अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक हरलेल्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना बदनाम करण्यासाठी, प्रचारकाळात त्यांची अनेक ईमेल ‘हॅक’ करून त्यातील तपशील फोडण्याची मोहीम रशियन हेरखात्यामार्फत राबवण्यामागे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात होता की नाही, हा वाद सध्या जोरात आहे. सध्या तरी ट्रम्प यांच्या पुत्रापर्यंत याचे धागेदोरे आले आहेत. अशा वेळी, याच विषयावरलं ‘हॅक’ नावाचं पुस्तक डोना ब्राझील या लिहीत असल्याची बातमी आली आहे.

हिलरींच्या राजकीय सहकारी, त्यांच्या पक्षातील ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी’ या कार्यकारिणीच्या माजी अध्यक्ष डोना ब्राझील या ‘वादळी व्यक्तिमत्त्व’ म्हणून ओळखल्या जातात. पण ऐन प्रचारकाळात वारे फिरले आणि एका फटक्यात अशी अनेक वादळं कोलमडलीच. ‘एफबीआयनं (अमेरिकी संघराज्यीय तपास संस्थेनं) मला चौकशीसाठी बोलावलं. तिथे त्यांच्या प्रश्नांमुळे या प्रकरणाची व्याप्ती माझ्या लक्षात आली. तिथनं निघाले, पक्षसमितीत माझ्या कार्यालयात पोहोचले आणि दार आतून बंद करून, मी आढय़ाकडे पाहात बसले.. एवढंच करू शकत होते मी तेव्हा!’ असं हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर काही दिवसांनी एका मुलाखतीत सांगणाऱ्या डोना आता पुस्तकातही हे अनुभव सांगतील. पण त्यांनी पुस्तक लिहायला घेतलं ते काही मी कशी खचले हे सांगण्यासाठी अर्थातच नाही.

पुस्तकात ‘प्रचार-काळातली रहस्यकथा, अनुभवकथन व भावी राजकीय दिशादिग्दर्शन’ हे सारंच समप्रमाणात असेल, असं पुस्तकासाठी डोना यांच्याशी करार करणाऱ्या ‘हॅचेट’ या प्रकाशनसंस्थेनं प्रसिद्धी-पत्रकात गुरुवारी म्हटलं आहे. अशी पत्रं एरवी गांभीर्यानं घेतली जात नाहीत; पण या पत्रकातले ‘भावी राजकीय दिशादिग्दर्शन’ हे शब्द महत्त्वाचे आहेत. आपल्या राष्ट्राध्यक्षांचं पुढे काय होणार, याची उत्कंठा आताच अमेरिकेत गेल्या आठवडय़ात (न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट यांनी हिलरी ईमेल-प्रकरणी केलेल्या गौप्यस्फोटांनंतर ट्रम्प-पुत्रानं स्वतच आणखी माहिती दिल्यामुळे) पसरू लागली आहे. अशा वेळी ‘ट्रम्प यांनी गंभीर गुन्हा केला. तो देशद्रोहापेक्षा कमी नाही’ असं काहीतरी सिद्ध करण्याची धडपड विरोधी पक्ष करणारच. ट्रम्प यांच्या ‘९ नोव्हेंबर’ या विजयदिनाच्या वर्षपूर्तीला प्रकाशित होणार असलेल्या पुस्तकाची धडपड अशीच आहे.