाला. यानंतर थेट १६९३ सालच्या आसपास अमेरिकेजवळच्या बम्र्युडा प्रदेशात तो गुलामांचा व्यापारी म्हणून कार्यरत असल्याची नोंद मिळते. १६९४ साली एव्हरीच्या कर्तृत्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तेव्हा इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक धनाढ्य गुंतवणूकदार आणि इंग्लिश संसदेचा सदस्य जेम्स हूब्लॉन याने त्याच्या परिचितांसमोर ‘द स्पॅनिश एक्स्पीडिशन’नामक एक महत्त्वाकांक्षी योजना मांडली. वेस्ट इंडीजमधील स्पॅनिश लोकांना काही शस्त्रे विकणे व अंतिमत: तेथील समुद्रात बुडालेल्या स्पॅनिश जहाजांवरील खजिना बाहेर काढून पैसा मिळवणे असे याचे स्वरूप होते. याकामी त्याने एकूण चार जहाजे व जवळपास २०० लोक जमवले.

हा ताफा इंग्लंडहून स्पेनला निघाला. तिथे ‘आ कोरुना’नामक बंदरात जहाजांनी नांगर टाकला. एकदोन आठवड्यांत तिथून निघण्याचा बेत होता. पण माद्रिदहून येणारी कागदपत्रे न आल्यामुळे तब्बल पाच महिने त्यांना तिथेच थांबावे लागले. त्याशिवाय कराराप्रमाणे खलाशांचा षण्मासिक पगारही न दिल्यामुळे त्यांच्यात असंतोषाचे वारे वाहू लागले. यातून सुटकेसाठी हेन्री एव्हरी आणि इतरांनी उठाव करून ‘दुसरा चाल्र्स’ हे जहाज बळकावण्याचा बेत केला. रात्रीच्या अंधारात शिताफीने ‘दुसरा चाल्र्स’ जहाज ताब्यातही घेतले. यानंतर एव्हरीने त्याला व उठावाविरुद्ध असणाऱ्या अन्य काहीजणांना एका बोटीतून पुन्हा बंदरात जायची परवानगी दिली. नंतरच्या न्यायालयीन सुनावणीत हा मुद्दा कळीचा ठरणार होता. या उठावाची माहिती मुळातूनच वाचण्यालायक आहे.

बंदरातून निघाल्यावर एव्हरीने अगोदर आपल्या सहकाऱ्यांसह लूट वाटून घेण्याचा एक आराखडा रचला. यात एव्हरीखेरीज सर्वांना लुटलेल्या कोणत्याही खजिन्याचा समान वाटा व एव्हरीला त्याच्या दुप्पट वाटा मिळेल असे सर्वानुमते ठरले. जायबंदी झालेल्या खलाशांना पेन्शन आणि विमा आदींसारख्या सुविधाही होत्या. अन्य प्रसिद्ध लुटारूंची समकक्ष उदाहरणे देऊन तत्कालीन रॉयल नेव्ही, ईस्ट इंडिया कंपनी आदी शासकीय संस्थांपेक्षा लुटारूंमधील अंतर्गत उतरंड ही बरीच सपाट असून, अंशत: कायद्याचे राज्यही असल्याचे जॉन्सन दाखवून देतात. बाहेर पडल्यावर एव्हरीने ‘चाल्र्स दुसरा’ जहाजाचे नामकरण ‘फॅन्सी’ असे केले व तो आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीकडे जाऊ लागला. तिथून मादागास्करच्या दिशेने एव्हरी निघाला. तिथून पुढे तांबड्या समुद्रातील जहाजांना लुटण्याचा त्याचा बेत होता.  मजल दरमजल करीत एव्हरीचे जहाज मादागास्करला पोहोचले. तिथे त्यांनी आणखी काही युरोपीय जहाजे लुटली व तांबड्या समुद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. सन १६९५ च्या पूर्वार्धात तांबड्या समुद्रात एव्हरीला काही अमेरिकी लुटारूही आढळले. त्यांनी त्याच्याशी युती केली. आता लुटारूंकडे एकूण सहा जहाजे व ४४० लोक होते. त्यांचे नेतृत्वही एव्हरीकडेच देण्यात आले.

सन १६९५ च्या सप्टेंबरमध्ये त्यांना काही व्यापारी जहाजांची बातमी समजेपर्यंत ती जहाजे रात्रीच्या अंधारात पुढे निघून गेली होती. पण अतिशय शिताफीने एव्हरीने त्यांच्या मागावर त्याची जहाजे नेली. जवळपास दहा दिवसांच्या तणावपूर्ण पाठलागानंतर एव्हरीला भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून जवळच धुक्यातून एक मोठे जहाज समोर दिसले. ते होते सुरतेतील धनाढ्य व्यापारी अब्दुल गफूरचे ‘फतह-इ-मुहम्मदी’नामक जहाज! तोकड्या मारगिरीनंतर ते जहाज एव्हरीच्या ताब्यात येऊन त्याला त्यात मोठा खजिना सापडला. जेम्स हूब्लॉनतर्फेच्या ‘स्पॅनिश एक्स्पीडिशन’मध्ये मिळणाऱ्या दोन वर्षांच्या पगाराइतके धन प्रत्येकाला एका झटक्यात मिळाले. यानंतर १० सप्टेंबर १६९५ रोजी एव्हरीला आणखी एका जहाजाची चाहूल लागली. हे होते ‘गंज-इ-सवाई’! प्रत्यक्ष औरंगजेबाच्या मालकीच्या या जहाजावर एक हजारापेक्षा जास्त लोक राहू शकत. त्याची भारवहनक्षमता दीडेक हजार टनांइतकी होती. त्यावर ऐंशी तोफा आणि शेकडो बंदूकधारी शिपाईही होते. हज यात्रा करून येणाऱ्या यात्रेकरूंसह व्यापाऱ्यांनाही यात आश्रय होता. मुघल राजघराण्याशी संबंधित काही स्त्रियाही त्यात होत्या. एव्हरीसाठी ही जवळपास अशक्य शिकार होती.

एव्हरीचे ‘फॅन्सी’ जहाज ‘गंज-इ-सवाई’जवळ आल्याबरोबर त्याने तोफांची मारगिरी सुरू केली. योगायोगाने तोफगोळ्याचा नेम मुख्य डोलकाठीवर नेमका बसून ती कोसळली, आणि प्रतिकारादाखल ‘गंज-इ-सवाई’कडून तोफ डागली जाण्याआधी अनपेक्षितरीत्या त्या तोफेचाच स्फोट झाला. यामुळे जहाजावर एकच कोलाहल माजून, एव्हरीच्या हाती हे प्रचंड मोठे घबाड आयतेच लागले. आजच्या हिशेबाने पाहता शेकडो कोटींचा मुद्देमाल लुटारूंना मिळाला. पण या चाच्यांनी लुटालुटीखेरीज जहाजावरील कैक स्त्रियांवर बलात्कारही केला. समकालीन युरोपीय साधनांत मात्र जहाजावरील मुघल राजकन्येने एव्हरीशी लग्न केल्याचा उल्लेख येतो. यात लुटारूंच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याचाच हेतू असावा, हे उघड आहे. जहाजांचा पाठलाग, प्रत्यक्ष लूट आणि त्यांवर आधारित साहित्याची संगती लावून विविध दृष्टिकोनांमागील पार्श्वभूमी जॉन्सन उत्तमरीत्या विशद करतात.

आता ‘गंज-इ-सवाई’वरील प्रवाशांनी सांगितलेल्या अत्याचारांच्या कहाण्या एका मुघल अधिकाऱ्याच्या कानी पडल्या. तो होता- इतिहासकार खाफी खान! त्याच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, ‘गंज-इ-सवाई’चा कप्तान इब्राहिम खानाचे मनोधैर्य डळमळीत झाल्याने प्रतिकारही विशेष झाला नाही. अब्दुल गफूरच्या ‘फतह-इ-मुहम्मदी’ जहाजातील लोक सुरतेस पोचल्याबरोबर त्यांच्याकडून ब्रिटिश चाच्यांनी केलेल्या अत्याचारांची माहिती घेऊन मुघल अधिकाऱ्यांसह सुरतेतील स्थानिकांनी तेथील कंपनीच्या वखारीला वेढा घातला. औरंगजेबापर्यंत ही बातमी पोचेतो लागणाऱ्या वेळामुळे वातावरण निवळेल, असा वखारप्रमुख सॅम्युअल अ‍ॅनेस्लीचा अंदाज होता. मात्र, दोनच दिवसांत ‘गंज-इ-सवाई’ जहाजावरील प्रवासीही सुरतेस कसेबसे पोहोचल्यावर अ‍ॅनेस्लीच्या अंदाजाच्या चिंधड्या उडाल्या. सुभेदार इतिमाद खानानेही अ‍ॅनेस्ली व इतर इंग्रजांना बेड्या घातल्या. याआधीच काही वर्षांपूर्वी कंपनी व मुघल संबंध व्यापारविषयक वाटाघाटी फिसकटल्यानंतर मोठ्या कष्टाने उभयपक्षी संबंध पुन्हा सुरळीत झाले होते. यथावकाश ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचवल्यानंतर त्याने सुरतेची वखार ताब्यात घेऊन, मुंबईवर पुनरेकवार हल्ला करण्याचा आदेश दिला. आता मात्र कंपनीला लुटारूंपेक्षा आपण वेगळे असून या लुटालुटीला आपले समर्थन नाही, हे दर्शवणे भाग होते. अन्यथा भारतातून त्यांना गाशा गुंडाळावा लागला असता.

मुंबईतील गव्हर्नर जॉन गेयरने इंग्लंडला पत्रे लिहून परिस्थितीचे गांभीर्य तपशीलवार वर्णन करून यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. यावर इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायसंस्थेकडून हेन्री एव्हरी आणि त्याच्या हाताखालील माणसांना ताब्यात घेण्याचे फर्मान सुटले. एव्हरीला पकडून देणाऱ्यास ईस्ट इंडिया कंपनीने कैक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.  आणि अशा प्रकारे एका माणसाच्या शोधार्थ जागतिक स्तरावरील पहिली शोधमोहीम राबवण्यात आली. इकडे अ‍ॅनेस्लीच्या डोक्यात वेगळेच राजकारण शिजत होते. औरंगजेबाने कंपनीला दिलेल्या आदेशानुसार, इत:पर भारतात राहायचे तर लुटारूंचा बंदोबस्त करण्याबरोबरच मुघल व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही टाकली होती. जॉन गेयरला पुरेशा पैशाअभावी यातील दुसरे कलम मंजूर नव्हते. परंतु अ‍ॅनेस्लीने गेयरला समजावून सांगितल्यावर अखेरीस गेयरने त्यास मान्यता दिली. भारतातून गाशा गुंडाळण्याची वेळ आलेल्या इंग्रजांसाठी हा मोठाच दिलासा होता. भारतातील इंग्रजांच्या इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग प्लासीच्या लढाईऐवजी हा असल्याचा लेखक जॉन्सन यांचा तर्क रोचक आहे.

सहभागी लुटारूंमध्ये हा अवाढव्य खजिना पूर्वनियोजित नियमाप्रमाणे शिस्तबद्धरीत्या विभागण्यात आला. लुटीनंतर एव्हरीने मादागास्करजवळील रियुनियन बेटाकडे कूच केले. त्याबरोबरचे पन्नासजण तिथेच राहिले. उरलेल्यांसह कॅरिबिअन प्रदेशातील बहामाज् बेटांकडे जाऊन, तिथे ‘फॅन्सी’ जहाज त्यागून सर्वांनी विलग व्हावे असे ठरल्यानुसार केप ऑफ गुड होपला वळसा घालून, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या हजारेक किमी पश्चिमेस खुल्या समुद्रातील असेन्शन बेटावर पोहोचले. काहीजणांनी त्या बेटावर राहणे पसंत केले. एव्हरीसह उरलेल्यांनी बहामाज्मधील न्यू प्रॉव्हिडन्स बेटाकडे मोर्चा वळवला. तिथे पोहोचल्यावर तेथील गव्हर्नर निकोलस ट्रॉटचा अंदाज घेऊन, त्याला ‘फॅन्सी’ जहाज आणि त्यातील काही धनही दिले.

एव्हरी व त्याच्या साथीदारांसमोर आता इंग्रज शासनाचा ससेमिरा चुकवण्याचे मोठेच आव्हान होते. न्यू प्रॉव्हिडन्समध्ये एव्हरीसोबतचे साताठ लोक राहिले. उरलेल्यांपैकी कैकजणांनी विविध अमेरिकी वसाहतींमध्ये जाणे पसंत केले. खुद्द एव्हरीसह वीसेकजण ‘सीफ्लॉवर’नामक लहान जहाजातून आयर्लंडच्या उत्तर भागातील डनफॅनगी बंदरात पोचले. कैकजण इंग्लंड व आयर्लंडमधील आपापल्या जन्मगावांत परतून निवांत राहू लागले.

एव्हरी व त्याच्या साथीदारांना पकडून देण्याकरिताच्या शोधमोहिमेचे पडसादही आता उमटू लागले होते. जॉन डॅन हा एव्हरीबरोबरचा एक खलाशी आयर्लंडहून इंग्लंडमधील रॉचेस्टरमध्ये असताना साफसफाई करणाऱ्या महिलेला त्याच्या कोटाचे वजन संशयास्पदरीत्या जास्त असल्याचे आढळले. तक्रार केल्यानंतर तब्बल हजारेक नाणी कोटात लपवल्याचे निष्पन्न झाल्याबरोबर रॉचेस्टरच्या नगराध्यक्षाने त्याला तुरुंगात टाकले. त्यानंतर आणखी काहीजण अन्य गावांमधून पकडले गेले. एकूण आठ कैद्यांना लंडनला आणले गेले. या कैद्यांना शिक्षा देऊन इंग्लंडला आपल्या न्यायप्रियतेची ग्वाही जगाला द्यायची होती. पूर्वीप्रमाणे अत्याचार करणे ब्रिटिशांना आता परवडणार नसल्यामुळे दृष्टिकोनात असा बदल आल्याचे जॉन्सन नोंदवतात.

लंडनमधील ओल्ड बेली इथे सन १६९६ च्या ऑक्टोबर महिन्यात कैद्यांना न्यायालयापुढे आणले गेले. कैद्यांना सुटकेची संधी न मिळता प्रचलित न्यायालयीन मार्गानेच फासावर लटकवण्याचा मुख्य हेतू होता. समुद्रावर लूटमार केल्याचा ठपका ठेवून, या गुन्ह््यामुळे कुणा एका व्यक्तीऐवजी राष्ट्रांना धोका पोहोचत असल्याने त्याची तीव्रता जास्त असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. जॉन डॅन आणि फिलिप मिडलटन या दोघांची प्रथम चौकशी करण्यात आली. त्यांनी उर्वरित सहाजणांवर ठपका ठेवला. आश्चर्यकारकरीत्या ज्यूरीने मात्र या सर्वांची सर्व आरोपांतून मुक्तता केली! या सर्वजणांना अखिल मानवजातीचे शत्रू घोषित करूनही असा निकाल येणे ही मोठीच नामुष्कीची बाब होती.

ही नामुष्की टाळण्याकरिता बराच खल झाला. जेम्स हूब्लॉनच्या स्पॅनिश मोहिमेवरील ‘चाल्र्स दुसरा’ या जहाजावर बंडाळी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर पुन्हा एकदा खटला भरण्यात आला. नव्याने झालेल्या सुनावणीत आठांपैकी पाचजणांनी स्वत: निर्दोष असल्याचे प्रतिपादन केले. जॉन डॅन आणि फिलिप मिडलटन या दोघांना पुन्हा एकदा सुनावणीकरिता बोलावण्यात आले. दोघांनी आ कोरुना बंदरापासून ‘गंज-इ-सवाई’च्या लुटीपर्यंत आणि त्यानंतरही बहामाज् बेटांपर्यंतची पूर्ण कहाणी सांगितली. बऱ्याच भवति-न-भवतिनंतर अखेरीस ही बंडाळी जाणूनबुजून स्वत:च्या मर्जीने केल्याचे, तसेच बहामातील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे दाखवल्यावर डॅन आणि मिडलटन वगळता उर्वरित सहाजण २५ नोव्हेंबर १६९६ रोजी फासावर गेले.

खुद्द एव्हरीचा मात्र कधीच थांगपत्ता लागला नाही. फिलाडेल्फियासारख्या वसाहतींमधून त्याच्या हाताखालील खलाशी उघडपणे ‘गंज-इ-सवाई’ लुटल्याची बढाई मारत असल्याचे तत्कालीन काही पत्रांत नमूद आहे. पुढे हळूहळू लुटारूंनीही तांबड्या समुद्राऐवजी कॅरिबिअनकडे लक्ष वळवले. मुघल सत्ताही कमकुवत होत गेली. मराठ्यांचा उदय झाला आणि अखेरीस फक्त पन्नाससाठ वर्षांत ईस्ट इंडिया कंपनीही प्रबळ बनली.

nikhil.bellarykar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 12:06 am

Web Title: dominant monarchy unrestricted looting stores medieval history famous hollywood movies like pirates caribbean medieval marine akp 94
Next Stories
1 होल्डिंग यांचे व्यथाख्यान…
2 मिळून नऊजणी…
3 ट्रम्पटिप्पणीनंतर ‘तो मी नव्हेच!’
Just Now!
X